सुश्री स्वप्ना मुळे (मायी)
जीवनरंग
☆ रेशमाची झूल… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆
“गेले पंधरा दिवस भुर्रकन निघून गेले … उद्या तुम्ही पण जाल.. मग मात्र सासुबाईंशिवाय हे घर मला आणि अविला खायला उठेल हो ताई..” एवढं बोलून शरु ढसढसून रडायला लागली. ह्या पंधरा दिवसात ती बरीच खंबीर होती. खरंतर आईचं पडल्यापासूनचं दुखणं या आठ महिन्यात तिनेच काढलं होतं. आपण फक्त नावाला लेक होतो. तिच्या कर्तव्याने खरी लेक शरुच झाली होती. त्यामुळे आपल्याला आईची उणीव जाणवणार, पण शरुला ती जास्त प्रखरपणे जाणवेल..
… स्मिताने तिला पटकन जवळ घेतलं. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही, कारण ‘ स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ‘ हे आता सगळेच अनुभवत होते. तिघांनी परत मनसोक्त रडून घेतलं.
मग शरु अलगद उठली. कपाटातून तिने सासुबाईचे कानातले जोड आणि बांगड्या नणंदेपुढे ठेवल्या. कपाटही उघडं ठेवलं. ती स्मिताला म्हणाली, ” ताई, आईची आठवण म्हणून हे दागिने आणि त्यांच्या ज्या साड्या पाहिजे त्या तुम्ही घेऊन जा…”
स्मिता उदास हसत म्हणाली, “अगं माणूस आठवणींनी मनात, हृदयाच्या कप्प्यात जपलेला असतो.. ह्या वस्तू, दागिने हे सगळं गौण आहे गं,.. मला काही नको, असू दे तुमच्याकडेच.. आईचा एवढा दवाखाना, खर्च, तुम्ही सगळं कसं पेललं असेल ह्याची कल्पना आहे मला… हे दागिने सगळे तुमच्याकडेच ठेवा. पण एक वस्तू मात्र मी हक्काने मागेल. आईने रेशीम दोऱ्याची एक सुंदर झूल शिवली होती.. ती मला दे. त्याच्या फार सुंदर आठवणी आहेत गं माझ्या मनात.”
शरुने लगेच खालच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुंडाळलेली ती झूल काढली. स्मिताने ती गच्च छातीशी धरली. तिला परत आईची खूप आठवण आली. रडणं ओसरल्यावर ती बोलू लागली, ” एकदा मागच्या अंगणात एक गाभण गाय हंबरत होती.. आईने बघितलं आणि म्हणाली ‘अगं बाई, इथेच पाडस जन्माला घालते की काय..? हिचा मालक कुठे गेला, का ही वाट चुकुन इकडे शिरली..’ .. पण तिला आता हाकलून लावणं शक्य नव्हतं… अवि तुला आठवतं का, त्या गावी बाबांची बदली झाली होती तिथं आपलं मागच्या पुढच्या अंगणाचं घर होतं बघ.”
त्यावर अवि म्हणाला, ” फार काही आठवत नाही, पण त्या कच्च्या दुधाच्या वड्या आठवतात.. पोटभर खायला मिळाल्या होत्या बघ….”
स्मिता म्हणाली, ” हं, तू लहान होतास फार, मला मात्र स्पष्ट आठवतं सगळं.. आपल्याकडे कामाला येणाऱ्या शामलाबाईंना आईने लगेच बोलवलं.. त्यांना सगळी माहिती होती.. आई म्हणाली ‘ मुकं जनावर असलं तरी त्रास आणि लाज दोन्ही असतात प्राण्याला..’
भिंतीच्या कोपऱ्यात घुसून हंबरत होती ती गाय. मग आईने तिला आडोसा केला.. गरम पाण्याचा शेक… अगदी जणू लेकीचं बाळंतपण केल्यासारखं केलं.. पाडस तर किती सुंदर होतं.. आणि काही क्षणात चार पायावर उभं राहिलं. आई म्हणाली, ‘ देवाला काळजी सगळ्या जीवांची.. ह्या मुक्या प्राण्यांना बघा कसं मिनिटात उभं करतो तो.. आपली लेकरं वर्ष घेतात..’
शामलाबाई आईला म्हणायच्या, ‘ फार जीव लावू नका, कधी मालक येईल आणि घेऊन जाईल तर करमणार नाही…’ आईने तेंव्हा त्या पाडसासाठी ही झूल केली होती.. अगदी रातोरात जागून… म्हणाली, ‘आपल्याकडे नव्या लेकराला कपडे करतात, त्याला झूल तर करू….’
मला फार आवडली होती ती रेशमी झूल, सुंदर रंगांची मऊमऊ. मी पण जागी होते त्या रात्री.. सकाळी उठून कधी त्या पाडसावर घालू असं झालं होतं.. पण सकाळी जाग आली ती आईच्या रडण्याने… गाय, वासरू निघून गेलं होतं आपल्या वाटेने.. तू खूप रडला होतास.. ‘बांधलं का नाहीस?’ तिला विचारत होतास…
आई म्हणाली, ‘ ती आपली मालकीची नव्हती, तिची अडचण म्हणून आडोश्याला उभी राहिली. आपलं मन वेडं, लगेच गुंतलं त्यात.’
मी ही झूल छातीशी घट्ट धरून रडत होते. आई म्हणाली, ‘ रडू नकोस.. अगदी स्त्री जन्म कसा असतो ते तुझ्या या वयात ही गाय येऊन तुला शिकवून गेली बघ. लज्जा, वेदना, मातृत्व… बघितलं ना वासराला कशी चाटत होती, आनंदाने दूध पाजत होती सगळ्या वेदना विसरून.. परत आपण दिलेल्या आरामाच्या मोहात रमली नाही, गेली निघून. आपल्या कर्तव्यांचं असंच असतं.. स्त्रीच जगणं… माहेरी दोन दिवस यायचं, लाड करून घ्यायचे आणि जायचं निघून परत आपल्या भूमिकेच्या युद्धावर..’
आईने झूल हातात घेतली. म्हणाली, ‘आता येणाऱ्या प्रत्येक चैत्र गौरीला मी ही झूल घालेल.. त्यावर माझी गौर बसेल.. कारण ही गाय माझ्या लेकीसारखीच आली माझ्या आयुष्यात, राहिली आणि निघून गेली… पण ह्या रेशमी झुलीवर तिच्या आठवणींच्या पाऊलखुणा सोडून गेली…’ आईने ह्या झुलीतून मला खूप काही शिकवलं आयुष्यभरासाठी. ही तिची आठवण मात्र मला द्या..”
अविने आणि शरुने स्मिताला जवळ घेतलं. तिघेही आईच्या आठवणीने रडत होते आणि रेशमी झूल, म्हणजे आईनेच हातात हात धरलाय असं अनुभवत होते…
© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)
मो +91 93252 63233
औरंगाबाद
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈