सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ नंदू आणि आनंद (अनुवादीत कथा) – भाग २ (भावानुवाद) – डॉ सुधा ओम ढींगरा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
डॉ सुधा ओम ढींगरा
3 जीवनरंग —
“ नंदू आणि आनंद….. “ ( अनुवादित कथा )– भाग दुसरा
हिंदी कथालेखिका : सुधा धिंगरा.
मराठी अनुवाद : उज्ज्वला केळकर
नंदू आणि आनंद ( अनुवादीत कथा) – क्रमश: भाग २
(मागील भागात आपण पहिले – वयाची दहा वर्षे होईपर्यंत त्याने आपल्या मम्मीचं अतिशय सुंदर रूप पाहिलं होतं. नंतर त्याने जे पाहिलं, त्यामुळे तो घाबरूनच गेला. आता इथून पुढे)
दहा वर्षापर्यंत तो एकत्र कुटुंबात वाढला. मोठा झाला. आजोबा- आजी, काका-काकी, आत्या सगळी घरात होती. तो तेव्हा सगळ्यांचा नंदी होता. सगळ्यांच्या कडे-ख्ंद्यावर चढून उड्या मारत, त्याचं बालपण सरलं. आजी-आजोबांच्या प्रेमाने भरलेल्या, खेळकर जीवनातील पहिली दहा वर्षे, विसरायची म्हंटली, तरी तो विसरू शकणार नाही.
त्याने घरात फक्त प्रेम आणि आपलेपणा, जिव्हाळाच पाहिला. नोकरांबरोबर देखील इथे मित्रांसारखीच वागणूक असायची. सागळा परिवारच गोड आणि प्रेमाने बोलणारा होता. तिरस्कार काय असतो, ते त्याला मुळीच माहीत नव्हतं, पण या परिवाराला कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक?
आत्याचं लग्न झालं आणि लग्नानंतर सगळंच बदललं. आत्याचं लग्न झाल्यावर आजोबांनी आपली सारी संपत्ती तीन हिश्श्यात वाटली. दुर्दैवाने त्याच्या पप्पांची बदली त्याच वेळी दिल्लीला झाली. दुर्दैव अशासाठी की दिल्लीला आल्यावर घरातलं सुख, चैन संपलं.
दिल्लीतल्या आपल्या नवीन घरात प्रवेश करताच, जीवनातला एक दु:खद अध्याय सुरू झाला. दिल्लीत त्याचं आजोळ होतं. त्याच्या आजोळच्या लोकांचा विचार त्याच्या गावाकडच्या लोकांपेक्षा वेगळा होता. ही गोष्ट त्याला लहानपणापासूनच कळलेली होती. एका दिलाने रहाणारे, पशू-पक्षी, निसर्ग, कुणालाच न दुखवणारे असे गावाकडचे लोक होते. आजोळचे लोक सामंती विचाराचे, समोरच्यांना भिववून, दाबून वरचष्मा दाखवणारे होते.
दिल्लीत नव्या घराची वास्तुशांत होते न होते, तोवरच मम्मीच्या मम्मीने, पप्पांकडे बघत कर्कश्य आवाजात म्हंटलं, ‘ सुगंधा तुझ्या सासर्याने तुमच्यावर खूप अन्याय केलाय. दहा वर्षे नवनीतची कमाई त्यांनी घेतली. तू जीव तोडून त्या सगळ्यांची सेवा केलीस आणि आता इस्टेटीची वाटणी करायची वेळ आली, तर सगळ्यांना एका तराजूत तोललय. मुलीचं लग्न इतकं थाटा-माटात, वाजत- गाजत केलं, तर तिला इस्टेटीतला वाटा द्यायची काय गरज होती?’
पप्पांनी त्या कर्कश्य आवाजाला मधुर आवाजात उत्तर दिलं, ‘ मम्मी, केवळ माझीच नाही, तर माझी आत्या, भाऊ, वाहिनी, बहीण सगळ्यांचाच पगार घरात खर्च होत होता आणि लग्नाचं म्हणत असाल, तर आम्हा सगळ्यांचंच लग्न थाटा-माटात, वाजत- गाजत झालं होतं. केवळ काजलच्या लग्नाचाच विचार कशाला करायचा? जितका आमचा हक्क इस्टेटीवर आहे, तेवढाच तिचाही आहे. ’
‘मोठ्या मुलाचा हक्क नेहमीच इतरांपेक्षा जास्त असतो.. ’ आजीने पुन्हा तिखटपणे मम्मीला सांगितलं.
‘आपण आपल्या मोठया मुलाला बाकीच्या दोघांपेक्षा जास्त हक्क द्याल?’ पप्पा पहिल्यांदाच तिखटपणे बोलले होते. भविष्यात कदाचित बोलणं वाढतच जाईल, असं त्यांना वाटू लागलं होतं आणि ते, ते सारं आधीपासूनच थांबवू इच्छित होते.
मम्मीचा मोठ्या आवाजात आक्रोश सुरू झाला. ते पाहून तो आणि त्याचा दोन वर्षाचा धाकटा भाऊ आमोद दोघेही घाबरले. त्यांच्या छातीत धडधड होऊ लागली. कसं दृश्य होतं ते. चारी बाजूंनी मोठमोठे आवाज. त्यांनी इतक्या मोठ्या आवाजातलं बोलणं यापूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. सगळे हळू आवाजात बोलायचे. त्याच्या चेहर्यावर घामाचे थेंब डवरले. मम्मी रडून रडून आजीला संगत होती, ‘आई, ऐकलस नं यांचं तिरकस बोलणं! कळलं ना तुला इतके दिवस मी काय काय सहन केलं असेल ते! दहा वर्षे मी तिथे कसे दिवस काढले, मलाच माहीत! आपल्या संस्कारामुळेच मी गप्प बसले आणि सारं सहन केलं. नशीब, मी आता दिल्लीला आपल्या लोकांमध्ये आलीय. ’
पप्पा आणि दोघे भाऊ हैराण होऊन उभे होते. काहीच काळात नव्हतं. हसत्या-खेळत्या परिवारात मिसळून गेलेली मम्मी हे काय बोलते आहे? आणि इतकी का रडते आहे?
या सगळ्या आवाजात फोनची रिंग वाजली. पप्पांनी फोन उचलला. गृहप्रवेशाच्या निमित्ताने पतियाळाहून आजोबांचा फोन होता.
‘बाबा, दंडवत!’ पप्पा एवढे बोलतात, न बोलतात तोवर आजीने त्यांच्या हातून फोन हिसकावून घेतला आणि आजोबांना काहीही बोलू लागली. बरळूच लागली. आजीच्या चढलेल्या आवाजाने धाकटी बहीण घाबरली आणि मम्मीच्या मांडीत डोकं खुपसून रडू लागली. आनंद आणि आमोदने बघितलं, त्यांचे पप्पा आवाक होऊन बेचैनसे उभे होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. आजीने फोन खाली ठेवला, तेव्हा पप्पा इतकंच बोलू शकले, ‘सुगंधा इतकं खोटं कशासाठी?’ त्यापेक्षा जास्त काही बोलूच शकले नाहीत ते. त्यांना खूप मोठा धक्का बसला होता.
हे ऐकून आजोबा उभे राहिले आणि कडवट, दर्पयुक्त आवाजात म्हणाले, ‘नवनीत भुल्लर, आपण आमच्या समोर आमच्या मुलीला खोटं ठरवताय, मग पतियाळात आपल्या सगळ्या परिवारासोबत ती एकटी होती, तेव्हा तिला कशी वागणूक मिळत असेल, आलं आमच्या लक्षात!’
आजी आखडून म्हणाली, ‘नवनीतजी, यापुढे आपण आमच्या मुलीला काही बोललात, तर आपण पतियाळात रहाल आणि सुगंधा इथे मुलांना घेऊन आमच्याजवळ राहील.’
पप्पा नि:स्तब्धसे उभे राहून बघत होते. दोन्ही भाऊ त्यांना जाऊन चिकटले. पप्पांनी त्यांच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्यांना घेऊन ते बेडरूममध्ये आले. पप्पांनी त्यांना मिठीत घेतलं. त्यांच्या डोळ्यातून टपकणारे गरम अश्रू मुलांच्या डोक्यावर पडले. मुलांना काही तरी जाणवलं.
‘पप्पा, मम्मी खोटं बोलत होती. आपण काहीच का बोलला नाहीत?’ त्याने विचारले.
‘बेटा, घराचा मालक, घर बांधणाराच जर घर जाळायला निघाला, तर आग विझवण्यासाठी पाणी कसं घालणार?’
‘पप्पा, मम्मी, आजी, आजोबा आपल्याला का रागावत होते?’ आमोदने विचारलं.
‘हं… मला कळलं असतं तर… मला कळतच नव्हतं, हे काय चाललय?’ त्या रात्री ते दोघे आपल्या पप्पांजवळच झोपले. मम्मी खोलीत आलीच नाही. गृहप्रवेशानंतर घरात एकच आवाज सतत गुंजत राहिला. तो आवाज मम्मीचा होता. पप्पा जवळ जवळ गप्पच असायचे.
‘नंदी बेटा, ऊठ. शाळेला उशीर होईल. ’ पप्पांचा आवाज ऐकून मम्मी संतापाने म्हणाली, ‘तुम्ही लोक किती आडाणी आहात. कुणाचं नावसुद्धा नीट उच्चारत नाही. नावात बिघाड करण्यात मोठी मजा वाटतेय तुम्हा लोकांना! खबरदार आजपासून याला कुणी नंदी म्हंटलं तर. मी त्याचं इतकं चांगलं नाव ठेवलय, आनंद. आनंद तू पण ऐकून ठेव, जर कुणी नंदी म्हंटल्यावर तू उत्तर दिलस, तर तुलाच शिक्षा करीन!’
त्या दिवसापासून तो आनंद झाला. नंदीला त्याने आपल्या आत लपवून ठेवलं. तो दिवस आणि तो क्षण असा होता, की पहिल्यांदाच ते दोघे भाऊ भाऊ आपल्या आईला घाबरले. दहा वर्षे तिने त्यांच्यावर खूप प्रेम केलं होतं. आता त्यांच्या मम्मीचं व्यक्तिमत्वच बदलून गेलं होतं. प्रत्येक गोष्टीत राग. प्रत्येक गोष्टीत अहंकार.
‘मम्मी खूप बदललीय. ’
‘होय. बदललीय. का? कारण काही कळत नाही. ’ पप्पांनी दीर्घ श्वास घेतला. ते सतत ते क्षण आठवत त्यांची चिरफाड करायचे.
सकाळी मुलांना तयार करून पप्पा शाळेत पाठवायचे. शाळेनंतर दोघेही भाऊ बाहेर खेळत रहायचे. पप्पा घरी आले की ते घरी यायचे. आमोद या काळात याच्या खूप जवळ आला होता आणि ते दोघे पप्पाच्या. मम्मीने त्यांच्याकडे लक्ष देणं बंद केलं होतं. तशीही पहिल्यापासूनच मम्मी त्यांच्याबाबतीत निश्चिंत होती. आजोबा-आजी आणि आत्याने त्याचं पालन केलं होतं. दिल्लीत आल्यावर मम्मी जास्त करून आपली आई, बहिणी, भाऊ, वाहिनी यांच्यासोबत असायची. किटी पार्टी, मैत्रिणी, क्लब यातच आपला वेळ घालवायची. त्यांचे पप्पाच त्या तिघांना सांभाळायचे.
एक दिवस तो हट्टालाच पेटला. ‘पप्पा, मम्मी घरी नाहीये. आजोबांशी बोलायला द्या ना!’
‘नाही बोलायला देता येणार बेटा! तुमची मम्मी बाहेर जाण्यापूर्वी फोनला कुलूप लावून जाते. ‘ असं म्हणता म्हणता पप्पांना रडू आलं. तो काळ लँडलाइन फोनचा होता.
मुले मोठी होऊ लागली होती. घरातील लहान-मोठ्या गोष्टी कळू लागल्या होत्या. एक दिवस घरात पुन्हा भांडण झालं. आजोळची सारी माणसे घरात एकत्र झाली होती. त्याच्या आजोबांनी आपल्या इस्टेटीचे जे तीन हिस्से केले होते, त्यापाकी त्यांच्या हिश्श्याचे पैसे मम्मी, आजोबा आणि मामाच्या बिझनेसमध्ये घालू इच्छित होती. पप्पांना बोलण्याची संधीच दिली जात नव्हती. मम्मीने सगळी कागदपत्रे आजोबांच्या आणि मामाच्या स्वाधीन केली. मग काही दिवसांनंतर मम्मी आणि पप्पांच्या सह्याही घेतल्या गेल्या.
त्याला वडलांचा राग यायचा. ते इतके गप्प का बसतात. काहीच का बोलत नाहीत?
ती दोघे आपला राग गिळून टाकत. ती इतकीही मोठी झाली नव्हती की पप्पांना काही विचारावं किंवा मम्मीला काही सांगावं.
ज्या दिवशी त्याला मुंबईला आय. आय. टी. ला प्रवेश मिळाला, त्या दिवशी तो, आमोद, पप्पा खूप खूश होते. तो पतियाळातील लोकांशी बोलू इच्छित होता. आजी-आजोबांना सांगू इच्छित होता की त्याला आय. आय. टी. ला प्रवेश मिळालाय. पण त्याला पप्पांचं बोलणं आठवलं. ‘आपल्या पायावर उभं राहून तू आपले निर्णय घेशील आणि निवड करशील, तेव्हा तुला कुणीच काही म्हणणार नाही. सगळं विश्व तेव्हा तुझं असेल!’ हा विचार करून तो गप्प बसला.
क्रमश: भाग २
मूळ हिंदी कथा 👉 ‘कभी देर नहीं होती…’- मूळ लेखिका – सुधा ओम ढींगरा
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈