श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ शुभमंगल सावधान – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
राजूच्या आईला संध्याकाळी पेपर वाचायची सवय. त्यांच्या जिल्ह्यातील पेपर यायचा सकाळी पण घरच्या व्यापात तिला पेपरात डोकं घालायला वेळ मिळायचा नाही. तशी ती सातवी शिकलेली, त्यामुळे तिला मराठी वाचन चांगले यायचे. सकाळी पेपर आला की राजाचे बाबा पहिल्यांदा पेपर वाचायचे. त्यांना तसा राजकारणात इंटरेस्ट, गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सर्व राजकारण ते वाचायचे. राजू दुपारी आला की पेपर वाचायचा. राजूच्या आईचे पेपर वाचता वाचता एका बातमीकडे लक्ष गेले, कुडाळ आज त्यांच्या जातीचा वधू-वरांचा मेळावा होता. जिल्ह्यातील पुढारी मंडळींनी हा मेळावा ठेवला होता. इतर काही काही कार्यक्रम होते पण मुख्य कार्यक्रम हाच होता.
राजूच्या आईच्या मनात कितीतरी दिवस मनात होतो आता राजू २७ वर्षाचा झाला, त्याचे दोनाचे चार हात करायला हवेत. आपणच या विषयावर घरात बोलायला हवे, नाहीतर बापलेक काही बोलायचे नाहीत. आपला राजू कमी बोलणारा, मुलींच्या मागे मागे फिरणारा नव्हे.
“तिने राजूच्या बाबांना हाक मारली ” अहो ही बातमी बघितलीत, समाजाचो मिळावो आसा कुडाळाक, वधू आणि वर दोघांचा बोलावल्यानी, राजू साठी बघू होय आता ‘ ” पण राजू काय म्हणावतो लग्नाबद्दल ‘.
” तो कसो म्हणतंलो? आपण मोठ्यानी आता बोलाक व्हया ‘
” पण तेका विचार रात्री, तेच्या मनात कोण आसात तर, नायतर खय ठरवल्यानं तर’ ” तो काय ठरवतलो? खयच्या मुलीकडे मान वर करून बोलाचो नाय कधी ‘.
“तरीपण इचार तेका.’
रात्री राजाच्या आईने राजाला विचारले.”राजू, आपल्या समाजाचो मिळावो आसा कुडाळाक, त्याच्याबरोबर वधू आणि वरांचा पण मिळावो आसा. तुझा नाव देऊया मेळाव्यात, आता तुझा २७ वर्षा वय झाला. खयतरी बघुक व्हयचं आता ‘.
राजा गप्प बसला.
” तुझ्या मनात कोण असेल तर सांग.’
” नाय तस कोणी नाय ‘.
“मग नाव नोंदवूक सांगू बाबांका ‘?
“हा, म्हणत राजू जेवू लागला. राजूच्या आईने राजूच्या बाबांना हाक मारून सांगितले, ” ऐकलात हो, राजू म्हणता रविवारी कुडाळाक जाऊ या ‘.
“बरा, मी फोन करून नाव नोंदवातंय ‘ बाबा म्हणाले. राजूच्या बाबांनी मेळाव्याच्या आयोजकांना फोन करून राजूचे नाव दिले.
रविवार 12 जानेवारी
रविवारी १२ जानेवारी रोजी कुडाळच्या मंगलमूर्ती हॉलमध्ये समाजाचा मेळावा भरला होता. राजू आणि राजूचे आई वडील सकाळी नऊ वाजताच हॉलमध्ये हजर होते. आज समाजातील आजूबाजूची लोकसुद्धा बरीच हजर होती. साडेनऊला कार्यक्रम सुरू झाला. पहिल्यांदा प्रास्ताविक, समाजाची माहिती वगैरे. मग आमदारांच्या मागे समाजाने उभे राहिले पाहिजे, अशा तऱ्हेची नेहमीसारखी भाषणे. मग चहापाणी झाली आणि मग मुख्य कार्यक्रम सुरू झाला.
पहिल्यांदा वरांची ओळख सुरू झाली. आयोजक एक एक वराचे नाव पुकारत होते. प्रत्येक वर आपली ओळख करून देत होता. मुलीबद्दलच्या अपेक्षा सांगत होता. असे करत करत ३३ मुलांनी आपली ओळख करून दिली. मग दुपारचे जेवण झाले आणि मग मुलींची ओळख सुरू झाली. आयोजकांचे म्हणणे फक्त दोन मुलींनीच नाव दिलेले आहे. त्यांची ओळख सुरू झाली.
पहिली मुलगी –‘माझे नाव विशाखा. शिक्षण बीए. थोडे थोडे टायपिंग येते. घरी एक भाऊ, वडिलांची थोडी शेती. दहा आंब्याची कलमे….’
मग आयोजकांनी नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा विचारल्या.
विशाखा अपेक्षा सांगू लागली “सरकारी नोकरी, घरात कमीत कमी माणसे, नवऱ्याचे शहरात वास्तव्य, नवऱ्याची स्वतःची गाडी.’
आयोजकांनी दुसऱ्या मुलीचे नाव पुकारले.
नाव सोनाली- वडील बस कंडक्टर, आई अंगणवाडी शिक्षिका. शिक्षण बारावी पास.
मग आयोजकांनी तिच्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा विचारल्या. सोनाली अपेक्षा सांगू लागली ” मुलगा इंजिनियर किंवा डॉक्टर. शहरात स्वतःची जागा. चार चाकी गाडी.’
दोनच मुलींनी नाव नोंदवले होते, आयोजकांनी कोणी आयत्यावेळी नाव द्यायचे असेल तर द्या असे कळवूनही कोणीही मुली पुढे आली नाही.
राजूची आई आ वासून बसली होती. वधू वर मेळाव्यासाठी 32 मुलगे आणि फक्त २ मुली. खेड्यात राहणाऱ्या या मुलींची अपेक्षा काय ” सरकारी नोकरी, घरात जास्त माणसे नकोत. त्या दुसऱ्या कंडक्टरच्या मुलीची अपेक्षा ” नवरा इंजिनियर किंवा डॉक्टर, शहरात स्वतःच घर.’
राजूची आई मनातल्या मनात असल्या मुलींना शिव्या देत होती “आपला तोंड तरी बगा गो एकदा आरश्यात, धड नाक नाय डोळो, बारावी पास आणि बी.ए. शिक्शन, अंगात कसली कला नाय, दोन पैसे मिळविण्याची अक्कल नाय आणि नवरो इंजिनीर आणि डॉक्टर होयो? अगो, इतक्या शिक्षण घेतलेले नवरे तुमच्याबरोबर कीत्या लगीन करतीत? तेंका नोकरीं करणारी मुलगी गावातली नाय काय? आमच्या काळात आमचे आईवडील दाखवितीत तेचाशी आमी लगीन करू फक्त धड धाकट नवरो आणि एकत्र कुटुंब बगला कीं काळजी वाटा नाय, अडी अडचणीक कुटुंब होया आसता, तुमका सासू सासरे नको, दीर नणंद नको. असली भूतां माझ्या झिलाक नकोच. ‘
राजू आणि त्याचे आई-बाबा घरी आले. मुलींच्या एवढ्या अपेक्षा असतील हे राजूला माहीतच नव्हते, असे असेल तर आपल्यासारख्या शेती बागायती करणाऱ्या मुलाला मुलगी मिळणे किती अशक्य आहे हे त्याला कळले. सध्या समाजात लग्नाच्या मुली नाही की काय असाही त्याला प्रश्न पडला. आपली ४०० आंब्याची कलमे, शंभराच्या वर नारळीची झाडे, गाई म्हशी, त्यांचे दूध काढणे, घरातले रोजचे जेवण तसेच गडी माणसांची रोजची जेवणे. एवढे सर्व आपली आई विना तक्रार किती वर्षे करते. आणि या सध्याच्या मुली? यांना शहरातला डॉक्टर इंजिनियर नाहीतर सरकारी अधिकारी हवा. कसे व्हावे आपले लग्न?
राजूचे बाबा राजू च्या आईला म्हणाले ” बघितलस काय परिस्थिती आसा? समाजात आधी मुली कमी. लोका मुलींका जन्मच देणत नाय, कसला तरी यात मशीन इल्ला मागे, त्यात कळा मुलगी काय मुलगो? मुलगी दिसली काय पाडुन टाकायचा, तेचो हो परिणाम, ह्याच्यात डॉक्टर लोकांनी पैसे मिळविल्यानी.’
राजूची आई म्हणाली ” तेंका जाऊदे, मी माझ्या भावाशीक विचारतंय, माझ्या भावाशीच चेडू आसा हेमा लग्नाचा, माझो भाऊस तसो नाय म्हणाचो नाय. हेमा तसा कामाचा पण आसा. ‘
“मग तूझ्या दादाक विचार राजू साठी हेमा देतास काय.’
दुसऱ्या दिवशी राजूची आई बांदा एसटीत बसली आणि ओटावण्याला भावाकडे आली. तिला अचानक आलेली पाहून भावाला खूप आनंद झाला “अगो, अचानक कसा इलंस, कळविलंस पण नाय ‘ भाऊ म्हणाला. एवढ्यात वहिनी पण बाहेर आली ” अचानक इलास वन्सनू,जेवण करतय, आत मधीचं यावा.’
वहिनीने पाणी दिलं चहा दिला, ” सगळी घरची बरी आसात मा, राजू काय म्हणता?’
‘बरो आसा, तेच्या लग्नाचा बघतय ‘
“होय काय, बघलंस खय काय?’
“मुलींचे नखरे काय कमी? हेमाचा बघलंस नाय अजून, तेचि पण पंचवीस झाली मा?’.
‘बघुक’
” बघुक व्हया,’
“गे वैनी, हेमाक विचारूक इललैय मी राजू साठी ‘.
“कोण राजू साठी? काय आसता वन्स, आमी गावात लगीन करून इलाव, आयुष्यभर हाल काढलव, ह्या घर सांभाळून आता म्हातारी झालाव, शहरांतली माणसा घराक कुलूप लावून जग फिरतात, आमी आयुष्यभर हायसार, इतक्या करून गाठीक नाय दोन पैसे, त्यामुळे मी ठरवलंय हेमांक नोकरीवालोच आणि शहरातलोच नवरो बघायचो, ह्या गावात आसा काय? आंबे लागले तर पैसे आणि तेका मेहनत किती? नोकरीवल्या सारखो एक तारखेला पगार नायतर पेन्शन थोडीच गावातली. तेव्हा राजूक दुसरी मुलगी बघूया, मी बघतय. माझे ओळखी असात, तुमी काळजी करू नकात.’
“बरा तर, मी निघताय,’
“असा काय जेऊन जावा ना, किती दिवसांनी इलात ‘
“नाय गे, घराकडे कोण आसा? कामाक माणसा एलीत,’ असं म्हणून राजूची आई बाहेर पडलीच. भाऊ बाहेर गेला होता. तो तेवढ्यात घरी आला “
‘अग तू खय चाल्लं, जेऊन जा ‘असा आग्रह करत होता, पण त्याला न जुमानता ती बाहेर पडलीच, परत देवगड गाडी पकडून गावी आली. घरी पोहोचताच तिने सर्व बातमी राजूच्या बाबांना सांगितली. “मुलीपेक्षा मुलींच्या आई चो जास्त प्रॉब्लेम आसा, सगळ्यांका शहरा हवी, गावातली कामा नको ‘. माझ्या भावाक आणि भावजयक सुद्धा मुलगी शहरात देवची आसा ‘.
मग राजूच्या बाबांनी मुलगी बघण्याची मोहीमच काढली. अनेक ओळखीच्यांना आणि नातेवाईकांना जाऊन लग्नासाठी भेटले. सर्वजण हो हो म्हणत होते, पण कोणी स्थळ आणत नव्हते. असेच एक वर्ष गेले.
त्यांच्या एका नातलगाने बातमी दिली, सावंतवाडीत एक एजंट आहे. तो सिंधुदुर्गात लग्नाच्या मुली पुरवतो. त्याने जिल्ह्यात काही मुली आणून त्यांची लग्न लावून दिली आहेत. त्यांचे संसार उत्तम चालले आहेत. राजूच्या बाबांनी त्या एजंटचा फोन नंबर घेतला. आणि वेळ घेऊन सावंतवाडीला त्याच्या घरी पोहोचले. ते घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या आधी सात-आठ जण मुलाचे आई-वडील तेथे बसलेले होते.
क्रमश: भाग-१
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर