श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ चळवळ – भाग-1 ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

माधुरीने आपली स्कुटर नेने असोशिएटस् च्या पार्किंग लॉटमध्ये लावली आणि ती ऑफिसचे दार ढकलून केबिनमध्ये जाण्यासाठी वळली। एवढ्यात कॉम्प्युटरवर काम करणारी मनाली तिला म्हणाली, ‘‘मॅडम, सरांनी केबिनमध्ये बोलावलयं.’’ आपल्या केबिनच्या दिशेने वळणारी माधुरी मागे वळली आणि पहिल्या मजल्यावरील अ‍ॅड. सुरेश नेनेंच्या केबिनच्या दिशेने चालू लागली. नेनेंच्या ऑफिसमधून बोलण्याचे आवाज ऐकू येत होते. तरी सुध्दा माधुरीने केबिनचा दरवाजा उघडला आणि नेनेंच्या दिशेने पाहत ‘‘गुड मॉर्निंग सर’’ म्हणाली. नेनेंनी गुड मॉर्निंग म्हणत समोरची खुर्ची दाखवली. माधुरी नेने सरांच्या समोरच्या खुर्चीत बसताच केबिनमधील अशिलांनी आपले बोलणे आवरले आणि ते जायला निघाले. ते बाहेर जाताच नेनेंनी खालच्या कप्प्यातून एक फाईल काढली आणि ती उघडत माधुरीशी बोलायला सुरुवात केली.

‘‘माधुरी, दोन महिन्यापुर्वी सोलापूर रोडवर माजी पोलीस अधिक्षक विजयकुमार चौहान यांची झालेली हत्या आठवतेय?’’

‘‘हो सर, कशी नाही आठवणार ? हायवेवर गाडी थांबवून केलेली हत्या, ती सुध्दा बंगालच्या माजी पोलीस अधिक्षकांची ? भर रस्त्यात ? पण त्याचा खुनी मारला गेला ना स्पॉटवर ?’’

‘‘हो, त्यांच्या अंगरक्षकाने केलेल्या गोळीबारात एक खुनी मारला गेला आणि एक सापडला. त्याचे नाव जय. जय सरकार. नक्षलवादी आहे.’’

फाईलमधील एक फोटो माधुरीला दाखवत नेने म्हणाले, ‘‘आत्ता ती केस कोर्टात उभी राहणार आहे. पण प्रश्न असा आहे की, पकडल्या गेलेल्या जय सरकारने पोलीसांकडे आपला गुन्हा मान्य केला आहे. ’’

‘‘मग कोर्ट निर्णय द्यायला मोकळे ’’ – माधुरी म्हणाली.

‘‘तसं करता येत नाही. त्याने गुन्हा मान्य केला असला तरी कोर्टात केस उभी राहणार, सरकारी वकिल आणि आरोपींचा वकिल आपली बाजू मांडणार, पुरावे तपासणार. हे सर्व करावेच लागते. काही वेळा पोलीसांसमोर गुन्हा मान्य केला असला तरी आरोपी कोर्टात नाकबुल करतो.’’

‘‘असं असतं का?’’ माधुरी उद्गारली.

‘‘हो असचं असतं. आरोपीला आपल्या वकिलांसह केस लढवावी लागते. पण या केसमध्ये अडचण झाली आहे ती म्हणजे, आरोपी जय सरकारने किंवा त्याच्या कुटुंबाने वकिल दिलेला नाही.’’

‘मग ?’ – माधुरीने विचारले.

‘‘अशा वेळी कोर्ट आरोपीच्या वकिलाची व्यवस्था करते, या वेळी पण कोर्टाने आपल्याला म्हणजेच नेने असोशिएटस्ना आरोपी जय सरकार याचे वकिलपत्र घेण्याची विनंती केली आहे आणि आपण माननीय कोर्टाला नाही म्हणू शकत नाही. कोर्टाकडून अगदी नगण्य फी मिळते पण फीसाठी म्हणून नाही, पण माननीय कोर्टाचा मान ठेवावा म्हणून वकिलपत्र घ्यावे लागते. नेने असोशिएटस् ते वकिलपत्र घेईलच पण कोर्टात जय सरकारची बाजू तू मांडावीस अशी माझी इच्छा आहे. अर्थात माझे लक्ष आहेच. काही तशीच परिस्थिती आली तर मी पण कोर्टात येईन. ‘

‘‘पण सर मी? मी नवीन….’’

‘हो, प्रत्येक जण नवीनच असतो. वकिली व्यवसायाच्या सुरुवातीला अशी केस मिळाली की अनुभव मिळतो. आत्मविश्वास येतो. आणि संपूर्ण नेने असोशिएटस् तुझ्या पाठीशी आहेतच. पण एक लक्षात ठेव. आरोपीने गुन्हा मान्य केला आहे म्हणून तो खुनी आहे असा दृष्टीकोन ठेवायचा नसतो. तर तो खुनी नसून दुसराच कुणीतरी आहे आणि त्याला सहीसलामत सोडवायचं आहे असा वकिलाचा दृष्टीकोन असावा लागतो. या केसचे पैसे किती मिळणार हे महत्वाचे नाही. प्रत्येक केस गांभिर्याने लढणे हे महत्त्वाचे. आरोपी जय सरकार जेलमध्ये आहे. उद्या तू आणि मी जेलमध्ये त्याला भेटायला जातोय. जेल सुपरिटेंडेंट कडून मी भेट मागितली आहे. तेव्हा या केसची ही फाईल तुझ्या ताब्यात घे आणि त्याचा अभ्यास कर व उद्या दहा वाजता जेलमध्ये जाण्यासाठी तयारीत रहा. नेने सरांनी दिलेली फाईल घेऊन माधुरी आपल्या केबिनमध्ये आली.

आपल्या केबिनमध्ये येऊन माधुरीने फाईल उघडली आणि ती केसचा अभ्यास करू लागली. विजयकुमार चौहान, वय ६१ वर्षे, बहुतेक नोकरी कलकत्ता आणि आजूबाजूला केलेली. नोकरीत बरीच वादग्रस्त प्रकरणे होती. पण राजकिय पाठिंब्यामुळे सहीसलामत सुटले. एका कंपनीच्या जमीन अधिगृहणाच्या विरुध्द निदर्शने करणार्‍या मोर्च्यावर बेछुट गोळीबार करण्याची ऑर्डर, यात हकनाक ३० माणसे मृत. त्यात कॉलेज विद्यार्थ्यांची संख्या मोठी. त्यामुळे चौकशी होऊन सहा महिने लवकर कार्यमुक्त. त्यानंतर दिल्ली येथे दोन वर्षे आणि मग पुण्यात कायमचे वास्तव्य. मुलगा-मुलगी अमेरिकेत, कोरेगांव पार्कमध्ये स्वतःचे घर, रोज स्वतःच्याच गाडीने सोलापूर रस्त्याने जाताना दोन बुरखाधारक मोटरसायकलस्वारांनी मोटरसायकल गाडीसमोर आणली आणि गाडी थोडी स्लो झाल्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यात चौहान साहेबांना चार गोळ्या लागल्या, बाजूला असलेल्या सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात मोटरसायकल चालवणारा जागेवरच ठार झाला. तर मोटरसायकलवरील मागे बसलेल्या व्यक्तीने केलेल्या गोळीबारात चौहान साहेबांच्या सुरक्षा रक्षकाचा दोन गोळ्या लागून मृत्यु. मोटरसायकल घेऊन पळणार्‍या दुसर्‍या मारेकर्‍याला लोकांनी पकडले आणि पोलीसांच्या ताब्यात दिले. तोच सध्या तुरुंगात असलेला – जय सरकार.

माधुरीने जय सरकारचा फोटो पाहिला. तरुण होता. गाव पश्चिम बंगालमधील एक जिल्हा. शिक्षण युपीएस्सीमध्ये भारतात पंचेचाळीसावा नंबर. युपीएस्सी परीक्षा दिल्यानंतर तीन वर्षे नक्षलवादी चळवळीत भूमिगत. त्यानंतर पुण्यामध्ये आल्यानंतर विमानाचा, पुण्यातील वास्तव्याचा तपशील होता. पुणे पोलीसांचा तपास आणि पुरावे इत्यादी. माधुरीच्या मनात आलं. या जयने पुण्यात येऊन चौहान साहेबांचा का खून केला असेल ? आणि त्याचा साथीदार विश्वास जो जागच्या जागीच मृत झाला तो कोण? हे सर्व उद्या कळेल. जयला विचारण्यासाठी तिने प्रश्नावली तयार केली. त्याच्या विरुध्द घेतलेले सर्व पुरावे काळजीपुर्वक वाचले. तिच्या मनात शंका आली. रस्त्यावर झालेल्या खुन्याचे वकिलपत्र घेतले म्हणून समाज काय म्हणेल? याची पण तिला चिंता वाटली. उद्या सकाळी सरांची भेट झाली की हा प्रश्न विचारायचा असे माधुरीने ठरविले. माधुरी –

उद्या तुरुंगात जाऊन चौहान साहेबांच्या आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाच्या खुन्याला प्रत्यक्ष भेटायचे होते. नेने सर सोबत आहेतच, तरीपण भिती वाटते आहे. कसा असेल जय सरकार? नावावरुन बंगाली वाटतो आणि फोटोवरुन देखणा वाटतो. युपीएस्सी परक्षेत भारतात पहिल्या पन्नासात आला आहे. म्हणूजे असामान्य हुशार असणार. मग चौहान साहेबांचा माग काढत बंगालमधून पुण्यापर्यंत का आला? आणि दुसरा मृत झालेला कोण तो नवीन चक्रवर्ती? तो पण याच्या एवढ्या वयाचा. त्याच्या फोटोवरुन तो पण देखणा, हुशार होता असे वाटते. मग एवढा टोकाचा निर्णय का घेतला या दोहांनी ? नेने सरांनी ही केस माझ्याकडे दिली आहे. आपल्या अशिलासाठी शेवटपर्यंत लढायचे हा नेने असोशिएटसचा बाणा. प्रत्येक केसमध्ये जीव ओतायचा. पण या जय सरकारने हत्येचा कबुली जबाब पोलीसांकडे दिलाय. मग केस कशी लढवणार ?

विचार करत करत माधुरी झोपी गेली. नेने सरांबरोबर तुरुंगात जायचे आहे म्हणून सकाळी ९ वाजताच ती ऑफिसमध्ये पोहोचली. नेने सर आधीच आले होते. आणि कॉम्प्युटरवर चौहान खुनाच्या जुन्या बातम्या पुन्हा वाचत होते. काही नोंदी घेत होते. या वयातही प्रत्येक केससाठी बारीक-सारीक माहिती मिळवून केस लढणार्‍या नेने सरांबद्दल तिला कौतुक वाटले. नेने सरांनी तिला जवळ बोलावून सोलापूर रोडवर झालेला खुनी हल्ला आणि त्यात चौहान साहेब त्यांचा अंगरक्षक आणि जय सरकारचा साथीदार यांचे रस्त्यावरील मृत फोटो दाखविले. दुसरा गुन्हेगार म्हणजे बहुतेक जय असावा, त्याच्या तोंडावर बुरखा होता, निळे जॅकेट अंगावर होते. पायात कॅनव्हास बुट दिसत होते. नेने सर माधुरीला म्हणाले, या बातम्या वाच पोलीसांचा पंचनामा वाच. साक्षीदारांचे म्हणणे वाच, कुठेतरी विसंगती मिळेलच. लक्षात ठेव, कितीही कडेकोट तुरुंग असला तरी कुठेतरी फट राहतेच. वकिलाला ती फट शोधावी लागते.

दहा वाजता नेने सरांच्या गाडीतून माधुरी आणि नेने जेलच्या दिशेने निघाले. अचानक माधुरीला आठवण झाली तशी ती म्हणाली, ‘‘सर, आरोपीचे वकिलपत्र घेतले म्हणून समाजातून टिका नाही का होणार?

‘याची मला कल्पना आहेच म्हणून आज सकाळीच ही केस कोणत्याही परिस्थीतीत नेने असोशिएटस् कडे आली याचा खुलासा पुण्यातील सर्व वर्तमान पत्रात दिला आहे.’

माधुरीचे समाधान झाले. कारण कोर्टात जय सरकारची वकील म्हणून ती उभी राहणार होती. आणि कारकिर्दीच्याच सुरवातीला तिच्यावर चारी बाजूनी टिका झाली असती.

नेने सरांची गाडी जेलमध्ये शिरली आणि जेलरसाहेबांकडे वेळ घेतल्याने सर्व कागदपत्रे पाहून दरवानाने दोघांना आत घेतले. कैद्यांना भेटण्याच्या जागी त्या दोघांना बसविण्यात आले. ५ मिनिटात सशस्त्र पोलीसांच्या पहार्‍यात जय सरकार त्यांच्या समोर हजर झाला. जयला पाहताच माधुरी उठलीच. जय एवढा देखणा, बांधेसूद असेल याची तिला कल्पनाच नव्हती. तिचे डोळे त्याच्यावर खिळले. दोघांना नमस्कार करत जय अस्खिलित इंग्रजीत बोलू लागला. – ‘‘आय अ‍ॅम जय. जय सरकार’’.

अ‍ॅड. नेने त्याच्याशी इंग्रजीत बोलू लागले. ‘‘मी सुरेश नेने, नेने असोशिएट्स या लॉ फर्मचा पार्टनर आणि ही माधुरी सामंत, माझी सहकारी. तुम्ही कोर्टात वकिल न दिल्याने मा. कोटाने आमच्या फर्मला तुमचे वकिलपत्र घेण्याची विनंती केली. माझी ही तरुण सहकारी नेने असोशिएटस् च्या वतीने तुमची बाजू कोर्टात मांडणार आहे. तुम्ही पोलीसांना हत्येचा कबूली जबाब दिला असला तरी, आम्ही तुमची बाजू कोर्टात व्यवस्थित मांडणार. आपल्याला फक्त दहा मिनिटाची वेळ दिलेली आहे. तेव्हा तुम्ही आणि तुमचा साक्षीदार विश्वास चक्रवर्ती बंगालमधून पुण्याला का आला हे मला कळणे महत्त्वाचे आहे.

क्रमश: भाग-१

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments