प्रा. बी. एन. चौधरी
(प्रा. बी. एन. चौधरी (लेखक / कवी / गझलकार / समिक्षक / व्यंगचित्रकार / पत्रकार) यांचे ई – अभिव्यक्ती समूहातर्फे स्वागत आणि या पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन.)
जीवनरंग
☆ खिचडी – भाग – १ ☆ प्रा. बी. एन. चौधरी ☆
(साहित्य संस्कृती मंडळ, बऱ्हाणपूर, म. प्र. आयोजित अ.भा. कमलबेन गुजराती मराठी कथा लेखन स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त कथा)—-
प्रगती विद्यामंदिर विद्यार्थ्यांनी फुलून गेले होते. वर्गा वर्गात विद्यर्थ्यांचा चिवचिवाट सुरु होता. सकाळची शाळा भरुन बराच वेळ झाला होता. घड्याळात ९ वा ४० मिनिटं झाली. मधल्यासुटीची वेळ झाली, तशी शिपायाने दिर्घ बेल दिली. धरणाची दारं उघडावी आणि पाण्याची लाट बाहेर पडावी तसं मुलांनी क्रिडांगणाकडे धाव घेतली. शाळेत एकच गलका झाला.
क्रिडांगणावर एका कोप-यात शालेय खिचडी वाटप सुरु होती. विद्यार्थ्यांनी रांगा लावून आपापल्या डब्यात, ताटलीत खिचडी घेतली. सारे खिचडी खायला रांगा करुन बसले. काहींनी घरुन जेवणाचा डबा आणला होता. ते एकमेकांशी वाटावाटी करुन जेवण करु लागले. खोड्या, मस्करी करत मुलांची अंगत पंगत रंगात आली होती. त्याच गर्दीत सातवीचा सुभाष कावरा बावरा होत चिमणीने दाणे टिपावे तसा खिचडीचे बारीक, बारीक घास तोंडात टाकत होता. मित्रांची नजर चुकवत त्याने कसंतरी जेवण उरकलं. डबा बंद केला. आणि तो हात धुवायला पाण्याच्या टाकीवर गेला. हात धुवन ते त्याने आपल्या चड्डीलाच पुसले. गुपचूप, गुपचूप तो त्याच्या वर्गाकडे गेला. मुलांवर लक्ष ठेवून असलेल्या क्रिडाशिक्षक पाटील सरांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. सारी मुलं आता कुठं जेवायला बसली असतांना सुभाषचं असं लवकर उठणं त्यांना संशयास्पद वाटलं. ते त्याच्या मागोमाग गेले. सुभाष घाबरा घुबरा होत त्याच्या वर्गातून बाहेर पडत होता. पाटील सरांच्या मनात शंका आली. काही दिवसांपासून वर्गा वर्गातून मधल्या सुटीत मुलांच्या दप्तरातून पैसे, पेन, वस्तू चोरीला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. शाऴेतीलच कुणी विद्यार्थी हे काम करत असेल असा सर्व शिक्षकांचा कयास होता. ही गोष्ट पाटील सरांच्या लक्षात आली. ते सावध झाले. त्यांना असल्या भुरट्या चो-या कोण करत असावा याचा आता अंदाज आला होता. ते सुभाषवर बारकाईने लक्ष ठेवून एका कोप-यात थांबले.
सुभाष वर्गातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या हातात एक कापडी पिशवी होती. तिच्यात त्याने काही लपवले होते. आपल्याला कुणी पहात नाही नं हे बघत तो शाळेच्या मेन गेट जवळ गेला. ते बंद होते. त्याने छोट्या गेटचं दार हळूच उघडलं आणि तो शाळेबाहेर पडला. पाटील सर त्याला न दिसता त्याचा पाठलाग करत होते. सुभाष शाळेबाहेर पडला तसा त्याने सुटकेचा निश्वास टाकला. पिशिवीकडे आनंदाने बघत, तिला छातीशी लावत त्याने धुम ठोकली.
पाटील सरांना त्याच्या सा-या हालचालींवरुन तोच ह्या छोट्या छट्या चो-या करत असावा याची खात्री पटली. त्याच्या पिशवित मुलांच्या चोरलेल्या वस्तू असतील असे त्यांना वाटले. सुभाषला रंगेहाथ पकडावं असा मनाशी निश्चय करुनच ते ही त्याच्या मागोमाग जावू लागले. सुभाषने आता वेग घेतला होता. त्याला जणू घबाडच हाती लागलं होतं. त्यात त्याला कुणीही बाहेर पडतांना पाहिलं नाही याचाही आनंद दडला होता. झपझप चालता चालता तो आता पळायला लागला. शाळेपासून निघून तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहचला. मुख्य रस्ता ओलांडत त्याने नगरपालीकेकडे मार्चा वळविला. आणि आता तो नव्याने वसलेल्या संजय नगरच्या झोपडपट्टीकडे जावू लागला. त्याच्या पायांना गती आली होती. तो याच झोपडपट्टीत रहात होता.
पाटील सर मनातल्या मनात खुष होते. ते शाळेत चो-या करणारा चोर सापडल्याच्या आनंदात होते. सुभाषच्या पिशवित इतर मुलांच्या वस्तू, पैशे असतील अशी त्यांची खात्री झाली होती. त्याला रंगे हात पकडून त्याच्या पालकांकडे तक्रार करावी असा मानाशी विचार करत ते चालण्याचा वेग वाढवून चालत होते. त्यांना सुभाषची पार्वभूमी आठवली.
सुभाष हा संजयनगरच्या झोपडपट्टीत राहणा-या झेंडू हमालाचा मुलगा. झेंडूला दारु, गांजा, सट्ट्याचं व्यसन होतं. दिवसभर पोती वाहणं. गाडी लोटणं हे त्याचं कष्टाचं काम. कष्ट विसरण्यासाठी दारु आली. त्यात इतर व्यसनं व्यसनं लागली. त्याचा शेवट क्षय रोग होवून मृत्यूत झाला. त्याच्या मागे त्याची बायको कमला गावात भंगार, रद्दी, प्लॅस्टिक गोळा करायची. नव-यामागे तिच्यावर संसाराचा भार आला होता. अशिक्षित, निराधार कमलाला संजयनगरवाले जुजबी मदत करत होते. आपल्या मुलानं शिकावं अशी तिची खूप इच्छा. म्हणून ती मुलाला नियमित शाळेत पाठवत होती. त्याला वह्या, पुस्तकं, इतर साहित्याची तजविज करत होती. वेळोवेळी शिक्षकांना भेटत होती. तोच हा सुभाष आज पाटील सरांच्या नजरेत चोर ठरला होता. सुभाष असे उपद्व्याप करेल याची त्यांना पुसटशीही अपेक्षा नव्हती. मात्र, गरीबी माणसाला काहीही करायला लावू शकते याची त्यांना कल्पना होती. या विचारात तेही संजयनगर पर्यंत पोहचले.
सुभाष आता त्याच्या खोपटा जवळ पोहचला होता. खोपटाचं दार बंद होतं. त्याची आई घरी नव्हती. ती पहाटेच भंगार गोळा करायला निघून गेली असावी. त्याने बाहेर लावलेलं पत्र्याचं दार लोटलं….. आपल्या मागे कुणी नाही हे पहात तो घराचं दार उघडून आत गेला. पाटील सरही पत्र्याचं दार लोटून आत आले. तेथले वातावरण पाहून त्यांना सुभाषच्या गरीबीची खात्री पटली. तेथे पडलेल्या भंगार, प्लॅस्टीक, रद्दीच्या ढिगा-याची त्यांना किळस आली. त्यांनी खिश्यातून रुमाल काढत तो नाकाला लावला. त्यांची भिरभिरती नजर सुभाषला शोधत होती. तोच त्यांचं लक्ष आतल्या दाराकडे गेलं. तिथं सुभाष होता. तो आत काय करतोय हे पाहण्यासाठी त्यांनी हळूच आत डोकावलं.
– क्रमशः भाग पहिला
© प्रा.बी.एन.चौधरी
संपर्क – देवरुप, नेताजी रोड, धरणगाव जि. जळगाव. ४२५१०५. (९४२३४९२५९३ /९८३४६१४००४)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈