सौ. वीणा आशुतोष रारावीकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ काही अ.ल.क. ☆ सौ. वीणा आशुतोष रारावीकर ☆ 

अलक क्रमांक १ – 

सोसायटी मधील कचरा गोळा करणारी ती.

सध्या त्या तिला रोज चार गरम पोळ्या आणि ताज्या भाजीचा डबा देत होत्या. तेव्हा दोघींचे डोळे बोलून जायचे.

अधिक महिन्याच्या वाणाचे नियम कोण, कसे ठरवणार?

अलक क्रमांक २ – 

पंचतारांकित हॉटेलमधील स्त्रियांचे प्रसाधनगृह. तिथल्या गुळगुळीत, चकचकीत आरशात ती नटी आपलाही आरशासारखा ठेवलेला चेहरा न्याहाळत होती. 

तेव्हा तीची नजर तिथे उभ्या असलेल्या कर्मचारी महिलेवर गेली. ती महिला त्या नटीचा चकमकता चेहरा पाहात होती आणि नटी त्या बाईचा बिन-मेकअपचा.

बाईचेच दोन्ही चेहरे. फरक फक्त मुखवट्याचा.

लक क्रमांक ३ – 

नुकतेच निवृत्त झालेले ते. 

“आपणच घरी सर्व काम कशी करतो” अशी बढाई मित्राजवळ चालू असताना;

आतून चहाचं भांडं  जोरात आदळलं. 

“ कोण रे तो? कोण आहे तिकडे? मी काही बोललो? बहुतेक मलाच भास होतो आहे.”

चहा पिता पिता आपापले विचार सुरू झाले.

घरात नवीन कप-बशा घ्यायचे काम कमी झाले, याचा आनंद का दुःख ?

अलक क्रमांक ४ – 

रेस्टॉरेंटमध्ये शिरताना, दरवाज्यावरच तिला प्रश्न विचारला, “ मॅडम, टेबल किती जणांसाठी हवे आहे? ”

तिने आत्मविश्वासाने उत्तर दिले, “दोन.”

मॅनेजर तिच्याकडे पाहात होता.

आत शिरताना तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

…. फक्त तिने हळूच एकदा आपल्या पोटावरून हात फिरवला. 

अलक क्रमांक ५ – 

घराबाहेर पडताना तिची नजर आभाळाकडे गेली. 

“ छत्री घेऊनच निघायला हवं.” तरीही मनात आलेला हा विचार झटकून तिने बाहेर पाऊल टाकलं.

आता तिच्या डोळ्यांना पदराची गरज उरली नव्हती.

अलक क्रमांक ६ – 

डबलडोअरचे एक मोठे शीतकपाट. प्रत्येक कप्पा ठासून ठोसून भरलेला.

कोणाचे घर आहे हे? 

“ तुमचे आणि घरच्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर तुमच्या घरातील शीतकपाट फेकून द्या ” असे शिकवणारी हीच का ती योगशिक्षिका ?

अलक क्रमांक ७ – 

“चहा?”

 “नको. मग कॅाफी?”

 “ती ही नको. निदान मैत्री?”

“अहो मग काय, तुम्हाला फक्त डोळ्यात पाणी हवं आहे?”

अतिशय वैतागलेला तो तरुण सहकारी बोलला, “ मॅडम, तुम्हाला कधी तरी आयुष्यात समजलं का की  तुम्हाला  काय हवं आहे ते?”

अलक क्रमांक ८ – (भावानुवाद)

रोज एक तास …

त्या वेळी ती एक चांगली आई, बहिण, मुलगी, सून कोणी नसते.

मग ती कुठे असते ?

फक्त त्यांना समजत नाही की तिला आंघोळ करायला इतका वेळ का लागतो? 

 अलक क्रमांक ९ – (भावानुवाद)

 “जुळं आहे.” डॅाक्टरांनी रिपोर्ट दिला.

तिने आपल्या पोटावरून हात फिरवला.

तिच्या छकुलीने दुसऱ्या हाताचे बोट घट्ट पकडले होते

आणि तिला कानात कुजबुज ऐकू आली, “थॅंक्यू दादा……”.

 …. परिस्थिती कोण आणि कधी बदलणार?

अलक क्रमांक १० – (भावानुवाद)

 रेस्टॉरेंटमध्ये शिरताना, दरवाज्यावरच तिला प्रश्न विचारला, “मॅडम, टेबल किती जणांसाठी हवे आहे?”तिने आत्मविश्वासाने उत्तर दिले, “दोन.”

मॅनेजर तिच्याकडे पाहात  होता.

आत शिरताना तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

 …. फक्त तिने हळूच एकदा आपल्या पोटावरून हात फिरवला. 

अलक क्रमांक ११- 

 तिला ९९% टक्के मार्क्स  बोर्डात मिळाले. तिचे आई-वडील पेढे वाटताना सगळ्यांना सांगत होते,

“माझी मुलगी डॅाक्टर होणार.” .. 

स्वप्न नक्की कोणाचे?… 

“मला नाचामध्ये डॅाक्टर व्हायचे आहे.”

तिच्या घुंगरांचा आवाज तिच्या खोलीत आणि कानात घुमत होता.

 अलक क्रमांक १२ – 

 “आजोबांना जरा चहा प्यायला बोलाव.”

 “ ते चिरनिद्रा घेत आहेत.”

 तत् क्षणी चहा गेला, कप-बशी गेली, हाती आली काठी.

 प्रसंगावधान राखत छोटूने तिथून पलायन केले…..  

 …… पण तरीही काढता पाय घेताना “माझ्या माय मराठीत काय चुकलं?” हे विचारायला तो विसरला नाही. 

☆☆☆

© सौ. वीणा आशुतोष रारावीकर

चर्चगेट, मुंबई

मो ९८१९९८२१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments