मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तहान – भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ ☆ तहान – भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

तिला भिकार्‍यांच्या बोलण्याचं हसू येई. त्यांना पैसे दिले, तर देव श्रीमंत करणार म्हणे. मग देव सरळ त्यांनाच का पैसे देत नाही, तिला वाटे. पण असं असलं, तरी प्रभू येशूच्या उपदेशाचे संस्कार तिच्या मनावर होत होते. ‘दीन-दलितांचे दू:ख निवारण करा…. तुम्ही केवळ स्वत:साठी जगू नका. इतरांसाठी जगा. प्रभू येशू जन्मभर तेच करत राहिला. चर्चचे फादर आणि सिस्टर्स तेच करताहेत. फादर फिलीपनी रसाळ भाषेत केलेलं सर्मन तिला आठवे. मग तिला वाटे, त्यांच्या पसरलेल्या हातावर काही नाणी टाकावी. यांच्यातच कुणी माझे आई-बाप असतील. त्यांना घोटभर चहा घेता येईल. पाव-बटर खाता येईल. क्षणभर तरी त्यांच्या दु:खी-कष्टी चहर्‍यावर आनंदाची छटा उजळून जाईल, पण तिच्याकडे पैसे नसत. क्रेशमधून तिला आवश्यक ते सगळं मिळे. पुस्तकं, वह्या, शैक्षणिक साहित्य, कपडे. सगळं काही मिळे. पैशाची तिला कधी गरजच नसे. नाताळ, ईस्टर आशा काही प्रसंगी क्रेशच्या वतीने तिथे जमलेल्या भिकार्‍यांना मिठाई वाटली जाई.  जसमीन ते वाटण्यात पुढाकार घेई.  ती मनातल्या मनात म्हणे, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यानो, तुम्ही मिठाई खा. तृप्त व्हा. रोज जेवताना जस्मीन प्रार्थना म्हणे, ‘प्रभू मला जसे सुग्रास भोजन मिळाले, तसे माझ्या आई-वडिलांना मिळो. तसेच इतरांनाही मिळो. आमेन…’

आई-वडिलांचा उल्लेख ती आवर्जून का करायची, कुणास ठाऊक? पण तसा होत असे. सहवासाने प्रेम, आपुलकी निर्माण होते म्हणतात. तिला काही त्यांचा सहवास लाभलेला नव्हता. तरीही आपल मन त्यांच्या भोवतीच का घुटमळत राहतं. सतत त्यांचाच विचार का करतं, तिला काळत नसे. की त्यामागेही काही ईश्वरी संकेत आहे? तिला वाटे. आपली आणि त्यांची पुन्हा भेट होणार आहे का?

क्रेशमधील सारी जण तिच्यावर प्रेम करत. पण आपण इथे उपर्‍या आहोत, आपण मुळच्या त्या भिकार्‍यांमधल्या… ही भावना आपली जीवनकहाणी ऐकल्यापासून तिच्या मनात जी रूजली, ती तिला कधी उपटून टाकताच आली नाही.

जस्मीनला निरोप देण्यासाठी आज चार वाजता क्रेशच्या रिक्रिएशन हॉलमध्ये एक छोटासा कार्यक्रम झाला. तिच्या अभ्यासू वृत्तीचं, नम्र, गोड वागणुकीचं सिस्टर मारीयानं खूप कौतुक केलं. ‘क्रेशाच्या सार्‍यांना तिचा अभिमान वाटला पाहिजे. शाळेतल्या सार्‍यांनी तिचा अनुकरण केलं पाहिजे…’ असा खूप काही काही बोलल्या त्या. जस्मीनलाही भरून आल्यासारखं झालं.

कुठल्या कोण आपण? यांनी किती केलं आपल्यासाठी आणि आपल्यासारख्या अनेकांसाठी…. केवळ आपल्याला त्यांच्या कळपात ओढण्यासाठी? लोकं टीका करतात. इथल्या लोकांना बाटवण्यासाठी सारा उपद्व्याप आहे म्हणतात. पण, टीका करणार्‍यांनी, नावं ठेवणार्‍यांनी काय केलाय आमच्यासारख्या मुलींना आसरा, निवारा, सुरक्षितता

लाभावी म्हणून? केवळ धर्मप्रसार करणं, एवढाच त्यांचा आंतरिक हेतू नाही, हे नक्की. निखळ माणुसकीचा झरा त्यांच्या हृदयात पाझरतो. प्रभू येशूच्या त्या देवदूताच्या संदेशावर, उपदेशावर त्यांची अपार श्रद्धा आहे. तो संदेश इतरांपर्यंत पोचवणं, म्हणजेच कळपात ओढणं की काय? आपल्या मातृभूमीपासून किती तरी लांब येऊन ते इथे राहिले. इथल्या लोकांची जमेल तशी सेवा केली. सार्‍यांना कुठे त्यांनी आपल्या कळपात ओढलय. आपण तर त्यांचे जन्माचे ऋणी….

क्रमशः … भाग 4

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈