सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
जीवनरंग
☆ एखाद्याचं नशीब — भाग-१ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
मुकुंदराव देवधर म्हणजे दहिवली गावातली प्रतिष्ठित आणि दिलदार असामी! वय ५२ वर्षे, उंची पावणेसहा फूट, लख्ख गोरा रंग आणि किंचित तपकिरी झाक असलेले भेदक डोळे, असं एकूण रूबाबदार व्यक्तिमत्त्व !
मुकुंदराव सिव्हिल इंजिनिअर, बांधकाम व्यवसायात त्यांनी चांगलंच नाव कमावलं होतं. त्यांचा प्रशस्त बंगला त्यांच्या वैभवाची साक्ष द्यायला पुरेसा होता. त्या शिवाय चार गुंठे जमीनीवर आंबा, नारळ, सुपारी, पेरू, चिकू अशा वेगवेगळ्या फळझाडांची लागवड केली होती. त्यातूनही बरंच उत्पन्न मिळत होतं.
शिवाय गावातील दोन पतपेढ्या, ज्युनियर काॅलेजच्या कमिटीवर ते होते आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसंबधी संस्थेचेही सन्माननीय सदस्य होते. अडल्या पडल्याला मदतीचा हात द्यायला नेहमीच ते पुढे व्हायचे. त्यामुळे गावात त्यांना आदराचं स्थान होतं.
बांधकाम व्यावसायिक असले तरी मुकुंदराव साहित्य – कला यांचे शौकीन होते. गणपतीला त्यांच्या बंगल्यासमोर मोठा मांडव घातला जायचा. तबला-पेटीच्या साथीनं दणक्यात आरती व्हायची. गावातली मंडळी आरतीला आवर्जून हजेरी लावायची. रोज किमान २०-२५ माणसं पंगतीला असायची.
गौरी-विसर्जनापर्यंत रोज वेगवेगळ्या कार्यक्रमांचीही मेजवानी असायची. काव्य वाचन, कथाकथन, कीर्तन, भजन, हिंदी-मराठी वाद्यवृंदांचे गाण्याचे कार्यक्रम अशी धमाल असायची. पण सगळे कार्यक्रम अगदी शिस्तबद्ध आणि वेळेत पार पडायचे. या कलाकारांचा पाहुणचार देवधर कुटुंब अगदी अगत्याने करायचं.
आत्ता सगळं आलबेल दिसत असलं तरी मुकुंदरावांचं आधीचं आयुष्य इतकं सुखाचं नव्हतं.
त्यांची आई त्यांना जन्म देऊन लगेच देवाघरी गेली होती. वडिलांची फिरतीची नोकरी. ते सरकारी नोकरीत, मृद्संधारण विभागात होते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे मातीचे नमुने गोळा करण्यासाठी त्यांना कायम खेडोपाडी जावं लागायचं, तिथे मुक्काम करावा लागायचा. त्यामुळे वडिलांच्या आईनं, आजीनेच मुकंदरावांना सांभाळलं. पण ते आठवीत असताना तीही वारली. मग दहावीपर्यंत ते मामाकडे राहात होते. मामाकडे राहायची-खायची सोय असली तरी मामीनं त्यांच्याकडे ‘विकतचं दुखणं’ या भावनेनंच पाहिलं. पुढच्या शिक्षणासाठी मग त्यांनी वसतीगृहात राहणं पसंत केलं आणि नेटानं अभ्यास करून सिव्हिल इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तमरित्या पास झाले. पण पोरकेपणाची जाणीव त्यांच्या मनात कायम घर करून राहिली होती.
इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर काही वर्ष त्यांनी सरकारी नोकरी केली. यथावकाश लग्न झालं. मुलं झाली. नंतर नोकरी सोडून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यात जम बसवून पैसा कमावला. जमीन विकत घेतली, मोठ्ठा बंगला बांधला. मधल्या काळात वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.
मुकुंदरावांची पत्नी मोहिनी, मुलगा विनय आणि मुलगी वरदा असं छान चौकोनी कुटुंब होतं. विनय टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर, नोकरीनिमित्त अमेरिकेत गेला आणि तिकडच्याच सोफियाशी लग्न करून तिकडेच स्थायिक झाला. मुकुंदराव या प्रसंगाने पार उध्वस्त झाले. आपलं कुटुंब म्हणजे त्यांचं सर्वस्व होतं. मुलगी तर लग्न करून सासरी जाणारच! एक मोहिनीच काय ती त्यांच्याजवळ राहणार होती. लग्न झाल्यापासून ते मोहिनीला सोडून कधीच राहिले नव्हते. व्यवसायानिमित्तही कुठे बाहेरगावी राहावं लागणार असेल तर ते मोहिनीला सोबत घेऊन हाॅटेलमध्ये राहायचे.
वरदानं एम. काॅम., एम. बी. ए. केलं होतं. तिचं लग्न मागच्याच आठवड्यात पार पडलं. जावई निखिल पण उच्च शिक्षित आणि ऑस्ट्रेलियात नोकरीला होता. लग्नासाठी म्हणून भारतात आला होता. त्याचे आई-वडील मुंबईत, मालाडला राहात होते. निखिल त्यांचा एकुलता एक मुलगा. ओळखीतल्या एकानी स्थळ सुचवलं आणि पंधरा दिवसांत लग्न झालं सुद्धा.
नवपरिणित दांपत्य कुटुंबियांसमवेत चार दिवस कुलदैवताच्या दर्शनासाठी कोकणात गेलं होतं. त्यानंतर दोनच दिवसांत जावई ऑस्ट्रेलियाला जाणार होता. वरदाचा व्हिसा आला की ती पण तिकडे जाणार होती. दोन आठवडे तरी त्यासाठी लागणार होते.
लेक तिकडे रवाना झाली की आपण दोघं मस्त लाईफ एंजॉय करायचं, असं मुकुंदरावांनी ठरवून टाकलं होतं. त्याला कारण होतं त्यांचं आजपर्यंतचं आयुष्य! आतापर्यंत भरपूर धावपळ केली, कष्ट उपसले. आता कामाचा व्याप कमी करायचा, मोहिनीला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यायचा, असा ते विचार करत होते.
लेक आणि सासरची मंडळी कोकणातून परतली. दोनच दिवसांनी निखिलही ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. त्याआधी वरदा आणि निखिल दहिवलीला धावती भेट देऊन गेले. नंतर वरदा आपल्या सासरी मालाडला होती. तिचीही जायची तयारी एकीकडे चालू होती.
असंच कपाटात काही तरी शोधताना तिला निखिलची काही कागदपत्रं हाती लागली. त्यात ऑस्ट्रेलियातल्या त्याच्या नेमणुकीच्या पत्राची काॅपी देखील होती. तो तिथल्या एका हाॅटेलमध्ये वेटरचं काम करत होता. त्यामुळे त्याचा पगारही अगदीच थोडा होता. वरदाला फार मोठा मानसिक धक्का बसला. कारण निखिल एम. बी. ए. फायनान्स असल्याचं, लग्न जुळवताना सांगितलं होतं. आता लग्न ठरवताना पुरावे थोडेच मागतो आपण? परस्पर विश्वासावरच अवलंबून असतं सगळं! आणि परदेशातल्या स्थळाचं आकर्षणही भुरळ घालतंच की आई-वडिलांना आणि मुलींनाही!
मग तिनं इतरही कागदपत्रं बारकाईने बघितली. निखिल बारावीच्या परीक्षेत जेमतेम ३६% मिळवून पास झाला होता. तिनं मग त्याचं बी. काॅम आणि एम. बी. ए. चं सर्टिफिकेट गुगलवर पडताळून बघितलं. पण गुगलवर नोंद आढळत नाही, असा शेरा येत होता. ही फार मोठी फसवणूक होती.
वरदाला काय करावं हेच कळेना. तिनं मुंबई विद्यापीठात काम करणाऱ्या एका मैत्रिणीकरवी पुन्हा तपास केला. पण या विद्यार्थ्याची नोंदच तिथे नव्हती.
आपली काही महत्त्वाची कागदपत्रं आणायला आपण माहेरी जात आहोत, असं सांगून ती घराबाहेर पडली आणि दहिवलीला आली.
तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते आणि तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. ती आपल्या खोलीत गेली आणि पलंगावर स्वतःला झोकून देऊन ओक्साबोक्शी रडू लागली.
तिला अशा अवस्थेत घरी आलेली पाहून मोहिनी भांबावून गेली. तिनं मुकुंदरावांना फोन करून ‘लगेच घरी या, वरदा आलीय’, एवढंच सांगितलं. मोहिनी फक्त तिच्या डोक्यावर हात फिरवत, काय झालं म्हणून विचारत राहिली. तासाभरात मुकुंदरावही घरी पोचले. तोवर वरदा थोडी शांत झाली होती. रडत-रडतच तिनं आई-बाबांना सर्व हकीकत सांगितली.
मोहिनीला दुःख आणि संतापानं अश्रू आवरेनासे झाले. मुकुंदराव या धक्क्याने आधी एकदम निःशब्द झाले आणि नंतर संतापाने तोंडाला येईल ते बडबडू लागले. असा बराच वेळ गेला.
मग मुकुंदरावांनी आपटेंना, त्यांच्या वकील मित्राला फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतर लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थाला त्यांनी फोन केला. ते देशमुखकाकाही हे सर्व ऐकून चकित आणि दुःखी झाले. ‘मुलाच्या आई-वडिलांनी दिलेली माहितीच आपण सांगितली’, असं ते म्हणाले. त्यांनी तिरीमिरीत निखिलच्या वडिलांना फोन लावला आणि अशी फसवणूक केल्याबद्दल त्यांची हजेरी घेतली. पण त्यांच्या बोलण्यातून, निखिलने या सर्व गोष्टींचा त्यांना पत्ताच लागू दिला नव्हता, हे कळत होतं. निखिलनं आपल्या आई-वडिलांचीही फसवणूक केली होती.
कालांतराने वरदाला घटस्फोट मिळाला. पण या धक्क्यातून ती स्वतःला सावरू शकली नाही. लग्न या प्रकाराचा तिनं धसकाच घेतला आणि आपण आता लग्नच करणार नाही असं तिनं आई-वडिलांना निक्षून सांगितलं.
मोहिनी लेकीच्या काळजीनं सतत तिच्या सोबत राहू लागली आहे. एकीकडे तिचे उपास-तपास, देवधर्म चालूच आहेत. ती यांत्रिकपणे घरातली कामं कशीबशी उरकते. रात्री देखील ती वरदाच्याच खोलीत झोपते. मुकुंदरावांकडे लक्ष द्यायला तिला सवडच नाही.
मुकुंदराव हतबल होऊन आपलं पोरकेपण भोगत आहेत.
– क्रमशः भाग पहिला
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈