श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सोबत…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी 

वर्षांपूर्वी बदलून आल्यापासून दिगंत तसा कशात आणि कुणात फारसा मिसळत नव्हता पण म्हणून तो माणूसघाणा आहे असंही कुणाला वाटलं नव्हतं. काहीसा अबोल, आपल्याच कोषात राहणारा असाच वाटत होता. ऑफिसच्या कार्यक्रमात काहीसं अंतर राखून, पण तसं भासवू न देता वावरत होता. असा दिगंत आपल्या मदतीला धावून का आला ? तेही स्वतःचं काम बाजूला ठेवून. कितीतरी वेळ त्या विचार करत होत्या पण त्यांना दिगंतच्या वागण्याचं कारण काही सापडत नव्हतं, ध्यानात येत नव्हतं.

तब्येत बरी होऊन त्या ऑफिसात कामावर रुजू झाल्या. त्या पर्स टेबलवर ठेवून खुर्चीत बसत होत्या त्याचवेळी दिगंत ऑफिसमध्ये आला. त्यांनी  बसता बसता दिगंतकडे पाहून स्मित केलं. त्यानेही हसून प्रत्युत्तर दिलं आणि त्यांच्या टेबलजवळून जाता जाता विचारलं,

“ आलात मॅडम? तब्येत पूर्ण बरी झाली ना? ,”

“ हो, एकदम छान.”

तो आणखी काहीही न बोलता स्वतःच्या टेबलजवळ गेला. हातातील बॅग ठेवून त्यानं आपल्या कामाला सुरवातही केली. त्यांनी दिगंतकडे एकदा पाहिलं आणि ‘ असा काय हा? ‘असा मनात आलेला विचार झटकून टाकून आपल्या कामाकडे वळल्या.

ऑफिसमध्ये सारा दिवस कामातच गेला. घरी आल्या न् त्यांनी खिचडीचा कुकर लावला. त्यांचं रोजचं रुटीन ठरून गेलेलं होतं. त्या सकाळी पोळी- भाजी करीत, थोडं खाऊन , डबा घेऊन ऑफिसला जात. संध्याकाळी मात्र आमटी- भात किंवा मुगाची खिचडी असाच बेत असे. ऑफिसमधून येतानाच भाजी किंवा किराणा खरेदी करत. इतर सारी कामं सुट्टीदिवशी.

कुकर लावून त्या भाजी निवडत बसल्या. त्या सरावाने काम करीत होत्या पण त्यांच्या मनातून दिगंतचा विचार जात नव्हता. त्यांच्या नजरेसमोरून  दिगंत ऑफिसात हजर झाला त्या दिवसापासूनचे सारे वर्ष तरळून गेलं. दूरवर गाव असणारा दिगंत त्याच्या जिल्ह्यातील ऑफिसमधून विनंती बदलीवर इकडे आलाय म्हणल्यावर प्रत्येकाच्याच मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं पण अजूनही कुणाला त्याचं उत्तर मिळालं नव्हतं .

दिगंत आलेल्या क्षणापासूनच रिझर्व्हड् राहिला होता. त्यानं कार्यालयीन संबंध कार्यालयापुरते मर्यादित ठेवले होते.कुणी मागितली तर ऑफिसच्या कामात मदतही करायचा पण ते तेवढ्यापुरतंच असायचं. अवांतर गप्पातसुद्धा सहसा सामील व्हायचा नाही. ऑफिसमध्ये लंचब्रेक झाला की सारे आपले टिफिन घेऊन एकत्र गप्पा मारत जेवत असत. दिगंत आला त्यादिवशी आणि नंतरही दोनतीन दिवस सारे त्याला जेवायला  बोलवायचे पण तो थँक्स आणि सॉरी म्हणून बाहेर जेवायला जायचा.

दिगंतच्या अशा वागण्याबद्दल ,सुरवातीचे काही दिवस , त्याच्या अपरोक्ष चर्चा चालायची, कारणांचा अंदाज बांधला जायचा पण हळूहळू सारे बंद होत गेलं होतं. तरीही प्रत्येकाच्या मनात ,सुप्तावस्थेत का होईना,त्याच्याबद्दल  कुतूहल हे होतंच. तो कसाही असला तरी त्याच्यापासून कुणालाही कसला त्रास नव्हता. तो तसा खूपच सरळमार्गी वाटत होता आणि म्हणूनही असेल कदाचित पण तो जसा आहे तसा साऱ्यांनी त्याला स्वीकारलं होतं.

ऑफिसमधले दिवस कामाच्या रामरगाड्यात पूर्ववत जात होते पण ऑफिसमधून बाहेर पडलं की रात्री उशिरापर्यंत झोप येईपर्यंत सारिका मॅडमांच्या मनात मात्र दिगंतचाच विषय घोळत असायचा. तसं म्हणलं तर त्या आजारपणानंतर दिगंतशी ऑफिसातसुध्दा फारसं बोलणं झालं नव्हतं पण तरीही त्यांच्या मनातून दिगंतचा विषय गेला नव्हता.

काही दिवस असेच गेले आणि एका रविवारी त्या मार्केट मध्ये किरकोळ खरेदी करत असताना त्यांना दिगंत दिसला. त्याला हाक मारली तर ऐकू जाणार नाही जाणवून ‘ काय करावं?’ असा विचार, त्याच्यावरची नजर न हटवता त्या करीत असतानाच दिगंतने त्यांना पाहिलं. त्यांनी हातानेच , ‘ इकडे या.’ अशी खूण केली. दिगंत आला.हसत म्हणाला,

“ तुम्हाला पाहिल्यावर न भेटता जाईन कसा?”

“ पाहिल्यावर ना? पाहिलं नसतं तर..हाकही पोहोचली नसती म्हणून कसं बोलवावं याच विचारात होते मी. “

“ पहा, न पहा. बोलवा, न बोलवा. भेट व्हायची असली तर होणारच ,मॅडम.”

“ पाचच मिनिटं. एवढे सामान घेते. मग घरी जाऊ.”

“ घरीss?”

“ आता कोणतंही कारण ऐकणार नाही मी, आधीच सांगून ठेवते.”

‘ ओsके !’ ,म्हणत तो हसला.

“ चला, झाले सारे. निघूया.”

सगळी खरेदी झाली तेव्हा त्या दिगंतला म्हणाल्या.

“ घरी येतो पण एक अटीवर…”

“ आता आणि कसली अट घालताय ?”

त्याच्या वागण्या-बोलण्याचा अर्थ न समजून आश्चर्याने त्याच्याकडे पहात मॅडम म्हणाल्या.

“ मला तुम्ही यापुढं ‘अहो जाहो’ करायचे नाही. एकेरी बोलवायचं.”

“ अहो पण तसं कसं…”

“ ते काहीही नाही. तुम्ही या क्षणापासून तसं म्हणणार आहात आणि मी घरी येणार आहे. चला.”

“ ओके बाबा.. चल. का अजून काही अट आहे?”

“ आता कसं बरं वाटलं.अजून आहे ना..हातातल्या दोनपैकी एक माझ्या हातात येणार आहे आणि घरी गेल्यावर मस्त चहा द्यायचा.”

“ नाही हं आता काही ऐकणार . एक अट मान्य केलीय ना तुझी?”

“ ठीक आहे . पिशवी दया. चहा राहू दे. एक माझं एक तुमचं मान्य. चालेल ना?”

हसत हसत त्यांच्या हातातील काहीशी जड असणारी पिशवी घेत तो म्हणाला. त्याच्या बोलण्यानं हसू आलेल्या त्या काहीच न बोलता घराच्या दिशेनं चालू लागल्या.

क्रमशः… 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments