सौ अंजली दिलीप गोखले

?जीवनरंग ?

☆ पार्टी – भाग १ – लेखक : शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

मार्चचा महिना …..कडक उन्हाने सगळी जमीन भाजून काढली होती….तप्त उन्हाने यमाई पठारावरची हिरवळ जवळपास करपवून टाकली होती तरीही तिथल्या आजूबाजूच्या डेरेदार झाडांनी तिथला गारवा आणि निसर्गसौन्दर्य अजून टिकवून ठेवलं होतं…..नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले यमाई पठार पावसाळ्यात वेगवेगळ्या फुलांनी बहरून जायचे पण उन्हाळ्यात मात्र एखाद्या विस्तीर्ण वाळवंटासारखा त्या पठाराची दशा असायची…..तरीही आसपासच्या स्थानिक लोकांची तिथे बरीच रेलचेल असायची…  त्या थोड्या उंचीवर असलेल्या पठारावरून रात्रीच्या वेळी सगळ्या शहराचे एक विहंगम दृश्य दिसायचे…..त्यामुळे स्थानिक लोक तिथे रात्री पार्टी करण्यासाठी वैगेरे यायचे… त्या उंचीवर असलेल्या पठारावरून रात्री शहराचे दृश्य म्हणजे एखाद्या हॉलिवूड सिनेमात दाखवतात तश्या आकाशगंगे सारखे लूकलुकते दिसायचे….अनुपला तो एकांत आवडत असे तिथे तो अगदी तासन्तास बसून मित्रांच्या बरोबर रात्री गप्पा मारत असे…..अनुपच्या घरापासून यमाई पठार 10 km लांब होते त्यामुळे तिथे त्यांचे क्रिकेटचे सामने किंवा बर्थडे पार्टी होत असत…..पठारावर नगरपालिकेने दोन तीन मोठे लाईट्स आणि काही सिमेंटचे बेंच बसवल्यामुळे तशी रात्रीची कसलीच अडचण येत नसे…..

27 मार्च अनुपच्या मित्राचा म्हणजे प्रकाशचा वाढदिवस…..त्या दिवशी प्रकाशचा वाढदिवस मित्रांनी दणक्यात साजरा केला नेमका त्याच दिवशी अनुप काही कामानिमित्त बाहेर गावी गेला होता…..2 दिवसानंतर जेव्हा अनुप परत आला तेव्हा समोर प्रकाश दिसताच अनुपच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला. ‘भावा “पार्टी”??’

प्रकाशने सुद्धा हातात हात देऊन स्मितहास्य करून मंजुरी दिली आणि रात्री यमाई पठारावर “बिर्याणी पार्टी” चे नियोजन लागले…..साहजिक अनुप आणि प्रकाश दोघेच जाणार होते….दोघे अगदी लहानपणापासूनचे मित्र आणि वाढदिवशी वैयक्तिक पार्टी करण्याची प्रथा त्यांनी अगदी लहानपणापासून जपली होती..त्या निमित्ताने अनेक जुन्या गोष्टीना उजाळा मिळायचा….ठरल्या प्रमाणे दोघेही 7 वाजता कामावरून आले आणि आपल्या आवडत्या क्लासिक बिर्याणी हाऊस मधून मस्त गरमागरम बिर्याणी आणि फ्राय चिकनचा डबा भरून घेतला…..आणि दोघे तिथून निघाले….वाटेत मस्त गाडीवर गप्पा मारत 20 च्या स्पीडने त्यांची बाईक चालली होती…..छोटी छोटी वेडीवाकडी वळणे पार करत करत त्यांची बाईक यमाई पठाराकडे चालली……साहजिक एक रंजक विषय निघाला होता त्यात दोघांच्या हसत खेळत गप्पा रंगल्या होत्या….

यमाई पठार एक पर्यटन स्थळ होत॰ त्यामुळे सुरवातीलाच एक कमान उभारली होती……गावापासून 3 की.मी.  तर मस्त गप्पा रंगल्या होत्या पण जस ती कमान पार केली दोघेही काही वेळ अचानक शांत झाले….पार्टी करायला ते सारखे यमाई पठारावर जात होते पण आता मात्र काहीसं वेगळं वातावरण त्या दोघांना जाणवत होतं…हवामानात बदल होऊन उष्ण हवामान कोंदट पावसाळी असल्यासारखं भासत होतं…आजूबाजूच्या परिचित टेकड्यांनी आपले आकार,जागा,रंग सगळं काही बदललं होत….अनुपला हा बदल लक्षात आला होता पण त्याच्याकडे त्याने दुर्लक्ष केले होते….अचानक एका दुनियेतून दुसऱ्या दुनियेत प्रवेश करावा अस काहीसं वाटत होतं ती कमान म्हणजे त्या दोन वेगवेगळ्या दुनियांचा दरवाजा असेल कदाचित म्हणून तर तिकडून पलीकडे गेल्यावर अचानक आकाशातले तारे जणू गायबच झाले होते एक काळाकुट्ट अंधार आणि त्या अंधारात हेडलाईटीच्या दिव्याचा आधार घेत चालणारी बाईक….अनुपला तर कमालीचे अस्वस्थ वाटत होते कारण रोजच्या रहदारीतला हा रस्ता वेगळा वाटत होता… मानवनिर्मित बांधकाम त्या रस्त्याच्या आसपास कुठेच दिसत नव्हते…..रस्त्याच्या आजूबाजूला असणारी झाडे एकदम नाटकी वाटत होती एरव्ही यमाई पठार परिसरात जो थंड गार वारा वाहत असे तो वारा गायबच होता त्यामुळे न हलणारी ती झाडे एकदम नाटकी वाटत होती…..काहीतरी वेगळं आणि विचित्र वाटत होतं तिथे म्हणून तर त्या कमानीतून आत आल्यावर रंगलेल्या गप्पा अचानक बंद झाल्या…..अनुपला काहीतरी वेगळं वाटत होतं पण प्रकाश अगदीच शांत राहून गाडी चालवत होता हे बघून अनुप ने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला गदागदा हलवले.

“अरे पक्या…काय झालं एकदम शांत झालास??”

पाठीवर पडलेल्या हाताने प्रकाश भानावर आला.

“क…क…काय नाही. “

प्रकाशने विषय टाळला….नेमकं काय बोलावं प्रकाशला काहीच सुचत नव्हतं…..पठार जवळ येत होतं….प्रकाशचे नाटकी बोलणे आणि नाटकी हसू अनुप बरोबर ओळखत होता… सोबत अनुपला हे सुद्धा जाणवत होते की हा रोजचा रस्ता नाही…..काहीतरी वेगळं वाटत होतं….भकास शांत वातावरण आणि काळाकुट्ट अंधार…..बाजूची डेरेदार झाडे बाईकच्या लाईटीच्या उजेडात एखाद्या अक्राळविक्राळ राक्षसासारखी वाटत होती…आता झडप घेऊन गिळंकृत करायला तयार आहेत की काय अशी भासत होती त्यामुळे अनुप घाबरून समोर रस्त्यावर बघत होता आणि प्रकाशशी काहीतरी विषय काढून चर्चा करून त्या वातावरणावर हावी होण्याचा प्रयत्न करत होता….इतक्यात बाईकने पठाराचा चढ पार केला आणि ते दोघे मोकळ्या मैदानात आले…..हौशी लोकांची रेलचेल रात्री ही तिथे असायची पण आज त्या पठारावर कुणीच दिसत नव्हतं… नगरपालिकेने लावलेला स्ट्रीट लाईट मर्यादित उजेड देत होता त्या उजेडात सिमेंटचा बसायचा बेंच दिसत होता अनुपला थोडं हायसं वाटलं कारण मगापासून ना ना शंकांनी त्याच्या मनात वादळ उठवले होते…..त्यातल्या एका शंकेला, “हुश्शहह आपण यमाई पठारावरच आहोत. “ह्या वाक्याने मनोमन उत्तर दिले होते…..पण सिमेंटच्या बेंचच्या आजूबाजूची हिरवळ गायब होती तिथे काळे खडक दिसत होते….दोघेही थबकले पण काही न बोलताच त्या बेंच जवळ आले….पुढचा धक्का मात्र त्या दोघांना जबर बसला….अनुपने तर प्रकाशचा दंड धरला…..त्या बेंच जवळून रात्री पूर्ण शहर लकाकताना दिसत होतं ….पण आता मात्र सगळीकडे काळोख…काळोख आणि फक्त काळोख दिसत होता….दोघांनी सगळ्या बाजूला नजर फिरवली…खाली असलेल्या शहरात एकही लाईटीचा दिवा दिसत नव्हता….फक्त उतरतिला एक चमकणारा लाईटीचा बिंदू टेकडीवरून दिसत होता…….नेमका प्रकार काय चालू आहे दोघांच्याही लक्षात येत नव्हतं.

“अरे अन्या…..काय रं हे…..सगळीकडे अंधार भुडुक कसं काय??”

अनुपने थोडा वेळ विचार करत उत्तर दिले, “आरं पक्या…..शहरात लाईट गेली असलं बघ…हा…तसच असलं…नुकतीच गेली असलं….ते जाऊ दे आपण बिर्याणी खाऊन घेऊ…उगच गार व्हायची….मग मज्जा नाही येत खाण्यात….काय म्हणतो??”

प्रकाशची नजर अनुपच्या हातातल्या पिशवी कडे गेली वास्तविक लाईट जाऊन सगळीकडे अंधार पडणे आणि वरून एकही दिव्याचा उजेड न दिसणे हे प्रकाशला पटत नव्हते तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष करत,

“व्हय व्हय….आधी मस्त खाऊन घेऊ मग बघूया पुढचं पुढं.”

बिर्याणी पार्टी निम्मित्त दोघे ह्या पठारावर आले की एक दोन तास तरी बेंच वर बसून दोघांच्या गप्पा रंगायच्या…..आधी वेळ असायचा पण अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यानीं त्यांच्याकडून वेळ ओरबाडून नेला होता त्यामुळे दोघेही महिन्यातून एकदा पठारावर येऊन लकाकणार्‍या शहराकडे बघत मस्त निवांत गप्पा मारायचे.  बिर्याणी खाऊन घरी यायचे पण आता मात्र कसल्या तरी भीतीने त्यांना घेरलं होत….आपल्या शिवाय इथे अजून कुणीतरी आहे आणि त्या अंधारातून आपल्याकडे बघत आहे असा काहीसा समांतर भास दोघांना होत होता त्यामुळे दोघांनी डब्बा उघडला आणि काहीही न बोलताच बिर्याणी खाऊ लागले…..त्यांचे हात चालत होते…बिर्याणी खायचे ठरलेले औपचारिक काम आटपून इथून निघून काय पळून जावे अस दोघांनी मनोमन ठरवलं होतं…बिर्याणी खाताना त्यांच्या माना आपोआप सगळीकडे फिरून खात्री करून घेत होत्या……सळसळ जाणवू लागली…..कुणीतरी दबक्या पावलांनी त्यांच्या दिशेने येत असल्याचा भास दोघांना झाला त्यानुसार दोघांच्याही माना त्या अंधारात त्या आवाजाचा मागोवा घेऊ लागल्या.. लाईटीचा उजेड मर्यादित होता…..गडद अंधारात नेमकं काय चालू आहे काय आपल्या दिशेने येत आहे हे दोघांनाही कळत नव्हतं…..पण जे समोरून येत होतं ते बघून दोघांचाही घास हातातच राहिला…..चारी बाजूनी चार धिप्पाड कुत्री अगदी गुरगुरतच त्या अंधारातून बाहेर पडली….त्या चोघांचे एकत्रित गुरगरणे अनुप आणि प्रकाशच्या मनात धडकी भरवत होतं….नेमकी कुत्रीच होती की अजून काही?? असली भयानक कुत्री त्यांनी आयुष्यात कधीही पहिली नव्हती… काळे केसाळ चमकदार अंग पिवळेशार चमकदार डोळे आणि लांब सुळे दात….एखादी हिंस्र श्वापदे…..अनुप आणि प्रकाश प्रचंड घाबरले त्यांनी आपल्या बिर्याणीतले चिकनचे तुकडे त्यांच्या दिशेने भिरकावले… पण ते चारीही धिप्पाड कुत्रे त्या मासांच्या तुकड्याकडे न बघता गुरगुरत दबक्या पावलांनी दोघांच्या दिशेने येत होते….आता चारी दिशांनी त्या कुत्र्यांचे भुंकणे सुरू झाले आवाज अगदी घाम फोडणारा होता ती कुत्री ठराविक अंतरावरून भुंकत होती जराही जवळ येत नव्हती अंधारातून कुणाच्या तरी आदेशाचे पालन करीत आपला आवेश आवरत कधी पुढे मागे सरकत अविरत कर्कश आवाजात भुंकत होती…..दोघांच्याही अंगावर काटा आला….जास्त वेळ थांबणे म्हणजे त्या भयाण हिंस्र कुत्र्यांची शिकार होण्यासारखं होत….त्यामुळे दोघांनीही सगळं समान आहे असं टाकून बाईकला किक मारली….प्रकाशने गाडीचा स्पीड वाढवला…..गार वाऱ्यातही दोघांचे अंग घामाने भिजले होते आणि ती काळी हिंस्र कुत्री त्यांच्या गाडीच्या मागे लागली होती……रस्त्यावर पूर्ण अंधार होता बाईकच्या हेडलाईटच्या उजेडात समोरचा रस्ता आणि मागून त्या कुत्र्यांचे चमकदार डोळे आणि पांढरेफेक आसुसलेले दात स्पष्ट दिसत होते…..अनुपची नजर आजूबाजूला गेली….मगाशी जिथून आलो तो हा रस्ता नव्हताच….हा रस्ता वेगळा होता झाडेही पूर्ण वेगळी होती…डेरेदार झाडांची जागा आता उंच अश्या नारळीच्या झाडांची घेतली होती…..सगळं वातावरण क्षणार्धात बदललं होतं….टेकडीचा उतार गायब होऊन त्याची जागा एका सपाट न संपणाऱ्या रस्ताने घेतली होती….आजूबाजूला काही फलक दिसत होते पण त्यावरची भाषा मराठी नव्हतीच…कुठल्यातरी वेगळ्याच भाषेतले ते फलक अनपेक्षित होते….सगळं काही अनपेक्षित भयानक घडत होतं..गाडी अविरत धावत होती….रस्ता संपत नव्हता आणि ती कुत्री काही केल्या पाठलाग सोडत नव्हती…गाडी थांबवून त्या कुत्र्यांना हुसकावून लावण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलाच नाही…कारण थांबला की खेळच संपणार होता…अचानक मागून अनुप जोरात ओरडला, “पक्या…पक्या….ते बघ तिथं…तिथं घर दिसाय लागलं…चल लवकर तिथं!”

क्रमश: भाग १

लेखक : शशांक सुर्वे

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments