डॉ. ज्योती गोडबोले

☆ स्वार्थ… परमार्थ… भाग – २  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(तू होतास म्हणून निभावलंस रे बाबा सगळं. नाही तर कोण करतं हल्ली परक्या माणसासाठी एवढं?तेही, एका पैची अपेक्षा न ठेवता?शाबास हो तुझी ! “ दातेकाका म्हणाले… राजाच्या डोळ्यात अश्रू आले.) इथून पुढे —- 

“ काका,तुम्ही बघत होतात..  मी कोणतीही अपेक्षा न ठेवता माझे वडील मानून गोगटेबाबांचं सगळं केलं. पण आता मीच बेघर व्हायची वेळ आली हो. मला एक महिन्यात जागा खाली करायला सांगत आहेत हे लोक. आता मी कुठं जाणार आणि एवढे पैसे घालून घर तरी कुठे घेणार? अहो कानी कपाळी ओरडत होती माझी बायकामुलं. पण मी त्यांचं कधीही ऐकलं नाही. माझ्या खाजगी नोकरीत  मला काही खूप पगार नाही आणि नव्हताही. कसे फेडणार होतो मी घर घेऊन हप्ते? या आउट हाऊसच्या तीन खोल्या पुरेशा होत्या आम्हाला काका.” राजाला अश्रू अनावर झाले.

दाते काका त्याच्या जवळ बसले आणि म्हणाले, “ राजा,देव असतो पाठीशी !माझा मित्र शहाणा होता. त्याला तुझ्या आपुलकीची, निरपेक्ष कष्टाची जाणीव होती बाबा ! जा घरी तू. उद्या मी बंगल्यावर येतोय. बारावे होईपर्यंत थांबलो होतो. जा तू. होईल सगळं ठीक बाळा !” 

राजा घरी आला. झोप उडाली होती त्याची. उद्या काय होणार आणि दातेकाका तरी काय चमत्कार करणार हे त्याला समजेना.  दुसरा दिवस उजाडला. सकाळी दाते काकानी सगळ्याना फोन करून घरी थांबायला सांगितले होतेच. दाते वकील घरात आले. म्हणाले, “आता तुमचे बाबा गेले !आता तुमचा विचार काय आहे?” तिघेही म्हणाले, “आम्ही हा बंगला विकणार काका. आम्ही तर परदेशात असतो. आता इथे कधीही येणार नाही आम्ही. “ 

“ बरं बरं ! मग या राजाचं काय? त्याने इतकी वर्षे इथे काढली. तुमच्या वडिलांच्या एकाही दुखण्याखुपण्यापासून ते अगदी अंत्यसंस्कारापर्यंत तुम्ही कुणी आलासुद्धा नाहीत. सगळं राजाने निभावलं. त्याची सोय काय? “ दात्यांनी विचारलं.

“ त्याची कसली आलीय सोय काका?  त्याने बघावं घर आता आपलं.” 

काका शांतपणे उठले. ब्रीफकेसमधून मृत्युपत्र काढले. हे माझ्या मित्राने केलेले कायदेशीर रजिस्टर्ड मृत्यपत्र. यात स्पष्ट  लिहिलंय ….  या बंगल्यातल्या सम्पूर्ण खालच्या मजल्यावर राजा गेले अनेक वर्षे भाडेकरू म्हणून रहातो. या बघा गेल्या वीस वर्षाच्या भाडेपावत्या ! तर आता तुम्ही हा बंगला भाडेकरू सकट विकत असाल तर उत्तम ! राजा खालचा मजला सोडणार नाही. तो कायदेशीर भाडेकरूआहे ! “ 

राजा आणि सगळी मंडळी थक्क झाली. राजाने मनोमन गोगटे बाबांना हातच जोडले. दाते मिस्कीलपणे हसत होते. आता लवकर बोला. मला वेळ नाही. राजा उद्या तू या खालच्या मजल्यावर शिफ्ट हो. केवळ बाबा होते म्हणूनच ना तू इथे रहात नव्हतास ?” दाते डोळा बारीक करून म्हणाले. “ होय हो काका,असंच झालंय.” राजा खूण समजून म्हणाला… “ मग आता तू ते आऊट हाऊस सोडून दे आणि इथे रहायला लाग. तू कायदेशीर भाडेकरू आहेस गेली वीस वर्षे. या बघा भाडे पावत्या. गोगटे काकांची सही असलेल्या सर्व पावत्या फाईलला व्यवस्थित लावलेल्या होत्या. तिन्ही भावंडांची बोलती बंद झाली. आता कसला बंगला विकला जाणार? कोण घेईल असा पूर्ण मजला भाडेकरूकडे असलेला बंगला?..   

दाते वकील निघून गेले.संध्याकाळी राजा त्यांना भेटायला गेला. त्याने दात्यांचे पायच धरले. “ काका,ही सगळी काय भानगड आहे ? माझी मती गुंग झालीय खरंच ! “ 

“ सगळं सांगतो. बस इथं ! हे बघ.माझा मित्र गोगटे काही मूर्ख नव्हता. तिन्ही आपमतलबी मुलं त्याला काय माहित नव्हती का?  मला सगळं सांगायचा बरं गोगटे ! प्रसंगी माझा सल्लाही विचारायचा तो. ती नीता एक नंबरची स्वार्थी आणि हावरट ! जवळजवळ सगळं  दागिन्यांचं कपाट साफ केलंय तिनं. तू किती आपुलकीने प्रत्येकवेळी गोगटेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंस, त्याच्या सर्व ऑपरेशनमध्ये त्याच्याजवळ कायम होतास, हे तो कसा विसरेल? त्यानेही तुझ्यावर मुलापेक्षा जास्त माया केली आणि तुझी त्याच्यापश्चात सोयही करून ठेवली. ही मुलं तुझा उपयोग करून घेणार,आणि तुला बाहेर काढणार याची खात्रीच होती त्याला. म्हणून माझ्याच सल्ल्याने या भाडेपावत्या करून ठेवल्या आम्ही.आता तू कायदेशीर भाडेकरू ठरतोस.” 

 “ काका,मला खूप अवघड वाटेल हो असं तिथे रहायला ! नको नको,मी नाही जाणार असा तिथे ! “

“ अरे वेड्या, पुढची गम्मत काय होते ते बघत रहा. माझ्या अंदाजाने हे धूर्त लोक आता माझ्याकडे येतील. माझा सल्ला विचारतील. तुला कसे काढायचे हे विचारतील. तेव्हा मी सांगणार, ‘ तुम्हाला बंगल्याची चांगली किंमत यायला हवी असेल तर राजाला दुसरीकडे फ्लॅट घेऊन द्या. तरच तो खालचा मजला सोडेल. त्याने का म्हणून जावे दुसरीकडे?’.. अरे राजा, तुला आपोआप चांगला फ्लॅट विनासायास मिळेल बघ .ते झक्कत देणार तुला फ्लॅट ! तेव्हा मात्र उगीच दोन खोल्यांचा घेऊ नकोस. तू सगळं सगळं केलं आहेस ना  बाबांचं? मग या चोरांना सोडू नकोस. मी बघून देईन तुला चार रूम्सचा फ्लॅट ! आपण काही ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खात नाही आहोत. हे झाले की मग मीही  मित्रकर्तव्यातून मोकळा होईन. माझी भरपूर फी गोगटेने आधीच दिलीय बरं ! भला माणूस माझा मित्र.” दाते आणि राजा दोघांचेही डोळे भरून आले. 

अपेक्षेप्रमाणे तिन्ही भावंडे आलीच दाते वकिलांकडे.. ‘  निर्वेध बंगला असेल तर फार उत्तम. किंमत लगेचच येत होती. आता आम्ही काय करू आणि राजाला कसे बाहेर काढू?’ हा सल्ला विचारत होते तिघेही. दाते म्हणाले, “ तो असा कसा जाईल? आता तुम्ही जर त्याला बाहेर फ्लॅट घेऊन दिलात तर मग बघता येईल.” 

“ काका, तीस पस्तीस लाखाचा फ्लॅट द्यायचा का  या चोरालाआम्ही ?” .. तणतणत तिघेही म्हणाले.

“ नका देऊ मग. तो राहील की तिथेच. मला मूर्ख समजू नका. गोगटेच्या बंगल्याची किंमत आज चार कोटी तर आहेच. कमी येत नाहीयेत तुम्हाला बंगला विकून पैसे ! ही गोगटेची इच्छा होती, राजा बंगल्यातच रहावा. तो कुठे म्हणतोय मला फ्लॅट द्या? बघा बुवा! “ 

आठच दिवसात राजाच्या पसंतीचा फ्लॅट  तिघा भावंडांनी त्याला दाखवला. दाते वकिलांनी कायदेशीर  कागदपत्रे तयार करून फ्लॅट राजाच्या नावावर केला. राजाने आऊट हाऊस लगेचच सोडले आणि पुढच्याच महिन्यात भरपूर किमतीला बंगला विकला गेला. पैशाची वाटणी करून दोघे भाऊ अमेरिकेला निघून गेले. राजाला फार सुरेख फ्लॅट मिळाला.

राजाने  दाते  काकांना घरी जेवायला बोलावले आणि मोठी रक्कम त्यांच्या हातात ठेवली. “ काका,तुम्ही नसतात तर आज मी कुठे गेलो असतो हो ? गोगटे बाबा आणि तुमचे अनंत उपकार आहेत माझ्यावर “  राजाला रडू आवरले नाही. रोहन आणि रंजना त्याच्याजवळ बसले आणि म्हणाले, “ आम्ही चुकलो. तुमच्या निरपेक्ष सेवेचं भरघोस फळ तुम्हाला मिळालं. आम्हाला  तुम्ही माफ करा बाबा. दाते आजोबा,  किती आभार मानावे तुमचे ते कमीच आहेत खरं तर ” रोहन म्हणाला.

“ बघा ना, गोगटेआजोबा गेल्याक्षणीच त्यांची मुलं बाबांना घर सोडायला सांगत होती. आज हे मृत्युपत्र नसते आणि तुम्ही ते गोगटे काकांकडून हुशारीने करून घेतले नसते, तर मात्र आम्ही रस्त्यावर आलोच असतो “. रोहनच्याही डोळ्यात पाणी आलं. “ अरे हो बाळा, हे असंच घडलं असतं, पण सत्याचा वाली देव असतो बाबा. तुझ्या बाबांना न्याय मिळाला बस. मी मित्रकर्तव्यातून मुक्त झालो. रोहन,तू सुद्धा तुझ्या बाबांसारखाच सरळ सज्जनपणे वाग. देव आपल्याला काही कमी  पडू देत नाही.” 

…. दाते काकांचेही डोळे मित्राच्या आठवणीने भरून आले होते .

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments