श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिलं- मी –  डी.एड.ल असताना एका संस्थाभेटीतूनही तू कथा लिहिली होतीस. आता इथून पुढे-)

उज्ज्वला – हो. एक नाही, मी दोन कथा लिहिल्या होत्या तेव्हा. ती संस्था म्हणजे ‘ममता क्रेश’. आमच्या कॉलेजपासून थोड्या अंतरावर असलेल्या चर्चने ते क्रेश चालवलं होतं. क्रेश म्हणजे सांगोपनगृह. विद्यार्थिनींच्या अभ्यासक्रमात समाजसेवी संस्थांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती करून घेणे, हा भाग होता. म्हणून आम्ही मुलींना घेऊन त्या क्रेशमध्ये आलो. इथे माहिती कळली की इथल्या परिसरातील गोर-गरीब मुलांसाठी हे क्रेश चालवलं जातं. याला मदत जर्मन मिशनची होती. त्यांनी जगभरच्या उदारमनस्क धांनिकांना विनंती केली होती की त्यांनी इथल्या एका मुलाला दत्तक घ्यायचं. म्हणजे इथल्या एका मुलाचा खर्च चालवायचा. पन्नास- साठ मुले होती तिथे. ८वाजता मुले येत. प्रार्थना होई. मुलांना नाश्ता मिळे. खेळ, शिक्षण होत असे. दुपारचं जेवणही इथे मिळे. ६ वाजता मुले घरी परतत. तिथल्या एक केअर टेकर महिला आम्हाला माहिती देत होत्या, इतक्यात एक दीड दोन वर्षाची चिमुरडी लडखडत्या पावलांनी तिथे आली. त्यांनी तिला जवळ घेत म्हंटलं, ही क्रेशाची पहिली दत्तक मुलगी सूझान. आम्ही एका लेपर भिकार्यातच्या जोडीकडून हिला दत्तक घेतली. त्यांना म्हणालो, आम्ही हिच्या आयुष्याचं कल्याण करू, पण तुम्ही तिला ओळख द्यायची नाही. ते कबूल झाले. आम्ही हिला डॉक्टर करणार आहोत. पुढे जर्मनीला पाठवणार आहोत.

इथे मला कथाबीज मिळालं. मी मुलीचं नाव ठेवलं जस्मीन. कथेची सुरुवात, मुलगी डॉक्टर झालीय व लेप्रसीवर संशोधन करण्यासाठी जर्मनीला निघालीय, इथून केली. तिला एव्हाना हे कळलेलं असतं की एका लेपर झालेल्या भिकारी जोडप्याची आपण मुलगी आहोत पण ते कोण हे तिला कळलेलं नाही.

मी – मिशन हॉस्पिटलच्या कॅरिडॉरमध्ये एक मोठं पोस्टर पहिलं होतं. त्यात येशू एका सुरईतून पाणी घालत आहे व एका स्त्रीने त्याखाली ओंजळ धरली आहे. त्याखाली लिहिलं होतं, त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागावतो, त्याला कधीच तहान लागत नाही.  प्रतिकात्मक असं हे चित्र. मी माझ्या कथेत ते पोस्टर क्रेशच्या हॉलमध्ये लावलं. जस्मीनचा सेंडॉफ होतो. ती टॅक्सीत  बसताना तिच्या मनात येतं , आपण लहानपणापासून त्याने दिलेल्या पाण्यानेच ( शिकवणुकीने ) तर तहान भागावतो आहोत. तरीही आपल्याला तहान लागलीय. खूप तहान. आपले आई-वडील कोण हे जाणून घेण्याची तहान. कथा इथेच संपते. मी कथेचं नावही ‘तहान’च ठेवलं. मराठी आणि हिन्दी दोन्ही वाचकांना ही कथा आवडली होती. या कथेचा हिन्दी अनुवाद हिंदीतील सुप्रसिद्ध मासिक ‘मधुमती’मध्ये प्रकाशित झाला होता. प्रा.झुल्फिकारबांनो देसाईंनी तो केला होता. 

आम्ही गेलो होतो, त्या दिवशी क्रेशमद्धे आणखी एक कार्यक्रम होता. चादर वाटपाचा. थंडीचे दिवस होते, म्हणून मुलांच्या जर्मन पालकांनी त्यांना चादरी पाठवल्या होत्या, असा क्रेशाच्या प्रमुख संचालिका रेमण्डबाईंनी प्रास्ताविक केलं. मुलांच्या आयांना चादरी न्यायला बोलावलं होतं. त्या म्हणाल्या, मुलांच्या पालकांना थॅंक्स गिव्हींगची पत्र लिहा. आमच्याकडे या. आम्ही लिहून देऊ, असाही म्हणाल्या.  इथे माझ्या ‘पांघरूण’ कथेचा जन्म झाला. सर्जा कथेचा नायक. मी चादरींऐवजी आकर्षक विविध रंगी ब्लॅंकेटस केली. तिथल्या शिक्षिका म्हणल्या होत्या, ‘जर्मन पालकांची मुलांना पत्रे येतात. खेळ येतो. चित्रे येतात. मुलांची प्रगतीही त्या पालकांना कळवावी लागते.’ आम्ही ते सगळं बघितलं होतं. शिक्षिकेच्या माध्यमातून सर्जाने जर्मनीतल्या पालकांशी खूप भावनिक संबंध प्रस्थापित केले होते. तो दोन दिवस विचार करत होता, ‘आपल्याला कोणत्या रंगाचं ब्लॅंकेट मिळेल? अखेर कार्यक्रम झाला. आई सर्जाला घेऊन घरी आली. घरी येताक्षणी सर्जा ब्लॅंकेट पांघरून झोपला.

सर्जाचा दारुड्या बाप घरी आला. त्याच्याकडे पैसे नव्हते. रखेलीकडे तर जायचे होते. त्याच्या मनात विचार आला, हे मऊ ऊबदार ब्लॅंकेट पाहून माझी राणी खूश होऊन जाईल. त्याने सर्जाचं ब्लॅंकेट ओढून घेतलं. सर्जाचा सगळा प्रतिकार लटका पडला. त्याच्या सख्ख्या बापानं त्याच्यावर पांघरूण घालायचं. पण होतं उलटच. त्याच्या मानलेल्या परदेशी बापानं पाठवलेलं पांघरूण त्याचा सख्खा बाप ओढून नेतो. सर्जा रडतो. आक्रोशतो. आई अखेर फटका पदर, त्याच्या अंगावर पांघरूण म्हणून पसरते.

ही कथादेखील मराठी, हिन्दी दोन्ही वाचकांना आवडली. माझ्या सगळ्या काथांमागे ठोस वास्तव आहे. काही प्रसंग, काही हकिकती आहेत. माझी ‘परक्याचं पोर’ ही कथा ७८ मध्ये स्त्री मध्ये प्रकाशित झाली. त्याला अनेक खुषीपत्रे आली. तेव्हा फोन घरी -दारी सर्वत्र  उपलब्ध नव्हता. त्यानंतर काही महिन्यांनी मला अनंत साठे यांचे लंडनहून , तर अनिल  पाटील यांचे रियाधहून कथा आवडल्याचे पत्र आले.

मी – अर्थात या मुळे तुझ्या कथालेखनाची गती वाढली असेल?

उज्ज्वला – नाही. असे काही झाले नाही. माझे व्याप सांभाळत अतिशय संथ गतीने माझे कथालेखन चालू होते. पण मी लिहिलेली कथा प्रसिद्ध झाली नाही, असंही कधी झालं नाही.

मी – पुढे पुढे तुझ्या कविता लेखनाप्रमाणेच क्थालेखनही कमी होत गेलं.

उज्ज्वला – खरं आहे. मी निवृत्त झाल्यानंतर माझा समाज संपर्क कमी होत गेला. नवनवे अनुभव मिळणं दुष्कर होत गेलं. मग कथालेखनही ओसरलं. आणखीही एक झालं.

मी – काय?

उज्ज्वला – मी अनुवादात घुसले. आणि चक्रव्यूहासारखी त्यातच अडकले. मग माझं स्वतंत्र कथालेखन थांबल्यासारखच झालं. 

क्रमश: ….

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments