श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆
मागील भागात आपण पहिले – ह्या बघा आमचो मांगर आसा. बंद असता. तुमका जमला तर रवा.
पण भाडा?
ह्या पगारात भाडा काय देतालात ओ? भाडा नको. फत माझो झील आसा आठवीत तेच्या अभ्यासार लक्ष ठेवा. ‘ – आता इथून पुढे )
हो. हो. निश्चित. पण पाण्याची सोय वगैरे ?
विहीर आसा. भरपूर पाणी. मांगरात एक मोरी आसा. विठू, मास्तरांका मांगर उघडून दाखव. दुकानदार मिराशी चा नोकर विठू पुढे चालू लागला तसे मास्तर तेच्या मागून गेले. पाटणकरांनी मांगर पाहिला. जागा बरी होती. बाहेर एक खोली आत एक. त्याखोलीत मोरी. मांगराला मागचे दार होते. थोड्या अंतरावर विहीर होती. विहीरीवरुन बायका पाणी नेत होत्या. म्हणजे बायकोला वनिताला सोबतीण मिळणार. पाटणकरांना जागा बरी वाटली. त्यांनी दुकानदार मिराशींना सांगून टाकले. रविवारी सामान घेवून येतो. मिराशी म्हणाले, भाडा नको. पण लाईट बिल तेवढा भरा. पाटणकर घरी जायला निघाले. त्यांचे लक्ष परत त्या छोट्याशा सलून कडे गेले. आता सलून मध्ये कुणीतरी दाढी करायला बसला होता. ह्या व्यवसायामुळे आपली भावंडे, आई-वडिल दोन घास जेवतात. ह्या सलूनाचा पाटणकरांना आधार वाटला.
रविवारी सकाळी पाटणकरांची बायको वनिता आपल्या दोन वर्षाच्या मुलासह एस.टी ने आली. त्याच्या आधी पाटणकर येवून पोचले होते. मिराशींच्या दुकानातील झाडूने त्यांनी मांगर स्वच्छ केला आणि सोबत आणलेल्या कळशीने दोन बादली पाणी भरुन ठेवले. मिराशींच्या बायकोने चूल पेटवायला म्हणून सोडणे, झावळ्या, थोडी लाकडे दिली. वनिता ने सोबत आणलेल्या तांदळाची पेज आणि मिराशींच्या वाट्यावर चटणी वाटली. मिराशींच्या दुभत्या म्हशी होत्या, त्यामुळे दुधाचा प्रश्न मिटला. आणि पाटणकरांचा संसार या नवीन गावात सुरु झाला.
दुसर्या दिवशी पाटणकर शाळेत हजर झाले. अकरावी साठी फिजिक्स शिकवायला वर्गात गेले. मुला-मुलींची ओळख करुन घेताना त्यांच्या लक्षात आले की मुल त्यामानाने मोठी आहेत. बहुतेकजण अठरावर्षापेक्षा जास्त वयाची होती. चौकशी करताना समजले, हुशार मुलं दुसरीकडे शिकायला गेली आणि ज्या मुलांना पुढे शिकायच नव्हत ती मुलं या शाळेत येत होती. पाटणकरांनी फिजिक्स मधल सरफेस टेंशन हा धडा शिकवायला सुरुवात केली. त्यांनी फळ्यावर डायग्राम काढून थोड इंग्रजीत, थोड मराठीत शिकवायला सुरुवात केली. काही वेळा नंतर शिकवलेल्या अभ्यासाच्या नोटस् लिहायला घातल्या. सहजच, ते खाली उतरुन विद्यार्थ्यांच्या वह्या बघायला गेले तर त्यांना आश्चर्य वाटले. बहुतेक मुलांनी काहीही वहीत लिहीले नव्हते. मुलांचे म्हणणे त्यांना इंग्रजी लिपी व्यवस्थित येत नाही. त्यांनी एका मुलीला उठविले. अगं, मी घातलेले तु का लिहीत नाहीस?
सर, आमका इंग्रजी येना नाय. मराठी येता. मराठीत अभ्यास घाला.
अगं, पण परिक्षा इंग्रजीत असते. सर्व सायन्स इंग्रजीत शिकावे लागते.
पण आमका इंग्रजीची भिती वाटता.
मग दहावीत पास कसे झालात तुम्ही?
एक मुलगा मागून ओरडला. कॉपी करुन.
म्हणजे?
आमचे इंग्रजी चे शिक्षक चाळीस मार्काचा सगळ्यांका सांगत. म्हणून आम्ही पास झालो.
मग तुम्ही सायन्स ला का अॅडमिशन घेतलीत?
आमका पुढे नर्सिंग करुचा आसा. बारावी सायन्स झालव की नर्सिंग मध्ये अॅडमिशन गावतली.
मग बारावी पास व्हायला लागेल ना?
दहावी पास झालव तसे बारावी पास होतोलव.
पाटणकरांनी डोयाला हात लावला. लेचर संपल्यानंतर त्यांना केमिस्ट्री शिकवणारे सावंत सर भेटले. सावंत सर, गेली दहा वर्षे म्हणजे सुरुवातीपासून येथे केमिस्ट्री शिकवत होते.
‘सावंत सर, मी आता अकरावी वर फिजिक्स शिकवण्याचा प्रयत्न केला, पण मुलांना साधं एबीसीडी येत नाही. त्यामुळे मी नोटस् घालत होतो ती कोणी लिहून पण घेतली नाहीत.’
‘त्यात नवीन ते काय? मी गेली दहा वर्षे इथे शिकवतोय. अशीच मुले आहेत या ठिकाणी.’
‘मग, ती बारावी पास कशी होणार?’
‘नाही होईनात. आपल्याला पगार मिळण्याशी मतलब. मी परमनंट शिक्षक आहे. माझ कोणी काही करु शकत नाही आणि मॅनेजमेंट ने जास्त गडबड केली तर आमची युनियन आहे. मी घाबरत नाही कोणाला. तुझ काय ते बघ कारण तु शिक्षण सेवक.’
‘होय ना, सावंत सर. मी शिक्षण सेवक आहे. मला मॅनेजमेंट विचारत राहणार.’
‘हे बघ पाटणकर, तुला इथे टिकायचे असेल तर सांगतो. तु शिकवण्याचे काम करतो. प्रॅटीकल्स घे. सर्व चाचणी परिक्षेत मुलांना पास कर. अकरावीत सर्वांना पास कर कारण ते तुझ्या हातात आहे. बारावीत बघू, त्यांच्या काय नशिबात असेल ते. दोन वर्षांनी दुसरीकडे नोकरी बघ.’
पाटणकर गप्प झाले. शांतपणे फिजिक्स शिकवू लागले. प्रॅटीकल्स घेऊ लागलेत. चाचणी परिक्षेत मुलांना पास करु लागले.
पाटणकरांची बायको वनिताने आजूबाजूच्या बायकांबरोबर ओळख वाढविली. मिराशींच्या घरी तिचे जाणे येणे होतेच. काही हवे असले तर मिराशींची बायको तिला द्यायची.
संस्थेने पहिले दोन महिने पाटकरांना सहा हजार रुपयाप्रमाणे मानधन दिले. तिसरा महिना संपला चौथ्या महिन्याची दहा तारीख आली तरी पैशाचा पत्ता नाही. वनिता नवर्याकडे एकसारखी पैसे मागत होती. घर सामानाला पैसे हवे होते. मिराशींची उधारी चालू होती. भाजीला पैसे हवे होते. दुधाचे पैसे द्यायचे होते. चौथ्या महिन्याची पंधरा तारीख आली तसे पाटणकर क्लार्क कोळंबकर ना भेटायला गेले.
‘कोळंबकर, अहो माझा पगार नाही दिला. आज पंधरा तारीख. मी माझा संसार कसा चालवू?’
‘अहो, पाटणकर. ह्यो सरकारचो पगार न्हय. एक तारखेक गावणारो. हेका मानधन म्हणतत. मुला जेव्हा फीचे पैसे भरतली त्यातून तुमचा मानधन.’
‘पण केव्हा मिळेल.?’
‘तुम्ही चेअरमनांका विचारा मी काय सांगू?’
दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर पाटणकर चेअरमनांच्या घरी गेले. तर चेअरमन सोसायटीत गेले होते. पाटणकर चौकशी करत सोसायटीत गेले. चेअरमन दोस्तांसमवेत गप्पा मारत बसले होते. पाटणकरांनी त्यांना नमस्कार केला.
‘हा काय पाटणकर इकडे कसो काय?’
‘साहेब, मागील महिन्यात पगार नाही झाला. पंधरा तारीख आली म्हणून आलो होतो.’
‘हे बघ पाटणकर, शिक्षक सेवकांचो पगार म्हणजे मानधन. एक तारखेक मिळात हेची गॅरंटी नाय. या आधी जे होते तेंका पण वेळेत कधी पैसे मिळाक नाय. मुलांकडून जसे पैसे जमतीत तसे पैसे देणार. संस्थेकडे पैसे नाहीत बाबा. नोकरी स्विकारताना विचार करायला हवा होतास तु. ’
‘पण साहेब, माझ कुटुंब…’
‘हे बघ मी काही करु शकत नाही. तु जा. ’
पाटणकर निराश मनाने बाहेर पडले. घरी येऊन वनिताला सर्व परिस्थिती सांगितली. वनिता दुसर्या दिवशी भावाकडे कनेडीला गेली. तिच्या भावाचे कनेडीत आणि कणकवलीत दोन सलून होती. तिने भावाला सर्व परिस्थिती सांगितली.
‘वनिता, भावोजींका सांग. तुमका पगार देनत नाय तर नोकरी सोडा आणि बर्यापैकी सलून घाला. मी मदत करतय. अगो, आमच्या धंद्यात काय कमी नाय. दाढी करुक आम्ही चाळीस रुपये घेतो आणि केस कापूक शंभर रुपये. एसी सलून घातला तर केस काळे करुक पाचशे रुपये घेतो आणि लोक आनंदान देतत. दिवसाचो खर्च वजा करुन दीड दोन हजार रुपये खय गेले नाय. ’
‘सांगतय मी तेंका. पण तेंनी शिक्षण घेतला ना. डबल ग्रॅज्युएट आसत. सासर्यानी मोठ्या अपेक्षेन एका झीलाक कोल्हापुराक पाठवून शिकवल्यानी. तेंका काय वाटात? वनिताच्या भावाने दोन हजार रुपये दिले आणि वहिनीने तांदूळ, गहू, शेंगदाणे, कुळीथ वगैरे दिले. वनिताला खर म्हणजे भावाकडे मागणे कमीपणाचे वाटत होते. पण नवर्याचा पगार सुरु झाला की दादाचे पैसे परत करु असे तिने ठरविले.
संस्थेकडून पगाराचे असेच सुरु होते. दोन महिन्यानी सहा हजार मिळाले पुन्हा दोन महिने नाही. कसा तरी संसाराचा गाडा पाटणकर आणि वनिता ओढत होते. सरकारचे धोरण बदलेल आणि आपणास परमनंट शिक्षकाचा पगार मिळेल या आशेवर ते होते. हळू हळू दसरा, दिवाळी जवळ आली आणि वनिता च्या चुलत बहिणीचे लग्न ठरले. पाटणकरांच्या मावस भावाचे लग्न ठरले. ही तर घरातली लग्ने. लग्नाला जायला हवेच. वनिता नवर्याला म्हणाली, ‘आता दिवाळीत दोन लग्ना आसत. घरचीच लग्ना. दागिने जावंदे, खोटे दागिने घालूक येतत. पण कपडे तरी हवेत. माझे साडये जुने झालेत. दोन साड्या, ब्लाऊज, शाम्याक दोन ड्रेस आणि लग्नाक अहेर करुक होयो. तेनी आपल्या लग्नात अहेर केल्यानी. पैशाची सोय करुक होयी. मागे दादान पैसे दिल्यान, आता तेच्याकडे परत पैसे कशे मागतले?’
‘नको, आता दादाकडे मागू नको. मी बघतय कोणाकडे तरी.’
पाटणकरांच्या लक्षात आले. आपले दोन सहकारी आहेत. सावंत आणि जांभळे. दोघेही परमनंट आहेत शिवाय जांभळेंची बायको शिक्षिका आहे. म्हणजे पैशाचा काही प्रॉब्लेम नाही.
– क्रमश: भाग २
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈