श्री अमोल अनंत केळकर

☆ एक हास्य कथा -> मो-“बाइल वेडी” – लेखक : डॉ. आनंद काळे ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर

गेली २० वर्षे  मानसोपचारतज्ञ म्हणून काम करत असताना माझ्या लक्षात आले की  काही रुग्ण चांगलेच लक्षात रहातात अन त्याहीपेक्षा अधिक लक्षात रहातात ते त्यांचे नातेवाईक.

आता पर्वाचाच एक किस्सा सांगतो .

सकाळीच एका २५ ते ३० वर्षे वयाच्या पुरुष रुग्नाला घेउन एका ४५- ५०च्या स्त्रीने ओपीडीत  प्रवेश केला . त्यांच्या सोबत होता त्यांच्या गावातला एक सज्जन .

मानसिक आजारची लक्षणे त्या तरुणात साफ दिसत होती . शून्यात असलेली नजर , अस्ताव्यस्त कपडे , वाढलेली दाढी अन चेहऱ्यावरचे अस्वस्थ भाव .

शेजारी बसलेल्या त्याच्या आईकडे माझे लक्ष गेले. नेटनेटकी नववार साडी ,कपाळावर टेबल टेनिसच्या चेंडू एव्हढे मोठे कुंकू, डोक्यावर भला मोठा अंबाडा अन नुकतच पान खाल्यामुळे लाल झालेले ओठ .

त्या स्त्रीने सुरुवात केली .

” दागदर, हे बगा हे माझ पोरग , गेल्या आठ दिसापासून ……..”

 एव्हढ्यात ” माळ्याच्या माळ्यामंदी पाटाच पाणी जात …..” मोबाईलची रिंग टोन ऐकू आली .

आवाज कुठून येतोय याचा काही मला अंदाज लागत नव्हता . या बाईने आंबाड्यात तर नाही ना ठेवला मोबाईल . डोक्यात एक विचार चमकून गेला .😳🧐

त्यानंतर  त्या स्त्रीने केलेल्या ज्या प्रक्रियेने ज्या जागेवरून मोबाईल दृष्टीक्षेपात आणला  ते बघून मी डोळे मिटले .

डोळे उघडल्यावर ती स्त्री मोबाईलवर संवाद करताना दिसली  . ” हॅलू , ….हा सखूच बोलतेय  … काय झाल ग कमळे …..आज नाही  भीसी ..   उद्या हाय … व्हय …या बारीस लागली ना मला भीसी तर श्यामसंग चा नवा मोबाईल घेनार हाय ..

मी मारला व्हता तुले मोबाईल सकाळी  पण तीकडून ती बाइ विंग्रजीत कायबाय बोलत व्हती… … बर म्या काय  म्हणते …”

आजूबाजूचे  वातावरण अन आम्हा पामरांबद्द्ल अनभिज्ञ होवून सखूबाई तल्लीन होवून मोबाईलवर  बोलत होत्या .

शेवटी त्यांना माझी दया आली . ” इकड   विठूला आणलय दाग्दरकड. त्याच झाल दोन मिंटात की लगेच लावते बघ .” त्यांनी कमळीला सांगत मोबाईल कट केला .

इतकावेळ धोरोदत्तपणे मी मोबाईलचे संभाषण संपण्याची वाट पहात होतो .  ” काय त्रास होतोय विठूला “

स्वत:च्या मनावर ताबा ठेवत मी विचारले .

“२ हप्त्यामाग एकदम नादर व्हता बघा. . जुन्या नोकीयाच्या जाड ठोकळ्यासारख्या मोबाईल वानी. एकदम ठणठणीत!.  बायकू गेली कवरेजच्या बाहेर! “

“ म्हणजे ?”😳 मी विचारले

“सोडून  गेली हो…. तव्हापासून बिघडलय बगा .”

“  काय बदल वाटतोय त्याच्यात?”

“मधीच बोलता बोलता “रेंज” सोडतय बघा”

“ काय ?” मी  उडालोच.😳🙃

“ म्हणजे बोलता बोलता लाइन सोडून बोलतो.” तीचं उत्तर.

“बर ! अजून काय त्रास होतोय?” माझा चिवटपणा.

सखूबाई उत्तर देणार इतक्यात पुन्हा ” माळ्याच्या मळ्यामंदी  ही मोबाईल ट्यून वाजली . या वेळी मी डोळे बंद करण्याच्या आत मोबाईल सखूबाईने उचलला होता .

” काय ग रखमे?”

माझा धीर आता सुटू लागला होता .

“ हे बघ . रातच्याला पीठल भाकर कर . चार मुठी बेसनात २ गीलास पाणी टाक अन चांगल रटरट शीजू दे . किती बार्या  सांगितल तुला तेच .  जरा डोक लाव की . अस काय करायलीस शीम कार्ड नसलेल्या मोबाईल वनी”

सखूबाईने मोबाईल कट केला अन त्याला अदृश्य करत माझ्याकडे वळल्या.

” तर म्या सांगत व्हते दागदर , मधून मधून कधी कधी “ह्यांग” बी होतो ? “

“काय होतो?”🧐

“मोबाईल जसा ह्यांग व्हतो ना तसा गच्च व्हतो बघा”

आता माझच डोक ह्यंग व्हायची वेळ आली होती .

” लघवी संडासला काही त्रास ? ” माझा हिस्टरी घेण्याचा प्रयत्न चालू होता .

“चार दिस झाले बघा संडासला झाल नाही”. खातच नाही काइ त्यो.. .आता मला सांगा डागदर  इनकमिंगच नाही तर आवुट गोइंग कस राहिल ?”

सखूबाईच्या मोबाईल क्षेत्रातल्या प्रगाढ पांडित्याने मी आता चांगलाच प्रभावित झालो होतो .😇😱

” डिसचार्च झालेल्या मोबाईल वानी वागतोय बघा . आता बायको नाही म्हणजे चार्जर् नाही . कितीदा सांगीतल त्याला मिसेसला एक मिस्ड काल तरी  दे म्हून. पण ह्यो ऐकतच नाही.”.

” एव्हढ्यात अजून एक मोबाइल ची ट्यून वाजली . ” निसर्ग राजा ऐक सांगतो “

आता हा कोणाचा मोबाइल ? मी प्रश्नार्थक मुद्रेने वर पाहिले . हा सखूबाईचा तर नक्कीच नसणार . सोबतच्या गावाकडच्या कार्यर्कत्याने आपल्या खिशातून मोबाईल काढला

“काय रामराव , कुठ हाइत तुम्ही.. . या येळीस झेड पी च्या विलेक्षणच तुमच तिकीट  फिक्स दिसतय . बाकी सगळ्याले डिलीट मारणार तुम्ही यंदा .  फेश्बुकावर लै चमकू लागले तुम्ही !!”

मी हताशपणे संभाषण संपण्याची वाट बघू लागलो .

इतक्यात सखूबाई त्या सद्गृहस्ताला बोलल्या .” ए बारकू . मूट करण मोबाइल . डॉक्टरकड आल्यावर मोबाईल शायलंट ठिवायच माहीत नाय का तुला.”

पुढे मी काही बोलण्याच्या आत सखुबाई सुरू झाल्या .

“हे बगा दागदर , तुम्हाला काय करायच ते करा.सगळ बील प्री पेड करते. पोस्ट पेडची भानगडच नाही . पण एकदाच फार्मेट का काय म्हणते ते मारा अन चक करून टाका सगळ.”

“ मव्हा भाउ हाय वडाफून च्या सेंटरात . त्यो म्हणला कशाला जाती डागदरकड . मी गूगळ करतो अन सांगतो तुला ट्रिटमेंट .ते त्याच गुग्गुळ काय माझ्या डोक्यात डाउनलोड झाल नाही बघा  म्हून आणल तुमच्याकड.”

सखूबाईच हे मोबाईल रुपक मी आणि विठू ( पेशंट )अगदी शांतपणे ऐकत होतो. फरक एव्हढाच की विठूच्या डोक्याच्या मोबाईलला नेटवर्कच  नव्हते अन  सखूबाईच्या अखंड बडबडीने माझ्या डोक्याचे नेटवर्क कधीच कंजेस्टेड झाले होते.

” हे बघा सखूबाई, या प्रकारच्या मनोविकाराची उपाययोजना ……”

मला मध्येच तोडत सखूबाई म्हणाल्या

” जरा एक मिनिट डागदर , हे तेव्हढ वाटस अप वर आंगठे , फुग अन फुल टाकते . शेजारच्या मंदीच्या लेकराचा ह्य्यापी बर्थ डे हाय”

सखूबाईनी मोबाईल मध्ये एखाद्या १०० ची स्पीड असलेल्या टाइपिस्टलाही लाजवेल अशा वेगाने टाइप केले .

माझ्याकडे वळत त्या म्हणल्या . “तुम्हाला काय करायच ते करा पण मव्ह पोरग चांगल नीट करून द्या ” एखाद्या नव्या टच स्क्रिन च्या मोबाईलवानी”

मी हवालदील .

“  ते औशीध गोळ्या धाडा मला वाटस अप वर”

सखूबाई उठल्या अन माझ्याकडे सरसावल्या .

“ ईकड बघा डॉक्टर . लांबवलेल्या हातातल्या मोबाएलकडे माझ्याशेजारी उभ राहून पहात त्यानी मला सांगितल.

“ए विठ्या , मेल्या बघ की त्या मोबाईलकडे. आपल्याला दागदर बरूबर शेल्फी काढायचीय.”

शेल्फी काढून सखूबाई, विठू अन त्यांच्याबरोबरचा तो इसम बाहेर पडले .

माझ्या डोक्याच्या मोबाईलच्या हार्डवेअर , सीम कार्ड अन बॅटरी यांच्या एकत्रित ताळ्मेळाची  पार वाट लागली होती .

दुसऱ्या दिवशी सकाळी मी वाट्स ॲप उघडले .एका अननोन नंबरवरून आलेला एक मॅसेज बघीतला “. गूड मार्निग दागदर “. बरोबर एक फोटो पाठवला होता. आदल्यादिवशीचाच  सखूबाई अन विठु बरोबरचा सेल्फी होता . .

फोटोत आपले लाल ओठ दाख्वत सुहास्य वदनाने  सखूबाई दिसत होत्या. शेजारी मी अन विठू .  माझ्या चेहऱ्यावरचे भाव मात्र  विठुच्या चेहर्यावरील भावापेक्षा फार काही वेगळे नव्हते .😃

इतक्यात माझ  मोबाईल खणाणला . “डागदर , पलीकडे सखूबाई होत्या . तुम्हाला पाठवलेला फोटू डीपी म्हून ठिवला तर बर राहीन का?

बिगीनी सांगा . मोबाईलची बॅटरी संपायली”.

माझी बोलती बंद झाली . माझा मोबाइल चार्ज्ड होता पण माझीच बॅटरी खलास झाली होती.😇🙃

लेखक : डॉक्टर आनंद काळे

औरंगाबाद.

प्रस्तुती – श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments