श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ चळवळ – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(मागील भागात आपण पहिले – ‘‘नाही गं, काय तरी काय?’’ असे म्हणत माधुरीने फाईलमध्ये लक्ष घातले. पण त्या फाईलमध्ये तिचे लक्ष कोठे लागायला ? माधुरीच्या लक्षात आल प्रतिकचे दोन फोन येऊन गेले कालपासून या गडबडीत त्याचा फोन घेणे काही जमले नाही. तिने त्यास सायंकाळी ५ वाजता वैशाली कॅफेमध्ये भेटूया असा मेसेज केला. – आता इथून पुढे)
सायंकाळी माधुरी वैशालीवर पोहोचली तेव्हा प्रतिक तिची वाटच पाहत होता. ती दिसताच त्याने कॉफीची ऑर्डर दिली. त्याच्या समोर बसताच माधुरी बोलू लागली, ‘‘सॉरी प्रतिक, कालपासून कामात होते, नेने सरांनी एका केसची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय, तुला आठवत असेल दोन महिन्यापूर्वी सोलापूर रोडवर सकाळच्यावेळी माजी पोलीस अधिक्षक चौहान साहेबांची झालेली हत्या,’’
‘‘हो तर, आठवतं तर! मी रोज त्याच रोडने ऑफिसला जातो. हत्येमुळे त्या दिवशी रस्ता बंद केलेला त्यामुळे मी दोन तास उशिरा पोहोचलो ऑफिसात.’’
‘‘त्याच हत्येमधील पकडलेला आरोपी जय सरकार ची केस कोर्टाने नेने असोशिएटस् कडे पाठविली आहे. आणि नेने सरांनी ती केस माझ्याकडे दिली आहे. म्हणजे कोर्टात मी जयची बाजू मांडणार’’
‘‘मग त्याकरिता त्या खुन्याला तुला भेटावं लागणार?’’ – प्रतिक
‘‘होय, काल नेनेसरांबरोबर भेटले मी त्याला. विलक्षण अनुभव होता तो. आणि माधुरी जयची पार्श्वभूमी, कलकत्त्यातील आंदोलन चिरडणारे अधिक्षक चौहान आणि गोळीबारात तीसजन मृत्युमुखी, त्यात जयची बहिण तनुजा मृत्युमुखी आणि त्याचा बदला घेण्यासाठी पुण्यात आलेले विश्वास आणि जय हे सर्व प्रतिकला सांगत सुटली. हे बोलताना जय बद्दल माधुरी एवढे भरभरुन बोलायला लागली की तिला त्याचे भानच नव्हते. तिचे दहा मिनिटे जय बद्दल भरभरुन बोलणे ऐकून प्रतिक उद्गारला, ‘‘माधुरी तू एका खुन्याबद्दल बोलते आहेस की प्रियकराबद्दल?’’
माधुरी दचकली. मग हळूच म्हणाली, ‘‘खरचं प्रतिक, कुणीही प्रेमात पडावं असाच आहे जय’’ एवढं म्हणून माधुरी गप्प झाली. मग ती आपल्याच विचारात मग्न झाली. प्रतिकच्या लक्षात आले. आता माधुरी मुडमध्ये नाहीय. तो पण गप्प राहिला.
रात्रौ बेडवर पडल्यापडल्या माधुरी सकाळचे सुवर्णाचे बोलणे आठवू लागली – ‘‘माधुरी तू जयच्या प्रेमात पडलीस की काय?’’ सायंकाळी प्रतिक म्हणाला, ‘‘माधुरी तु एका खुन्याबद्दल बोलते आहेस की प्रियकराबद्दल?’’ माधुरी विचार करु लागली. खरंच मी जयच्या प्रेमात पडले की काय? जयच्या आठवणीने ती मोहरली. त्याच्या सोबतच्या काल्पनिक विश्वात रमली. एवढ्यात तिला आठवले. अरे ! जय, चौहान हत्येतील आरोपी आहे आणि काही आश्चर्य झाले नाही तर त्याला फाशी… माधुरी दचकली. आपले लग्न प्रतिकशी ठरले आहे. मग आपल्या मनाची अशी द्विधा परिस्थिती का झाली आहे? छे ! छे !! जयचा विचार मनातून काढून टाकायला हवा. माधुरीने एक पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तक वाचता वाचता झोप यावी म्हणून, पण आज झोपही तिच्यावर रुसली. नेहमी तिच्यावर प्रसन्न असलेल्या झोपेचा आज लपंडाव सुरु होता आणि रात्रभर जय तिचा पिच्छा सोडत नव्हता. पहाटे चारच्या सुमारास ती दचकून जागी झाली. तेव्हा तिच्या स्वप्नात आपण जयसोबत वैशालीमध्ये कॉफी पित होतो असे होते. मग तिला आठवले आज सायंकाळी प्रतिकसोबत आपण वैशालीमध्ये कॉफी प्यायलो. मग स्वप्नात प्रतिक यायचा सोडून जय का आला ? फक्त एकदाच जय तुरुंगात सशस्त्र पोलीसांसोबत आणि नेनेसरांसोबत भेटला. त्यातील दोन किंवा तीन वाक्ये आपल्यासोबत बोलला असेल तरीही पूर्ण शरीरभर,मनभर तो व्यापून का गेला? असे का व्हावे ? तो देखणा होता म्हणून ? अत्यंत कुशाग्र बुध्दीचा होता म्हणून ? छे छे ! आपली आयुष्याची सव्वीस वर्षे पुण्यासारख्या शहरात गेली. नूतन मराठी सारखी शाळा, एस.पी. सारखं कॉलेज, प्रायोगिक नाट्य ग्रुप्स, लॉ-कॉलेज मध्ये कितीतरी देखणे, हुशार, श्रीमंत तरुण आजुबाजूला होते. कित्येकजण मित्र होते. अनेकांना आपल्याशी मैत्री वाढवायची होती. पण आपण कुठेच अडकलो नाही. दोन महिन्यापुर्वीच नात्यातल्या प्रतिकचे स्थळ आले आणि त्याचे आईबाबा आणि आपले आईबाबा यांच्या संमत्तीने प्रतिकशी लग्न ठरले. आपले आजपर्यंतचे आयुष्य सरळ रेषेत गेलेले. पण दोन दिवसापूर्वी जय समोर आला आणि मनातल्या समुद्रात वादळ शिरले.
सकाळी उठल्याबरोबर माधुरीने निश्चय केला आपल्याला जयच्या आठवणीपासून दूर जायला हवे, तो आपला अशिल आहे एवढेच लक्षात ठेवायचे. ऑफिसमध्ये गेल्यागेल्या तिने नितीनला भेटायला बोलावले आणि जय आणि विश्वास संबंधात जी कागदपत्रे जमवायला सांगितली होती त्यासंबंधी आढावा घेतला. अजूनही पुराव्यातल्या त्रुटी शोधायला सांगितल्या. नेने सरांचा तिला मेसेज आला. बहुतेक चौहान हत्येची केस पंधरा दिवसात स्टॅण्ड होणार. त्यामुळे आपली तयारी लवकर करायला हवी. माधुरीला वाटायला लागले आपण जयच्या आईवडीलांना भेटायला हवे. त्याचे आणखी कोण जवळची मंडळी असतील त्यांना भेटायला हवे. कोण जाणे काही तरी नवीन माहिती मिळायची. माधुरी नेने सरांच्या केबिनमध्ये गेली. ‘‘सर, मला वाटतं मी बंगालमध्ये जाऊन जयच्या आईवडीलांना भेटायला हवे. त्याची कोण जवळची मंडळी असतील त्यांनासुध्दा भेटायला हवे.’’
‘‘माधुरी, तुला मी मागेच बोललो होतो, जयच्या नातेवाईकांना एकदा भेटणे योग्यच. तू येत्या शनिवारी कलकत्त्याला जाऊ शकतेस काय? कलकत्त्यात माझे मित्र आहेत सुब्रतो नावाचे. त्यांची लॉ फर्म आहे. ते सर्व व्यवस्था करतील. मी मनालीला सांगतो तुझी तिकिटे बुक करायला. मला उद्या भेट.’’ दुसर्या दिवशी मनालीने माधुरीची कलकत्ता जायची यायची तिकिटे तिच्याकडे दिली. शनिवारी सायंकाळी ५च्या सुमारास कलकत्ता विमानतळाबाहेर आली तेव्हा सुब्रतोंची सेक्रेटरी सुप्रिया तिची वाटच पाहत होती. सुप्रियाने तिला हॉटेलपाशी नेले आणि जयच्या गावी जाण्यासाठी सहावाजता गाडी घेऊन येते, प्रवास चार तासांचा आहे आणि जय च्या आईवडीलांना पुण्याहून नेने असोशिएटस् तर्फे माधुरी सामंत भेटायला येणार असल्याचे कळविल्याचे सुप्रिया म्हणाली.
सकाळी ६ वाजता सुप्रिया ड्रायव्हरसह हजर झाली तेव्हा माधुरी तयारच होती. माधुरी सुप्रियाशी हिंदीत बोलायला लागली. ‘‘सुप्रिया पुण्यामध्ये जी पोलीस अधिक्षक चौहान यांची भररस्त्यात जी हत्या झाली आणि विश्वास चक्रवर्ती जागेवरच मारला गेला आणि जय सरकार पकडला गेला याबाबत इकडची प्रतिक्रिया काय?’’
सुप्रिया – ‘‘माधुरी खरं सांगू, चौहानांबद्दल बंगालच्या लोकांना कमालीचा राग होता, त्यांची पोलीस अधिक्षक कारकीर्द अरेरावीची होती. मोटर कारखान्यांच्या विरोधात जे आंदोलन झाले ते चिरडून टाकण्यासाठी त्यांनी गोळीबाराची ऑर्डर दिली आणि तरुण कॉलेजमधली मुलं मारली गेली. चौहानांचा खून झाल्याचे कळताच लोकांना आनंद झाला पण विश्वास, जय सारखी तरुण मुलं पोलीसांच्या तावडीत मिळाली याचे लोकांना वाईट वाटले.
चार तासांचा प्रवास करुन माधुरी आणि सुप्रियाने जयच्या गावात प्रवेश केला. आणि थोडीफार चौकशी केल्यानंतर त्यांची गाडी घरसमोर आली. त्या घराकडे माधुरी एकटक पाहत राहिली. छोटासा बंगला होता. बाहेर हिरवळीवर तरुण मुलं-मुली हातात कागदपेन घेऊन बसले हाेते. काहीजण घरातून बाहेर ये-जा करत होते. माधुरी आणि सुप्रिया हिरवळीवरुन चालत घराच्या दिशेने निघाल्या तेव्हा एक तरुण मुलगी बाहेर आली आणि सुप्रियाशी बंगालीत बोलू लागली आणि दोघींना आत बेडरुमध्ये घेऊन गेली. माधुरी बसलेल्या खोलीचे निरीक्षण करत होती. रविंद्रनाथ टागोरांचा एक मोठा फोटो होता. त्याच्याकडे पाहत असतानाच जयचे आईबाबा खोलीत आले. माधुरीच्या लक्षात आले. जयने आईचा तोंडवळा आणि बाबांची उंची घेतली आहे.
‘‘नमस्कार, मी माधुरी सामंत, पुण्याच्या नेने असोशिएट्स मधील वकील’’
‘नमस्ते, तुम्ही येणार याची कल्पना सुब्रतोच्या ऑफिसमधून दिली होती. तुम्ही जयचे वकिलपत्र घेतले? का ? त्याने चौहानांच्या हत्येचा कबुलीजबाब दिला आहे ना पोलीसांकडे ?’
‘‘जयने कबुली जबाब दिला असला तरी माननीय कोर्टाने जयच्या वतीने कोर्टात केस चालविण्याची विनंती केली आणि नेने असोशिएटस् ने ही केस चालविण्यासाठी माझी नियुक्ती केली.
जयचे वडील म्हणाले, ‘पण एवढे लांब येण्याचे कारण?’
‘‘आम्ही जयच्या सुटकेसाठी सर्व प्रयत्न करणार. चौहान हत्येसंबंधात काही नवीन माहिती मिळते का याकरिता मी इकडे आले.’’
‘या माहितीचा फारसा उपयोग होणार नाही माधुरी. जयने पोलीसांकडे हत्येचा कबुली जबाब दिला आहे आणि कोर्टात सुध्दा तो हत्येची कबूली देईल. तो बंगालमधील सरकार घरण्यातील मुलगा आहे. आम्ही मरणाला घाबरत नसतो. माधुरीचा नाईलाज झाला. या हत्येबद्दल जयचे आईबाबा फारसे बोलायला उत्सुक नव्हते. मग माधुरीच आजुबाजूला जमलेल्या तरुण मुलांकडे पाहून म्हणाली, ‘‘ही तरुण मंडळी कशाला जमली आहेत?’’
क्रमश: भाग-२
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈