सुश्री सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ मुलाखत… लेखिका – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुनिता गद्रे ☆
डॉ हंसा दीप
आसमंतात धुरळा उडवत — कच्च्या रस्त्यावर धडधडत एक मळकट बस त्या गावाच्या थांब्यावर येऊन गचकन् थांबली .
त्या वैराण गावात ‘ तिला ‘ उतरताना पाहून त्या बसच्या ड्रायव्हर, कंडक्टरच्याच काय पण प्रवाशांच्याही चेहर्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले . —–
ही मुलगी ह्या असल्या गावात उतरून काय करणार ?
हसत हसत ती खाली उतरली. रस्त्याकडेला असणाऱ्या एका पडक्या चौथऱ्यावर बसलेल्या एका पोरग्याला तिनं खुणावत बोलावलं.
” काय रे , हे रतनपुरच आहे ना ? ” तिने विचारले .
” व्हय जी !!”तो अवघडून उद्गारला .
” अरे , इथं तर काही वस्तीही दिसत नाहीय .” तिनं आश्चर्य व्यक्त केलं .”
” या गावची वस्ती ह्याच सडकेवर हाय … वाईच थोड्या अंतरावर ,एक होवाळ हाय, त्याच्या पल्ल्याड हाय बघा धा पंदरा घराची वस्ती .”
त्या मुलाच्या इशाऱ्यावरुन तिनं आपली नजर टाकली . मात्र तिथं कुठलीच वस्ती असल्याचा मागमूसही दिसत नव्हता .
त्या नजरेला नजरेनंच वाचत पोरगा उत्तरला ,
” ताय, वाईच चालावं लागेल .
चा पिणार तवर? पेशल चा? त्या पोराच्या चतुराईवर खुश होऊन तिने होकार भरला. सूर्य उतरणीला लागला होता. दूरवर पसरलेली विरळ झाडी, थोडी हिरवळ, क्वचित काही मोठे वृक्ष…. एकाच नजरेतून तिने टिपून घेतले. मधूनच धुरळा उडवत जाणारी एखादीच गाडी… बाकी सगळं सामसुमच! खेडेगावात असणारं हे नेहमीचंच दृश्य! इतक्यात पोरगा वाफाळलेला शुद्ध दुधाचा कडक गोड चहा घेऊन आला. नेहमी शहरात फिकट चहा पिणाऱ्या तिला हा दुधाचा दाट गोड चहा पिताना काही वेगळंच स्वादिष्ट पेय पीत असल्याचा ‘फील’आला. तिचा तो आनंदित चेहरा निरखत पोरानं प्रश्न केला, “ताय फोटू काढाय आलाय व्हय? “?
” हो तुला काढायचाय्?” या प्रश्नावर लाजलेला तो आपल्या चिकट तेलकट वाऱ्याने विस्कटलेल्या केसांना बळेबळे चापून बसवत म्हणाला,”व्हय जी मला फोटू काढून घ्याया लय आवडतं.”
“नाही ,नाही….. इथं नको, तुझ्या चहाच्या टपरीवर काढू या… चहा करतानाचा”… तिनं त्याला सुचवलं. खुष होत त्यानं घाईघाईनं किटली झाकणावर दणका देत बंद केली. आणि फोटोसाठी निघाला सुद्धा. चहाचे पैसे घ्यायलाही तो संकोचू लागला. त्याच्या मागोमाग पाऊलवाटेवरून चालत ती दोघं टपरीवर पोहोचली. बाजूलाच काही गाई चरत होत्या, तर काही जवळच्या पाणवठ्यावर पाणी पीत होत्या. तिथंच जरा वरच्या अंगाला म्हशी पाण्यात डुंबत होत्या. हे निरखतच ती झरकन् पुढे झाली, जिथं पाच सात उघडी, मळकी पोरं खेळत होती. धुळीने भरलेली विस्कटलेल्या केसांची…. तिनं गोड आवाजात त्यांना आपल्याजवळ बोलवून आपल्या बॅगेतली काही चॉकलेट्स बाहेर काढली आणि प्रत्येकाच्या हातावर ठेवली.. आणि आपापल्या आयांना बोलवून आणायला सांगितलं. तशी ती पोरंही हातातल्या चॉकलेट कडे बघत, मागे वळून बघत, काहीशी लाजत, संकोचत आईला घेऊन यायला निघाली. आणि ही परत त्या वस्तीच्या राहणीचाअंदाज घेऊ लागली.
दिवसभर तर इथले पुरुष कामानिमित्त घराबाहेरच शेतीच्या कामात व्यग्र राहत असतील.शहरी वातावरणापासून अगदी अलिप्त असे हे छोटसं गाव!
..पिवळ्या मातीने बनवलेली कौलारू, छोटेखानी, झोपडीवजा घरं,… बाहेर बसाउठायला बांधलेले ओबडधोबड चबुतरे… वारली किंवा तत्सम ग्रामीण शैलीत चितारलेल्या घराच्या भिंती… ती हे सगळं निरखत राहिली, अगदी अभ्यासू दृष्टीनं! काही घरांच्या भिंतीचे तर ती मुलं येईपर्यंत फोटोग्राफ्स देखील घेऊन झाले. मनोमन ती सुखावली.
इतक्यात काहीशा गोंधळाच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. हातात चॉकलेटं जशीच्या तशी ठेवून आयांना सोबत घेऊन ती मुलं तिच्या दिशेने येत होती. त्या बायकाही तरातरा जरा राग मिश्रित हातवारे करत तिच्या दिशेने येत होत्या. अभावीतपणे नमस्कारासाठी तिचेहात
जुळतात न जुळतात तोच,
“काय वो, ही चॉकलेटं तुम्हीच दिलीसा नव्हं?”असा बोचरा प्रश्न तिने ऐकला.
“हो.”
“कशाला दिलीसा?”
“सहजच.. काही कारण नाही!”
“धनी घरात नाय, म्हणूनशान आमच्या पोरांस्नी फसवून, पळवून नेतेस व्हय गं बये?”
नीट अर्थ लागला नसला तरी त्या बायकांच्या अविर्भावामुळे परिस्थितीचे गंभीर ओळखून ती म्हणाली,
” नाही हो, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा.”
“न्हाय कसं? ही थोरली माय बराबर बोलतीया…. तुमी मोठ्या शेहेर गावातली मानसं असाल… पर आम्हास्नी येडंखुळं नगा समजू!” एकापेक्षा एक जळजळीत नजरेनं त्या बायका तिला न्याहाळू लागल्या. हा उपेक्षेनं भरलेला आरोप तिला सहन होईना.
“अरे माझ्यावर विश्वास तरी ठेवा. एका खास कामानिमित्त मी तुमच्या गावी आलेय्.”
” वाईच आईकलं काय गं बायांनोऽऽऽ, ही शेर गावची बया हितं खेड्यात कामापायी आलीया म्हनं! वाईच खरं वाटंल असं तरी बोलावं म्हंते मी!”
क्षणभरासाठी तिला वाटलं,’ ती खरंच कोणी अट्टल चोर आहे आणि पोलिसांनी तिला रंगे हात पकडलंय् .खरंच इथपर्यंत आपण मोठ्या सहजतेने पोहोचलो. वाटलं मुलाखतीचंच तर काम आहे, होईल चुटकी सरशी! आत्ता कुठे कळलं कि… हे शहरातलं आणि खेड्यातलं अंतर एखाद्या खोल दरीसारखं आहे, कधीच न सांधता येणारं!’
भेदरल्यामुळे कोरड्या पडत चाललेल्या शुष्क ओठावरून तिनं हलकेच जीभ फिरवली.. आणि अजीजीनं तिनं मन मोकळं करण्याचा प्रयत्न सुरू केला,….” हे पहा माझ्या बाबतीत तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका
मी तर तुमची लोकगीतं, जी तुम्ही लग्न आणि इतर विशेष कार्यक्रमात गाता.. ती मिळवण्यासाठी इथं आलेय्. “ए चला गं बायांनो आपापल्या वाटेनं, लई कामं पडलेती घरात! हितं आमची गाणी ऐकूनशान् तू शेहेरात बक्कळ पैसा कमणार हैस नं ?” हा खरखरीत आवाज त्यांच्यापैकीच एखाद्या प्रौढ स्त्रीचा असावा.
“नाही हो मावशीबाई, ह्या अशा पारंपारिक लोकगीतावर एक पुस्तक लिहितेय मी.” आपला विचार चांगला असल्याचे पटवण्याचा ती परोपरीनं प्रयत्न करत होती
“काय करणार हाईस त्या पुस्तकाचं?”
” मी कॉलेजमध्ये शिकवते. पुढच्या अभ्यासासाठी मला हे पुस्तक लिहायचंय्.”
” मास्तरणी हाएस जणू?”
” हो “
ते ऐकताच रागाने त्यांच्या नाकपुड्या फुरफुरू लागल्या बहुतेक मास्तर या शब्दाची त्यांना घृणा असावी. इतक्या वेळेपर्यंत दाबून ठेवलेला त्या साऱ्याजणींचा राग उफाळून बाहेर आला. दातओठ खात त्या म्हणाल्या,” म्हंजे पोरास्नी शाळंत शिकवणारी बाई हैस तू?”
“नाही…. मी मोठ्या मुला- मुलींना शिकवते.”
एखाद्या विजेचा करंट लागल्याप्रमाणे त्या चित्कारल्या, “संग संग बसवून ?”
“होय” तिनं हामी भरली. काहीतरी घोरपातक हातून घडल्यासारखं साऱ्याजणी तिच्याकडे रोखून बघू लागल्या. आता पूर्ण शरीरभर त्या बायकांची नजर फिरू लागली. तिची राहणी, देहबोलीतून काही जाणून घेण्याचा प्रयत्न त्या करू लागल्या. तिची फॅशनेबल केसांची रचना, तिचा पंजाबी ड्रेस, मनगटावरचे नाजूक घड्याळ, इतकंच् काय पण नखावरचं नेल पॉलिशही त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. घाबरं घुबरं होत, काहीसं संकोचत ती आपली ओढणी सावरू लागली. एका यशस्वी प्रोफेसरला मास्तरीण म्हणणं आणि त्यांचं ते न्याहाळून बघणं…. तिला कसंनुसं करून गेलं. चक्क घामाघूम झाली ती! इकडे त्या बायका कधी तिला न्याहाळत, तर कधी आपापसात खाणाखुणा करत होत्या. मुलांची मात्र चॉकलेट्स हातात असूनही ती मनमुराद खाता येत नसल्यामुळे पंचाईत झाली होती. आतापर्यंत लाळ गळायचीच काय ती बाकी राहिली होती.
इतक्यात एक आगाऊ प्रश्न तिच्या कानावर आदळला ,
“ए बाय ,लगिन झालंया नव्हं तुजं?”
“हो, बारा वर्षें झालीत माझ्या लग्नाला.”
“बारा वरीस ?”
सगळ्याजण परत एकदा आपादमस्तक न्याहाळत तिचा अंदाज काढू लागल्या.
“पोरगा हाय न्हवं तुला ?”
“नाही… मुली आहेत दोन… एक नऊ वर्षाची आणि दुसरी सहा वर्षाची!”
… त्यांच्या डोळ्यातला बदललेला भाव तिला जाणवला. त्यातलीच एक आपुलकीनं म्हणाली,”घाबरू नको पोरी, आताच्या खेपंला पोरगाच होईल.”
ते आधार युक्त आणि काळजीने भरलेले शब्द ऐकताच ती नव्या नवरी सारखी सुखावली…. लाजली देखील!
” पाणी पेणार?”
घशाला पडलेली कोरड जाणवत तिने होकार दिला. तिने पाणी पिताच इकडे जणू पोरांनाही चॉकलेट खाण्याचा परवानाच मिळाला. त्या खेडवळ बायकांनी तिला स्वीकारल्याचा तो संकेतच होता. इकडे बायकाही आनंदात एका पाठोपाठ एक पारंपरिक गीते गाऊ लागल्या. एकमेकांच्या ग्रामीण आणि शहरी संस्कृती अशा काही एक- जीव झाल्या की जणू काही त्या कधी वेगळ्या नव्हत्याच. दोन नद्यांच्या संगमासारख्या ! गावाकडे आली तेव्हा एक शहरी बाई असलेली ती थोड्या वेळा नंतर शहराकडे परत जाताना “शहरातली ताई” बनली. नक्की परत येण्याच्या एकमेकांत आणाभाका घेत ती आली तशीच गेलीही…. बसनंच….. तिच्याबरोबर होतं, ‘एक मुलाखत ‘यशस्वी झाल्याचं विजयाचं अन् समाधानाचं हास्य!
हिंदी कथा – इंटरव्यू – लेखिका डॉ हंसा दीप
मराठी भावानुवाद- सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈