डॉ. ज्योती गोडबोले

☆ नाक  दाबल्याशिवाय… भाग – १  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

 तसं बघितलं तर विजू अगदी सामान्य कुटुंबातली. दिसायला मात्र सुरेख. चार भावंडं होती ती, पण विजू सगळ्यात हुशार आणि सुंदर सुद्धा. निम्न मध्यमवर्गातल्या मुलांना देव उपजत शहाणपण देतो ना, तसं शहाणपण, समजूतदारपणा, हे सगळं त्या चारी भावंडात आपोआप आलं होतंच.

विजू शाळेतसुद्धा फार हुशार होती. शिवण, चित्रकला, फार चांगली होती विजूची. ती बीकॉम झाली आणि तिने बँकेच्या एंट्रन्स दिल्या. तिला दोन बँकांतून कॉल आले.साहजिकच तिने सरकारी बँकेतली नोकरी स्वीकारली. ती खरे तर आणखी खूप शिकू शकली असती, पण आत्ता स्वतःच्या पायावर उभे रहायची आणि पैसे मिळवण्याची नितांत गरज होती तिला. बँकेत रोज बसने जावे लागायचे आणि ती बसच्या प्रतीक्षेत ठराविक वेळी उभी असायची. 

 नरेंद्र तिला रोज बघायचा. रोज बसस्टॉपवर नुसती टाईम पास न करता कोणते ना कोणते पुस्तक वाचणारी ही मुलगी आवडली त्याला ! तो रोज त्याचवेळी बससाठी येतो, हे तिच्या गावीही नव्हते. बस आली की चढायचे आणि जायचे एवढेच सध्या आयुष्य होते तिचे !

 नरेंद्रने हळूहळू तिची ओळख करून घेतली. तीही मोकळी होऊन त्याच्याशी बोलायला लागली. तिला  जवळच्या अशा फारशा मैत्रिणी नव्हत्याच ! नरेंद्रने तिला आपली सगळी कुटुंबाची परिस्थिती सांगितली.

आईवडील खेड्यात, एक बहीण लग्न होऊन विदर्भात गेलेली, त्यामुळे त्याला मुंबईत कोणीच नातेवाईक नव्हते. आर्थिक परिस्थितीही अगदी जेमतेमच ! नरेंद्र होता मोठा कसबी आर्टिस्ट ! हातात कला होती त्याच्या. मासिकाची, पुस्तकांची, कधी नाटकांची जाहिरातकामे करणे, हेच काम होते त्याचे. कायमची नोकरी नव्हती किंवा ठराविक उत्पन्नही नियमित नव्हते. कित्येकवेळा चहाचे पैसेही विजूच द्यायची. 

घरी विजूच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. रात्री अण्णा तिला म्हणाले, “ विजू, आज  दुपारी डॉ. देशपांडे येऊन मला भेटून गेले. ते डॉक्टर ग?आपला  किशोर पडला तेव्हा तू नाही का त्याला लगेच त्यांच्याकडे नेलेस आणि त्याला टाके घालावे लागले? आज ते आलेले बघून आम्हाला जरा आश्चर्यच वाटलं. ते म्हणाले,

‘ मी रोज तुमच्या मुलीला बघतो जातायेताना ! मी तिच्याशी लग्न करू इच्छितो. तिला विचारा ती तयार आहे का?’ किती छान स्थळ आहे हे विजू ! किती हुशार,उमदा मुलगा दारात आपण होऊन आलाय बघ मग, करायची का पुढची बोलणी? “

विजू शांतपणे म्हणाली, ”अण्णा, थोडं थांबा, मी विचार करून दोनच दिवसात सांगते.”

अण्णा जरा नाराज झाले. इतक्या चांगल्या मुलाला  हो म्हणायला वेळ का घेतेय ही? असेल काहीतरी विचार तिचा, असं म्हणत अण्णा दोन दिवस थांबले. विजूने नरेंद्रला विचारले, ‘ हे असं असं झालंय. तुझा काय विचार आहे ते लगेचच सांग बाबा. नाहीतर अण्णा आता  थांबणार नाहीत.’ 

नरेंद्र म्हणाला, “ मला लग्न तर करायचं आहेच तुझ्याशी, पण तू माझी परिस्थिति बघते आहेस ना? मला रहायला फक्त एक खोली आहे भाड्याची.  मला कायमस्वरूपी नोकरी नाही, त्यामुळे  माझे  शाश्वत उत्पन्न नाही. तुझ्या पगारावरच आपला संसार चालणार हे सत्य आहे. मला जे मिळेल ते मी तुलाच आणून देणार. आत्ता सगळं ठीक वाटतंय  पण हे अवघड जाईल तुला. तरीही  तुझी तयारी असेल तर मी तुझ्या आईवडिलांना भेटतो. मग बघूया काय घडते ते.” 

दुसऱ्या दिवशी नरेंद्र विजूच्या अण्णा आईला भेटायला आला. त्याचे रुप, व्यक्तिमत्व, काहीच आवडले नाही त्यांना. पुन्हा ठराविक उत्पन्न नाही, घर नाही, कसं व्हायचं आपल्या या मुलीचं? त्यांना  प्रश्नच पडला. या मुलात विजूने काय पाहिले हेच त्यांना समजेना. तो गेल्यावर अण्णा म्हणाले, “अवघड आहे असल्या भणंग मुलाशी संसार करणं ! तो काय सिनेमा आहे का? प्रत्यक्ष संसार सुरू करशील तेव्हा जमिनीवर पाय येतील बरं विजू. नको करू असं ! चांगले ते देशपांडे डॉक्टर मागणी घालत आहेत तर हो म्हण ग बाळा . “ 

विजू निक्षून म्हणाली, “ मी याच्याशीच लग्न करणार अण्णा ! तुम्ही साधं कोणताही खर्च न करता लग्न लावून द्या. मला रोख पैसे द्या, त्यातून मी घर बुक करीन. आणि हप्ते भरीन लोन काढून,आमच्या बँकेचं !” 

अण्णा गप्प बसले. त्यांना हे अजिबात पटले नाही. “ अग, हा कसला त्याग? म्हणे मी त्याची परिस्थिति सुधारून दाखवीन. मूर्ख आहेस का? ही कसली जिद्द? याला तद्दन  मूर्खपणा म्हणतात विजू ! पश्चातापाची वेळ नको यायला तुझ्यावर ग बाई !” विजूच्या भावी आयुष्याचा पट त्यांना स्पष्ट दिसला. पण आता ही   ऐकणार नव्हती. 

इतकी सुरेख मुलगी या स्वार्थी माणसाच्या हातात देताना आई वडिलांचा जीव तळमळला. साधे लग्न लावून दिले, शक्य होते तेवढे रोख पैसे तिला दिले आणि विजू नरेंद्रच्या एका खोलीत रहायला गेली.  त्याने काहीही तयारी करून ठेवली नव्हती, की विजूला विचारून चार भांडी, गॅस कुकर आणला होता. विजूने आपल्या  पैशांनी मांडामांडीला सुरवात केली. त्या एका खोलीत स्वयंपाक, नळ नाही त्यामुळे खालून पाणी भरणे, यात विजूची सकाळी अतिशय  धावपळ होई. ‘अरे, निदान पाणी तरी भरून ठेवत जा ना नरेंद्र !’ ती वैतागून म्हणे, पण त्याचा काहीही उपयोग होत नसे. विजू बँकेत काम आणि घरकाम याने भरडून जात होती. मध्यंतरी आई अण्णा तिच्या घरी येऊन गेले. ती एक खोली,ती चार भांडी बघून कपाळाला हातच लावला त्यांनी. श्रीमंत नसले तरी इतके दारिद्र्य नव्हते अण्णांचे. “ विजू,हे काय बघतोय आम्ही?  फ्लॅट बुक केलास ना? निदान तो तरी तुझ्या स्वतःच्या नावावर घे. कठीण आहे बरं सगळं !” हताश झाले अण्णा आणि आई हे बघून. 

पण विजूची कोणतीच तक्रार नव्हती. “अग, निदान गॅस तरी घेऊन जायचास ना आपल्या कडून ! आहेत आपल्याकडे तीन तीन गॅस ! “ विजू काहीच बोलली नाही. आई अण्णा घरी परत आले. अण्णा म्हणाले, “काय ही मुलगी. तुला सांगतो उषा, काही माणसांना आपण जे केलंय ते शेवटपर्यंत नेण्याची जिद्द असते. आपला हा त्याग हीच जिद्द वाटते त्यांना. त्याचीही नशा येते माणसाला. विजूचं तसंच झालंय. आपण गप्प बसून बघूया. तिला जर आपली कोणतीही मदत नकोय, तर आपण काय करू शकतो? तिला तिची चूक पहिल्या महिन्यात समजली असणारच, पण ती कबूल नाही करणार ! बसेल झगडत.” अण्णा उद्वेगाने म्हणाले. उषाबाईना अत्यंत वाईट वाटले. गप्प बसण्याखेरीज त्या तरी काय करणार होत्या? दिवाळसणाला अण्णांनी जावई-लेकीला बोलावले. यथोचित आदर केला. विजूला त्यांनी  स्कूटीच्या किल्ल्या दिल्या.

“ विजू,ही तुला दिवाळसणाची भेट. आता बसने अजिबात जायचे नाही.”  विजूचे डोळे भरून आले. “अहो कशाला अण्णा? मी मोटारसायकल घेणारच होतो यंदा !” नरेंद्र म्हणाला.अण्णा काहीही बोलले नाहीत. फक्त म्हणाले,” विजू ही फ़क्त तू वापरायचीस.” 

त्या स्कूटीने विजूचं काम हलकं झालं.  तिच्या बुक केलेल्या फ्लॅटचा ताबा मिळायला अजून एक वर्ष होतं.  त्या एका खोलीत जीव नुसता उबून जाई तिचा. लग्नाला वर्ष होत आलं तरी नरेंद्रने तिच्या हातात म्हणावे असे पैसे नव्हतेच ठेवले. कंटाळून गेली विजू. आता बोलून आणि भांडून काही उपयोग नव्हताच.

उलट नरेंद्र आता काम मिळवायच्याही भानगडीत पडेनासा झाला. विजूचा पगार आयता येत होताच. ती सगळे खर्च भागवत होतीच.  शहाणपणा करून तिने तिच्या डॉक्टरकडे आधीच जाऊन  उपाय योजले, म्हणून निदान दिवस जाण्याची भीती तरी उरली नाही. 

– क्रमशः भाग पहिला.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments