सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? आत्मसंवाद – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ?

(रेडिओवरील व मंडळांमधील भाषणांसंबंधी सांगितले.)

“कवितेच्या प्रांतात कधी शिरली नाहीस का?”

“जवळ जवळ नाहीच. माझी ‘चारधाम’वरील कविता आणि ‘झोपाळा’ ही कविता प्रसिद्ध झाली . बाकी बऱ्याच कविता या प्रसंगानुरूप केलेल्या होत्या. कुणाच्या लग्नाचा वाढदिवस, साठावा किंवा ८० वा वाढदिवस वगैरे. अशा कविता मी सांभाळून ठेवल्या नाहीत. कारण त्या कविता त्या प्रसंगापुरत्याच असतात.”

“बरोबर. लेखनामुळे आलेले आणखी काही विशेष वेगळे अनुभव सांगतेस का?”

“हो. आठवतील तसे सांगते. माझा रशियामधील पीटर्सबर्गवरील लेख प्रसिद्ध झाल्यानंतर साधारण दोन महिन्यांनी मला रशियन कॉन्सुलेटमधून डॉक्टर सुनीती अशोक देशपांडे यांचा फोन आला. पीटर्सबर्गवरील माझ्या लेखात मी रशियन बॅलेबद्दल सविस्तर लिहिले होते. डॉक्टर देशपांडे यांनी त्या लेखातील बॅलेचा उल्लेख करून मला कॉन्सुलेटमधील ‘कल्चरल सेंटर ऑफ रशिया’ पेडर रोड इथे होणाऱ्या एका रशियन बॅले शोसाठी आमंत्रित केले. डॉक्टर देशपांडे यांच्यापर्यंत हा लेख कसा पोहोचला ते मला कळले नाही कारण बॅले शोसाठी आम्ही गेलो  त्यावेळी त्यांची भेट होऊ शकली नाही. आम्ही बॅले पाहून आणि  अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन परतलो.”

“अरे वा! छान संधी मिळाली.”

“माझा मोरोक्कोवरील लेख मानिनी दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांची ईमेल मला आली. त्यात त्यांनी लेख खूप आवडल्याचे व त्यांना मोरोक्को पहायची इच्छा होती पण जमले नाही. त्यामुळे या लेखातूनच मरोक्कोची भेट झाली असे कळविले होते.”

“मला आठवतं की तुला कौस्तुभ आमटे यांचीही एक मेल आली होती”.

“हो ना! तेव्हाही मला आनंद आश्चर्याचा  धक्का बसला होता. माझा ‘उरते फक्त आमसुलाची चटणी’ हा लोकसत्ता- चतुरंगमध्ये प्रकाशित झालेला ललित लेख वाचून  श्री कौस्तुभ प्रकाश आमटे यांनी आनंदवनहून लेख खूप आवडल्याची कौतुकाची ईमेल पाठविली होती.”

“छान! त्यांनी आवर्जून कळविले ही विशेष गोष्ट!”

“तसंच कौतुक मला डॉक्टर महेश करंदीकर यांचं वाटतं. डॉक्टर करंदीकर नाशिकरोडला त्यांच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये न्युरो सर्जन आहेत. पण त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून माझा लोकसत्तेत आलेला लेख वाचून आवडला तर आठवणीने फोन करतात. ‘आमसुलाच्या चटणीसाठी’ त्यांचाही फोन होताच!

“मला वाटतं माननीय सुरेश खरे यांनीसुद्धा तुझी पुस्तके वाचून तुला काही सूचना केल्या होत्या.”

“हो तर! शिवाय डॉक्टर शरद वर्दे, शुभदा चौकर ,जयप्रकाश प्रधान, धनश्री लेले,ठाण्याचे श्री शरद भाटे , शुभदा चंद्रचूड यांचेही कौतुक व मार्गदर्शन लाभले. रत्नागिरीपासून नागपूरपर्यंतच्या वाचकांनी खुशी पत्रे पाठवून,  किंवा फोन, ईमेल करून पसंतीची पावती दिली. या सर्वांमुळे मी लिहिती राहिले.

“चांगल्या झाल्या आपल्या गप्पा! आठवणींची उजळणी झाली. मी आता एकच प्रश्न विचारतो. प्रवासाच्या आवडीमुळे भरपूर विमान प्रवास झाला. कधीच काही अडचण आली नाही का?”

“एक अविस्मरणीय प्रसंग सांगते आणि आपण थांबू या.”

“चालेल”.

“ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडच्या प्रवासाहून मुंबईला परत येताना वाटेत बँकॉकला विमान बदलायचे होते. बँकॉकहून  दुसऱ्या विमानाने निघालो. पोटावर बांधलेले पट्टे अजून तसेच होते. विमान  आकाशात स्थिरावयाचे होते. तेवढ्यात उजवीकडील खिडक्यांच्या बाजूने, पुढपासून मागपर्यंत विजेची एक सळसळती रेषा सरकन गेली. ‘something wrong ‘असं मनात येईपर्यंत मागच्या बाजूचे लोक ‘फायर फायर ‘असं ओरडत पुढे येऊ लागले. आरडाओरडा, हुंदक्यांचे आवाज येऊ लागले. कॅप्टनने सर्वांना आपापल्या जागेवर पट्टे बांधून बसण्याची विनंती केली. सर्व क्रू मेम्बर्स, एअर होस्टेससुद्धा त्यांच्या जागेवर बसले. कॅप्टनने  घोषणा केली की, विमानाच्या एका इंजिनाला आग लागली होती. ती आता विझविण्यात आली आहे आणि विमान परत बँकॉक विमानतळावर नेण्यात येत आहे.

मी मधल्या रांगेत ,पुढून दुसऱ्या लाईनमध्ये कडेच्या सीटवर होते. तिथेच जवळ दरवाजाशी एक एअर होस्टेस कॅप्टनने सूचना केल्या प्रमाणे बसली होती. तिचं तोंड माझ्याकडे होतं. अगदीच पोरसवदा दिसत होती. नवीनच लग्न झालं असावं किंवा घरी लहान बाळ असावं. तिच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहत होतं. मी खुणेने तिला सांगितलं रडू नको आणि आकाशाकडे बोट दाखवून नमस्कार केला. खांद्यावर क्रॉस करून दाखवलं आणि म्हटलं God is great. Don’t weap .”

अशा परिस्थितीमध्ये विमानाचं जमिनीवर सुखरूप उतरणं हे महत्त्वाचं असतं. विमानाने नुकतेच उड्डाण केल्यामुळे ते फ्युएलने पूर्ण भरलेले होते. काहीही घडू शकत होते. कॅप्टनने अतिशय कौशल्याने विमान सुखरूप उतरविले. सर्वांनी टाळ्या वाजवून जल्लोष केला. ती एअर होस्टेस माझ्या जवळ आली आणि माझे हात हातात घेऊन,

‘Thank you very much, thank you very much’असे म्हणू लागली. मी तिला म्हटलं,’ अगं, मी तुझ्यापेक्षा जास्त घाबरले होते. (I was more afraid of than  you. Believe in God. He will take our care.)’

नंतर मनात आलं की मृत्यु समोर दिसल्यावर कोण घाबरणार नाही? पण काही प्रसंगच असे असतात की त्या वेळी आपण काहीसुद्धा करू शकत नाही. आपलं आयुष्य हा सुद्धा एक प्रवासच आहे. जीवनाच्या या प्रवासात कितीतरी वेळा आपल्याला प्रश्न पडतात की अरे, हे असं का झालं? अमुक एक घटना का घडली? पण अशा प्रश्नांना काहीही उत्तर नसतं. असे अनुत्तरित प्रश्‍न आणि अनपेक्षित घटना यांना बरोबर घेऊनच आपल्याला आयुष्याचा प्रवास करायचा असतो.

बँकॉकला विमान उतरल्यावर आमच्यासाठी चहा नाश्ता तयार होता. कोणाला घरी फोन करायचा असेल, ई-मेल करायची असेल तरी विनामूल्य सोय होती. तासाभरातच दुसऱ्या विमानाने आम्हाला घेऊन उड्डाण केलेसुद्धा आणि आश्चर्य म्हणजे त्याच एअर होस्टेस , पण नवीन ताजा आकर्षक युनिफॉर्म घालून हसर्‍या चेहर्‍याने आमचं स्वागत करीत होत्या.

अनुत्तरित  प्रश्न आणि अनपेक्षित घटना यांना गृहीत धरून आयुष्याचं असंच स्वागत करायला हवं, नाही का?”

भाग चार व आत्मसंवाद समाप्त

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments