सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ येते मी… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
काही महिन्यांपूर्वीच माझं तिकीट आलं होतं. तारीख होती १२ डिसेंबर. जायचे होते चित्रगुप्त हवाई अड्डा, टर्मिनल तीन. अर्थात ते बदलू शकणार होतं. हा प्रवास तसा काहीसा अज्ञात होता. मोठाही असणार होता आणि शेवटचा ठरणारा होता.
गंमत म्हणजे पासष्ट वर्षांच्या आयुष्याच्या या प्रवासात अनेक सोबती होते. हवेसे, नकोसे, कसे का असेना पण ते या प्रवासात माझ्याबरोबर होते. आता यापुढचा आणि अखेरचा प्रवास मात्र एकटीने करायचा आहे. सोबत कोणीही नसणार. स्थळ, काळ, दिशा माहित नसलेला हा प्रवास. शिवाय या प्रवासात बरोबर काहीच न्यायचं नाहीय्. म्हणजे सारे काही इथेच ठेवून जायचे आहे. पण असं कसं म्हणता हो? ओझी आहेत ना. कर्माची. पाप— पुण्याच्या दोन पिशव्या असणार आहेत बरोबर. कुठली जड, कुठली हलकी, कुठली किती रिकामी, भरलेली हेही माहित नाही. शिवाय नेहमीप्रमाणे यात थोडी जागा आहे म्हणून यातलं सामान त्यात भरूया. नो चान्स. कारण हा प्रवासच वेगळा आहे.
अजून मी डीलक्स वेटिंग रूम मध्ये वाट पहात आहे. पण आता फार वेळ नाही. बोर्डिंग आता सुरूच होईल.
कळत नाही की भास आहे की प्रत्यक्ष आहे पण मी एका आलिशान रूममध्ये पहुडले आहे. अंगभर संचारलेल्या वेदनांना अंगाखालच्या नरम गादीचाही स्पर्श सहन होत नाही. नाका तोंडात, हाता पायात, नळ्याच नळ्या. डाव्या, उजव्या बाजूला टकटक करणारी विचित्र यंत्रे. त्यावरच्या सरकणार्या रेषा. गंभीर चेहरा करून माझ्या भोवती वावरणारी माझी माणसं आणि पांढऱ्या एप्रन मधील अनोळखी माणसं. कुणी हात उचलतय, कुणी कमरेला आधार देतेय् ठिकठिकाणी टोचाटोची.
डब्ल्यु. बी. सी. काउंट लो, प्लेटलेट्स ड्रॉप होत आहेत, किडनी, लिव्हर नॉट फंक्शनिंग. पण तरीही या साऱ्या वेदनांच्या पलीकडे जाऊन माझ्या मिटलेल्या, प्राण हरवत चाललेल्या डोळ्यासमोर माझे जीवन मी पहात आहे. एक जाणवतेय माझा हात हातात घेऊन निशा केव्हांची जवळ बसली आहे. तिच्या डोळ्यातून गळणाऱ्या अश्रूधारांनी माझा हात भिजत आहे.
निशा माझी जुळी बहीण. एकत्र जन्मलो, एकत्र वाढलो, खेळलो, भांडलो, तुटलो. पुन्हा पुन्हा जुळलो. कसं होतं आमचं नातं! खरं म्हणजे आता मागे वळून पाहताना वाटतंय मी नक्की कशी होते? सगळ्याच नात्यांच्या भूमिकेत मी किती गुंतले? किती दुरावले? कितीतरी अनुत्तरीत “कां” मला दिसत होते.
हे काय दिसतय मला. एक एक घटना दृश्यरूप होत आहेत. निशाच्या सुवाच्च्य अक्षरात केलेल्या गृहपाठावर मी शाईच सांडली. चित्रकलेच्या स्पर्धेत मला पहिलं बक्षीस मिळालं तेव्हां निशाच आनंदाने नाचली होती.
ताई खरंच खूप अडचणीत होती. पप्पांनी तिला घरावर मजला बांधून दिला, आर्थिक मदत केली. मी केवढी भांडले त्यांच्याशी. तिलाच कां म्हणून? खरं म्हणजे त्यांनी मलाही नंतर एक ब्लॉक दिला.
हा माझा आणि बिंबाचा संवाद वाटतं!
ती म्हणाली होती,” नको करूस हे लग्न. अगं! हे प्रेम नाही. नुसतं आकर्षण आहे. त्याच्यात आणि तुझ्यात खूप सांस्कृतिक फरक आहे. एकंदरच आपल्या कुटुंबात तो नाही सामावणार. वेळीच विचार कर. तू सुंदर आहेस. तुझ्या हातात कला आहेत. तुला खूप चांगला जोडीदार मिळेल. “
तेव्हा तिला मी काय म्हणाले,
“तुझं काय आहे ना बिंबा! तुला नाही ना कोणी मिळाले म्हणून तू आमच्यात फूट पाडते आहेस. तू जळतेस आमच्यावर”
हट्टाने लग्न केलं. पण काय झालं? सहा सात वर्षानंतर वेगळे झालो ते आज पर्यंत. मुलांना कसं वाढवायचं? किती प्रश्न होते ना? आई-पपाना आयुष्यभर टेन्शन दिलं. पण त्यावेळी निशाने खूप सावरून घेतलं. खूप मदत केली. खरं म्हणजे तीही काय फारशी सुखात, ऐशाआरामात नव्हती. तिचेही अनेक प्रॉब्लेम्स होते. पण माझं म्हणणं नेहमी हेच असायचं, “तुम्हाला कळणारच नाहीत माझी दुःखं! तुम्हाला नेहमी मीच चुकीची वाटते.”
तरीही कोणीही मला डावललं नाही. छुंदाचा बटवा तर कायम माझ्यासाठी उघडा असायचा. सगळेच नेहमीच माझ्या पाठीशी होते. निशा तर आमच्या एकनाळेशी कायम बद्ध राहिली. तरीही मी तिच्याशी सतत भांडले. एकदा तर तिने वैतागून माझा फोन नंबर ब्लॉक केला होता.
आयुष्याच्या अल्बम मधलं एक एक पान उलटत होतं. लहानपणी गल्लीत त्या पत्राच्या पेटीतल्या सिनेमा पहावा ना तसं मी माझं गत आयुष्य या शेवटच्या पायरीवर पाहत होते. मीच मला पहात होते.
सुखाचे आनंदाचे क्षणही खूप होते. माझी चित्रं, माझ्या कवितांना प्रचंड प्रसिद्धी मिळत होती. मित्रमैत्रीणींचे ग्रुप्स होते. पण आता वाटतं की मला आनंदाने जगताच आले नाही का?
आयुष्य पुढे पुढे जात होतं. मुलं मोठी झाली. संसारात रमली. पण गंमत म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मी प्रत्येक वेळी माझंच स्थान शोधत होते. ते मनासारखं नव्हतं मिळत. त्यामुळे प्रचंड एकाकीपणा जाणवायला लागला होता. मला कळतच नव्हतं की मी सुखी आहे की दुःखी आहे.
निशा एकदा म्हणाली होती, “तुला कौन्सिलिंग ची गरज आहे.” तेव्हांही मी तिच्यावर उसळले होते.
तोही परत आला होता. म्हणाला,” मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊया. तारुण्यात झालेल्या चुका दुरुस्त नाही करता आल्या तरी त्यांना डिलीट तर करूच शकतो ना?”
“काय म्हणणं आहे तुझं?”
” परत नव्याने सुरुवात करूया”
त्यावेळी एक मात्र जाणवलं होतं, इतक्या वर्षानंतरही तो कुणातही गुंतला नाही. तोही नाही आणि मीही नाही. फक्त आमच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या. केलेल्या प्रितीचे कण विखुरलेले जाणवत होते.
पण एकत्र नाहीच आलो परत. गेले काही महिने तो सतत माझ्या भोवती आहे. मुलांना तो लागतो. शेवटी त्या दिवशी त्याला म्हणालेच,
“आता खूप उशीर झालाय “
ही आणखी एक मागची आठवण. आई गेली तेव्हा आईच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता. ताईने पुढे जाऊन म्हटलं होतं,” आई तू काळजी नको करूस. आम्ही सगळे तिला सांभाळू” कावळा पिंडाला शिवला. ताईने मला लगेच मिठीत घेतले. किती रडलो होतो आम्ही.
आम्ही पाच बहिणी. पाच बहिणींची वज्रमुठच होती. निशाला मी सहजच म्हटलं, “निशा आता फाईव्ह मायनस वन होणार.”तिनं माझा मुका घेतला. एक ओला मुका. या शेवटच्या प्रवासात घेउन जाईन बरोबर.
अंगात शक्ती उरलीच नव्हती. घरभर पसारा पडला होता. निशा एकटीच आवरत होती. माझ्यासाठी रोज डबा आणत होती. भरवत होती.
“निशा, मला तुझ्या मांडीवर झोपू दे. मला थोपटशील? खूप थकवा आलाय गं! आणि एक सांगू जमलंच तर मला क्षमा कर. खरं म्हणजे मला आता सगळ्यांचीच क्षमा मागायची आहे जाण्यापूर्वी.” निशाचा हात माझ्या पाठीवर फिरत होता.
काय चाललं आहे हे?
गतायुष्याची पाने का फडफडत आहेत? खूप सारी पानं गळूनही गेलीत. काहींचे रंग उडालेत. कोरी झाली आहेत, काही फाटलेली आहेत.
या एका पानावर अनेक आनंदाचे क्षण लिहिले होते. रम्य बालपण. आई, पप्पा, जीजी यांचे अपरंपार प्रेम. माझं आणि त्याचं गाजलेलं अफेअर. डेटिंगचे ते रोमँटिक दिवस. एकत्र भटकणं, गाणी गाणं, नदीकाठी, डोंगरावर जाऊन पेंटिंग करणं. पेंटिंगच्या निमित्ताने एकत्र केलेले प्रवास. विरोधातलं लग्न. मुलांचे जन्म
या पानावर शेवटी एक तळ टीप आहे. “प्लीज टर्न ओव्हर”
पुढच्या पानावर नुसतेच रंगांचे चित्र विचित्र फटकारे होते. जीवनातल्या संघर्षाचे रंग होते का ते?
त्यानंतरच पान मात्र वेगवेगळ्या अक्षरात, वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिलेलं असावं.
तू खूप हट्टी आहेस.
तू प्रेमळ आणि सेवाभावी आहेस.
तू एक कलाकार आहेस.
तू फारच कोपिष्ट आणि दुराग्रही आहेस. बोलायला लागलीस की भान राहत नाही तुला. नंतर वाईट वाटून काहीच उपयोग नसतो ग. शब्द हे बाणासारखे असतात ते परत माघारी येत नाही हे कळलच नाही का तुला?
तू सगळ्या भाचरंडांची लाडकी मावशी आहेस.
तुझ्या हातात अन्नपूर्णा आहे.
तू दिलेल्या कितीतरी सुंदर भेटी माझ्याजवळ आहेत. तुझ्या प्रत्येक खरेदीत कलात्मकता असते.
अगं आयुष्य हे कृष्णधवल असतं. तू चित्रकार असूनही केवळ दुराग्रहाने जीवनात आनंदाचे रंग भरू शकली नाहीस का?
आणि एक परिच्छेद होता. बहुतेक छुंदाने लिहिला असावा.
“तुला माहित आहे का? तुझ्यात किती पोटेन्शीयल आहे ते. कशाला त्याच त्याच गोष्टी उगाळण्यात आयुष्य खर्च करतेस. अग! तुझ्या प्लस पॉइंट्सकडे बघ ना.”
तेव्हां किती राग यायचा. रागाने फटकाररुन म्हणायचे,
“मी नाही तुमच्यासारखी. मी वेगळी आहे.”
आता मात्र राग नाही, वाद नाही, प्रवाद नाही सार्यांच्या पलीकडे जात आहे मी.
आणि हे शेवटचं पान.
या शेवटच्या पानावर काहीतरी लिहिलं आहे. एकच वाक्य ठळक अक्षरात.
“आम्ही सारे तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो”
या क्षणी हे वाक्य मला हॅपी जर्नी म्हटल्यासारखं का वाटतंय? पण आता माझा शेवटचा प्रवास नक्कीच सुखकर होईल.
मला सफेद एप्रन मधल्या माणसाने म्हटलेले शब्द ऐकू आले आहेत.
“शी ईज नो मोअर. सॉरी!”
माझे लव—कुश? सुखी रहा बाळांनो!
आणि तो, त्या, ते सारेच… “येते मी.”
काउंटर वरच्या त्या बिन चेहऱ्याच्या व्यक्तीला मी माझा बोर्डिंग पास दाखवला. तिने स्कॅन केला आणि मी निघाले. आता पुढचा प्रवास.
एकटीचा. सोबत कोणीही नाही. कसलंही वजन नाही. कसलाही भार नाही. हं! त्या दोन पिशव्या आहेत. पाप पुण्याच्या.
“गेट्स आर क्लोजिंग. कूर्सी की पेटी बांध ले. नमश्कार.”
यमा एअर लाईन्स मे आपका स्वागत है! हमारे आजके पायलट है गोविंद यादव, कोपायलट है राम रघुवंशी. उडानके दरमियान गीतापान और धर्म भोजन होगा मद्यपान, धूम्रपान अवरोधित है। यात्रियोंसे निवेदन है ,शांतीपाठ ध्यानसे सुनिए।
रंभा, उर्वशी तथा मेनका आपकी सहायता करेंगी।
हमे आशा है, आपका सफर शांतीदायी हो। धन्यवाद!
आयुष्याच्या विमानाने एका अज्ञातात झेप घेतली पुन्हा कधीही परत न येण्यासाठी.
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈