श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ चळवळ – भाग-४ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

(मागील भागात आपण पाहिले –  माधुरीचा नाईलाज झाला. या हत्येबद्दल जयचे आईबाबा फारसे बोलायला उत्सुक नव्हते. मग माधुरीच आजुबाजूला जमलेल्या तरुण मुलांकडे पाहून म्हणाली, ‘‘ही तरुण मंडळी कशाला जमली आहेत?’’ – आता इथून पुढे)

जयची आई उद्गारली, आमच्या बाजूच्या जिल्ह्यात एका मोठ्या नदीवर नवीन धरण बांधण्याचे सरकारने ठरविले. या धरणाने कितीजणांना विस्थापित केले जाणार आहे याची सरकारला कल्पना नाही. बहुतेकजण आदिवासी लोक, त्यांनी कुठे जायचे? सरकार त्यांना आसामच्या बॉर्डरवर घर देऊ इच्छिते पण ते आपले गाव सोडून जायला इच्छुक नाहीत. आता त्यांना जबरदस्तीने हाकलले जाऊ शकते. त्या विरुध्द आंदोलन सुरु केले आहे. त्या आंदोलनाची तयारी येथे सुरु आहे. या आमच्या घरात सायंकाळी आंदोलनातील नेते जमतात. रोज चर्चा सुरु आहे. सरकार चर्चेसाठी बोलावते का बघायचे. मागे मोटर कारखान्याच्या विरोधात आंदोलन झाले त्यात ३० तरुण मुलं मारली गेली. आमची कन्या, होणारा जावई, मुलगा सर्व या मोटर कारखान्यामुळे…. जयचे वडील बोलता बोलता थांबले. क्षणभर थांबून ते जोराने म्हणाले, ‘‘पण मोटर कारखाना इथून दुसर्‍या राज्यात गेला हे महत्त्वाचे. आमच्या गरीब लोकांच्या जमिनी परत मिळाल्या. आम्ही विजय मिळविलाच. या धरणाला पण आमचा विरोध आहेच. या धरणाची गरज नाही आम्हाला. सरकारला तो निर्णय रद्द करावाच लागेल. त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत. अगदी आमचे प्राण…. बोलता बोलता जयचे बाबा थांबले. माधुरीच्या लक्षात आले. बहुतेक त्यांना आपल्या मुलांची आठवण आली असणार. जयची आई हळूच माधुरीला म्हणाली, ‘‘माधुरी, जयला भेटलेलीस इतक्यात?’’

 ‘‘होय आई’’ माधुरी म्हणाली.

 आई चटकन आत गेली आणि एक मिठाई बॉक्स घेऊन आली.

 ‘‘माधुरी, माझं एक काम कर, ही बंगाली मिठाई आहे. संदेश. जयला फार आवडते संदेश मिठाई. पुण्याला गेलीस की जयला भेटून ही मिठाई दे. म्हणावं, आईकडून ही शेवटची मिठाई…. कदाचित…..’’

आईला मोठा हुंदका आला. माधुरी पुढे गेली. आईच्या खांद्याभोवती हात घालून तिने आईला जवळ घेतले. क्षण दोन क्षण त्या दोघी एकमेकींच्या मिठीत अश्रू ढाळत होत्या. दुसर्‍या क्षणी आई बाजूला झाल्या. माधुरीला म्हणाल्या, ‘‘जयला सांग एक मोठ्ठं धरण बोडक्यावर मारलंय सरकारनं, त्याच्या विरुध्द आंदोलन सुरु होत आहे. त्याची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे तुझ्या आईबाबांना अजिबात वेळ नाही.’’ एवढं बोलून आई झटकन आत गेली. जयचे बाबा पण उभे राहिले. माधुरी त्यांना नमस्कार करुन निघाली. माधुरीने बाहेर पडतापडता पाहिले, मघा आत गेलेली जयची आई बाहेर महिला कार्यकर्त्यांच्या गराड्यात बोलत होती.            

माधुरी आणि सुप्रिया गाडीत गप्पगप्प होत्या. काहीवेळानंतर माधुरी सुप्रियाला म्हणाली, ‘‘सुप्रिया चळवळ म्हणजे काय? चळवळीतले कार्यकर्ते कसे असतात हे आज मला कळाले, मी इथे आले नसते तर कदाचित कळलेच नसते.’’ रात्रौच्या विमानाने माधुरी पुण्यात पोहोचली. दुसर्‍या दिवशी नेने सरांना भेटून तिने सर्व वृत्तांत सांगितला. नेने असोशिएटस् तर्पेâ तुरुंगाधिकार्‍याकडे जयची भेट मागितली गेली आणि यावेळी माधुरी एकटीच तुरुंगात पोहोचली. थोड्यावेळाने मागच्या वेळेसारखाच सशस्त्र पोलीस बंदोबस्तात जय बाहेर आला. ‘‘हाय माधुरी, काही काम होत का? केस केव्हा सुरु होणार?’’

‘‘बहुतेक पंधरा दिवसात’’

‘‘नाही, माझं आयुष्य किती शिल्लक राहिलं याचा हिशेब करतोय.’’

माधुरी आवेगाने म्हणाली, ‘‘असं बोलू नकोस जय, मला यातना होतात.’’      ‘‘एवढी इमोशनल होऊ नकोस माधुरी, माझ्या मनाची तयारी झाली आहे. का आली होतीस?’’

‘‘मी तुझ्या घरी जाऊन आले, तुझ्या आईबाबांना भेटून आले.’’

‘‘कशाला गेली होतीस ? केस संदर्भात ? अजून या केसमधून मी सुटेन अशी आशा वाटते का तुला?’’

‘‘वकीलाने आपल्या अशिलाच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करायलाच हवे जय, आणि दुसरं म्हणजे बंगालमधील चळवळीतील तुझ्या आई-बाबांना पण समजून घ्यायचं होत.’’

‘‘हो, आमचं कुटुंब चळवळीतीलं, आम्ही आमचा स्वार्थ कधी पाहिलाच नाही. आईबाबांना नोकरीत पगार मिळायचा तोपण निराधार कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च व्हायचा. माझ्या आई-बाबांना आम्ही दोनच मुलं नव्हतो, अशी शेकडो मुलं आमची भावंडं होती.’’

‘‘जय, आजुबाजूला स्वार्थी माणसांची डबकी पाहिली की तुझे आईबाबा उत्तुंग वाटतात रे! अशी माणसं अजून या जगात आहेत हे खरं वाटत नाही. जय बंगालमध्ये एका धरणाविरुध्द आंदोलन सुरु झाले आहे आणि तुझे आई-बाबा त्या आंदोलनात पुन्हा सक्रिय झाले आहेत. तुमच्या घरात कार्यकर्त्यांची लगबग सुरु होती. त्यांना माझ्याशी बोलायला सुध्दा वेळ नव्हता.’’

‘‘छान आहे, चळवळ, कार्यकर्ते हा त्यांचा श्वास आहे. मागच्या आंदोलनात मोटर कारखान्याच्या मालकाला शेवटी कारखाना बाहेर न्यावाच लागला. शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या.’’

‘‘पण जय, त्यासाठी किती किंमत मोजावी लागली ? तीस मुलं जागच्या जागीच मृत्युमुखी, त्याशिवाय….’’

‘‘त्याशिवाय तनुजा, विश्वास, मी असंच म्हणायचं आहे ना माधुरी ? चळवळीतील लोक जीवाची पर्वा करत नाहीत. “

एवढ्यात माधुरीला आठवण झाली. तिने पर्समधील जयच्या आईने दिलेला संदेश मिठाईचा बॉक्स बाहेर काढला, तो जयसमोर धरुन माधुरी म्हणाली, ‘‘जय तुझ्या आईने तुझ्या आवडीची संदेश मिठाई पाठविली आहे.’’

‘‘संदेश मिठाई ? ही मिठाई मला फार आवडते. ’’ तो मिठाईचा बॉक्स जयने हातात घेतला, बॉक्स गोंजारला, ‘‘माधुरी, गेले दोन महिने तुरुंगातील अन्न खाऊन शरीराला त्याची सवय झालीय, त्या शरीराला ही तुपातली संदेश मिठाई खाऊन पुन्हा ती सवय मोडायला नको. माधुरी ही मिठाई माझ्यातर्फे  तुला भेट. नाहीतरी माझ्यासाठी तू एवढे करतेस याचा उतराई मी कसा होऊ?’’

‘‘जय असं बोलू नकोस रे !’’

‘‘मला समजतयं माधुरी, मी पण तरुण आहे, तरुणाईच्या सर्व संवेदना माझ्याही मनात आहेत. तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलचे प्रेम दिसत आहे पण ही वेळ चुकीची आहे. तुझं लग्न ज्या तरुणाशी ठरलयं त्याच्याशी लग्न कर आणि सुखी हो.’’ एवढं म्हणून जय आत निघून गेला. तो संदेश मिठाईचा बॉक्स हातात घेऊन माधुरी बाहेर पडली.

पंधरा दिवसानंतर विजयकुमार चौहान हत्येची सुनावणी चालू झाली. प्रतिकला कल्पना होती, माधुरी नुसती जय सरकारची वकिल नव्हती ती मनाने त्याच्यात अडकली होती. त्यामुळे प्रतिक रोज कोर्टात हजर राहत होता. सकाळी तो आपल्या गाडीतून माधुरीला आणत होता, सायंकाळी घेऊन जात होता.

सरकारी वकिलांनी अनेक पुरावे दाखल करुन जय सरकारला फाशी देण्याची विनंती केली.

माधुरीने पुराव्यातील त्रुटी दाखवून जयचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. फाशी ऐवजी कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती केली.

जय ने विजयकुमार चौहान व त्याच्या अंगरक्षकाची गोळी मारुन हत्या केल्याचे मान्य केले.

कोर्टाने जय सरकारला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

माधुरी शांत होती. तिने शांतपणे कोर्टाचा निकाल ऐकला. पोलीस बंदोबस्तात जयला नेत असताना माधुरी आणि प्रतिक त्याला समोरे गेले. जय म्हणाला, ‘‘माधुरी, एक महिन्यापूर्वी तुझी ओळख नव्हती. पण माझ्यासाठी तू जी धडपड केलीस त्याला तोड नाही. आता माझ्यासाठी एकच कर, मी जिवंत असेपर्यंत तुझे आणि या तरुणाचे लग्न होऊ दे. ती बातमी मला ऐकू दे. ही माझी शेवटची इच्छा समज.’’

पोलीस जयला घेऊन गेले.

२ डिसेंबर रोजी प्रतिक आणि माधुरी यांचे लग्न झाले. दुसर्‍या दिवशी माधुरी प्रतिकसह जयला तुरुंगात भेटून आली. तिघांनी नेहमी मित्र गप्पा मारतात तशा गप्पा मारल्यात. बाहेर पडताना माधुरीने जयला पाहून घेतले. जयने हसत हसत माधुरी-प्रतिकला निरोप दिला.

२१ डिसेंबर रोजी विजयकुमार चौहान हत्येबद्दल जय सरकारला फाशी दिले गेले.

बंगालमधील धरणाच्या विरोधातील आंदोलन सुरुच आहे. भारतात आणि जगात भूमीपुत्र आपल्या हक्कांसाठी सरकारबरोबर आणि उद्योगपतींसोबत लढतच आहेत. आंदोलने करतच आहेत. चौहानांसारखे पोलीस अधिकारी अधिकारांचा वापर करुन निरपराधा लोकांवर गोळीबार करीतच आहेत. त्यात तनुजा सारखी तरुण मुल हकनाक मरतच आहेत, विश्वास सारखे तरुण रस्त्यात गोळी खातच आहेत आणि जय सारखे फासावर जातच आहेत. सरकारची दडपशाही सुरुच आहे. आंदोलने सुरुच आहेत. पुन्हा गोळीबार… पुन्हा फाशी… सारे चालू राहणार आहे….. चालूच राहणार आहे….

– समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments