श्री मेघ:श्याम सोनावणे
जीवनरंग
☆ त्या दोघी… लेखिका – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆
घरचं पटापटा आटपून रेखा कामावर पोहोचली. आज घरी अक्षय्य तृतीयेच्या सणाचा पुरणाचा स्वैपाक होता. शिवाय रोजची कामं होतीच.
कामावरून वेळेवर येऊन आज खरेदीला जायचं होतं. थोरलीचं लग्न पंधरा दिवसांवर येऊन ठेपलं होतं. कपडे, रुखवताची भांडी, सगळ्या सगळ्याची खरेदी अजून राहिली होती. अक्षय्यतृतीयेच्या आजच्या चांगल्या मुहूर्तावर करण्याचं ठरलं होतं.
गावातच राहणारे दीर-जाऊ, शेजारच्या गावातली नणंद खरेदीसाठी येणार होते म्हणून तिला आज जास्तच स्वयंपाक करावा लागला होता.
पहाटे चारलाच उठून तिनं किलोभर पुरण शिजवलं. कटाची आमटी, भात, वांग्याची भाजी, कोशिंबीर, पुरणाच्या पोळ्या नि भजीपापड रांधून ठेवलं नि नऊ वाजताच ती कामावर हजर झाली.
कामावरही आज पुरणाचा स्वयंपाक असणार हे डोक्यात ठेऊन ती लगलगा चालत बंगल्यावर पोहोचली. बंगल्याची झाडपूस तिनं उरकली. मॅडमना स्वयंपाकाचं विचारलं.. आमरस पुरीचा बेत त्यांनी तिला सांगितला तसं तिने मनातून हुश्श केलं..
आमरस, पु-या, कुर्मा, पुलाव नि आंब्याची डाळ असा सुटसुटीत बेत होता. दोन तासांत सगळा स्वयंपाक आवरून तिला घरी जाता येणार होतं.
तिने पु-यांची कणिक मळली.
मोठाले पिकलेले हापूसचे पिवळेधम्म आंबे पाण्यात टाकले. आता ती भाज्या चिरायला बसली.. एवढ्यात दारावरची बेल वाजली. ती दार उघडण्यासाठी उठली..
रेखा एकदा बंगल्यावर आली की ही सगळी कामे तिलाच करावी लागत. या घरात कामाला लागून तिला नाही म्हटलं तरी बारा- पंधरा वर्षं झाली होती.
ती कामाला लागली तेंव्हा हे सधन घर पैशांप्रमाणेच माणसांनी भरलेलं होतं. सर, मॅडम, सरांचे आई-वडील आणि दोन मुले असं गोकुळ नांदत होतं. अचानक हार्टऐटॅकने आजोबा वारले. त्यानंतर दोनच वर्षांनी आजी कॅन्सरचं निमित्त होऊन आजोबांपाठोपाठ निघून गेल्या..
आधी मुलगा नि नंतर मुलगी शिक्षणासाठी परदेशात रवाना झाले.
त्यांची शिक्षणं झाली नि नोकरी पकडून ते दोघे आता तिथेच स्थायिक झाले होते..
रेखाच्या मुलीचं लग्न ठरलं तेंव्हाच नेमकं नेहाचं, म्हणजे मॅडमच्या मुलीचं लग्न ठरलं.. ठरलं म्हणजे तिनेच जमवलं होतं. तिच्याच ऑफिसात तिच्याबरोबर काम करणारा मुलगा होता. परदेशात काम करत असला तरी मुळचा भारतीयच होता..
चार महिन्यांपूर्वी भारतातच बंगल्यावर साखरपुड्याचा कार्यक्रम धुमधडाक्यात झाला होता..
तेंव्हा पुन्हा एकदा घराचं गोकुळ झालं होतं. सहा महिन्यांनंतर महाबळेश्वरमधे मोठ्या पंचतारांकित हॉटेलात लग्न होणार होतं..
रेखाने दार उघडलं. सर आले होते. हातात लाल रंगाची दागिन्याची नवीकोरी पेटी होती..
रेखा पुन्हा स्वयंपाकघरात येऊन कामाला लागली.
सरांनी मॅडमना हाक मारली.. मॅडम नि सर सोफ्यावर बसले.. “सुंदर झालाय नाही का हो नेकलेस ? अगदी घसघशीत दिसतोय.. नेहाच्या गळ्यात शोभून दिसेल नाही ? आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नाच्या खरेदीचा मुहूर्त झाला ते बरं झालं …”
सर नि मॅडम खुशीत दिसत होते.
रेखा स्वयंपाकघरात असली तरी तिचे कान दिवाणखान्यात होते.. नेकलेस पहायची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देईना. ती सरांना पाणी द्यायचं निमित्त करून हॉलमधे गेली. सरांना पाण्याचा ग्लास दिला.
“नेहाताईंसाठी नेकलेस का मॅडम ?”
“हो गं, आता लग्नाची तयारी सुरू करायला हवी. आठवड्यापूर्वीच करायला टाकला होता. आजच्या चांगल्या मुहूर्तावर सर घेऊन आले.. अगं बघ ना तू पण.” त्यांनी रेखाला नेकलेस दाखवला..
रेखाचे डोळे दिपले. तिने एवढा घसघशीत, सुरेख दागिना कधीच पाहिला नव्हता.. “किती वजनात बसला ?”
“पाच तोळ्यांचा आहे.”
नेकलेसचं देखणं रुपडं डोळ्यात साठवत रेखा पुुन्हा स्वयंपाकघरात निघून गेली. फ्लॉवर, बटाटा, कांदे चिरताना तिचे डोळे कधी पाझरू लागले ते तिलाच कळलं नाही.
लेकीच्या लग्नात तिला एक तोळ्याचा नेकलेस घालायचा, हे तिचं लेक जन्मल्यापासूनचं स्वप्न होतं..
त्याला कारणही तसच होतं.. रेखाचं नि तिच्या जावेचं लग्न एकाच मांडवात झालं होतं. रेखाच्या माहेरची परिस्थिती बेतासबात… कसंतरी तिला उजवून टाकलं होतं. लग्न ठरवताना नवरा मुलगा काय करतो, कसा आहे.. हे न पाहता सासऱ्याची पेन्शन पाहून रेखाला त्या घरात दिलं होतं. फक्त हिरव्या बांगड्यांचा चुडा नि खोटं कानातलं घालून रेखा लग्नाला उभी होती..
जाऊ मात्र बऱ्या परिस्थितीतली..
शाळेत शिक्षक असणाऱ्या दिराशी लग्न लावताना तिला एक तोळ्याचा नेकलेस गळ्यात घालून तिच्या माहेरच्यांनी बोहल्यावर उभं केलं होतं. लग्नाच्या दिवशी नि नंतरही सगळे जावेच्या नेकलेसचं कौतुक करत होते..
रेखा मात्र कानकोंडं होत तो कौतुक सोहळा बघत होती. पण तेंव्हा तिने मनाशी ठरवलं होतं …लेकीला लग्नात तोळ्याचा नेकलेस घालूनच लग्नाला उभं करायचं.. पण गरिबाला ठरवायचा अधिकार नसतो… जे पुढ्यात येईल ते फक्त स्वीकारायचं असतं..
पाठोपाठ झालेल्या तीन मुली, निकम्मा नवरा, मुलींची शिक्षणं, सासऱ्याचं आजारपण, या सगळ्यात दिवसभर कष्ट करूनही एक तोळा सोडा एक ग्रॅम सोनही घेणं तिला जमलं नव्हतं!
लग्न पंधरा दिवसावर आलेलं..
सगळा खर्च सासूच करणार होती.
त्यासाठी रेखाचं सोन्यात गाठवलेलं मंगळसूत्रंही सासूनं गहाण ठेवलेलं होतं. नेकलेसचं रेखाचं स्वप्न स्वप्नच राहिलं होतं. तिच्या सारखीच तिची मुलगीही पार्वतीच्या रुपातच लग्नाला उभी राहणार होती..
आज नेहाचा नेकलेस पाहून तिच्या काळजाला अनंत घरं पडली होती.. भरल्या डोळ्यांनीच तिने स्वयंपाकघरातल्या देवापुढं हात जोडले.. “देवा, पुढच्या जन्मी मला लुळीपांगळी कर पण गरीब ठेऊ नकोस.. फार नको, पण एक तोळ्याचा नेकलेस माझ्या लेकीला घालता येईल, एवढा तरी पैसा मला दे!”
हॉलमधून कसलातरी आवाज आला म्हणून रेखाने डोळे पुसले..
“अगं आई, तू इतकी कशी मागासलेली गं.. अगं सध्या असले कुणी सोन्याचे दागिने घालतं का गं ..ओल्ड फॅशन्ड? प्लॅटिनम नि डायमंडशिवाय कोणी काही घालत नाही सध्या.. तू नाही ते उद्योग मला न विचारता का करतेस? मी हा नेकलेस आजिबात घालणार नाही.. तुला पाहिजे तर तू घाल.. आणि परवाच मी तुला सांगितलं नं मी आणि नीरज भरपूर मिळवतोय. माझे दागिने, कपडे आम्हीच घेऊ.. तू आता त्या तुझ्या जुन्या विचारातून बाहेर ये “…
नेहाने फोन कट् केला असावा.. आता फक्त मॅडमच्या हुंदक्यांचा आवाज ऐकू येत होता.. आमरसाची चव दाखवायला रेखा हॉलमधे गेली तेंव्हा मॅडम डोळे पुसत होत्या नि सर त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत होते.. रेखाला पाहून त्यांनी स्वत:ला सावरलं..
“तुला खरेदीला जायचय नं लग्नाच्या.. पटपट स्वयंपाक आवर नि निघ. जेवण टेबलावर मांडून ठेव. आम्ही नंतर जेऊन घेऊ…”
मॅडम नि सर खोलीत गेले नि रेखा स्वयंपाकघरात आली.. पुन्हा तिचे डोळे पाझरू लागले.. देवाकडे तोंड करत तिने विचारलं, “देवा, असे खेेळ करायला तुला काय गंमत येते रे ? जिथे उदंड आहे तिथे नकोय आणि जिथे मनापासून हवंय तिथे ते दिसतही नाही… माणसाला सुख मिळूच द्यायचं नाही असा तुझा डाव आहे का? आजवर तुझं खूप केलं. तुझी पूजा, उपवास कधी चुकवला नाही. कधी लबाडी केली नाही. नेकीनं काम केलं, सासुसासऱ्यांची सेवा केली.. पण तू मला काय दिलस?
माझ्यासाठी मी काहीच मागितलं नाही.. पण लेकरासाठीची मागणीही पूर्ण केली नाहीस..
मॅडमचंही तसच.. त्यांनी सगळ्यांचं सगळं केलं नि आज ती नेहा कशी बोलली त्यांना… सणादिवशी आम्हा दोघींच्या डोळ्यात तू आज पाणी आणलस.. आजपासून तुझी माझी कट्टी!”
त्याच तिरिमिरीत तिनं झपाट्यानं काम आवरलं. जेवण टेबलावर ठेवलं. कट्टा स्वच्छ केला. हात धुतले. पदर ठीकठाक केला नि स्वयंपाकघराच्या बाहेर पडली.. एवढ्यात पुन्हा बेल वाजली.
“आता कोण आलं ? पाहुणे असतील तर चहापाणी करायला थांबायला लागणार .”.. ती पुन्हा वैतागलीच… जरा गुश्श्यातच तिने दार उघडलं.. दारात तिची थोरली लेक उभी होती..
“तू कशाला आलीस एवढ्या उन्हाचं ? मी येतच होते की… चल पटकन् घरी जाऊन जेवण करूया नि खरेदीला बाहेर पडूया. काका, आत्या आले का ?” रेखाची डेक्कनक्वीन थांबायचं काही नाव घेईना…
“अगं, आम्ही तिला बोलावलय.”
मॅडम नि सर सोफ्यावर बसत बोलले. “आत या दोघी. रेखा, तुम्हा दोघींसाठी आमरस आण दोन वाट्यांमधून.”
“नको बाई, उशीर होईल घरी जायला.. पुन्हा दुकानात जायचंय.”
“काही उशीर होत नाही.. जा पटकन आण.”
रेखाने आमरस आणला. दोघी मायलेकींनी तो संकोचाने संपवला.
“आता निघू आम्ही ?”
“थांब, आतून कुंकवाचा करंडा घेऊन ये.”
रेखाने कुंकवाचा करंडा आणला. मॅडमनी दोघींना कुंकू लावलं. सरांनी मगाचा नवीन लाल बॉक्स मॅडमच्या हातात दिला. त्यांनी त्यातून नेकलेस हळुवारपणे काढून रेखाच्या लेकीच्या गळ्यात घातला.
“ही लग्नाची आमच्याकडून तुला भेट.”
रेखा बधीर झाली होती. तिचे डोळे वाहू लागले होते..
“अहो ताई, हे काय करताय? आधीच तुमचे फार उपकार आहेत आमच्यावर.. नेहाची वह्या, पुस्तकं, दप्तरं, कपडे यांवरच तर माझ्या लेकी वाढल्या. तुमचा पगार होता म्हणून माझा संसार चाललाय. आणि आता हे ओझं कशाला ?”
“अगं ओझं कसलं ? आम्ही तुझ्यासाठी केलं त्यापेक्षा जास्त तू
आमच्यासाठी केलस.. मी नोकरीला जायचे. मुलांचं खाणपिणं, आजी-आजोबांची आजारपणं मी तुझ्या मदतीनेच निभावली.. धाकट्या बहिणीसारखा आधार वाटतो तुझा मला.. ही मावशीकडून भाचीला दिलेली भेट समज…”
रेखा नि तिच्या लेकीने सर नि मॅडमना वाकून नमस्कार केला.. रेखा लेकीला घेऊन स्वयंपाकघरात गेली नि दोघी देवाच्या पाया पडल्या.. “आहेस रे बाबा तू… आता कट्टी संपली बरं का…”
रेखा नि तिच्या लेकीच्या चेहऱ्यावर फुललेले गुलाब पाहून सर नि मॅडमची उदासीनताही कुठल्याकुठे पळून गेली… शिल्लक राहिला तो फक्त अक्षय्य आनंद!
लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈