डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ फुंकर… भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(जाई सासरी रमून गेली आणि अरुण माईंचं तर पान हलेना जाई शिवाय. ) इथून पुढे —
अरुण पुढची परीक्षा पास झाला आणि त्याला घसघशीत पगारवाढ मिळाली. माईंच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं. ‘ जाई, हे श्रेय तुला जाते ग बाई ! तू किती समजूतदारपणे बदल घडवलास अरुणमध्ये ग ! मी खूप प्रयत्न केले ग पण माझं काही चालेना बघ आबांसमोर ! सतत त्याचा पाणउताराच केला नंदिनी आणि त्यांनी ‘.
‘जाऊ दे हो माई, आता झालंय ना सगळं चांगलं? गुणी आहे हो अरुण ! मला हे आलं होतं लक्षात पहिल्यांदाच.म्हटलं मी एक शिक्षक आहे ना, तर हा विद्यार्थी बघू सुधारतो का ! त्याच्या आत्मविश्वासावर बसलेल्या राखेवर मी फुंकर घालायचं काम केलं इतकंच हो !’ माईंचे डोळे भरून आले. गुणांची पोर ग बाई माझी म्हणून डोळे पुसले त्यांनी.
पुढच्या वर्षी नंदिनी भारतात आली. अरूणच्या लग्नाला ती येऊ शकली नव्हती. यावेळी नंदिनी एकटीच आली होती. तिच्या नवऱ्याला रजा नव्हती इतकी ! आल्याआल्या नंदिनीने घरात झालेले बदल एका क्षणात ओळखले.
“आबा माई, काय म्हणतात नवीन सूनबाई? “ नंदिनी म्हणाली.
“ तूच आता प्रत्यक्ष बघ ना “
जाई सकाळी नाश्ता घेऊन नंदिनीच्या खोलीत गेली. नंदिनीताई, इथेच घेता का येता डायनिंग टेबलावर?सगळे वाट बघत आहेत तुमची ! जाई हसतमुखाने म्हणाली. नंदिनी बाहेर आली.आबा माई अरुण तिची वाट बघत होते. “ ये ग नंदिनी ! तुला आवडतात तसे दडपे पोहे केलेत जाई ने !” अरुण म्हणाला. नंदिनीने बघितलं, केवढा बदलला होता अरुण. आनंदी, अभिमानाने उंच झालेली मान आणि पूर्वीचा चाचरत, डोळ्याला डोळा न देता बोलणारा अरुण जणू गायबच झाला होता. नंदिनीला समजले या घरातले पूर्वीचे स्थान डळमळीत झाले आपले. जाईला पाहून ती म्हणाली, “ जाई, छान हुशार आहेस ग तू. आमच्या अरुणला कसं काय पसंत केलंस? “ जाई हसून म्हणाली,” का हो ताई? किती चांगला आहे तुमचा भाऊ ! आता सगळेच कसे डॉक्टर आणि वकील आणि मोठ्या पोस्टवर असणार? आमच्यासारख्या शिक्षकांचीही गरज आहेच की समाजाला, आणि अरुणसारख्या लोकांची फॅक्टऱ्याना ! त्याशिवाय यंत्र आणि माणसांचं कसं चालेल? “ अरुण कौतुकाने जाईकडे बघत होता. असा त्याचा ‘स्व’ कोणीच नव्हता जपला. . त्याची अशी बाजूही नव्हती कोणी घेतली इतकी वर्षं. आणि हसत हसत नंदिनीसमोर धीटपणे बोलायची हिम्मतही नव्हती कोणी दाखवली आजपर्यंत !
चार दिवसात नंदिनीच्या लक्षात आले, आबा माई सगळे जाई जाई करत असतात. त्या दिवशी जाई शाळेत गेली तेव्हा नंदिनी आणि माई बाल्कनीत चहा पीत गप्पा मारत होत्या. नंदिनी म्हणाली, “ माई, जाईने चांगलीच छाप पाडलीय ग तुमच्यावर ! आबा सुद्धा जाई जाई करत असतात.”
“ नंदिनी हो ग. फार गुणी आणि कर्तृत्वाची आहेच बघ जाई ! अरुणची काळजी होती ग बाई मला फार. कसा हा मुलगा, वडील सतत हेटाळणी करत असायचे आणि मी तरी किती संभाळून घेऊ? माझी फार ओढाताण व्हायची ग ! पण बघ ना, जाईला पसंत करताना आम्हाला माहीत होतं, ही गरीब घरातून आलीय. तिला ऍडजस्टमेंटची सवय असणार. ती आणि अरुण लग्नाआधी चारवेळा भेटले होते त्यामुळे अरुण कसा आहे ते तिला समजले होतेच. आमचा निर्णय योग्य ठरला अगदी. बघ ना,आता लग्नाला तीन वर्षे झाली की. किती बदल घडून आला घरात. अरुण इतका सुखी आणि आत्मविश्वासाने वावरलेला मी कधीही बघितला नव्हता.”
“ हो माई, छानच आहे ग जाई. आवडली मला.”
नंदिनीचे परत जायचे दिवस जवळ आले. अरुण नंदिनीला म्हणाला, “उद्या दुपारी आपण बाहेर जेवायला जाऊया .आमच्याकडून तुला ट्रीट.! “ हा अरुण कोणी वेगळाच होता. एका छानशा हॉटेलमध्ये अरुणने सगळ्यांना जेवायला नेलं. कॉन्फिडन्सने ऑर्डर देणारा, विनोद करणारा अरुण बघून नंदिनीला खूप आनंद झाला.
कौतुकाने नंदिनी म्हणाली. “ किती छान वाटतंय रे अरुण, तुला असं आनंदात बघून. जाई, हे सगळं श्रेय मी तुला देईन. माझ्या भावात आमूलाग्र बदल घडवून आणायचं !. किती छान फुलवलंस ग तू त्याला. हे खरं तर मी करायला हवं होतं. पण मी माझ्या यशाच्या धुंदीत असायची आणि अरुण कोमेजतच गेला. माझी चूक झाली. आणि मीही लहानच होते ग जाई त्यावेळी. माझ्या हे लक्षातच आलं नाही कधी. आबा,तुमचीही खूप चूक होती तेव्हा. किती उपमर्द करत होतात या बिचाऱ्याचा तेव्हा तुम्ही ! एकटी माई तेवढी उभी असायची अरुणसाठी .अरुण, मला माफ कर हं.” नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं. आबाही म्हणाले “अरुण, माझं चुकलं. दोन मुलात इतका जमीनअस्मानाचा असलेला फरक मला सहनच व्हायचा नाही रे. मला तुझं अपयश हा माझा पराभव वाटायचा. मी तुला समजू शकलो नाही. माई,अरुण मला माफ करा रे तुम्ही !”
जाई म्हणाली, “ काय चाललंय हे ! अरुण हे केव्हाच विसरून गेलाय. हो ना अरुण? ही सगळी तुम्ही आपली, आमची माणसं आहात. आमचं तुम्ही कायम भलंच चिंतणार. होतात चुका हो आपल्या हातून. आमचंही चुकत असणार. अरुणही चुकला असेल त्यावेळी !” अरुण हसला आणि म्हणाला,” हो !वाईटच होते ते दिवस. पण तेव्हा मला जाईसारखी मैत्रीण मिळाली असती तर मी असा डिप्रेशन मध्ये नसतो गेलो. माझंही खूप चुकलं. आता वाटतं, आबांच्या वरच्या रागामुळं मी मुद्दाम पुढं शिकलो नाही. किती चुकलं माझं. पण जाई माझ्या आयुष्यात आली आणि तिने माझ्या स्वाभिमानावरची धूळ झटकली. माझ्यातला स्फुल्लिंग जागा केला आणि मी माझ्या नोकरीत किती तरी वर जाऊ शकलो. थँक्स जाई. पण एक सांगतो, मी चांगला पिता होईन आणि माझ्या मुलावर कधीही अन्याय होऊ देणार नाही, की त्याची हेटाळणी करणार नाही.”
माई हसून म्हणाल्या, “ हो का? जाई, पिता होण्याची तयारी झालेली आम्हाला नाही का सांगायची?”
जाई लाजून लाल झाली आणि म्हणाली,” माई अरुण तरी ना !अहो, कालच तर आला रिपोर्ट माझा पॉझिटिव्ह.” माईंनी उठून जाईला मिठीच मारली आणि ते कुटुंब आनंदात बुडून गेलं.
… हे सगळं आत्ता माईंना आठवत होतं.
आबा कालवश झाले आणि नंदिनी महिनाभर राहून कालच अमेरिकेला गेली. माई एकट्या बाल्कनीत बसून हा भूतकाळ आठवत होत्या. आबांच्या आठवणीनं पाणी येत होतं त्यांच्या डोळ्यात ! शेवटी शेवटी किती बदलले आबा. छोट्या अद्वैतचा जन्म झाल्यावर तर ते पूर्ण बदलून गेले. आबा असे मृदू, प्रेमळ आजोबा असतील हे माईंना स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. आबांच्या आठवणींनी डोळे भरून आले
त्यांचे ! अद्वैत माईंना शोधत बाल्कनीत आला, आणि म्हणाला, “ रडू नको ना माईआजी ! आपले आबा देवबाप्पाकडे गेले ना? तू रडलीस तर त्यांना वाईट वाटेल.” आपल्या छोट्याशा हातानी अद्वैतने त्यांचे डोळे पुसले आणि तो त्यांना घरात घेऊन गेला.
— समाप्त —
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈