सौ. प्रांजली लाळे
जीवनरंग
☆ विवाह करार – भाग-1 ☆ सौ. प्रांजली लाळे ☆
कैवल्यनं ठरवले होते मस्त आयुष्य एन्जॉय करायचे.अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून..स्वच्छंदी जगायचे..भरपूर पैसा कमवायचा..पण फक्त स्वतःसाठीच..खाओ पिओ ऐश करो..अरे हेच तर आपलं लाईफ..तो तसा चारचौघात उठून दिसणारा.मुलींची लाईन वगैरे मागे नसली तरी एखादी तरी सहज मागे वळून पाहिल इतका स्मार्ट तर नक्कीच..करीअर आणि बस् करीअरच!! डॉक्टरकीची पदवी मिळाल्यानंतर त्याने आता स्वतःची प्रॅक्टिस सुरु केली..पंचवीशीतला तोरा आणि लवकरच पदरात पडलेले यश..यामुळे तो अधिकच रुबाबदार वाटू लागला..आई-बाबा आणि मोठी ताई एवढेच काय ते चौकोनी कुटुंब..ताईचेही लग्न ठरले..वेल सेटल्ड परागशी अरेंज म्यारेज झाले.तेही थाटामाटात..घरातील वातावरण अगदी आनंदात होते..
आता सर्वांची नजर कैवल्यवर होती..तु कधी करणार रे लग्न?? छे छे सध्या तरी नाहीये विचार..असे म्हणून टाळला त्याने विषय..मी भला आणि माझं काम भलं..असे रुटीन सुरुच होते त्याचे..दवाखान्यातल्या बऱ्याच केसेस चुटकीसरशी सोडवणाऱ्या कैवल्यला मनातील गुंता काही सुटत नव्हता..लग्नाबाबतची कोणतीही रिस्क त्याला घ्यायची नव्हती..त्याच्या एक दोन मित्राचे कटू अनुभव तो ऐकून होता ना !!
असो..
एक दिवस सकाळीच दवाखान्यातुन इमर्जन्सीचा फोन आला..दुसऱ्या क्षणी कैवल्य गाडी काढून दवाखान्याकडे निघाला देखील..कर्तव्यदक्ष डॉक्टर!!
एक तरुणी तिच्या बाबांना घेऊन आली होती..बाबांना सिविअर हार्ट अटॅक आला असावा..असा प्राथमिक अंदाज..तपासणी अंती तात्काळ ऑपरेशन करायचे ठरले..ती तरुणी अतिशय घाबरलेली..कोणताही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नव्हती..सर्जरी आधी फॉर्मवर तर सही करावी लागणार होती..अतिशय नाजूक प्रकरण आहे हे कैवल्यने जाणलं..तिचं नाव काव्या असल्याचे समजले..तुझ्या बाबांना काही होणार नाही..ही फक्त फॉरमालिटी आहे..बाकी तुम्ही निर्धास्त रहा..असं म्हणताना तिच्याशी नजरा नजर झाली..आखीव रेखीव नाक- डोळे,गहू वर्णीय ती ललना..मनाचा ठाव तर घेत नव्हती त्याच्या???
फॉर्म भरला गेला.काव्याला आश्वस्त करुन कैवल्य कामाला लागला..मन शांत..डोक्यावर बर्फ..पुर्ण एकाग्रतेने त्यानं काव्याच्या बाबांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली..आता काव्या जरा निश्चिंत झाली..
काव्या अतिशय बडबडी मुलगी..सगळ्यांना आपलसं करणारी..दिलखुलास बोलणं..पाच-सहा दिवसातच आख्खा दवाखाना ओळखीचा..कैवल्यही जरा हलला..मुली अशाही असतात तर..डिस्चार्ज मिळाल्यावर पुनर्तपासणीला दोनदा तीनदा तिचं येणं झाले..कैवल्यशी जुजबी बोलणं झाल्यावर समजले की तिचा दादा परदेशात असतो..आई बाबा आणि तिच भारतात फक्त..अचानक झालेल्या या प्रकाराने हादरुन गेले होते..पण सर्जरी उत्तम पार पडल्याने सुखावले देखील होते..
एक दिवस अचानक काव्याचा फोन आला..बाबा कसंतरी करतायेत..कैवल्यने कोणतेही आढेवेढे न घेता घरी येण्याची तयारी दर्शवली..काही तरी बदल घडत होता..पण काय ते नव्हते कळत त्याला..बाबांची शुगर प्रचंड वाढली होती..त्यामुळे रात्रभर तरी निरिक्षणाखाली रहावं लागणार होते..काव्याचे सोज्वळ वागणे त्याला जास्त भावले..जेष्ठांची काळजी घेणं जाम आवडलं..पहाटे शुगर नॉर्मल झाल्यावरच डॉ.कैवल्य घरी जायला निघाले..
आजकाल डॉ.कैवल्य काव्यामय झालेले..हे त्यांच्या आईसाहेबांच्या नजरेतुन सुटले नाही..कैवल्य मात्र काहीच न झाल्यासारखा कामात मन गुंतवत असे…काव्यालाही असेच वाटते का हा प्रश्न मनात रुंजी घालू लागला..
पेशंट तपासून झाले आणि केबीनकडे वळतच होता..अचानक काव्या समोरून येताना दिसली.निरभ्र आकाशावर गुलाबी छटा यावी..तसा आकाशी ड्रेस गुलाबी ओढणी असा पेहराव घातलेली काव्या पाहून मंत्रमुग्ध झालेला कैवल्य जसा होता तसाच उभा..
निशब्दं भावनांचा कडेलोट होतो की काय अशी भिती क्षणभर कैवल्यला वाटायला लागली..क्षणात चेहऱ्यावरचे भाव कडक इस्त्री फिरवल्यासारखे सपाट!!
एक ना एक दिवस अव्यक्त भावना व्यक्त होणारच..पण कशा?? लग्नसंस्थेवर विश्वास नसलेला कैवल्य लग्न करुन लग्न बंधनात अडकणारा नव्हता..आणि काव्याने आई बाबांच्या काळजीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता..
खरं तर लग्न हे असे नाते असते की ज्यामुळे आयुष्य जगण्याला वेगळा अर्थ प्राप्त होतो..एकमेकांसाठी जगणं म्हणजे प्रेम असते !! पण त्या प्रेमाला लग्न नावाचं कोंदण तर हवंच..
काव्या तिथून निघून गेल्यावर बराच वेळ कैवल्य ओपीडीत विचार करत बसलेला..भावनावेश उफाळून येत असला तरी त्याच्या ठायी अहंकारही होताच की..काव्याही आता त्याच्यात गुंतत चालली होती..काही ना काही कारणाने कधी मुद्दाम तर कधी अनाहूतपणे कैवल्यला भेटणे व्हायचेच..दोघात भक्कम मैत्रीचे नाते निर्माण झाले होते…एकमेकांना जाणून घेता घेता एक नातं फुलत होतं दोघांत..त्या नात्याचं नाव मात्र नव्हते सापडत दोघांना…
मैत्री की अजून काही हे समजायला किती वेळ लागणार होता कोणास ठाऊक??
काव्यालाही आता कैवल्यबद्दल विश्वास वाटायला लागला होता..तो आहे ना..मग काही टेन्शन नाही..मग ते प्रेम आहे की आणखी काही माहिती नाही?? दोघेही निशब्दं होऊन फक्त नजरेतुन एकमेकांना बरंच काही सांगून जायचे..पण अर्थ मात्र लागत नव्हता..हेच तर प्रेम नसेल??
कैवल्यने आता स्वतःला गुंतवून घ्यायचे ठरवले..काव्याही शक्यतो दवाखान्यात जायचे टाळू लागली..क्या यही प्यार है??
कधी मधे फोन व्हायचा पेशंटची(?)चौकशी करायला..
काव्याला टाळणे जरी शक्य झाले तरी मनाचे काय??
दोघांचीही मनस्थिती कैवल्यची आई जाणून होती..तिने काव्याच्या आईला फोन केला..मग काय खलबतं झाली..दोन्ही आईंची..अस्फुट भावना कुठे तरी व्यक्त झाल्या तरच त्या सुंदर अविष्कार घडवतात..नाही तर अव्यक्त..अर्धोन्मिलित कळीसारख्या तिथेच गळून जातात..
कैवल्यच्या आईने थेट विषयालाच हात घातला..कैवल्या मला आता असे वाटतेय तु लग्न करावेस..मलाही सूनमुख बघायची घाई झाली आहे..माझ्या पहाण्यात आहे एक मुलगी..तु बघ आणि ठरव..आई मला लग्न या concept वरच विश्वास नाही..प्लीज तु मला अडकवू नकोस..मी असाही खुप सुखी आहे..इती कैवल्य..
आई काहीच बोलली नाही..कैवल्य दवाखान्यात गेल्यावर काव्याला घरी बोलावुन घेतले..काव्या दुपारी पोहचली कैवल्यच्या घरी..तसे तिचे या आधी एकदा दोनदा येणं झाले होते..त्यामुळे परकेपणा कधीचा गायब झालेला..तिच्या बोलक्या स्वभावाने न बोलणाऱ्यालाही बोलायला लावणारी काव्या कैवल्यच्या आईला अतिशय आवडली..कैवल्यचे बाबाही काहीसे अबोल..आणि कैवल्यही तसाच कमी बोलणारा..ताई होती बोलकी..पण ती आता सासरी गेलेली..मग काय कमालीचे एकटेपण आलेले घरात..मै और मेरी तनहाई..बस्स्…काव्या आली आणि क्षणात घरातील माहोलच बदलून गेला..कैवल्यच्या आई जाम खूष..तिने सोबत आणलेल्या सुरळीच्या वड्या आणि पाकातल्या पुऱ्या दोघींनीही जवळजवळ फस्तच केल्या..सोबत गप्पांचाही ओघ होताच की..बोलता बोलता काकूंनी काव्याला तिचे मतही विचारले लग्नाबद्दल..हम्म..मी सध्या तरी लग्नाचा विचार नाही करणारे…आई बाबांना कोण सांभाळेल..लग्न करण्यात जोखीम आहे वगैरे बरंच काही..पण नकारात्मक विचार..इतकी आशावादी मुलगी..ह्याबाबत निराशावादी होती हेही तितकेच खरे..तरी कैवल्यच्या आई आशावादी होत्या..नातेबंध सांभाळण्यात आणि ते निभावण्यातच आनंद मानण्याऱ्या..तुला कैवल्य आयुष्याचा जोडीदार म्हणून कसा वाटतो?? काव्या क्षणभर स्तब्धं झाली..पण निरुत्तर नाही बरं का..सलज्ज नजरेने तिने मान झुकवली..कैवल्यबद्दलच्या प्रेमाला आज जणू तिने मुक संमती दर्शवली होती…
संध्याकाळी कैवल्य घरी आल्यावर आईनं काव्या घरी येऊन गेल्याचं सांगितले…चेहऱ्यावरचा आनंद न लपवता आल्याने कशाला आली होती..किंचित ओरडलाच..अरे मीच बोलावलेले गप्पा मारण्यासाठी..आजकाल तुझे बाबाही मित्रांसोबत बाहेर फिरायला जातात..एकटेपणाचा मला कंटाळा येतो रे…मग काव्याला विचारले मी येते का गं कायमची रहायला इकडे?? काय???आईकडे आश्चर्याने पहात ओरडलाच..आईचे एकटेपण त्यालाही सतावत होते..त्याला वाटणाऱ्या काव्याबद्दलच्या अव्यक्त प्रेमाला आता व्यक्त होण्याशिवाय पर्याय नाही असे दिसत होते..पण पहले आप पहले आप असे किती दिवस??
काव्याशीच बोलायचं असं ठरवून कैवल्यने तिला फोन केला..आज ओपीडी लवकर संपेल. ऑपरेशन्स पण नाहीत आज कोणते..जवळच्या कॅफेला भेटुया…काव्याही चाट पडली..त्याचा बोलण्याचा स्वर आर्जवी वाटला..की फक्त मनाचा खेळ??
काव्याची तर द्विधा मनस्थिती.काय असेल कैवल्यच्या मनात? आपले आई बाबा काय म्हणतील?? एरव्ही बडबडी असलेली..न बोलणाऱ्यालाही बोलकं करणारी काव्या आज निशब्दं,आपल्याच विचारात गुरफटली…काय असेल कैवल्यच्या मनात?? याआधी आई बाबां व्यतिरिक्त असे कोणाबरोबर बाहेर भेटणं व्हायचे नाही असे नाही..ती आणि तिच्या मैत्रीणी भरपूर वेळा हास्य फवारे उडवत रेस्टॉरंट दणाणून टाकायच्या..पण असं खास भेटायचे म्हणजे जरा वेगळंच वाटले तिला..तिने खुप विचारांती कैवल्यला भेटायला येत असल्याचे सांगितले..
– क्रमशः भाग पहिला…
संग्राहक : सुश्री प्रांजली लाळे
मो न. ९७६२६२९७३१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈