सौ. दीपा नारायण पुजारी 

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले (भाग चार) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

संध्याकाळचा चहा करायच्या निमित्ताने मी ओट्याकडे गेले. बकूमावशींचा कप खिडकीत ठेवला. हळूच हात जोडून विनवणी केली,’घरचे वेड्यात काढतील हो मला. फार काही गोंधळ घालू नका. झाडावरच बसा गुपचूप .” त्या थोड्याशा हसल्या की काय कोणजाणे?

काही वेळाने ‘अग्गोबाई सासूबाई बघत गवार निवडत बसले होते . “अगं काय फास्टात काम चाललयं. बाकी सिरिअल्सच come back झाल्याची खुशी वाटतं?” मी दचकून खाली बघीतलं. गवार almost निवडून झाली होती .मी कावरीबावरी होऊन इकडंतिकडं  बघायला लागले . हाहाहा s वासू जोरजोरात हसू लागला . त्यात एक बायकी हसणंही ऐकू येत होत.???

रात्रीची आवराआवर झाल्यावर मावशींची चाहूल घेत होते. चांगलं ठणकवायचं यांना.गुपचूप रहा .मदतबिदत काही नक्कोच! देवघरातून रामरक्षा म्हंटल्याचा आवाज आला . बकूबाई? देवा!देवा!!

बैस,बैस इथं हातानंच खूण करून जवळच्या पाटावर त्यांनी मला बसायला सांगितलं .” मी चालले बर का सुधा आता.वेटिंग लिस्ट संपली बरं. कोरोना आवाक्यात येतोय हो. आज कोरोनामुळे झालेले डेथ्स् कमी होते.उद्या सकाळी आठ वाजता माझ्या नंबर हो. त्या मेल्या यम्यानं मेसेज केलाय बघ  WhatsApp वर.”

मला कसंतरीच वाटलं एकाएकी. गळा भरून आला.बकूमावशींच्या मांडीवर डोकं ठेवलं. त्या हलकेच थोपटत राहिल्या. झोप कधी लागली कळलेच नाही . सकाळी उठले तर मावशी दिसल्या नाहीत. चटचट आवरून कपाटातून घडी न मोडलेली छानशी लेमन  यलो साडी काढली. चाफ्याची वेणी केली. हो, एक मास्क सुध्दा आठवणीने ठेवला. चाफ्याच्या झाडापाशी  जाऊन बकूमावशींची ओटी भरली. वाकून नमस्कार केला. त्या प्रसन्न हसल्या. पिवळी साडी लपेटलेल्या,आंबाड्याभोवती चाफ्याची वेणी घातलेल्या बकूमावशी हात हलवत आकाशाकडं  मार्गस्थ होताना दिसत होत्या.

त्या दिसेनाशा होईपर्यंत मी ही हात हलवत होते .. . . . . कोण बरं ? . . वासू , आबा . . . दोघंही  हाका मारतायत? काय झालं  बाई?

“अगं अशी देवघरातच का झोपलीस ? काय  झालं सुधा ?” दोघंही  माझ्या कडं वाकून बघत होती. मी दचकून उठले खरी परंतु माझा हसरा, प्रफुल्लित चेहरा बघून दोघही अचंबित झाले .गालात हसत हलकेच मानेला झटका देऊन मी दैनंदिन कामाला लागले.

 समाप्त

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं:    ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments