सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ ‘शाॅवर…’- भाग १ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

वर्षभर .चाललेलं बंगल्याचं काम आता संपलंच होतं. कधी पण ठेकेदार सांगेल, ‘‘आता पुढच्या कामावर जा.’’ त्याला रखमा अन् धर्माची तयारी असायली हवी. त्याच विचारात रखमा होती. तेवढ्यात गणू येऊन तिला बिलगला. म्हणाला,

‘‘आये, कवा यायाचं आपल्या नव्या घरात र्‍हायाला?’’

‘‘कुठलं रं नवं घर?’’

‘‘ह्योच की आपला बंगला. तू अन् बानंच बांधलाय न्हवं? तू घमेले वहायची, बा भित्ती बांधायचा. मंग? आता झाला ना पुरा?’’

रखमाला हसावं का रडावं कळंना. ‘‘आरं बाबा ह्यो आपला न्हाय बंगला. काम झालं. आता जावं लागंल म्होरल्या कामावर.’’

हे ऐकताच गणुनं भोकाड पसरलं. हातपाय आपटत म्हणू लागला, ‘‘न्हाय! म्या न्हाय येणार. हे आपलं घर हाय. हिथंच र्‍हायाचं.’’ असं म्हणून तो पळत सुटला.

रखमा तिच्या टपरीत आली. बराच वेळ झाला, तरी गणू येईना. ती हाका मारून दमली. शेवटी बंगल्यातच आहे का बघावं म्हणून हाका मारतच आत शिरली. पाण्याचा जोरात आवाज आला. ती बाथरुमपाशी आली. तिथं गणूचा जलोत्सव चालू होता. शॉवर सोडून त्याखाली नखशिखांत भिजत-नाचत होता. ओरडत होता. त्या आवाजात त्याला आईचा आवाजही आला नाही.

आता मात्र रखमा जोरात ओरडली, ‘‘आरं एऽ मुडद्याऽ, कवाधरनं हाका मारतीया… चल घरी.’’ गणुला कुठलं ऐकू यायला?

रखमानं पुढं येऊन शॉवर बंद केला. खस्कन त्याच्या दंडाला धरून ओढत, फरफटत टपरीत घेऊन आली. त्याचा अवतार पाहून त्याचा बापही ओरडला, ‘‘कुठं रे गेला हुता, एवढं भिजाया?’’

‘‘अवं, बंगल्याच्या मोरीत नाचत हुता. वरचा पावसाचा नळ सोडून.’’

लुगड्यानं, गणुचं अंग, डोकं खसाखसा पुसत रखमा करवादली!

‘‘काऽय?’’ धर्मा ओरडला.

‘‘जाशील का जाशील परत?’’ म्हणून रखमानं त्याला जोरदार थप्पड मारली.

एवढा वेळ आनंदात नहाणारा गणू, आता मुसमुसून रडू लागला. त्याला कळतच नव्हतं आपल्याल घरात जायला आपल्याला बंदी का? ‘‘चल मुकाट्यानं भाकरटुकडा खाऊन घे!’’

‘‘मला न्हाय खायाची भाकर.’’ असं म्हणून गणू तणतणत उठला.

‘‘जाऊ दे. जाऊ दे. भूक लागली की चट् खाईल.’’ … गणूचे लाड करायला, त्याच्याकडं ना वेळ होता, ना पैसा.

गणू मनानं अजून बंगल्यातच होता. शॉवरखालची आजची अंघोळ त्याच्यासाठी आयुष्यातला सर्वात आनंदाचा प्रसंग होता. त्या आनंदातच जमिनीवर पसरलेल्या फरकुटावर तो झोपून गेला. त्या इवल्याश्या जिवाला अंघोळीनं नाही म्हटलं तरी थकवाच आला. पण त्या आनंदातच त्याला झोप लागली.

झाकपाक करून रखमा त्याच्याशेजारी लवंडली. पोर उपाशी झोपलं म्हणून तिला गलबलून आलं. ‘‘काय बाई यडं प्वार’’ थोडंसं कौतुकानं, थोडं काळजीनं तिनं त्याला जवळ ओढलं. पोटातलं पोर लाथा मारत होतं. रखमाला बाळंतपणाची काळजी वाटू लागली.

दुसर्‍याच दिवशी ठेकेरादानं सांगितलं, ‘‘8 दिवसांनी मुहूर्त हाय मालकाचा. बंगला साफसूफ करून घ्या. आता दुसर्‍या कामावर जायला लागंल. धर्माच्या पोटात धस्स झालं. पण ते चुकणार नव्हतंच. संध्याकाळी त्यानं रखमाला सांगितलं, ‘‘आरं देवा’ म्हणत तिचा हात पोटावर गेला. पण त्यांनी मनाची तयारी केली.

वास्तुशांतीच्या आदल्या दिवशी शर्मा कुटुंब बंगल्यात आलं. तोपर्यंत गणू रोज बंगल्याच्या ओट्यावरच झोपायचा. आई-बापाशी त्यानं पूर्ण असहकारच पुकारला होता. आई-बापालाही त्याची मनधरणी करायला वेळ नव्हता.

बंगल्याची वास्तुशांत झाली. त्यात शर्मांचं सारं कुटुंब राबत होतं. संध्याकाळी धर्माला अन् गणूला कापड अन् रखमाला साडीचा आहेर मिळाला. गोडाचं जेवण झालं. दुसर्‍या दिवशी धर्मा अन् रखमाचा मुक्काम दुसर्‍या कामावर हालला. किती समजावून सांगितलं रखमानी, पण गणू त्यांच्याबरोबर गेला नाही. त्याचा एकच हेका होता, ‘‘आपला बंगला सोडून म्या येणार न्हाय.’’ राहू दे हितंच. पोटात कावळे कोकलतील तेव्हा येईल चट्! मुकाट्यानं!

दोघांनी विंचवाचं बिर्‍हाड पाठीवर घेतलं अन् मुक्काम हलवला. रखमाचा जीव तुटत होता, पण करणार काय? इथल्या टपरीचे पत्रेही काढले होते. संध्याकाळी त्याला घेऊन जाऊ म्हणून ती काळजावर दगड ठेवून निघाली. गणूने ढुंकूनही तिकडे लक्ष दिलं नाही.

बंगल्याचे मालक मनिष शर्मा आणि सुनिता शर्मा, हे साधं-सुधं प्रेमळ दांपत्य होतं. गडगंज श्रीमंत तेवढंच मनानंही श्रीमंत अन् दिलदार! मनिष शेअर ब्रोकर होता. घरातच त्याचं ऑफिस होतं. सुनिता घरकाम सांभाळून त्याला मदत करत होती. त्यांना श्वेता नावाची 4 वर्षाची गोड मुलगी होती. तिची गणूशी लगेच गट्टी जमली.

आईबाप गेल्यावर श्वेताशी खेळण्यात गणूचा दिवस गेला. रात्री गणू बंगल्याच्या ओट्यावरच झोपला. झोपण्याचं फटकूर त्यानं ठेवून घेतलं होतं. तसा तो हिंमतीचाच!

पहाटे मनिष आणि श्वेताही बाहेर आले तेव्हा त्याला गणू दिसला. पाय पोटाशी घेऊन झोपला होता. मनिष तिला म्हणाला, ‘‘देखो ये बच्चा सोया है । उसे कुछ शॉल वगैरे देना । श्वेतानेही स्वतःची शाल आणून त्याच्या अंगावर घातली.

सकाळी गणूला जाग आली. अंगावरच्या त्या मुलायम शालीने तो हरखून गेला. त्या मुलायम स्पर्शाने आईच्या पातळाचा स्पर्श आठवला. डोळे भरून आले. श्वेताने त्याला विचारलं, ‘‘रोते क्यौं?’’ आपल्या इवल्याशा हाताने त्याचे डोळे पुसले. आता तर त्याला आणखीनच रडू यायला लागलं. तिने आईलाच बोलावून आणलं. ‘‘देखो भैय्या रोता है.’’

सुनिताने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याला विचारलं, ‘‘काय झालं, भूक लागली का? तू आईबरोबर नाही गेला का?’’

तो फक्त रडत राहिला. सुनिताने त्याला विचारलं, ‘‘चाय पिओगे?’’ तो काहीच बोलला नाही. सुनिता त्याला चहा देण्यासाठी आत गेली. श्वेता त्याला बाथरुममध्ये घेऊन गेली. पेस्ट देऊन म्हणाली, ब्रश करो. यहा पानी है ।‘

ती बाथरुम पाहून गणू एकदम मूडमध्ये आला. त्यानं नुसतेच दात घासले, खुळखुळ करून तोंड धुतलं.

चहा पिऊन गणूला तरतरी आली. श्वेता सारखी त्याच्या मागेमागेच होती. घरात तिला खेळायला कुणीच साथीदार नव्हतं. मूळचं राजस्थानातलं हे कुटुंब! फारसे आप्तस्वकीय जवळ नव्हते. कामाच्या व्यापात सुनितालाही श्वेताकडं लक्ष द्यायला वेळ नव्हता. त्यामुळे गणू म्हणजे तिच्यासाठी हवाहवासा होता. तसंही त्यांना माणसांचं मोल होतंय. सारा दिवस श्वेता गणूच्या मागंमागंच होती. लकाकत्या डोळ्यांचा, तल्लख बुद्धीचा गणू, मोठा तरतरीत होता. हा बंगला आपलाच आहे अन् तो सोडून जायचं नाही ह्या निर्धारामुळे एवढ्याश्या गणूच्या व्यक्तित्वाला धार आली होती. आत्मविश्वासही होता. एवढ्याश्या गणूच्या व्यक्तित्वानं तिला भारून टाकलं होतं. भैया-भैया करत ती त्याच्या भोवतीच रुंजी घालत होती. गणूबद्दल बालसुलभ निर्व्याज्य प्रेम तिच्या मनात वाटत होतं. तिचे आईवडीलही तश्याच प्रेमानं गणूशी वागत होते.

बघता-बघता दिवस मावळतीला आला. रखमा उतावीळपणे पोटातलं बाळ सांभाळत धावत-धावत आली गणूला न्यायला. बंगल्याची पायरी पण न चढता खालूनच हाक मारत राहिली. गणूला ऐकूही आलं नसावं. ऐकलं तरी त्याला ऐकायचंच नव्हतं म्हणा! श्वेताच त्याच्या आईला पाहून धावत आली. रखमा म्हणाली, ‘‘गणू हाय का?’’ तिनं धावत येऊन गणूला सांगितलं. गणूही धावत बाहेर आला. रखमा म्हणाली, ‘‘चल घरला. तुला न्याया आले मी.’’

गणू तडक म्हणाला, ‘‘म्या न्हाय येणार.’’

श्वेताला काही कळत नव्हतं. श्वेताचे आईवडील दोघेही बाहेर आले. त्यांना गणूच्या आईने सांगितले ती गणूला न्यायला आली आहे. त्यांनी गणूला सांगितलं, पण गणू तेवढाच ठाम होता. नाही जायचं म्हणाला, ते दोघेही म्हणाले, ‘‘राहू दे त्याला. त्याला वाटेल तेव्हा येईल तो.’’ श्वेताला त्यांनी विचारलं, ‘‘जाऊ दे का गणूला?’’ ती तर रडायलाच लागली. रखमाही रडकुंडीला आली. पण गणूला कशाचंच देणंघेणं नव्हतं. शेवटी रखमा माघारी गेली.

आता गणूची चिंताच मिटली. तो बंगल्यातच राहू लागला. श्वेता त्याच्याशिवाय जेवत-खात नव्हती. त्यामुळं त्याच्या पोटाचीही चिंता मिटली. रात्री तो बाहेरच्या ओट्यावर जाऊन झोपला. पण मनिषने त्याला उठवून व्हरांड्यात झोपायला सांगितलं. त्याला अंथरुण, पांघरुण दिलं. दुसर्‍या दिवशी मनिषने गणूसाठी 2 शर्ट-पँट आणले.

गणूवर बहुधा दैव प्रसन्न असावं. त्याच्या अगदी किमान असलेल्या गरजा सहज पूर्ण होत होत्या.

पण ‘‘हा बंगला माझाच आहे’’ हे त्याचं ईप्सित मात्र कसं पूर्ण होणार?

एक आठवड्यानं रखमा अन् धर्मा दोघंही परत आले. रखमाचे दिवस भरत आले होते. तिला कामाला गणूच्या मदतीची गरज होती. पण गणू नाहीच म्हणाला. तो बंगला सोडून जाणं शक्यच नव्हतं. खरंच त्याचं नशीब थोर म्हणून मनिष आणि सुनिता, श्वेता भेटले. त्यांनी मोठ्या मनाने त्याला ठेवून घेतलं. एवढंच नाही, आता जूनमध्ये शाळा सुरू होतील म्हणून त्यांनी गणूच्या शाळेची चौकशी केली. गणू चौथीत गेला होता. त्याला शाळेत पाठवायची पण व्यवस्था त्यांनी केली.

क्रमश: भाग १

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments