डॉ. ज्योती गोडबोले
☆ अखेरची इच्छा … भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
कालच वैदेही ऋचाला खूप रागावली होती. हल्ली ऋचाच्या मागण्या जरा जास्तच वाढल्या होत्या. रोहित अजून लहान होता, म्हणून अजून तरी आईचं ऐकत होता. ऋचा आता दहावीला होती आणि मैत्रिणींकडे नवीन काही बघितलं की हिला ते हवंसं वाटे. यात तिची चूक नव्हती. ते वयच तसं होतं आणि अशा तिच्या मागण्याही काही फार अवास्तव नसत. पण फक्त विशालच्या एकट्याच्या पगारात भागवताना वैदेहीच्या नाकी नऊ येत. हे कोडे कसे सोडवावे, हेच तिला समजेनासे झाले होते हल्ली. मुलांकडे नीट लक्ष देता यावे, म्हणून असलेली चांगली सरकारी नोकरी सोडली तिने आणि आता पश्चाताप करण्याखेरीज हातात काहीच उरले नाही !
तेव्हाही विशाल म्हणाला होता, की ‘ नको सोडू नोकरी. आपल्याला अजून बरीच गरज आहे. अजून मोठा फ्लॅट घ्यायचाय ना, शिवाय मुलांसाठीही लागतीलच पैसे ! ‘ पण खुशाल सोडली आपण नोकरी. मैत्रिणी, बॉस -सगळे सांगून थकले…. पण तेव्हा घर, मुलं यांचं भूत बसलं होतं डोक्यावर !आता लक्षात येतंय की आपण नोकरी सोडल्याने काहीही फायदा झालेला नाही, उलट तोटाच झालाय. बहिणी म्हणाल्या होत्या की “ बरं झालं नोकरी सोडलीस. आता आईकडे तुला छान लक्ष देता येईल. आम्ही नोकऱ्या करतो, म्हणून फक्त सुट्टीच्या दिवशी येऊन जाऊ.” भाऊराया परदेशात स्थयिक झालेले, त्यांचे येणे कधीतरीच व्हायचे, आणि ते आले की मग काय ! तोचि दिवाळी दसरा व्हायचा आईला.
अतुल आईचा अतिशय लाडका. अगदी उघड उघड ती त्याला देत असलेले झुकते माप लक्षात येण्यासारखेच असे. या तिघी बहिणी आणि हा एकुलता एक भाऊ. सगळ्यात धाकटा आणि सगळ्यात हुशार, म्हणून आईचा अत्यंत लाडका. त्याच्याच आवडीच्या भाज्या, त्याला आवडते म्हणून कायम घरात सणासुदीला जिलबीच. मुलींना आई फारसे महत्व द्यायचीच नाही. अतुल म्हणेल ते प्रमाण. याचा परिणाम असा झाला, वरच्या दोघी जणींनी आपापली लग्नं ऑफिसमध्येच ठरवली आणि आईने न बोलता लावूनही दिली.
वैदेही त्यातल्या त्यात गरीब आणि भिडस्त ! सगळं दिसत असूनही बंड न करणारी आणि सोसणारीही. बहिणीही सांगून थकल्या– ‘अग वैदेही, नोकरी कसली सोडतेस? आम्ही नाही का केल्या नोकऱ्या? मुलंबाळं सांभाळून? तुलाही जमेल. मुलं काय ग, बघताबघता होतात मोठी, पण पैसा मात्र त्या प्रमाणात वाढत नाही,आणि गरजा मात्र वाढतात.’
पण वैदेहीला हे पटले नाही. कालांतराने तिचे वडील कालवश झाले आणि आई एकटी पडली. बहिणींनी आधीच खूप लांब घरं घेतली होती. वैदेहीचंच घर आईच्या जवळ होतं. आई शिक्षिका होती आणि तिने स्वतःला छान गुंतवून घेतलं होतं. पत्ते ग्रुप, भिशी ग्रुप, त्यांच्या समवयस्क मैत्रिणींच्या जवळपासच्या ट्रिपा, आईचा वेळ मस्त जायचा. आई एकटीही मजेत राहत होती. वैदेहीला आता वाटलं, किती मूर्ख आहोत आपण !
मुलं बघताबघता सहजपणे मोठी होत होती, आणि लागलं सवरलं तर आई होती की बघायला . परवाच ऋचा म्हणाली ते तिला आठवलं, “ आई, कशाला ग नोकरी सोडलीस तू? मला जर कमी मार्क मिळाले, तर तू म्हणणारच, आम्ही नाही हं तुला पेमेंट सीट देऊ शकत ऋचा ! माझ्या इतर मैत्रिणींच्या घरी दोघेदोघे नोकऱ्या करतात म्हणून सगळं कसं मस्त आहे. त्यांना नाही हा प्रॉब्लेम !” वैदेहीला हसावे का रडावे हेच समजेना. या मुलीला चार महिन्यापासून पाळणाघरात नको टाकायला म्हणून जीव नुसता तळमळला होता आपला, आणि म्हणून नोकरी सोडली ना आपण ! तर तीच मुलगी बघा काय म्हणतेय ! तिचंही बरोबरच होतं म्हणा. मागे त्यांची कुलू मनालीला ट्रिप होती. तर त्यावेळी आपण तेवढे पैसे देऊ शकलो नाही तिला. काय हे ! वैदेहीला पुरेपूर पश्चाताप झाला. विशाल तर काय ! त्याला कशाचेच सोयरसुतक नसायचे. ना कधी त्याने प्रमोशनसाठी धडपड केली, ना कधी काही नवीन गोष्टी शिकला ऑफिसमध्ये ! वर्षानुवर्षे तीच नोकरी करत राहिला… निर्विकार पणे ! आईला आता ऐशी वर्षे पूर्ण झाली. आता मात्र तिला एकटे राहवेना . तिघी बहिणींकडे ती आलटून पालटून राहू लागली. अतुल कायम अमेरिकेत स्थायिक झाल्यामुळे त्याचा प्रश्नच येत नव्हता. ताई माई जमेल तसं बघायच्या आईकडे. त्याही आता रिटायर झाल्याच होत्या. वैदेही सर्वात धाकटी.
आईचा स्वभाव अतिशय हेकट, कुरकुरा आणि कुणाशी ऍडजस्ट करणारा नव्हता. आयुष्यभर मास्तरकी केल्यामुळे, मी म्हणेन तसंच झालं पाहिजे ही वृत्ती लोकांना आता त्रासदायक ठरू लागली. ताई माईंची घरं मोठी होती, तरी त्यांचीही मुलं सुना आल्या होत्याच ! आजीचं आणि नवीन नातसुनांचं एक मिनिट पटत नसे. सुना म्हणत, “अहो आई,, आजीचं नका सांगू काही करायला. त्यांना आमचं काहीही आवडत नाही. सतरा चुका काढत बसतात. तुम्ही त्यांचं सगळं करून जा. इतर कामं आम्ही करू”. सुदैवाने वैदेहीकडे हे झगडे होत नसत. तिच्यात आणि ताई-माईमध्ये बरंच अंतर होतं म्हणून, आणि तिची मुलंही अजून कॉलेजमधेच शिकत होती. तरीही ऋचा रोहितचे आजीशी फार पटत असे. आजी फार लाडकी होती त्या दोघांची ! कुठे चाललीस, कधी येणार, हा काय ड्रेस घातलाय, अशी टीका टिप्पणी आजीची बसल्याबसल्या चालू असे. आणि मुलांना ते मुळीच चालत नसे. मुद्दाम ऋचा आजीसमोर येऊन म्हणायची, ‘आजी हा स्कर्ट आवडला का? मांड्या दिसत नाहीत ना? आजी, गळा खोल आहे का टॉपचा?” – मुद्दाम आजीला चिडवून ऋचा म्हणे.. ‘हात मेले !’ आजी रागावून म्हणायची. किती वेळा तरी वैदेहीने आईला सांगून बघितलं, की आई नको ग तू त्यांच्या भानगडीत पडत जाऊस. आत्ताची मुलं आहेत ती. आम्ही घेतलं तुझं ऐकून, ती कशी घेतील? तू शांत बसत जा ना.” पण हे काही तिला जमायचं नाही. रोज रोज खटके! रोहित स्वतःच्या मेरिट वर मेडिकलला गेला. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये फी अगदी माफक, म्हणून तो अभिमानाने सांगे, “ मी खरा मेरिट होल्डर डॉक्टर होणार आजी!”
तरीही त्याला आजी म्हणायचीच ‘ हे काय लांडे कपडे ! ही कसली फाटकी पॅन्ट ! गुडघ्यावर फाटलीय ! आणि हे काय झबलं घातलंय?” खोखो हसून रोहित म्हणायचा. आजी, ही अशीच फॅशन असते, लै भारी असते बरं ! ‘पुरे मेल्यानो .. नसतं अवलक्षण,’ असं म्हणून आजी उठून जायची. रोहितवर आजींचा विशेष जीव ! एक तर तो अतिशय हुशार आणि दांडगोबा. आजी त्याचं सगळं ऐकायची.
आईची तब्येत चांगलीच होती. पण तरीही आता तिच्यासाठी म्हणून दिवसाची बाई ठेवावी, असा निर्णय मुलींनी घेतला. कारण मग त्याशिवाय यांना घराबाहेर पडताच येत नसे. सुना बघायला अजिबात तयार नसत आणि वैदेहीच्या मुलांची कॉलेजेस दिवसभर ! ओळखीच्या एक चांगल्या बाई मिळाल्या आणि त्या सकाळपासून रात्रीपर्यंत येऊ लागल्या. आई खुशीने त्यांचे पैसे देऊ लागली. तिलाही सोबत, आणि गप्पा मारायला एक माणूस झालं. शांताबाई आजींना रिक्षातून देवाला, बागेत, आजी म्हणतील तिथे हिंडवून आणायच्या. मुलं चेष्टा करायची, “आजी भेळ खाल्ली का? आम्हाला नाही का आणली?” आजी खुशीत हसायची. वैदेहीची मुलंही मोठी झाली. आजी आता नव्वदच्या जवळपास आल्या. ऋचाचं लग्न ठरलं आणि तिला खूप छान स्थळ मिळालं. आजीने वैदेहीला जवळ बसवलं आणि विचारलं, ‘ वैदेही, तुला काही पैसे हवे असतील तर निःसंकोचपणे सांग. माझ्या चार बांगड्याही मी देणार आहे ऋचाला. त्या मोडून तिला हवे ते कर हो तिच्या आवडीचे !” वैदेहीच्या डोळ्यात पाणी आले. तिला आत्ता खरोखरच गरज होती या मदतीची. “ अग वैदेही, मला समजत नाहीत का गोष्टी? तू नोकरी सोडलीस आणि मग तुझी फरपट सुरू झालेली मी डोळ्यांनी बघतेय ना. कानी कपाळी ओरडूनही तू माझं ऐकलं नाहीस. बघ बरं आता ! ताई माईंचे संसार बघ,आणि तू सगळ्यात उजवी, हुशार असून किती मागे पडलीस बघ बरं. बाबांनाही फार वाईट वाटायचं ग तुझ्या बद्दल ! बरं, जोडीदार तरी धड निवडावास ! किती अल्प संतुष्ट आहे ग हा विशाल. नुसता स्वभाव चांगला असून काय उपयोग ग ? महत्वाकांक्षा असायला नको का काही ? “
– क्रमशः भाग पहिला
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈