श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ धाकलं काळीज काढून देताना…! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
बापाचं काळीज! पाषाणासारखं कठीण असतं असं लोक म्हणतात. आणि तसं दिसतंही लांबून पाहणाऱ्याला. या पाषाणाच्या अंतरंगात झुळझुळु वाहणारा झरा जर स्पर्शायचा असेल तर या काळजाच्या आत हात घालावा लागतो.
देवानं माणसाला एकच काळीज दिलेलं असलं तरी आई-बापांना जितकी मुलं, तितकी काळजं दिलेली असतात. आणि ह्या काळजांना काळजीची काजळी सतत काळवंडत असते! मुलांच्या हृदयाची स्पंदनं जितकी आनंदाची तितकी ही काळजं सुपाएवढी होतात. यांना थोडा जरी धक्का लागला ना, इजा झाली ना, तर आई-बापाच्या काळजात कळा उठतात!
आपण गोकुळचे नंदराजा नसू, नसू आपण यशोदा… पण आपलं घर म्हणजे गोकूळ आणि या गोकुळातले तान्हे आपले कृष्ण-बलराम! ही जोडी आयुष्यातल्या संकटाच्या कंसावर एक न एक दिवस चालून जाईल, हे माहीत असतं जीवाला! त्यांच्या सामर्थ्याचा अदमास असतोच…. पण मनात भीतीचा एक अनामिक काटाही रुतत असतो…. जगात कंस एकटा नाही आणि कंस जगात एकच नाही!
कुणी सांगितलं नव्हतं बाळकृष्णाला की तुला कंसाचा नि:पात करायचा आहे, त्यासाठीच तुझा अवतार! पण गोकुळातल्या गोपांसवे गाई चारायला घेऊन जाऊ लागल्यावर कान्हाला जग समजू लागलं.
मथुरेला दूध घालायला निघालेल्या गोपिकांच्या खोड्या काढण्याचा आगाऊपणा हा केवळ दूध-दही-लोणी चोरण्यासाठी नव्हता…कन्हैयाला गोकुळातलं दूध राक्षसांसाठी देणं नको होतं!
माझा कृष्ण असाच आपल्या देश नावाच्या गोकुळाच्या शत्रूविरुद्ध, मथुरेच्या सीमेवर दंड थोपटून नुकताच उभा राहिला होता. जायचंच म्हणाला तेंव्हा त्याला मी ‘नाही’ म्हणू शकलो नाही. सिंहांचा बछडा थोडाच कुणाला विचारून झेप घेतो सावजावर?
माझा बछडा असाच निर्धास्त होता. आज आहोत तर उद्या नसूही शकतो याचा विचार पक्का असलेला. पण जोवर असू तोवर आपल्या असण्याला अर्थ प्राप्त करून देण्याचा निश्चय तर होताच त्याचा.
सैनिकाच्या काळजात गोळी सुसाट वेगाने घुसते ना… तेंव्हा त्या गोळीच्या व्यासाएवढंच छिद्र दिसतं बाहेरून… पण आतमध्ये जगणं विदीर्ण झालेलं असतं…. जीवनाला भगदाड पाडून ती गोळी जणू काहीही झालं नाही असं भासवत आरपार निघून जाते. तर कधी हट्टानं त्या काळजातच रुतून बसते. तसं होतं सैनिकाच्या बापाचं काळीज. आईचा आक्रोश सवयीचा झालाय आपल्या. पण बापाचं मूक रूदन कानांवर रेघोट्या नाही मारत कुणाच्या.
आमचा लेक, आमचा यश म्हणायचा फौजेत जायचंय, रुबाबात आणि शिस्तीत जगायचंय बिनधास्तपणे… देशाच्या दुश्मनाच्या छाताडात रायफल मधली मॅगझीन रिकामी करायचीये! दुश्मनाच्याही हाती रायफल असते,तिच्यातूनही गोळ्या सुटतात याचा विचारही त्याच्या मनात नसायचा!
तरूण रक्त असंच तर असतं… सळसळतं… स्वत:च्या प्रवाहात सारं काही वाहवून घेऊन जाण्याच्या ताकदीचं… एखाद्या त्सुनामीसारखं.
या रक्ताला थांबवणारा मी कोण? माझ्याही जवानीत माझेही हात सळसळत होतेच की. पण तो योग नव्हता. पोरगा माझ्याच डोळ्यांनी सीमेचे रक्षण करणार होता तर मग मी कशाला मध्ये येऊ. “जा,पण जपून रहा” एवढंच तर म्हणू शकतो बाप! आई “जा” असं नाही म्हणू शकत कधी. “लवकर ये… नीट ये” असं मात्र म्हणत राहते आसवांतून…. त्याला निरोप देताना.
रडण्याची परवानगी नाही बापांच्या डोळ्यांना. या डोळ्यांनी फक्त बघत राहायचं आणि जागत राहायचं… बंद पापण्यांच्या आडोशानं!
रात्री-अपरात्री फोन येऊ शकतो म्हणून सावध झोपायची सवयच होऊन जाते सैनिकांच्या घरच्यांना. हा अनुभव घेऊ लागायला आम्हाला एकच तर वर्ष झालं होतं. थोड्याशा शेतीवर गुजराण करत होतो आम्ही. दोन मुलं आणि दोन मुली.
यश जवान झाला आणि आणखी जवान व्हायचं स्वप्न पाहू लागला. गावातले दोन जण होते फौजेत. त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकीन म्हणायचा. देशाला सैनिक शेतांतूनच तर मिळतात… मातीत राबणारी शरीरं प्रसंगी मातीत मिसळून जायलाही मागे-पुढे पहात नाहीत. यश शेतात काम करता करता लष्करात भरती होण्यासाठीची धूळपाटी गिरवायचा.
अठरा वर्षांचं कोवळं पोर ते…. पण खानदेशच्या भलत्या उन्हात घाम गाळायचं. झाला भरती. गेला ट्रेनिंगला. त्याला गाडीत बसवून देताना हिला तर काही सुचत नव्हतं. गावात अर्धा भाकरतुकडा मिळत होताच की. पोरगं नजरेसमोर राहिलं असतं… पण त्याच्या नजरेसमोर शौर्य उभं होतं… नोकरी नव्हती फक्त.
ट्रेनिंगवरून आला तो यश आमचा नव्हताच… देशाचा झाला होता. बारीक कुडी.. पण डोळ्यांत आणखी चमक. ताठ चालणं आणि थेट बोलणं. आमच्या घराण्यातला पहिला शिपाईगडी म्हणायचा यश! त्याच्या बोलण्यातूनच सैन्यातले शब्द आमच्या कानांवर पडले…. युनिट, बटालियन, पोस्ट, ऑपरेशन… आणि बरंच काही.
त्याची आई त्याला म्हणायची… “सांभाळून रहा…” तो म्हणायचा “देश सांभाळायला मिळालाय…. देशच आता मला सांभाळेल.”
कश्मिरात लागली ड्यूटी पहिल्याच वर्षी. तीन महिन्यांपूर्वीच सुट्टीवर आला होता. म्हणाला एखादे दिवशी तुम्हांला फिरवून आणेन भारताचा स्वर्ग… कश्मिर!
सा-या गावाचा निरोप घेऊन गेला…. ”जातो आई!” म्हणाला… आई म्हणाली “अरे, येतो म्हणावं.” म्हणाला, “ते काय सैनिकाच्या हातात असतं?” गेला..!
भ्याड हल्ल्याला वाघही बळी पडतात कधी कधी. अन्यथा यश एकटा नसता गेला. समोरासमोर शत्रूशी गाठ पडली असती तर…. दोघं-तिघं अतिरेकी तर त्यानं नक्कीच सोबत नेले असते…. त्यांना नरकापर्यंत पोहोचवायला, आणि मगच ताठ मानेनं प्रवेश केला असता त्यानं स्वर्गातल्या हुतात्म्यांच्या जगात!
२६ नोव्हेंबर २०२०. दुपारी बातमी आली. गावकऱ्यांना आधी समजलं होतं काय झालं ते… आमच्या म्हाताऱ्या काळजांच्या काळजीनं लोकांनी लवकर नाही येऊ दिले ते शब्द आमच्या कानांवर. आमचं यश नावाचं काळीज जळून गेलं होतं… पण त्या ज्वाळा चंदनाच्या होत्या…. त्यातून शौर्याचा, देशभक्तीचा सुगंध पसरला होता आमच्या रानोमाळी!
“शहीद यश देशमुख अमर रहे” च्या घोषणा अजून तशा ताज्याच होत्या गावातल्या वाऱ्यात…. सारा देश उभा होता पाठीशी… यशने आमच्यासाठी खूप काही करून ठेवले होते…
दु:खाचे कढ काळाच्या फुंकरीने थोडे थंड होऊ लागले होते… तेवढ्यात दुसरं काळीज जागेवरून हललं. म्हणालं…. “दादाचं स्वप्न पुरं करायचंय… मी ही जातो!”
ही मनातून म्हणाली असेल.. “तू जाशील तर आम्ही कुणाकडं पहायचं?” आणि मग तिला आठवलं असेल की यश गेल्यानंतर देश आपल्या पाठीशी कसा उभा राहिला ते! देशसेवा, आणि ती ही सैनिक बनून करायला मिळणे हे फक्त निवडक रक्ताचं भाग्य. इतर जीव विविध कारणांनी मृत्यूमुखी पडतात पण सैनिकाच्या मुखावर मृत्यूच्या भयाचं नामोनिशान नसतं… हा तर स्वर्गाचा राजमार्ग!
धाकटा पंकज म्हणाला, “दादाचं स्वप्न पुरं करायचंय! गेलं तर पाहिजेच! कृष्ण गेला तरी बलराम आहे की अजून!”
सारं बळ एकवटलं वाणीत… म्हणालो.. .”जा…की! तुला कोण अडवणार. दादाचं राहिलेलं काम भावानं नाही हाती घ्यायचं तर कुणी? कृष्णाचा नांगर बलरामच हाती घेणार ना!
“सांभाळून रहा!” आम्ही दोघंही पंकजला म्हणालो… यशला म्हणालो होतो तसं. तसबीरीतला यश बघत असावा आमच्याकडे! आता आमचं धाकलं काळीज सीमेवर उभं आहे!
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव मधील सामान्य शेतकरी दिगंबर देशमुख आणि सुरेखाताई देशमुख यांचा थोरला लेक यश श्रीनगर मध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याच्या टेरोटोरीयल आर्मीच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीम’चा सदस्य होता. २६ नोव्हेंबर,२०२० रोजी श्रीनगर मधील खुशीपोरा भागात ही टीम बंदोबस्तासाठी नुकतीच तैनात होत असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर लपून छपून गोळीबार केल्याने शिपाई रतनसिंग आणि शिपाई यश देशमुख धारातीर्थी पडले.
यशचे वडील दिगंबरदादा आणि मातोश्री सुरेखाताईंनी हा आघात झालेला असतानाही केवळ तिसऱ्याच वर्षी आपला धाकटा लेक पंकज यास सैन्यात धाडले… केव्हढे हे धाडस!
एकुलता एक मुलगा सैन्यात धाडलेले अनेक आई-बाप आहेत. त्यांना त्रिवार वंदन. एकुलता एक लेक गमावलेले, आपले दोन्ही लेक गमावलेले किती तरी माता-पिता आहेत देशाच्या कानाकोपऱ्यात. त्यांचे दु:ख इतरांना समजू शकेलच असं नाही. त्यांच्या त्यागाचे मूल्य आपण कशानेही करू शकणार नाही.
हुतात्म्यांसाठी प्रार्थना करणे आणि त्यांच्या मागे राहिलेल्या त्यांच्या जीवलगांप्रती कृतज्ञताभाव ठेवणे ही एक नागरीक म्हणून आपली जबाबदारीच आहे… किमान नोंद तर आपण घेऊच शकतो!
(सदर लेखन श्री. दिगंबरदादा देशमुख यांच्या भूमिकेत जाऊन केलेले लेखन आहे. सैनिक आणि त्यांचे आई-बाप शब्दांतून सहसा व्यक्त होत नाहीत. यातील घटना, नावे मात्र खरी आहेत.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈