सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ आयेचा फोटु… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी

सकाळी झाडू मारायला गेली, तेव्हा 705 मधल्या मॅडमनी इडल्या दिल्या होत्या.

रखमानी त्या तेलावर परतून त्यावर तिखट-मीठ भुरभुरून सदाला दिल्या. सदा खूष झाला.

नाष्ट्याचं काम झालं.

दोन-तीन दिवसांपासून त्याचं सारखं चालू होतं ‘मोबाईल पायजे’. माजा समदा अभ्यास त्याच्यावरच असतुया.’ रखमाला काही कळंना. पैसे कुठून आणावं त्या मोबाईलसाठी. पर अभ्यास त्यावर असतो म्हणतुया. रखमानं परोपरीनं त्याला समजावलं. दिवाळीपत्तुर दम धर. दिवाळी मिळंल त्यातनं बघते.

पण त्याला काही पटत नव्हतं. त्याची आदळ-आपट अन् अबोला, यामुळं रखमा मनातून कष्टी होती. रोज कुणी काही शिळं पाकं द्यायचं त्यावरच दोघांचं भागायचं. आज दुपारी त्याला ताजी भाकर करून द्यावी, लेकराला जरा बरं वाटंल असं ठरवून रखमा पुढच्या कामाला गेली. सारी सोसायटी झाडायची म्हणजे तिला बराच वेळ व्हायचा. पण आज रविवार.

शाळेची सुट्टी. त्यामुळे आज तिनं भाजी-भाकरीचा बेत ठरवला होता.

कामावरून येतांना भाजीला पाच रुपयांचा पाला घेऊन आली. भराभरा पाला फोडणीला घातला. भाकरी थापली न् सदाला हाक मारली. ‘‘ये रं पोरा. ज्यवायला ये. ताजी भाकर केलिया तुझ्यासाठी. माझ्या सोताच्या हातानं. आपल्या घरात. ये माझ्या राजा.’’

सदानं हू, की चू केलं नाही. जेवायलाही आला नाही. रखमानं उठून पाहिलं, तर फुरगंटून बसला होता. तिच्याकडं बघायलाही तयार नव्हता. रखमानं लाख मिनतवार्‍या केल्या, पण तो काही बधला नाही. शेवटी तणतणत पाय आपटत खोपटातनं निघून गेला.

रखमाच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. कधी नव्हं ते घरला ताजी भाकरी केली.

लेकरासाठी. पण त्यानं ती शिळीच केली. शिळी करून बी खायचं नाव नाही. रखमानं डोळ्याला पदर लावला. तिच्या तरी घशाखाली घास कसा उतरणार? त्या दिवशी दोघंही उपाशीच झोपले.

रखमाला त्या भाकरीकडं पाहून राहून राहून दुःखाचे कढ येत होते. पोरासाठी जीव तुटत होता. त्याचा बाप गेल्यापासून रखमानं तळहाताच्या फोडासारखा जपला होता पण पैश्याची सोंगं ती कुठून आणणार? पोरगं हट्टापायी जिवाला त्रास करून घेतंय म्हणून तिला वाईट वाटायचं.

आज तर अबोलाच धरून बसला होता.

दुसर्‍या दिवशी शाळेत गेला तोही उपाशीच. आला तो ओरडतच. ‘‘आये, मपले शाळेचे कपडे धून ठीव. उद्याच्याला कारेक्रम हाय शाळत.’’

‘‘कसला रं?’’

‘‘मला न्हाय म्हाइत. पर गांधीबाबाचं काय तरी हाय!’’ पर कापडं चमकून ठीव झाक.

दोन ऑक्टोबरचं स्वच्छता अभियान होतं शाळेत. बरं बरं म्हणून रखमा उठलीच.     कालचा राग सोडून पोरगं दोन शब्द बोललं म्हणून रखमा हुरळून गेली. तिनं डाळ-भात शिजवला. त्यानंही मुकाट्यानं खाल्ला. रखमाचा जीव भांड्यात पडला.

दुसर्‍या दिवशी दुपारी चार वाजता रखमा समोरची सोसायटी झाडून आली तर सदा धावत आला. ‘‘चल शाळेत चल. लौकर चल’’ असं म्हणून ओढतच तिला शाळेत घेऊन गेला.

अंगावरच्या मळक्या पातळातच तिला ओढून शाळेत घेऊन गेला.

शाळेत सगळी पोरं पटांगण साफ करत होते. मास्तर लोकही पोरांना सांगून साफसफाई करून घेत होते. पाहुणे, पुढारी आलेले होते.

सदानी आईला मास्तरांसमोर उभं केलं. रखमाचा जीव लाजेनं कांडकोंडा झाला. मास्तरांनाही कळंना. कोण आहे ही? कशाला आली आहे? त्यांनी सदाला विचारलं, ‘‘काय रे सदा, कोण आहेत ह्या? कशाला आणलंस त्यांना?’’

‘‘मास्तर, मपली आय हाय ती.’’

‘‘कशाला आणलंस शाळेत आईला? आज पालकांना नाही बोलावलेलं.’’

‘‘मास्तर का न्हाय बोलावलं मपल्या आयेला आज? आज तिचा खरा मान हाये. म्हून म्या आणलंय तिला फोटू काढाया.’’

‘‘काय? कसला मान? कसला फोटू?’’

‘‘आज शाळेत स्वच्छता… (अभियान) चालू हाय ना?  त्यासाठी आणलंय आयला. त्या फोटुग्राफरला सांगा आयेचा फोटो काढाया लावा त्येंना.’’

लाज-शरमेनं रखमाचा जीव पाणी पाणी झाला. ‘‘हत् येड्या. मपला कसला फोटु?  येडा का खुळा? सोड मला. जाऊं दे घरला. अजून सारी सोसायची झाडायची हाय मागली.’’

‘न्हाय-न्हाय, मी तुला जाऊन देणार न्हाय. रोज सारा जनमभर झाडत असतीया. मंग तुझाच फोटु काढाय पायजे. हे सगळे काय रोज झाडतात का कधी? तुझ्यावाणी? नुसता हातात झाडू घेऊन फोटु काढत्याती अन् पेपरात देतात.

सूज्ञ प्रेस फोटोग्राफरला इथं काही तरी बातमी दिसली. त्यानी लगेच रखमाच्या हातात झाडू दिला अन् तिचा फोटो काढला.

दुसर्‍याच दिवशी झाडझूड करताना आमदार साहेबांच्या फोटोशेजारी रखमाचाही फोटो छापला होता. ‘विशेष’ मधे. खाली लिहिलं होतं- ‘‘सत्कार्यासाठी फोटो – अन् फोटो हेच सत्कार्य’’

शाळेतही नोटीस बोर्डवर तो पेपर लावला होता. सदानं धारिष्ट्यानं सरांना तो पेपर मागितला. सरांनी शाळा सुटल्यावर सदाला तो पेपर दिला. सार्‍या वस्तीत तो पेपर दाखवत

सदा धावत सुटला.

‘‘मपल्या आयेचा फोटु पेपरात. बघा-बघा आयेचा फोटु. मपल्या आयेचा फोटु.’’

हसता-हसता डोळे पुसून रखमाचा पदर ओला झाला.

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments