श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग ३ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆
(मागील भागात आपण पहिले – पाटणकरांच्या लक्षात आले. आपले दोन सहकारी आहेत. सावंत आणि जांभळे. दोघेही परमनंट आहेत शिवाय जांभळेंची बायको शिक्षिका आहे. म्हणजे पैशाचा काही प्रॉब्लेम नाही. – आता इथून पुढे)
दुसर्या दिवशी त्यांनी सावंत सरांना गाठले. सावंत सरांना भेटताना त्यांच्या लक्षात आले, हे सर आता रिटायरमेंटला आले म्हणजे यांचा पगार एक लाखाच्या आजूबाजूला असणार. आपल्याला फत पाच हजाराची गरज आहे.
‘सावंत सर, माझं एक काम होतं. ’
‘होय काय. पैशाचे सोडून काही काम असेल तर सांगा.’
‘पैशाचेच होते. फत पाच हजार हवे होते. ’
‘‘नाय ओ. मीच कर्ज घेतलयं. त्याचे हप्ते भरतय आणि तुमच्या या सहा हजारात तुम्ही पैसे परत कशे करणार बाबा? नाही जमायचे.’
हिरमुसले होत पाटणकर बाहेर पडले. आता जांभळे सर म्हणजे नवरा बायकोचा पगार. म्हणजे किमान दीड लाख रुपये. हे नाही म्हणणार नाहीत असा पाटणकरांचा अंदाज होता.
‘जांभळे सर, थोडं काम होत. ’
‘बोला पाटणकर. ’
‘फत पाच हजाराची गरज होती. पगार झाला की तुमचे पैसे निश्चित देणार’
जांभळे सर खो-खो हसत म्हणाले, ‘पाटणकर शिक्षण सेवक कधी कुणाचे उधार घेतलेले पैसे देतो काय हो? तुमचे महिन्याचे मानधन वेळेत मिळत नाही म्हणजे तुम्ही अनेकांकडून पैसे उधार घेतलेले असणार. मग माझे देणार कसे? मी कधीच कुणाला पैसे देत नाही. पैसे कमवण्यास घाम गाळावा लागतो. पैसे काय झाडाला लागतात?’
‘‘हो सर, बरोबर आहे तुमचं.’ असं म्हणून पडेल चेहर्याने पाटणकर बाहेर आलेत. बाहेर पडता पडता शाळेचा प्यून मोहन ने त्यांना पाहिले. मोहनला पहिल्यादिवसापासून पाटणकरांची दया येत होती. गरीबीतून हा मुलगा नोकरीस लागला तो शिक्षण सेवक म्हणून. चार वर्षे आधी शिक्षण पुरे केले असते. तर एव्हाना साठ-सत्तर हजार मिळवले असते. मोहन ने पाटणकरांना बाजूला घेतले. ‘सर, काय प्रॉब्लेम होतो?’
‘काही नाही ओ. असंच. ’
‘असंच नाही. माझ्या कानात शब्द पडलेत. या जांभळ्याकडे पैशे मागूक गेलात. अहो जांभळो म्हणजे एक नंबर चिकटो.’ किती पैसे हवेत? मी देतलय. अहो माका चाळीस हजार रुपये पगार आसा माका खर्च कसलो? किती व्हयेत सांगा. उद्या आणून देतलय.
‘कसं सांगणार तुम्हाला. पण पाच हजाराची गरज होती. ’
‘उद्या तुमका पाच हजार रुपये मिळतले. ’
आणि खरोखरच मोहन ने पाटणकरांना पाच हजार रुपये दिले आणि वर सांगितल पाटणकर हे पैसे परत करु नकात आणि तुम्ही दिलात तरी मी घेवचय नाय.
‘पण मोहनराव असा कसा?’
मोहन तेथून दुसरीकडे निघून गेला होता. पाटणकरांचे मन भरुन आले. आपले पैसे मिळाले की मोहन चे पैसे परत करायचे हे त्यांनी मनोमन ठरविले.
पाटणकरांची बायको खुश झाली. या लग्नासाठी साड्या, ब्लाऊज, मुलासाठी कपडे आणि बळेबळे नवर्याला पण पॅन्ट-शर्ट घ्यायला लावले.
जानेवारी महिना उजाडला आणि अकरावी-बारावी ची सहल काढण्याच टूम निघाली. या वर्षी गोव्याला जायचे ठरले. एकंदर बावीस मुला-मुलींनी सहलीला येण्याची तयारी दाखविली. सोबत शिक्षक म्हणून पाटणकर आणि खालच्या वर्गात शिकवणार्या चव्हाण मॅडम जाणार होत्या. सकाळी सहा ला बस मधून जायचे आणि संध्याकाळपर्यंत परत यायचे असा कार्यक्रम ठरला. कणकवलीतून बस येणार होती. एकंदर बारा मुलगे, दहा मुली, दोन शिक्षक असे चोवीस जण सहलीला निघाले.
पाटणकरांनी सहलीचा कार्यक्रम निश्चित केला आणि तसे ड्रायव्हरला सांगितले. गाडी साडे सहाला निघाली. गोव्यातील ओल्ड चर्च, शांतादुर्गा, मंगेशी देवस्थाने तसेच पणजी करत दुपारी तीन च्या सुमारास कळंगुट बीच वर आले. पाटणकरांनी आणि चव्हाण मॅडमनी मुलांना येथे एक तास दिला. समुद्रावरुन फिरुन चार वाजता पुन्हा बसकडे या. चार वाजता बस सुटेल असे निक्षून सांगितले. मुल-मुली खुशीत समुद्रावर धावली. पावणेचार झाले तसे पाटणकर आणि चव्हाण मॅडम बसकडे आले. चारला पाच मिनिटे असताना मुल-मुली गाडीकडे येऊ लागली. चार वाजले तसा ड्रायव्हर येऊन बसला. चव्हाण मॅडमनी मुल-मुली मोजली तर वीस मुल भरली. म्हणजे दोन मुल आली नव्हती. अजून पाच दहा मिनीटे थांबून पुन्हा पाटणकर खालीपर्यंत पाहून आले. दोन मुल आली नव्हती. कोण नाही आली याची चौकशी केली तर बारावीतील एक मुलगा आणि अकरावीतील एक मुलगी आली नव्हती. पाटणकर घाबरले. पाटणकरांनी मुलांकडे आणि चव्हाण बाईंनी मुलींकडे चौकशी केली तर मुल एकमेकांकडे बघून खुसुखुसु हसत राहिली. चव्हाण बाई पाटणकरांना म्हणाल्या, काहीतरी गडबड आहे. ही मुलं गेली कुठे? शेवटी जबाबदारी पाटकरांची होती. त्यांनी आपल्या जबाबदारीवर मुलांना एक तासा करिता सोडल होत. म्हणता म्हणता साडेचार वाजले तरी या दोन मुलांचा पत्ता नाही. पाटणकरांच्या घशाला कोरड पडली . काय कराव हे कळेना. त्यांनी शाळेत फोन केला आणि मुख्याध्यापकांना ही बातमी सांगितली. जोंधळे चिडले. ‘तुम्हाला मुलांना समुद्रावर मोकळ सोडायला कोणी सांगितल होत? आता काय जबाब देणार पालकांना? आता तेथल्या पोलिसांना तक्रार द्या. दुसरा काही उपाय दिसत नाही मला.’ अस म्हणून जोंधळेंनी खाड्कन फोन आपटला.
– क्रमश: भाग ३
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈