जीवनरंग
My father is the best mother… भाग – 2 – सुश्री ज्ञानदा कुलकर्णी☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
(कारण– कारण मी अशी मुलगी होते जिनं जन्माला येतांना आपल्या आईला खाल्लं….) इथून पुढे —
माझ्या वडिलांनी पुन्हा लग्न करावे म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले.पण त्यांनी लग्न केले नाही. माझ्या आजी आजोबांनी नैतिक, अनैतिक, भावनिकरित्या बाबांना प्रवृत्त करण्याचा कसोशीने प्रयत्न केला,पण बाबा ठाम राहिले.. शेवटी तर आजीआजोबांनी Ultimatum दिला….” तू जर आमचे ऐकले नाहीस तर ही शेती,जमीनजुमला,घर यातला छदामही मिळणार नाही, या सर्वातून तुला बेदखल केले जाईल. “
बाबा दुसऱ्यांदा विचार करण्यासाठीसुद्धा थांबले नाहीत आणि क्षणार्धात सगळ्यावर पाणी सोडले. सुखी आयुष्य आणि विशेषतः ग्रामीण सुखी जीवनावर पाणी सोडले व मला घेऊन या मोठ्या शहरात एक सडाफटींग माणूस म्हणून अतिशय कठीण, कष्टप्रद जीवन स्विकारलं. रात्रंदिवस काम करुन मला वाढवलं,जपलं, प्रेमानं माझी काळजी घेतली. .
आता मोठं झाल्यावर माझ्या लक्षात येतंय की अनेक चांगल्या गोष्टी त्यांना का आवडायच्या नाहीत… ज्या मला आवडायच्या !
पानात एखादा तुकडा राहिला आणि मला आवडत नाही असं त्यांनी म्हंटलं की तो मीच संपवायचे…..कारण एकच की हा पदार्थ बाबांना आवडत नाही…
खरी ग्यानबाची मेख इथंच होती….त्यांच्या समर्पणाची.
त्यांच्या आवाक्याबाहेरचे,पण जे जे चांगले आहे ते त्यांनी मला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
या शाळेनं मला आश्रय दिला आणि सर्वात महागडे बक्षीस दिले ते म्हणजे मला इथं प्रवेश दिला.
Love, Care ..defines Mother.म्हणजे प्रेम आणि काळजी ही बाब आईसाठी असेल तर माझा बाबा यात फिट्ट बसतो.
Compassion….म्हणजे करुणा म्हणजे जर आई असेल,तर माझा बाबा यात फिट्ट….
Sacrifice…समर्पण हे आईचे रुप असेल तर माझ्या बाबाचं प्रभुत्व आहे यावर….
संक्षेपात……
आई जर प्रेम,काळजी,करुणा,समर्पण यांची मुर्ती असेल तर…..
….. MY FATHER IS THE BEST MOTHER ON EARTH THEN…
On Mother’s day I Salute him and say it with great Pride that, the hardworking GARDENER working in this School is MY FATHER…
On Mothers day..या पृथ्वीवरचा एक सर्वोत्तम पालक म्हणून मी माझ्या बाबांना शुभेच्छा देते.
कदाचित शिक्षकांना मी हे लिहलेलं आवडणार नाही,पण ही तर अगदी छोटी गोष्ट आहे माझ्याकडून माझ्या बाबांसाठी, ज्यानी माझ्यावर निस्वार्थीपणे प्रेम केले.
टांचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता खोलीत पसरलेली….आवाज काय तो फक्त गंगादासच्या कोंडलेल्या हुंदक्यांचाच.
बागकाम करतांना तळपत्या उन्हाने कधीही घामाघुम न झालेला गंगा… आपल्या मुलीच्या या मृदु मुलायम शब्दांनी त्याची छाती अश्रुंनी भिजून चिंब झाली..तो हात बांधून उभा होता….
शिक्षकाच्या हातातून गंगानं तो कागद घेतला आणि ह्रदयाच्या जवळ धरला.अद्यापही हुंदक्यांनी त्याचं शरीर थरथरत होत…….
प्राचार्य मॅडम खुर्चीतून उठल्या. गंगाला त्यांनी खुर्चीत बसायला सांगितले, पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाल्या….
आवाजातला प्रशासकीय करड्या स्वराची जागा आता मुलायमतेनी घेतली होती..
“ गंगा अरे तुझ्या मुलीला 10/10 गुण मिळाले. शाळेच्या इतिहासात मदर्स डे च्या दिवशी आईवर लिहलेला हा सर्वोत्कृष्ट निबंध आहे. आपल्या शाळेत Mother’s Day निमित्त उद्या एक मोठा समारंभ आयोजित केला आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने यासाठी मुख्य अतिथी म्हणून तुला बोलवण्याचे ठरवलेयं. आपल्या मुलांना वाढविण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेम आणि समर्पण करणाऱ्या व्यक्तिचा सन्मान आहे हा. सर्वात महत्वाचे म्हणजे या वेळी तुझ्या मुलीनं तुझ्याबद्दल दाखविलेल्या विश्वासाला Appreciate केलं तर तिलाही अभिमान वाटेल आणि शाळेलाही, आपल्याकडे असणाऱ्या सर्वोत्तम पालकाचा….खरंतर एका अर्थाने बागशिल्पकारच तू. A Gardner…. बागेतील झाडांची काळजी घेतोस,जपतोस. एवढच नाही तर तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर फुलाचं निरोगी संगोपन, पालन पोषण अप्रतिम पद्धतीने करतोयस……
“So Ganga ….. will you be the chief guest for tomorrow’s event?”
—समाप्त
लेखिका – सुश्री ज्ञानदा कुळकर्णी.
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈