श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ आसावरी…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
सकाळीच सुधाकरचा फोन आला होता. सौ. आसावरी वहिनींच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजिलेल्या स्नेह-संमेलनाला आम्हा उभयतांना आग्रहाचं आमंत्रण होतं.
‘आसावरी’ हा शब्द मी पहिल्यांदा एका ज्युकबॉक्स सेंटरमध्ये ऐकला होता. लक्ष्मी टॉकीजच्या शेजारच्या हॉटेलात नुकताच ज्युकबॉक्स बसवलेला होता. पंचवीस पैश्यात मनपसंत गाणं ऐकायला मिळायचं.
सुधाकरची फर्माइश एका गाण्यासाठीच असायची ती म्हणजे, ‘लो आ गयी उनकी याद, वो नही आए.’ लताजींनी गायलेल्या असंख्य सुरेल गाण्यातील दो बदन या चित्रपटातलं हे एक उत्कृष्ट गाणं आहे. आम्ही वैतागून म्हणायचो, “अरे यार, दरवेळी हे दर्दभरं गाणं काय आम्हाला ऐकायला लावतोस? एखादं उडत्या चालीचं गाणं ऐकव ना.” भीमाशंकरने तक्रार केली. मग त्यानं ‘बडी बहेन’ या जुन्या चित्रपटातलं, ‘चले जाना नही नैन मिला के’ या गाण्याची फर्माइश केली.
भीमाशंकरच्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे पाहून गल्ल्यावर बसलेला गृहस्थ बोलला, “साहेब, तुमच्या मित्राने फर्माइश केलेली ही दोन्ही गाणी ‘आसावरी’ रागातील आणि केहरवा तालातील आहेत बरं कां. त्यांची संगीतातली जाण चांगली दिसतेय.”
आम्ही आपलं “हो कां?” म्हणून गप्प बसलो. आमचे कानसेन मित्र सुधाकर मात्र डोळे मिटून ‘आसावरी’ रागाचा आस्वाद घेत होते.
अभ्यासाला, सिनेमाला, फार कशाला संध्याकाळी फिरायला जाताना देखील आम्ही तिघेच असायचो. सुधाकर, मी म्हणजे रत्नाकर आणि भीमाशंकर असं आमचं त्रिकूट होतं. आमच्या त्रिकुटाला बाकीचे मित्र ‘सु-र-भी’ म्हणायचे. त्या गोष्टीला जवळपास पन्नास एक वर्ष झाली असतील.
सुधाकरच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. बाहेर गेलो की चहापाण्याचा, सिनेमाचा खर्च मी किंवा भीमाशंकरच करीत असू. “पचीस पैसे भी बडी चीज होती है बाबू” असं तो म्हणायचा.
आठवड्याच्या मंगळवार बाजारात जाऊन तो पंचवीस पैश्याला एक या भावाने जुनी इंग्रजी मासिके खरेदी करायचा. त्यातून स्वत:ची शब्दसंपदा वाढवत राहायचा अन त्यात वाचलेली छानशी माहिती आम्हाला सांगत राहायचा. रात्री आमच्याबरोबर बसून तो अभ्यास करायचा. आम्ही गाढ झोपेत असताना पहाटे पाच वाजता उठून तो पेपरलाईनवर जायचा. सायकल दामटत दीड दोनशे घरात वृत्तपत्रे टाकून साडेसात वाजता गडी परत यायचा. एक मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्र स्वत:साठी ठेवायचा.
आम्ही चेष्टेत म्हणायचो. “एक तर मराठी पेपर वाच किंवा इंग्रजी तरी वाच. बातम्या त्याच असतात ना? इंग्रजीच्या किचकट बातम्या वाचायला नकोशा वाटतात.”
सुधाकर म्हणायचा, “लेको, आधी मराठी पेपरातल्या बातम्या वाचा. मग इंग्रजी पेपरातल्या बातम्या वाचताना किती सोप्या वाटतात ते बघा. हा मराठी पेपर घरच्यांसाठी आहे.” असं म्हणत त्याने त्याच्या दफ्तरमधून एक लांबडीशी वही काढली आणि म्हणाला, “आता मी डायरेक्ट इंग्रजी पेपर वाचतो. इंग्रजी पेपरातला कुठलाही शब्द अडला की ते संपूर्ण वाक्यच काढून या वहीत लिहायला लागलो. त्यातल्या अवघड शब्दाला अधोरेखित करून त्याचा नेमका अर्थ डिक्शनरीत पाहून बाजूला मराठीत लिहित राहिलो.
किती मोठा संपादक असला म्हणून काय झालं, तो आपल्या सात आठशे शब्दांच्या वर्तुळातच फिरत असतो. महिन्यानंतर लक्षात आलं की संपादकांचा नवीन शब्दांचा ओघ संपलेला आहे. मग इंग्रजी पेपर सुगम मराठीसारखा होऊन गेला. आहे काय, नाही काय?” सुधाकर आम्हा दोघांच्यासाठी इंग्रजीचा ‘सुधारक’ ठरला हे आम्हा दोघांना मान्य करावंच लागेल.
इंटरसायन्स नंतर इंजिनियरिंगसाठी म्हणून मी सांगलीला गेलो आणि भीमाशंकर मेडिकलसाठी हुबळीला गेला. आमच्या आग्रहाखातर सायन्सला अॅडमिशन घेतलेल्या सुधाकरला सायन्सचा खर्च झेपणे अवघड चालले होते. इंटरसायन्सला असतानाच तो नोकरी शोधत राहिला. लेखी परीक्षा व इंटरव्यू या दिव्यातून पार पडल्यानंतर एका प्रायव्हेट कंपनीत क्लार्क म्हणून रूजू झाला. कॉमर्सला अॅडमिशन घेतल्याने त्याला पेपरलाईन सोडावी लागली. सकाळी कॉलेजच्या पहिल्या तीन तासांना हजेरी लावून तो कंपनीचं ऑफिस गाठायचा.
जात्याच हुशार असल्याने सुधाकर प्रथम श्रेणी मिळवून बी. कॉम झाला. कंपनीच्या अकाउंट्स खात्यात त्याला प्रमोशनही मिळालं. दोनशे सत्तर रूपयावरून त्याचा पगार चारशेपर्यंत वाढला.
सुट्ट्या पडल्या अन गावात आलो की सुधाकरबरोबर आमचे नेहमीप्रमाणे फिरणे असायचे. आता मात्र सुधाकर आम्हाला खिशात हात घालू द्यायचा नाही.
सुधाकरच्या घरच्यांनी वधू संशोधन सुरू केलं. कमी शिकलेल्या मुली सांगून येत होत्या. मुलगी किमान मॅट्रिक पास झालेली तरी हवी ही सुधाकरची अपेक्षा चुकीची नव्हती.
त्याच दरम्यान आसावरी वहिनींचं स्थळ सांगून आलं. त्या चक्क पदवीधर होत्या. चहा पोह्यांच्या सर्व सोपस्कारानंतर त्यांच्याकडून होकार आला. अंतिम निर्णय घ्यायच्या अगोदर सुधाकरला परत एकदा नियोजित वधूशी बोलायचं होतं. मध्यस्थांकरवी कळवून मी आणि सुधाकर त्यांच्या घरी गेलो.
आसावरी वहिनी आमच्या समोरच बसल्या होत्या. काही वेळ असाच गेला. मग सुधाकरनं हळूच विचारलं, “कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम् । बांधवाः कुलमिच्छंति मिष्टान्नमितरे जनाः ॥” हा श्लोक ऐकला आहे काय?”
वहिनींनी माहीत नसल्याचं सांगितलं.
शाळेत असताना सुधाकर संस्कृत टॉपरच होता. त्याने अर्थ सांगितला – कन्येला वराचे रूप पाहिजे असते, मातेला धन व पित्याला त्याची विद्या हवी असते; बांधव कुल पाहतात. इतर लोकांना मात्र नुसते मिष्टान्न पाहिजे असते. बरं, मी तसा काही रूपवान नाही. धन म्हणाल तर स्वत:चं घरही नाही आणि प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. विद्या म्हणाल तर बी. कॉमच झालोय.” त्या काही बोलल्या नाहीत.
– क्रमशः भाग पहिला
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈