श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ काय हरवले सांग शोधिसी…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
दारावरची बेल वाजली. दार उघडलं, पाहते तो काय? सुहासिनी, नावाप्रमाणेच अतिशय मोहक हसू ल्यालेली मैत्रिण समोर उभी होती.
सुहासिनी दिसायला अगदी सुरेख होती. लांबसडक रेशमी केस, सावळीच पण नाकीडोळी नीटस, नाजुक ओठ आणि पाहताक्षणी भुरळ पडावी असे विलक्षण बोलके डोळे आणि अत्यंत चौकस नजर. फिक्कट रंगांच्या साड्या, त्यावर शोभेलसा मॅचिंग ब्लाउज घातलेला. तोंडात खडीसाखर. अगदी कायम मनमोकळे हसणे. गेली अनेक वर्ष सुहासिनी ही अशीच आहे.
तिची गळाभेट घेत मी आनंदमिश्रित आश्चर्याने विचारलं, “आज अचानक अशी तू इकडे कशी?” ती सोफ्यावर रिलॅक्स होत म्हणाली, “तू काल म्हणत होतीस ना की गिरीशदादा सकाळीच बाहेरगांवी जाणार आहेत म्हणून. आज मीही एकटीच होते, म्हटलं तुझ्याकडे चक्कर टाकावी. चालेल ना?”
“अग, चालेल काय, धावेल सुद्धा.” आम्ही खळखळून हसलो. सखूबाई लगेच आमच्यासाठी चहा टाकायला आत गेल्या. मी म्हटलं, “उद्याच्या लेक्चरची तयारी झालीय का?”
“आम्हा मराठी प्राध्यापकांना कसली आलीय तयारी? तुला माहीतच आहे, माझ्या सर्व आवडत्या कवींच्या कविता मला कशा तोंडपाठ आहेत त्या. अर्थात त्यात माझी हुशारी कमी, अगदी मनामनांत ठसले जाणारे त्या कवींचे योगदान जबरदस्त आहे. माझं त्यावर चिंतन, मनन सारखं चालू असतं. पण तुझं तसं नाही, कारण तू मानसशास्त्राची प्राध्यापिका आहेस. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्रशुद्ध शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मला त्यात इंडस्ट्रिअल, क्लिनीकल, चाईल्ड, स्कुल सायकोलॉजी वगैरे असतं एवढीच जुजबी माहिती आहे. ते ऐकूनच टेन्शन येतं.” सुहासिनी म्हणाली.
“हो, या प्राध्यापकीत कितीही मुरलेलो असलो तरी उद्या काय शिकवायचे आहे हे समजावून घेऊन त्याच्या नोट्स काढाव्याच लागतात. तयारीशिवाय जाणं निदान मला तरी आवडत नाही.”
….तितक्यात चहा आला.
प्रतिकूल परिस्थितीत जे घट्ट पाय रोवून उभे असतात, अशा लोकांशी माझी मैत्री चटकन जमते. पंचवीस वर्षापूर्वी आम्ही दोघी एकाच वर्षी प्राध्यापकीला सुरूवात केली होती. सुहासिनी प्रथम श्रेणीत बी.ए. पास झाली. सुहासिनीसारख्या सुंदर मुलीचं स्थळ जमायला अवघड गेलं नाही. शेखर कुठल्याशा कंपनीत क्लार्क होता. सुहासिनीने एम.ए. ला अॅडमिशन घेतलेली होतीच. लग्नानंतर तिने मराठीत एम.ए. करताना गोल्ड मेडल मिळवलं. एम. फिलसाठी अॅडमिशन घेतली. त्याच दरम्यान घरी पाळणा हलला. घरी लक्ष्मी आली पण खर्चाची तोंडमिळवणी करणे अवघड जात होते.
नशिबाने महाविद्यालयात तिची नेमणूक झाली. आता स्थिरता येईल असे वाटत असतानाच शेखरची कंपनी बुडाल्याने त्याची नोकरी गेली. परत कुठे नोकरी शोधायचा त्याने प्रयत्न केला नाही. त्याला समाजकार्याची आवड होतीच. निरपेक्ष वृत्तीने अडल्या नडलेल्या लोकांची कामं करून देणं हे आता त्याचं व्यसन होऊन बसलं होतं.
सुहासिनीने चकार शब्द काढला नाही. कुणी काही बोललं की ती म्हणायची ‘नवऱ्यानं कमवायचं अन बायकांनी घरी बसून राहायचं, आता ते दिवस गेले. मी कमवते अन माझा नवरा बसून खातो याचं माझ्या मनांत किल्मिष नाही की माझ्या नवऱ्याच्या मनांत अढी. तुम्हाला काय त्याचं? दुसरं, माझा नवरा समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने जगावेगळे काम करतो आहे.’ असं सांगायची.
आपल्या हिमतीवर तिने आपल्या दोन्ही मुलांना नीट वाढवलं. कन्येला उच्चविद्याविभूषित केलं. कन्येला कुठेतरी नोकरी लागून तिला आपल्या पायावर उभी केल्याशिवाय तिच्यासाठी स्थळंही पाहायला तयार नव्हती. नोकरी मिळताच तिच्या मनासारखं तिचं लग्नही जमलं. मुलगी सुस्थळी पडली पण एकुलती एक कन्या आपल्यापासून कित्येक मैल दूर होणार म्हणून सुहासिनीच्या जीवाची घालमेल होत होती. त्यावेळी मीच तिला समजावून सांगितलं होतं. ‘सुसि, एवढी हुरहुर लावू नकोस ग, तिच्या जीवाला. आपल्या स्वत:च्या विश्वात ती नव्या नवलाईने जाते आहे, तिची पावले जड होऊ देऊ नकोस. या काळजाच्या तुकड्याच्या पंखांत तूच बळ दिले आहेस म्हणूनच तर नव्या दिशेला भरारी मारण्याचे स्वप्न तिला पाहता आले. तू दिलेल्या संस्काराच्या बळावर ती घट्ट पाय रोवून उभी राहील. लक्षात ठेव, तिला तुझी गरज देखील भासणार नाही.’ झालंही तसंच, ती कन्या सुहासिनीला पार विसरून गेली.
पहिलटकरणीचं हक्काचं घर म्हणून कन्या आईकडेच आली होती. कॉलेज सांभाळत सुहासिनीने लेकीचं सगळं केलं. दोन महिन्यानंतर लेकीला, नातीला सोडायला म्हणून पहिल्यांदा दिवाळीच्या सुटीत मुलीच्या सासरी गेली होती. आपल्या लेकीनं घर छान सजवलं आहे म्हणून तिला खूप आनंद झाला. तिने मला खास फोन करून सांगितलं होतं.
त्यानंतर आज ती पहिल्यांदाच अशी वेळ काढून माझ्याकडे आली होती. चहा संपला. सुहासिनी गप्पच होती.
काही वेळाने सुसि म्हणाली, “मीनल, तू त्या दिवशी बरोबर बोलली होतीस. मला आता ते प्रकर्षानं जाणवतं आहे. मी आता केवळ गरजेपुरती राहिली आहे. का कोण जाणे, आताशा सारखं वाटतं आहे की आपले म्हणवणारे लोक फक्त स्वार्थासाठी माझा वापर करताहेत. माझी मुलं आणि त्यांच्या भविष्याचा ध्यास एवढंच माझं लक्ष्य होतं.
शेखरला घराकडे लक्ष द्यायला वेळ नाही हे स्वीकारूनच मी मुलांच्या शिक्षणाकडे जातीनं लक्ष दिलं. त्यांची प्रत्येक मागणी मी पूर्ण करीत राहिले. हे सगळं मी एकटीच्या जीवावर करत होते. शेखरच्या वडिलार्जित इस्टेटीतला एक तुकडा आपल्या हाती लागेल तेव्हा लागेल, आपलं स्वत:च एक घर असावं म्हणून छोटंसं कां होईना, घर बांधून घेतले. त्याचे हप्ते भरतेच आहे. मुलीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी पेलली. दोन महिने लेकीला हवं नको ते पाहिलं. नोकरी सांभाळत हे सगळं करत होते, मला कधी त्याचा त्रास वाटला नाही.” ती बोलतच राहिली.
— क्रमशः भाग पहिला.
© श्री व्यंकटेश देवनपल्ली.
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈