जीवनरंग
☆ अशीही एक वटपौर्णिमा – सुश्री चित्रा अविनाश नानिवडेकर ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆
आज तन्वी च्या डोळ्यातून सतत पाणी येत होतं. लग्नानंतर ची पहिलीच वटपौर्णिमा. आठवड्यापासून तिची तयारी चाललीय. आईने दिलेली गर्भरेशमी हिरवी पैठणी, सासूबाईनीं आठवणीने काढून आणलेल्या गोठ पाटल्या, पहिल्या वटपौर्णिमे साठी म्हणून मुद्दाम तिने आणि तनिष ने खरेदी केलेला लफ्फा, झालंच तर नथ वगैरे काढून ठेवली…तिला लहानपणापासून हया सणाचं खूप अप्रूप होतं…छान ताट सजवून घ्यायचं त्यावर स्वतः विणलेला क्रॉशाचा रुमाल घालायचा पाच सवाष्णी बरोबर वडाच्या पारावर जायचं…मनोभावे पूजा करून नाजूक हाताने वडाला दोरा गुंडाळत एकीकडे “जिवाच्या सख्या “कडे पाहायचं…लौकरच मनात धरलेलं स्वप्नं सत्यात येणारं हे धरूनच तिची तयारी चालली होती. सासूबाई आणि तनिष हळूच तिची फिरकी घेत होते परवा पासून
“अगं.. तूझं तबक धुवायचे राहिले…किंवा साडी चा ब्लाउज आणायचा राहिला…आणि हो त्या दिवशी कडक उपास असतो बरं…फक्त शहाळ नि केळं खायचं “
मंद हसून ती त्यांना दाद देत होती. लग्नानंतर येणारी पहिली वटपौर्णिमा मनात रंगवत रात्री तिने तनिष ला न विसरता बजावलं
“फोटो काढण्यात कंजूस पणा करू नकोस उदया. मला स्टेटस ला भरपूर फोटो टाकायचे आहेत.”
… आणि सकाळीच तिला मेट्रन चा फोन आला. हॉस्पिटल मध्ये अपघाताच्या केसेस आल्यात तुझी सुट्टी कॅन्सल. ताबडतोब जॉईन हो. खूप इमर्जन्सी आहे. सासूबाईनीच फोन घेतला त्या आणि तनिष दोघेही म्हणाले..
“जा… तन्वी वटपौर्णिमा परत सुद्धा साजरी करता येईल पण आत्ता हॉस्पिटल मध्ये खरी तुझी गरज आहे. आम्ही समजू शकतो “
डोळ्यातलं पाणी परतवून तिने युनिफॉर्म चढवला. हॉस्पिटल कंपाउंड मध्येच रहात असल्यामुळे पाचव्या मिनिटाला ती इमर्जन्सी वॉर्डात दाखल झाली.
खरंच रोड अपघातात सापडलेली संपूर्ण फॅमिली, ड्रायवर, चिमुकली दोन मुलं. नशिबाने त्यातील एक तरुणी दाराच्या बाहेर फेकली गेली होती म्हणून थोडक्यात खरचटलं आणि पायावर फ्रॅक्चर वर निभावलं.
तन्वी च्या टीम ने भराभर सगळ्यांना ईलाज सुरू केले. डॉक्टर्स ऑर्डर देत होते. आणि सगळ्या त्या प्रमाणे ट्रीटमेंट देत होत्या. त्या तरुणीच्या मिस्टर ना जेंव्हा आय. सी. यू. मध्ये हलवले…तिने तन्वी चा हात घट्ट पकडत डोळ्यातून पाणी काढून म्हटलं.
“सिस्टर…माझ्या साठी तुम्ही आज सावित्रीचं रूप आहात…माझ्या.. माझ्या सत्यवानाला प्लिज प्लिज यमाच्या दारातून बाहेर आणा…मी.. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन.”
तन्वी च्या अंगावर सर्रकन काटा आला. तिला धीर देत तन्वी म्हणाली “हो.. काळजी नको करुस. आम्ही सगळे प्रयत्न करू. हे बघ माझ्या हातात त्यांचेच ब्लड सॅम्पल आहे.2..3.. बॉटल रक्त लागेल द्यायला. तेंव्हा ते नक्कीच शुद्धीवर येतील. विश्वास ठेव आम्ही सर्व जण शर्थीचे प्रयत्न करू. तू पण देवाला प्रार्थना करत राहा “
अक्षरशः रात्री आठ वाजता त्या तरुणी च्या मिस्टरांनी ट्रीटमेंट ला प्रतिसाद दिला तेंव्हाच तन्वी आय सी यू च्या बाहेर आली.
त्या तरुणीला व्हील चेअर वर घेऊन तन्वी ने तिच्या नवऱ्याच्या बेडजवळ नेलं.नवऱ्याचा हात हातात घेऊन ती तरुणी भरभरून रडत म्हणाली…
“वटसावित्री आज तुमच्या रूपाने फळाला आली सिस्टर तुम्ही होतात म्हणून. मला समजलं आज स्वतः ची पहिली पूजा सोडून इमर्जन्सी मध्ये आलात . पण ड्युटीवर आल्या पासून जरा ही खंत न करता तुम्ही सगळी परिस्थिती शांतपणे हाताळली.मी मनापासून प्रत्येक वर्षी वटसावित्री दिवशी एक सौभाग्य वाण तुमच्यासाठी देणार. आज तुमच्यामुळे माझं सौभाग्य मला सहिसलामत मिळतं आहे.”
तन्वी चे सुद्धा डोळे भरून आले. तिच्या पाठीवर थोपटून तन्वी म्हणाली “अगं…मेडिकल मधले सगळेच ह्यासाठी झटले.. म्हणून ह्या अपघातातले सगळेच वाचले. चल मी निघू? उदया येईनच ड्युटीवर “
व्हरांड्यात तनिष ला बघून तिला आश्चर्य वाटले. “अरे…इकडे कसा काय? मी येतच होते घरी “
“बाईसाहेब…वटपौर्णिमा काय तुम्ही एकट्याने पुजायचा मक्ता घेतलाय? मी पण अशी कर्तव्यदक्ष बायको सातजन्म मिळावी म्हणून उपास करून होतो.”
“म्हणजे? मी नाही समजले “
तेवढ्यात एक म्हातारे आजोबा जवळ येऊन तनिष च्या पाठीवर थोपटत म्हणाले
“बाळा.. किती रे धावपळ केलीस माझ्या मुलाला ब्लड मिळवण्यासाठी, नातवंडाना दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलास. हिला तूझ्या आईने बळजबरी जेवू घातलं…खूप सेवा केलीत. हया परक्या ठिकाणी आम्हाला तुमचा खूप आधार वाटला रे. तुमच्या रूपाने देव भेटला…!”
तन्वी चे डोळे कृतज्ञतेने भरून आले.
अश्या तऱ्हेने तिची वटपौर्णिमा साजरी झाली.
लेखिका – सुश्री चित्रा अविनाश नानिवडेकर
संग्राहिका – सुश्री पार्वती नागमोती
मो. ९३७१८९८७५९
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈