डॉ. ज्योती गोडबोले
☆ स्वार्थ… परमार्थ… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
एवढ्या मोठया बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये राजा आपला संसार थाटून रहात होता. बायको रंजू आणि मुलगा रोहन असे छोटेसे कुटुंब राजाचे ! राजाला आठवतं त्या दिवसापासून राजाची आई याच आऊट हाऊसमध्ये रहात होती आणि कायम बंगल्यातच राबण्यात जन्म गेला तिचा ! राजा चार वर्षाचा असतानाच त्याचे वडील वारले आणि आई आणि राजा याच आऊट हाउस मध्ये राहू लागले. आईने जिवापाड कष्ट केले आणि राजाला शाळेत घातले, शिकवणीही लावली. राजाचे वडील बंगल्यात वॉचमनचं काम करत असत, आणि गोगटे साहेबांचे अगदी विश्वासू उजवा हात होते ते. गोगटे साहेबांची दोन्ही मुलंही गुणी आणि हुशार होती. राजालाही ती दोघे शाळेत मदत करत आणि राजाला चांगले मार्क्स मिळत.
राजा बीकॉम झाला आणि गोगटे साहेबांनी त्याला एका कारखान्यात नोकरी लावून दिली. मग तर राजाची आई कृतज्ञतेने भारावूनच गेली. दरम्यान बऱ्याच घटना घडल्या. गोगटे साहेबांच्या पत्नी माई अचानकच निधन पावल्या. दरम्यान दोन्हीही मुलं परदेशी निघून गेली होती आणि एवढ्या मोठ्या बंगल्यात गोगटेसाहेब अगदी एकाकी एकटे पडले. त्यांनी राजाला अगदी कळवळून विनंती केली, “ राजा,आता तू तरी नको जाऊ घर सोडून. मला एकटे अगदी रहावत नाही रे. तू आपल्या आऊट हाऊसच्या मागच्याही दोन खोल्या नीट करून घे आणि इथेच रहा मला सोबत म्हणून !” राजाला वाईट वाटले आणि त्याने गोगटे साहेबांची विनंती मान्य केली. मुलगे जरी परदेशी असले तरी साहेबांची मुलगी नीता भारतातच होती. तिच्या नवऱ्याच्या आर्मीतल्या नोकरीमुळे त्यांच्या सतत बदल्या होत. जमेल तशी तीही आपल्या वडिलांकडे येत असे. पण वारंवार येणे तिलाही जमत नसे.
गोगटे साहेबांचे मुलगे वर्षा दोन वर्षांनी भारतात येत, महिनाभर रहात आणि निघूनजात. गोगटेसाहेबही बऱ्याचवेळा मुलांकडे परदेशात जाऊन आले होते. पण आता त्यांना ते झेपेनासे झाले. साहेबांची तब्बेत अजूनही छान होती. रोज सकाळी वॉक ,मग आले की बाई छानसा ब्रेकफास्ट करून ठेवत. त्या मग स्वयंपाक करून ठेवूनच निघून जात. सुट्टीच्या दिवशी ते राजाच्या कुटुंबाला घेऊन एखाद्या हॉटेलात जात आणि आनंदाने वेळ घालवत. राजाला त्यांनी कधीही नोकरासारखे वागवले नाही आणि आता तर तो स्वतःही बऱ्यापैकी नोकरीत होताच. गोगटे साहेब कितीवेळा म्हणायचे,” राजा,काय माझे ऋणानुबंध आहेत रे तुझ्याशी,सख्खी मुलं राहिली बाजूला आणि तूच किती प्रेम करतोस रे माझ्यावर.” अनेकवेळा रंजू साहेबांना जेवायला बोलवायची, सणासुदीला गोडधोड बंगल्यावर पोचवायची. नीता अधूनमधून यायची वडिलांकडे. तिला हे सगळं दिसायचं. रंजू राजा अतिशय मनापासून करतात आपल्या वडिलांचं, आणि त्यांना आपण भारतात असूनही आपली फारशी गरजही लागत नाही, याचा राग येई तिला. गोगटे साहेब हळूहळू थकत चालले. त्यांनाही आपली तिन्ही मुलं कशी आहेत ते नीट माहीत होतंच. त्यातल्या त्यात नीताचा स्वभाव फार स्वार्थी, मतलबी आणि धूर्त होता. खरं तर तिला काय कमीहोतं ? नवऱ्याला आर्मीत चांगला पगार होता, सासरचंही चांगलं होतं सगळं. पण इथे आली की दरवेळी आईचं कपाट उघडून फक्त सांगायची – “ बाबा, मी यावेळी हे चांदीचं तांब्याभांडं नेतेय बरं का. कधी ,मी आईची ही चेन नेतेय हं ! तिकडचे भाऊ आणि त्यांच्या बायकांना काय उपयोग या सोन्याचा?”
बाबा बिचारे गप्प बसत. आपलीच मुलगी ! काय बोलणार तिला? आणि तिच्या आक्रस्ताळ्या स्वभावाला घाबरून ते ती नेईल ते नेऊ देत तिला. गोगटे साहेबांचे तिकडे असलेले अजय आणि अमोल हे मुलगे जरा तरी रिझनेबल होते. राजा सतत आपल्या वडिलांजवळ असल्याने त्यांना खूप हायसे वाटे. मध्यंतरी बाबांचे प्रोस्टेटचे ऑपरेशन झाले तेव्हाही, त्यांना ऍडमिट करण्यापासून ते रात्री झोपायला जाण्यापर्यंत सगळे राजा आणि रंजूने तर निभावले, आणि म्हणून नीता किंवा त्यांना कोणालाच यावे लागले नाही. अजय अमोलला याची पूर्ण जाणीव होती. ही कृतज्ञता ते राजाला वेळोवेळी बोलूनही दाखवत. राजा म्हणायचा, “अरे काय बिघडतं मी केलं तर… माझे वडील दुर्दैवाने लवकर गेले पण मला तुमच्या बाबांनी कधी काही कमी नाही पडू दिलं. मी आज त्यांच्यामुळेच उभा आहे.”
बाबासाहेब दिवसेंदिवस थकत चालले. त्या दिवशी त्यांचे वकील मित्र दाते काका आलेले दिसले आणि दुसऱ्या दिवशी गोगटेसाहेबांना गाडीतून नेलेलेही बघितले रंजूने. असेल काहीतरी काम म्हणून ती आपल्या कामाला लागली. रंजनाचा मुलगा आता मोठा झाला होता. कॉलेजला जायला लागला होता. चांगलाच हुशार होता तो अभ्यासात ! त्याची स्वप्न ध्येयं वेगळी होती. “ आई, आपण या आऊट हाऊसमध्ये आणखी किती वर्षे रहायचं ग? मोठं आहे हे मान्य आहे.. पण किती त्रास होतो बाबांना. सतत हाका मारत असतात गोगटे काका आणि किती राबवतात आपल्या बाबांना. यांची मुलगी आहे ना इथे? मग कधी कशी ग त्यांच्यासाठी येत नाही? आपले बाबा आणि तूसुध्दा किती वर्षे करणार? इथंच रहायचं का आपण कायम?” रोहन चिडून विचारत होता… “ पटतंय बाबा तुझं सगळं मला, पण बाबांना कुठं पटतंय? आंधळी माया आहे त्यांची गोगटे साहेबांवर. मी काही बोलायला लागले की गप्प करतात मला. अरे माई होत्या तेव्हा तर विचारू नको. हे घरगडी आणि मला स्वयंपाकीण करून टाकली होती अगदी ! “ रंजना उद्वेगाने म्हणाली.
राजा बाहेरुन हे ऐकत होता. “ हे बघा, तुम्हाला इथं रहायचं नसेल तर तुम्ही मोकळे आहात कुठेही जायला. मी बाबांना सोडून कुठेही येणार नाही, त्यांच्या अशा उतारवयात तर नाहीच.”
“अहो पण बाबा, त्यांना आहेत की तीनतीन मुलं. हा कसला त्याग बाबा? आम्हाला तुमची काळजी वाटते बाबा. आपल्या भविष्याचा विचार कधी करणार तुम्ही? जन्मभर इथेच रहायचं का आपण ?” रोहनने विचारलं.
“ हो. निदान बाबा असेपर्यंत तरी ! मग बघू पुढचं पुढं ! “ रंजना हताश होऊन आत निघून गेली.
गोगटे आता वरचेवर आजारी पडू लागले. राजाने त्यांच्यासाठी रात्रंदिवस काळजी घेण्यासाठी नोकर नेमले. त्याचे पैसे मात्र गोगटे काकांच्या अकाउंट मधून जात. राजाने मुलांना कळवले, “ तुम्ही येऊन जा,बाबांचं काही खरं नाही.” दोन्हींही मुलांचे फोन आले, “आम्हाला येता येत नाही. तूच बघ बाबा काय ते.”
नीताला कळवले तर तीही येऊ शकली नाही. गोगटे काका पुढच्याच आठवड्यात झोपेतच कालवश झाले. काकांचे अंत्यसंस्कारही राजानेच केले. मग मात्र तीनही मुलं आली. त्यांची बायका मुलं आली नाहीतच. राजाला अतिशय वाईट वाटले. सख्खी तीन मुलं असूनही आपल्यासारख्या परक्या मुलाकडून काकांचे अंत्यसंस्कार व्हावे, याचे फार वाईट वाटले त्याला. पण मुलं शांत होती.पंधरा दिवसांनी त्यांनी राजाला बोलावलं आणि विचारलं, “ राजा, खूप केलंस तू आमच्या बाबांचं. पण आता आम्ही कोणी इथे रहाणार नाही तर हा बंगला आम्ही विकायचं ठरवतोय….तू आमचं आउट हाऊस कधी रिकामं करून देतो आहेस ? एक महिन्यात सोडलंस तर बरं होईल. म्हणजे हा व्यवहार करूनच आम्ही तिकडे निघून जाऊ.”
राजा हे ऐकून थक्क झाला.त्याने स्वतःच्या खिशातून काकांसाठी केलेल्या खर्चाची विचारपूस तर जाऊच दे, पण एका क्षणात हे लोक आपल्याला जा म्हणून सांगतात, याचा त्याला अत्यंत संताप आला.’ विचार करून दोन दिवसात सांगतो,’ असं म्हणून राजा घरी आला.
त्याला एकदम आठवलं, काकांचे दाते वकील काही महिन्यापूर्वी काकांकडे आले होते आणि त्यांना घेऊन बाहेर गेले होते. राजा ताडकन उठला आणि दाते वकिलांकडे गेला .. “ ये रे राजा, झालं ना गोगटेचं सगळं नीट? तू होतास म्हणून निभावलंस रे बाबा सगळं. नाही तर कोण करतं हल्ली परक्या माणसासाठी एवढं? तेही,एका पैची अपेक्षा न ठेवता? शाबास हो तुझी ! “ दातेकाका म्हणाले. राजाच्या डोळ्यात अश्रू आले…
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈