श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ त्या दोघी… – भाग-४ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – एवढ्यात बाहेर गेलेला अभय आला. त्या दोघीना बघून खुश झाला. सुलभा किती वर्षांनी अभयला पाहत होती. मागे कधी यायची तेव्हा तो क्लबमध्ये गेलेला असायचा.) ‘‘खूप धक्का बसला ना तुला? आठ दिवस बेशुध्द होतीस अस समजलं’’ अभय म्हणाला. ‘‘धक्का बसणारचं, आमची मैत्री होती तशीच ! कोल्हापूरात असताना सतत दोघी बरोबर असायचो. वर्गात शिक्षक ‘‘त्या दोघी’’ कुठे गेल्या असे विचारायचे.’
‘‘खरंच अशी मैत्री विरळाच आजकाल’’ अभय म्हणाला.
‘‘स्मितू गेली म्हणजे माझ्या शरीराचा अर्धा भाग लुळा पडला असच मला वाटतं. त्या शेवटच्या दिवशी ती माझ्याकडे आली होती. मला कल्पना न देता. तणावाखाली होती. खूप दिवसांनी मी तिच्या केसांना तेल लावलं. केस विंचरुन दिले. मग तिने गरम पाण्याची आंघोळ केली. आम्ही जेवलो आणि मी तिला थोपटून थोपटून झोपवलं. कोल्हापूरात असताना झोपवायची तशी. सुलभा जुन्या आठवणीत रमली.
‘‘तिच्या सर्व विमा पॉलिसीज, म्युच्युअल फंड, शेअर्स ही सर्व गुंतवणूक किती आहे ? तसेच नॉमिनीवगैरे बरोबर आहे ना याची तिने खात्री करुन घेतली. तिच्या पॉलिसीज बघून मी तिला म्हटलं – अग हे पैसे तुला नाही, तुझ्या वारसांना मिळणार। मला काय कल्पना त्या पॉलिसीज एवढ्यात ड्यू होतील. अभय, तेजू स्मितू गेली पण तुम्हाला कोट्याधिश बनवून गेली. या तुमच्या पॉलिसीज, फंड डिटेल्स, शेअर्स तुमच्या ताब्यात घ्या आणि मला मोकळं करा. एवढ्यासाठीच मी आले होते.
तेजश्री – मावशी खरं आम्हाला नको हे पैसे, आईच्या बँकेतून मिळणारा फंड खूप झाला आमच्यासाठी, आम्ही पैसे मिळवू. एवढे दिवस ऐतखाऊ सारखं जगलो आता स्वाभिमानाने जगू.’
अभय – जो पर्यंत ती व्यक्ती आजूबाजूला असते, तो पर्यंत तिची किंमत नसते. स्मिता गेली तेव्हा लक्षात आलं, आम्ही खर्या अर्थाने अनाथ झालो. आम्ही तिला गृहित धरले. ती नोकरी करणार, घरातले सामान आणणार, जेवण बनवणार, कपडे ईस्त्रीला पाठवणार, गुंतवणूक करणार. सुलभा हे सर्व आम्हाला नकोच. स्मिता म्हणत होती कोल्हापूरातल्या शाळेची इमारत पडायला आलीय. त्यासाठी पैसे जमवणं सुरु आहे. हे पैसे त्यासाठी वापरुया.
सुलभा – कोल्हापूरच्या शाळेसाठी पैसे जमवणे सुरु आहे हे खरे, पण ती जबाबदारी दोन हजार माजी विद्यार्थ्यांनी घेतलीय. त्यात पाहिजे तर या पैशातील पाच लाख देऊया. पण बाकी पैसे तुम्हाला घ्यावेच लागतील. कारण तिची तशी इच्छा होती.
तेजश्री – मावशी आई गेल्यानंतर मामा-मामी आले होते. खूप रडला गं श्यामू मामा. त्याची लाडकी ताई ना गं ती! मावशी, मामाचे कोल्हापूरातील घर तीन-चार पिढ्यांचे जुने. मी मागे पाहिले तेव्हा फार जीर्ण झाले होते. आईची इच्छा होती मामाला घर बांधून द्यायचं. त्याची घर बांधण्याची परिस्थिती नाही. मला वाटते की, आईच्याच पैशातून मामाला घर बांधून देऊ. मजबूत, पुढिल तीन पिढ्यांनी काळजी करता कामा नये असे मजबूत.
सुलभा – स्मितू माझ्याशीपण हे बोलली होती. खरंच चांगली कल्पना आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या आईवडिलांना, भावांना मदत करायलाच हवी. तुझ्या श्यामू मामाला गरज आहे. मला वाटतं यातून पन्नास लाख रुपयात ते घर बांधता येईल. आणि वर दोन ब्लॉक्स बांधले तर त्याचे भाडे मामाला मिळेल.
तेजश्री – पण मावशी या सर्व पैशांच्या देवीघेवी तुलाच करायला हव्यात. तुला एकदम यातून मोकळं होता येणार नाही. आम्ही फक्त सह्या करायला येणार.
सुलभा – हो, ग हो. माझं पिल्लू ते! तुला सोडून कशी जाईन मी ?
अभय – सुलभा, तुझ्या मनात एक विचारायचं असेल तेजूचं लग्न ? ते तुला तेजूच सांगेल. तेजश्री – मावशी आईची बँकेत मैत्रीण होती कल्पना, आईची इच्छा होती कल्पनाचा मुलगा विराज याच्याशी माझं लग्न व्हाव, तो चांगला सीए आहे. आणि वडिलांच्या फर्ममध्ये काम करतोय. पण माझ्या डोक्यात खुळ भरलं होतं. मी वेळीच सावरले पण आईच्या अपघाताचे मोल देऊन. विराजशी लग्न ठरते आहे माझे. तेजश्री रडत रडत सांगत होती.
सुलभा – रडू नकोस तेजू, ती असताना हे सर्व झाले असते तर ती समाधानी झाली असती. तिच्या डोक्यातील वादळे कमी झाली असती. पण….
अभय – आणि सुलभा लग्न फक्त वीस पंचवीस जवळच्या लोकांमध्येच आणि ते पण सहा महिन्यानंतर लग्न करायचं आहे. तो पर्यंत आम्हाला पण सावरु दे. आणि कन्यादान तुला आणि राजनला करायचं आहे. नाही म्हणून नकोस. स्मिताला असेल तिथून समाधान वाटेल.
‘‘ठिक आहे’’ सुलभा डोळे पुसत म्हणाली. मी आले होते तुमचे सर्व व्यवहार तुमच्या हाती देऊन त्यातून मोकळी होण्यासाठी पण तुम्ही दोघांनी मला पुन्हा अडकवलंत याच्यात. पण तिच्यासाठी हे मला करावचं लागेल. कारण आमची जोडी होतीच तशी..
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈