सुश्री सोनाली लोहार
(आजची कथा अंधार सोनाली लोहार यांची आहे. त्या लेखिका, कवयित्री, ऑडिओलॉजिस्ट व स्पीच लॅंग्वेज पॅथॅलॉजिस्ट, उद्योजिका आहेत.)
जीवनरंग
☆ ‘‘अंधार‘…’ ☆ सुश्री सोनाली लोहार ☆
पुस्तक : गुंफियेला शेला – कथा २ : अंधार – सुश्री सोनाली लोहार
“मला एक आयफोन हवाय, नवीन मॉडेल..तुम्ही द्याल का आणून कुठून जरा कमी किंमतीत..?”
त्यानं नवलानं वत्सलाकडे बघितलं.
कोपऱ्यात पडलेल्या तिच्या नोकियाच्या मळकट फोनकडे बघत तो म्हणाला, “एकदम आयफोन…कशाला?? पैसे वर आलेत का तुझे! “
तिनं मान खाली घातली.
“दिपूचा वाढदिवस येतोय पुढच्या महिन्यात, पंधरा पूर्ण होतील..गावाहून आईचा फोन होता, म्हणाली त्याला हवाय.”
त्यानं डोक्याला हात लावला,” पागल आहेस का गं तू!अगं स्वतःकडे बघ जरा काय अवस्था करून घेतलीयस !अंगावर नावाला तरी मांस शिल्लक आहे का?? आणि हे असले महागडे हट्ट पुरवत बसशील तर पोरगा हातातून कधी गेला ते कळणार पण नाही हां!”
तिच्या डोळ्यात तरारून पाणी आलं , ” हातातून जायला आधी हातात तर असला पाहिजे नं!”
अंधारात तिचं अंग हुंदक्यांनी गदगदून गेलं..न राहवून त्यानं तिला जवळ ओढली. तिच्या पोलक्याची सुटलेली बटणं लावत तो पुटपुटला,” पोराच्या आयुष्यात रंग भरता भरता रिकामी होत चाललीयस वच्छी, मरशील अशानं एकदिवस! आणतो मोबाईल, पण पैशाचं काय?”
“पैशाची हुईल व्यवस्था, तुम्ही तेव्हढं जरा स्वस्तात मिळतो का बघा देवा”, ती हुशारून म्हणाली.
दारावर बाहेरून थाप पडली. कपडे झटकत तो विटलेल्या गादीवरून उठला आणि पत्र्याची कडी काढून तिच्याकडे न बघता बाहेर पडला. दाराबाहेर थांबलेलं दुसरं किडमिडं गिर्हाईक आत शिरलं.
दरवाजा लावताना बाहेर बसलेल्या संभ्याला ती म्हणाली,” आंटी को बोल, जेव्हढी पाठवता येतील तेव्हढी पाठव, पंधरा मिनटाला एक पण चालेल…मैं लेगी.”
त्या सहा बाय चार फुटाच्या पत्र्याच्या खोक्यातला अंधार तिला गिळताना पाय पसरून दात विचकत हसत होता….
टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री सोनाली लोहार यांच्याशी संपर्क साधावा.
चित्र साभार – फेसबुक पेज
©️ सुश्री सोनाली लोहार
मो. – 9892855678
ईमेल- sonali.lohar@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈