सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ परिवर्तन – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
‘वाढदिवसाच्या शुभेच्छा !’
‘आज भलताच गोड दियातोयस. काही खास…’
’आज मौज-मस्ती करण्याचा दिवस आहे ना!’
‘खायचं… प्यायचं… आणि दिवसभर भटकायचं’
‘भाड्याची गाडी घेऊन ड्रायव्हिंगचा आनंद लुटायचा. ‘
आज साशाचा तिसावा जन्मदिवस. केस नीट-नेटके करत आणि आरशाशी बोलत तो हसतो. स्वत:शी गप्पा मारायला त्याला आवडतं. आज तर खास दिवसाची खास सकाळ आहे. मस्तपैकी तयार होऊन स्वत:ला वाढदिवसाची भेट देण्यासाठी बाहेर जायचय. रजा आधीच घेऊन झालीय. शहरातल्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये सकाळचा नाश्ता, त्यानंतर दुपारचं जेवण त्याहून खास अशा चांगल्या जागी. भूकदेखील इतर दिवसांच्या मानाने तीव्रतर झालीय. खास रेस्टॉरंटमधील खास पदार्थांचा दरवळ आत्तापासून नाकपुड्यातून वहात पोटापर्यंत जाण्यासाठी उतावीळ झालाय.
डॉ. हंसा दीप
आपल्या संथ गतीने आरामात कपडे बदलून बूट घालण्यासाठी तो बाहेर आला. घाईघाईत जवळच्याच स्टुलाला धडकला आणि स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्नात जी उडी मारली, ते तो भिंतीवर जाऊन आपटला. शरिराचं सारं वजन हातांनी पेललं. इतकी वेदना झाली, की काही काळ डोळे रहाटगाडग्याप्रमाणे गरगरले. त्याने या छोट्याशा दुर्घटनेकडे फारसे लक्ष दिले नाही. आता उत्तम पॉलीश केलेले बूट घालण्यासाठी तो सेल्फमध्ये मोजे शोधू लागला.
अर्ध्या बाहीचा आपल्या आवडीचा टी – शर्ट घालून बुटाची लेस बांधताना जाणवलं, त्याचा हात जरासा आखडलाय. हात कुरवाळत, चोळत त्याने कोपरापर्यंत पाहिले. तिथे हिरवे-निळे डाग उमटले होते. त्या डागांजवळ चांगली जखम झाली होती. त्याच्याजवळच्या कातडीवर रक्ताचे लहान लहान थेंब चमकत होते. बाहेर येण्यासाठी उसळ्या मारत होते. हा डाग किवा हे आलेलं रक्त साधंसं रक्त नव्हतं. त्याचा सगळा इतिहास त्यात सामावलेला होता. एक दोन पाने नव्हेत. सगळंच्या सगळं पुस्तक होतं. इतिहासाचं हे पुस्तक असं होतं , की जे उघडायचं, तेव्हा त्याचं मन आणि मस्तक पूर्णपणे विषासक्त करूनच बंद व्हायचं. हेदेखील आज व्हायला हवं होतं? आज तो खूप खूश होता. आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी छानपैकी सजून – धजून तयार झाला होता. जखम झाली, त्याठिकाणी त्याची नजर गेली, तेव्हा एक क्षणही लागला नाही, त्याला, ती — त्यावेळची—- दृश्ये डोळ्यापुढे यायला, ज्यावेळी, तो भिंतीवर आपटावा, म्हणून त्याला धक्का मारला जात होता. अशाच प्रकारच्या काळ्या-निळ्या खुणा त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी उमटत होत्या. या खुणा नष्ट होण्यासाठी जितका वेळ लागायचा, त्यापेक्षा किती तरी जास्त वेळ त्याच्या मनाती भयाची भावना नष्ट व्हायला लागायचा. जेव्हा असे डाग डोळ्यासमोर यायचे, तेव्हा तेव्हा, तो त्या ठिकाणी पोचायचा, जिथे त्याला कधीच जायची इच्छा नसे.
एकदा त्याच्या हातून दुधाचा कप पडला, दूध सांडलं आणि ते टेबलाच्या कडेने वहात, जवळच बसलेल्या त्याच्या वडलांची पॅंट आणि कोट ओला करून गेलं. त्यावेळी त्याने जशी काही सिंहगर्जना ऐकली. त्याला एक जोरदार थप्पड मारली गेली. तो भेलकांडला. खुर्चीवरून खाली पडून भिंतीला टक्करला. डोकं, हात, पाय, नाक सगळ्याला जखम झाली. त्यावर हिरवे-निळे डाग उभारले. नाकातून रक्त वाहू लागलं. टप- टप दुधात रक्ताचा लालिमा मिसळला आणि एक नवाच मातकट रंग तयार झाला. त्या निरागस मुलाचं मन मळून गेलं. त्यानंतर जेव्हा जेव्हा दुधाचा कप हातात येई, तेव्हा तेव्हा त्याचे हात कापू लागत. डोळे घट्ट मिटून तो दूध गटकत जाई आणि कप खाली ठेवूनच श्वास घेई.
हानपणापासूनच तो भयाच्या अंधार्या विहिरीत ढकलला गेला होता. बाहेरचे जग समजून घेण्यासाठी जेव्हा त्याला बाहेर काढलं गेलं, तोपर्यंत त्या विहिरीचं साठलेलं, दुर्गंधयुक्त पाणी त्याच्या रक्तात मिसळलं होतं. शरीरात पसरलेली ही घृणेची दुर्गंधी, जेव्हा तेव्हा बाहेर येऊन, त्याला श्वास घेणं अवघड करायची. त्याला अशा तर्हेने विचलित करायची, की तो गुदमरून जायचा. हे ते जग होतं, जिथे त्याने हिंसेशिवाय दुसरं काहीच बघितलं नव्हतं. जनावरांनी केलेली हिंसा, त्यांच्या पोट भरण्याशी संबंधित असते. पण माणसाने केलेल्या हिंसेची भूक अनेक प्रकारची असते. कधी ती त्याच्या अहंकाराशी जोडलेली असते, कधी त्याच्या नशेशी, कधी त्याच्या चीड-त्राग्याशी जोडलेली असते, कधी त्याच्या अपयशाशी. अशा तर्हेची दानवीयता, मानवतेला गिळून, चांगल्या माणसाला राक्षस बनवते आणि हिंस्त्र श्वापदाप्रमाणे जीवन जगायला भाग पाडते.
हेच सगळं त्याने पाहिलं होतं. शिकवलं होतं किंवा असं म्हणा, त्याला दाखवलं गेलं होतं. तो जे काही लहानपणापासून शिकला होता, ते त्याने साठवून ठेवलं होतं आणि तेच मनातल्या मनात शिंपडत होता. आपल्या तिरस्काराच्या पेरलेल्या बियाणाला तो पाणी देत राहिला. ते अंकुरित झाले. फुलले, फळले. आतल्या क्रोधाला, वैरात रूपांतरीत करत, त्याच्या तळतळाटाची वाढ करत राहिले. हे त्याचा आतील युद्धं होतं. ते जिंकण्याचा तो किती तरी वर्षे प्रयत्न करत होता, पण जिंकू शकत नव्हता. जेव्हा त्याला मार दिला जायचा, तेव्हा त्याला वाचवणारं कोणीच नसे. आसपास कोणी नसेच, तर येणार तरी कोण? शेजारी दूर होते. त्याच्या हळू आवाजातलं ओरडणं, किंचळणं त्यांच्यापर्यंत पोचतच नसे. त्याच्याजवळ होती फक्त भीती.
एक दिवस खेळता खेळता, त्याने बॉलला मारलेली कीक वर टांगलेल्या काचेच्या झुंबरावर जाऊन आदळली. झुंबर महागडं होतंच. शिवाय त्याच्या दिवाणखानाभर विखुरलेल्या काचा गोळा करायचं काम… त्याच्या वडलांचा संताप आटोक्याबाहेर गेला. त्या दिवशी रागावलेल्या वडलांनी त्याला असं काही मारलं की त्याचे दातच तुटले. तोडातून वहाणारं रक्त, त्याच्या डोळ्यात उतरलं होतं. सुडाचं एक बीज त्याच्या मनात अंकुरू लगलं. तो काही सांगू शकत नव्हता, पण आपली वेदना एकत्र करू लागला होता. घाव, जखमा, वेदना आणि भीती यांचा एकत्रित प्रभाव त्याला माणसांपासून तोडत राहिला.
पुढल्या वेळी त्याच्या शरीरावर चामड्याच्या पट्ट्याची अशी बरसात झाली, ज्याची वेदना तो अद्यापही विसरू शकला नाही. त्यावेळी त्याने आपल्या वडलांना एका बाईबरोबर पाहिल्यावर तोंड विचकले होते. वडलांचा संताप, पट्ट्याबरोबर साशाच्या शरिरावर उतरत होता. इतकं मोठं झाल्यावरही, कधी कधी झोपेत ते दु:स्वप्न त्याचा पाठलाग करायचं. दचकून घामाने थबथबत तो झोपेतून जागा व्हायचा. अर्ध्या रात्री, ते दृश्य झोपेतून त्याला उठवून आपल्या बाहुंचा विळखा घालायचा आणि तो त्यात धसत जायचा.
काळानुसार हे घाव भरण्याच्याऐवजी ते अधिकाधिक खोल जात आहेत. छोट्या- मोठ्या घावांचा त्याने हिशेबच ठेवला नाही. मोजण्यासाठी अनेकदा त्याला ती दृश्ये डोळ्यापुढे आणावी लागत. अनेकदा त्याने ती पीडा अनुभवली होती, कारण ती दृश्ये, ती वेदना तो विसरूच शकत नव्हता.
जेव्हा रोजच्या ओरडण्या-किंचाळण्याचा आवाज वाढत गेला, आवाज मोठा होऊ लागला, तेव्हा शेजारी-पाजारी त्रासले. मुलाची स्थिती लक्षात आली, तशी माणुसकी पाझरली. कुणी तरी पोलिसांना माहिती दिली. पोलीस, कोर्ट वगैरे सोपस्कार होऊन त्याला दत्तक आई-वडलांकडे सोपवण्यात आलं. ज्यांना स्वत:चे मूल नव्हते, असे पालक, अशा निरागस मुलांना, अन्न, वस्त्र, निवारा देण्यासाठी स्वेच्छेने तयार असत.
साशा नवीन घरात गेला, पण इथेही त्याची भीती कमी झाली नाही. नवी आई जोएना आणि नवीन डॅडी कीथ प्रयत्न करत राहिले, ‘साशा, घाबरू नको. आता हेच तुझे घर आहे. इथे तुला जे हवं असेल, ते तू करू शकतोस. बोल तुला काय पसंत आहे? चल. फिरायला जाऊ. तुझ्यासाठी खूप खेळणी घेऊन येऊ.’
तो मान खाली घालून ऐकत राहयचा. त्याला भयमुक्त करण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच असायचे. कित्येक दिवस तो काही बोललाच नाही. नंतर बोलायला लागला, तोही घाबरतच. त्याला वाटायचं, हे प्रेम नकली आहे. थोडीशी जरी चूक झाली, तरी त्याला पुन्हा शिक्षा होईल. गप्प बसणंच योग्य. जे जसं असेल, तसं तो स्वीकारायचा. खायला सांगितलं, खायचा. झोपायला सांगितलं, बिछान्याकडे जायचा. मग झोप येवो, अथवा न येवो. जे सांगितलं जाई, ती काळ्या दगडावरची रेघ समजून तो तसं वागायचा. कुणालाही एवढीही तक्रार करायला जागा मिळू नये, असं तो वागायचा. नाही तर पुन्हा कुणाचे तरी हात त्याला मारायला उठतील, असं त्याला वाटायचं.
शाळेत जाताना अनेक मुले रस्त्यावरून आईचा हात धरून जाताना त्याला दिसायची. पण त्याला काही फरक पडत नसे. तो आई या शब्दाशी परिचित होता. आईच्या नात्याशी नाही. आईच्या आकार- प्रकाराशी परिचित होता. आईच्या ममतेशी नाही. आपल्यावर थोपलेल्या घरात तो कैद होता. आपल्या घरातून तो मुक्त झाला, तरी जोएनाला आईच्या रूपात बघण्याचा त्याने कधी प्रयत्नच केला नाही.
एका आज्ञाधारक मुलाप्रमाणे शालीन बनून त्याने हे दिवस काढले. एका मेहनती व्यक्तीप्रमाणे तो आपले जीवन जगत होता. मात्र एक विचार सतत त्याच्या मनात यायचा, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घेतला पाहिजे. ‘मीच का?’, ‘माझ्याच बाबतीत असं का व्हावं?’ हेच प्रश्न त्याच्या मनात वारंवार यायचे. त्याला टोचत रहायचे. या जखमातून अजूनही पू वाहत होता. त्यावर मलमपट्टी करण्याची वेळ आली होती. स्वत:ला न्याय मिळवून घेऊ इच्छित होता तो. आपल्या मनातील या टोचणीपासून त्याला मुक्ती हवी होती, पण कशी? त्याला कळत नव्हतं.
बालपणीच्या सहनशीलतेची त्याला आता किंमत वसूल करायची होती. आताही प्रतिकार केला नाही, तर जगातले सगळे लोक आपल्या हिंसक स्वभावाने प्रत्येक मुलाला आपली शिकार बनवतील, असं त्याला वाटायचं. कधी कधी त्याला वाटायचं, हे सगळे लोक मुंग्यांसारखे आहेत. त्यांना हातात घेऊन चुरगळून टाकावं. गाडीच्या चाकाखाली तुडवून टाकावं. आपल्या जंगली जिद्दीसाठी ते जशी मुलांना आपली शिकार बनवतात, तशी त्यांची शिकार करावी.
क्रमश: भाग १
मूळ हिंदी कथा 👉 ‘शत प्रतिशत’– मूळ लेखक – डॉ हंसा दीप
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈