श्री मेघ:श्याम सोनावणे
जीवनरंग
☆ गोडवा… लेखिका – सुश्री प्राजक्ता राजदेरकर ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆
“ऐकलं का, रमेशला यायला जरा उशीर लागणार आहे, तो ट्रॅफिकमध्ये अडकलाय, या.. इथे बसून वाट बघू..”
“मी जरा माझ्या फुलवाल्या मैत्रिणींना भेटून येऊ का?”
“या.. आणि सावकाश जा बरं..” असं आजींना सांगत आजोबा शेजारी असणाऱ्या दुकानाबाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसायला गेले.. “बसू ना गं ताई मी इथे.. चालेल ना..”
“बसा ना आजोबा, खरंतर आतच बसा, बाहेर ऊन यायला लागलंय.. अन् आता तशी फारशी वर्दळ नाहीये, तुम्ही अगदी सहज बसू शकाल आत.. या बसा..”
गावात देवीच्या मंदिराच्या बाजूलाच मानसीचे बुटीक होते. हे आजी आजोबा प्रत्येक मंगळवारी नेमाने येत असत मंदिरात. त्यांचा ऑटो दुकानासमोर थांबत असे हिच्या. प्रत्येकवेळी आपसूकच नजर जात असे तिची ऑटोतून सावकाश उतरणाऱ्या आजी आजोबांवर.
साधारण साडेचारच्या दरम्यान येत असत ते प्रत्येक मंगळवारी. म्हणजे गेल्या तीन चार महिन्यापासून तरी त्यांना पाहत आली होती मानसी. आधी आजोबा उतरत, सावकाश हात धरून आजीला उतरवत.. हळुवारपणे चालत दोघेही मंदिरात जात, अर्ध्या पाऊण तासाने परत येत. हा असा सिक्वेन्स कायम होता त्यांचा, प्रत्येकवेळी.
साधारण पंच्यायशी ते नव्वद दरम्यान वय असेल दोघांचेही. पण दोघेही अगदी काटक.. आजोबा उंच होते आजीपेक्षा.. पांढरा शुभ्र सदरा, धोतर, डोक्यावर काळी टोपी, हातात काठी.. आजोबांकडे बघूनच त्यांच्यातील व्यवस्थितपणाची जाणीव होत असे.
आजोबांच्या तुलनेत आजी तशा ठेंगण्याच.. छानसं काठपदरी सुती नऊवारी पातळ नेसणाऱ्या, केसांचा सुपारी एवढा अंबाडा घालणाऱ्या.. ठसठशीत कुंकू लावणाऱ्या.. आजोबा अलवारपणे हाताला धरून घेऊन जात आजींना.. मानसीला फार आवडत असे त्यांना बघायला..
मागच्या मंगळवारी आजी आजोबा मंदिरात आले नाहीत .. मानसीला जरा चुकल्यासारखेच वाटले. खरंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची वेळ आली नव्हती कधी, आज ती ही संधी सोडणार नव्हती.. फार प्रसन्न वाटायचं तिला त्या दोघांना बघितलं की. “आजोबा, मागच्या मंगळवारी दिसला नाहीत..”
“अगं, जरा बरं वाटत नव्हतं मला.. आता काय हे चालायचंच… नव्वदी पार झालीये माझी….”
“अरे वा..मस्तच की. पण वाटत नाही बरं.. आणि आजींचं काय वय..”
“ती सत्त्यायशीची.. सत्तर वर्षे सोबत आहोत एकमेकांच्या आम्ही..”
असं सांगतांना अभिमान झळकत होता आजोबांच्या चेहऱ्यावर..
“काय सांगताय, किती गोड.. आणि दर मंगळवारी या मंदिरात येण्याचा नेम आहे वाटतं आजींचा.. मी गेले अनेक महिने तुम्हाला मंगळवारीच बघतेय मंदिरात येताना..”
यावर काहीसं मिश्किल हसत आजोबा म्हणाले, “तिचा नाही गं, माझाच नेम आहे तो.. पण तिच्यासाठी..”
“म्हणजे..?”
“सांगतो.. ती एक गंमतच आहे.. सांगतो थांब..” असं म्हणून आजोबा उठले, दुकानाबाहेर डोकावून बघितलं. आजी अजूनही त्यांच्या फुलवाल्या मैत्रिणींशी गप्पा मारत होत्या, याची खातरजमा करून घेतली त्यांनी…..
“सुगरण आहे गं ती फार, अजूनही स्वयंपाक करते, लोकांना खाऊ घालण्याची प्रचंड आवड.. तितकीच स्वतः वेगवेगळं खाण्याची आवड.. त्यात गोड म्हणजे तर विक पॉइंट.. गुळाम्बा, साखरांबा, सुधारस, शिकरण.. काही ना काही रोज जेवणात लागतं. कणकेचा शिरा तर असा करते ना….
पण काय करणार.. आता या सगळ्यांवर बंधनं आली. मधुमेह झालाय तिला, रक्तातली साखर अचानक खूप वाढली.. सगळं एकदम बंद झालं गं.. जेवण अगदीच कमी झालं तिचं तेंव्हापासून…
त्या दिवशी शिराच केला होता तिने. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर पट्टकन एक घास तोंडात टाकला.. नेमकं हेच आमच्या नातसुनेनं पाहिलं आणि सगळ्यांसमोर म्हणाली तिला, ‘आजी नका गोड खाऊ, त्रास होईल तुम्हाला..’
तीही काळजीपोटी बोलली गं, पण हिला खूप ओशाळाल्यासारखं झालं, एखाद्याला आपली चोरी पकडल्यावर होईल तसं.. खूप खजील झाली गं ती.. आपण गुन्हाच केलाय असं वाटलं तिला.. खरंतर गुन्हा वगैरे नव्हताच तो….मग मी ही शक्कल लढवली, तो धनाशेठ मिठाईवाला.. बालपणीचा मित्र आहे माझा.. आम्ही दर मंगळवारी मंदिरात येतो.. तिथून त्याच्या दुकानात जातो.. मग ती खाते तिच्या आवडीच्या एकदोन मिठाया.. काय समाधान असतं त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर..”
“अहो पण आजोबा.. हे धोकादायक आहे ना त्यांच्यासाठी.. त्यांची खूप शुगर वाढली तर उगाच कॉम्प्लिकेशन्स होतील ना..”
“कळतं गं मला पण हे सगळं.. पण तुला खरं सांगू.. आता आमच्यासारख्याचे काय, सात गेले अन पाच राहिले.. कधीही बोलावणं येऊ शकतं आम्हाला… आम्हा म्हाताऱ्यांना वयाच्या सायंकाळी फक्त दोन गोष्टींची आस असते, एक म्हणजे ‘घरातल्या प्रत्येकाला या वयात सुद्धा आपण तितकेच हवे आहोत’ ही जाणीव अन दुसरं म्हणजे ‘पोटापेक्षाही मनाला तृप्त करणारं अन्न..’ हे दोन्ही असेल तरच पुढचा मार्ग सुकर होतो गं..
एवढी सत्तर वर्षे फारच समाधानाने घालवली आहेत आम्ही एकमेकांसोबत.. मला आमची यापुढचीही असली नसली सगळी वर्षं समाधानात जायला हवी आहेत.. ती समाधानी नसेल तर मी तरी सुखात कसा राहू सांग..”
“बरं एक गंमत तर मी तुला सांगितलीच नाही, मी म्हणालो ना हा धनाशेठ दोस्त आहे माझा, तो तिला आवडणाऱ्या मिठाया ते शुगर फ्री का काय असतं ना त्यात बनवतो, काही गुळातही बनवतो.. अर्थात हे आमच्या सौ. च्या लक्षात येत असेलच म्हणा.. हाडाची सुगरण आहे ना ती.. पण तसं काही बोलून दाखवत नाही कधी.. कधीकधी मीच सांगतो त्याला, तिला सगळं खऱ्याखुऱ्या साखरेतलं खाऊ घालायला.. मग त्या दिवशी आम्ही बागेत दोन फेऱ्या जास्ती मारतो..”
असं बोलताना आजोबा अगदी डोळ्यांच्या कोपऱ्यापर्यंत हसले, तितक्यात ऑटोवाला रमेश आल्याचे लक्षात आले त्यांच्या, दुरून हळूहळू चालत आजीही येत होत्या.
मानसीचा निरोप घेत ते म्हणाले, “माझं हे सिक्रेट सांगू नकोस हं कोणाला.. म्हणजे मी घरी मुलांना सांगितलंय, धनाशेठला अन बबनला माहित्ये, अन आता तुला.. मला तिच्या चेहऱ्यावरचा गोडवा असाच कायम टिकायला हवाय.. चल निघतो.. भेटू पुढल्या मंगळवारी..”
असं म्हणून आजोबा निघाले, आजींना त्यांनी हाताला धरून ऑटोत बसवलं.. वळताना पुन्हा एकदा मानसीला हात दाखवला. त्यांच्या नात्यातला अन त्या दोघांच्याही चेहऱ्यावरचा गोडवा तिला अगदीच सुखावून गेला…
लेखिका : सुश्री प्राजक्ता राजदेरकर
प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈