श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवन यात्रा
☆ आत्मसंवाद…भाग 6 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिलं – मी – तू अनुवादाकडे कशी वळलीस? आता इथून पुढे )
उज्ज्वला – अगदी योगायोगाने. साधारण मी निवृत्त होण्याचा तो काळ होता. लायब्ररीतून एकदा एक हिन्दी कथासंग्रह वाचायला आणला. ‘कविता सागर.’ हा तारीक असलम तस्नीम या बिहारी लेखकाचा विशेषांक होता. विचार असा, हिन्दी लेखकांचे आस्थेचे विषय कोणते? काय, कसं लिहितात, बघावं. या वेळेपर्यंत माझ्या कथांचे फास्ट फूड, कृष्णस्पर्श, धुक्यातील वाट आणि झाले मोकळे आकाश ही ४ पुस्तके प्रकाशित झाली होती.
पुस्तिकेच्या आकाराचे हे त्रैमासिक होते. वाचायला लागले, आणि चकीतच झाले. अर्धं, पाऊण, एक पानी कथा. कुठेही वर्णनाचा फापट पसारा नाही॰ थेट विषयाशी भिडणं आणि सत्य, तथ्य मांडणं. मराठीत आशा प्रकारच्या कथा लिहीलेल्या माझ्या पहाण्यात तरी नव्हत्या. याचा अनुवाद केला, तर मराठी वाचकाला एका वेगळ्या साहित्य प्रकाराची ओळख होईल, असं वाटलं. म्हणून मग मी काही कथांचे अनुवाद केले आणि तेव्हाचे लोकमतचे संपादक दशरथ पारेकर यांना दाखवले. त्यांनीही आस्था दाखवली. आणि या कथा सदर स्वरूप लोकमतमध्ये येऊ लागल्या. या दरम्यान ‘बेळगाव तरुण भारत’ च्या ‘खजाना’ पुरवणीसाठीही कथांचा अनुवाद पाठवू लागले. ‘कथासागर’ची वर्गणी भरली. त्यामुळे मला अनुवादासाठी कथा उपलब्ध झाल्या. मी त्या त्या लेखकांना त्यांच्या कथांचे मराठी अनुवाद पाठवत असे. मग ते आणि त्यांच्या परिचयाचे इतर लेखक आपापले लघुकथा संग्रह अनुवादासाठी पाठवत. त्यामुळे मला अनुवादासाठी कथांची कमतरता कधी भासली नाही. बारा वर्षे होऊन गेली. ‘खजाना’ मधील माझे हे सदर अजून चालू आहे.
या लेखनातून माझी लघुतम कथांची ६ पुस्तके झाली. यातील कथांचा आकृतिबंध वेगळा असल्याने सुरूवातीला पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊसने’ स्पॉट लाईट- तारीक असलम तस्नीम व सवेदना – डॉ. कमल चोपडा ही पुस्तके प्रकाशित केली. यापैकी ‘स्पॉट लाईट’ला बुलढाण्याचा ‘तुका म्हणे’ हा अनुवादाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘आवाज: आतला… बाहेरचा …हे घनश्याम अग्रवाल यांच्या लघुतम कथांचे पुस्तक निघाले. पुढे प्रत्येकी दहा लघुतम कथाकारांच्या प्रत्येकी १० कथांचे मिळून ‘थेंब थेंब सागर’ व कण कण जीवन’ आसे दोन संग्रह निघाले. अगदी अलीकडे ‘प्रातिनिधिक पंजाबी कथां’चा संग्रह निघाला. हा पंजाबीच्या हिन्दी अंनुवादावरून केलेला होता इतक्या कथांचा अनुवाद करता करता मीही काही लघुतम कथा लिहिल्या. त्या हिन्दी मासिके व पुस्तक संकलने यातून प्रकाशित झाल्या.
मी – तू केवळ लघुतम कथाच नव्हेत, तर मोठ्या कथाही केल्या आहेसं.
उज्ज्वला – हो. त्यावेळीही असंच झालं. लायब्ररीतून वाचायला आणलेल्या एका पुस्तकात मोहनलाल गुप्ता यांची ‘आशीर्वाद’ ही ऐतिहासिक कथा वाचली. ती मला खूप आवडली. मनात आलं, हा इतिहास मराठी वाचकांना कळावा, म्हणून मग त्यांच्या परवानगीने मी तिचा अनुवाद केला. परवानगी देताना त्यांनी लिहिलं होतं, ‘त्यांचं जे साहित्य मला आवडेल, त्याचा अनुवाद करून मला हव्या त्या ठिकाणी प्रसिद्ध करायला मी स्वतंत्र आहे.’ या सोबत त्यांनी तोपर्यंत त्यांची प्रकाशित झालेली सगळी पुस्तके मला पाठवली. त्यात ४ कथासंग्रह होते. कथा छानच होत्या. मी इतरही कथांचे अनुवाद केले. ते मासिकातून, दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाले. पुढे त्याचं पुस्तक निघालं ‘सांजधून’. हे माझं पहिलं अनुवादीत पुस्तक. त्यानंतर इतर अनेक निघाली. कथांचा अनुवाद करताना एक विचार मनात असे, तेच तेच घिसं-पीटं लिहिण्यापेक्षा आशय, रचना या सगळ्या दृष्टीने वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण असेल, ते वाचकांपर्यंत पोचवावं. त्याचप्रमाणे कथा अनुवादीत वाटू नयेत. मूळ मराठीत लिहिलेल्या वाटाव्या. त्यानंतर मी मोहनलाल गुप्ता, सरला अग्रवाल, आणि डॉ. कमल चोपडा या ३ लेखकांच्या प्रत्येकी ८ कथांचा अनुवाद ‘त्रिधारा’ म्हणून केला. हेही पुस्तक ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केले. या पुस्तकाला शिरगावचा (जि. धुळे) ‘स्मिता पाटील’ पुरस्कार अनुवादासाठी मिळाला.
त्यानंतर मी प्रतिमा वर्मा (बनारस), सूर्यबाला ( मुंबई), मधू कांकरीया ( मुंबई), डॉ. कमल चोपडा ( दिल्ली ) इ.च्या कथासंग्रहांचा अनुवाद केला. याशिवाय अनेक लेखकांच्या कथांच्या अनुवादाची संकलित पुस्तकेही आली. हे सारं करत असताना आणखीही एक महत्वाची गोष्ट घडली. माझ्या एका मराठी कथेचा अनुवाद ( लीडर) साहित्य अॅहकॅदमीच्या मुखपत्रात ‘समकालीन भारतीय साहित्य’ यात आला म्हणून ते द्वैमासिक माझ्याकडे आले. तोपर्यंत त्या नियतकालिकाबद्दल मला काहीच माहीत नव्हते. त्यानंतर मी त्याची वर्गणी भरली. या नियतकालिकाचे वैशिष्ट्य असे की इथे हिन्दी साहित्याबरोबरच अन्य भाषातील दर्जेदार साहित्याचा हिन्दी अनुवाद प्रकाशित होत असे. यातून मला अन्य भाषेतील चांगल्या कथा अनुवाद करण्यासाठी मिळाल्या. आवर्जून उल्लेख करावा आशा कथा म्हणजे- राक्षस – सुकान्त गंगोपाध्याय ( बंगाली), उत्तराधिकारी केशुभाई देसाई -(गुजराती), मुडीवसंतम्- व्होल्गा (तेलुगू) मागच्या दाराने – ममतामयी चौधुरी ( आसामी). या सगळ्या कथा माझ्या ‘विविधा या कथासंग्रहात संग्रहित आहेत.
त्यानंतर माझ्या धुक्यातील वाट, गणवेश, मीच माझ्याशी या कथांचे हिदी अनुवादही यात प्रकाशित झाले. पुढे गणवेशचा तर कन्नड आणि तेलुगूमध्येही अनुवाद झाला.
मी – तुझी हिंदीतील अनुवादाची एकूण किती पुस्तके झाली?
उज्ज्वला – लघुतम कथासंग्रह -६, लघुकथासंग्रह ( हिंदीत याला कहानी म्हणतात.) – १३ , कादंबर्या -६, , तत्वज्ञान – ५ अशी माझी अनुवादाची पुस्तके प्रकाशित आहेत. कथासंग्रहांच्या अनुवादाच्या २-३ आवृत्याही निघाल्या आहेत. यातील काही पुस्तके मला प्रकाशकांनी सांगितली, म्हणून मी ती केली.
मी – तुझ्याही कथांचा हिन्दी अनुवाद झालाय.
उज्ज्वला – होय. मानसी काणे, सुशीला दुबे, प्रकाश भातंब्रेकर यांनी तो केलाय. तो हिंदीतल्या दर्जेदार मासिकातून प्रकाशित झालाय.
मी – तू आत्तापर्यंत तुझा झालेला लेखनप्रवास मांडलास. तुला असं नाही का वाटलं, की या क्षेत्रात आपल्या अजून काही गोष्टी करायच्या राहिल्या ?
उज्ज्वला – नाही. माझ्या कुवतीप्रमाणे, जे आणि जेवढं करावसं वाटलं. तेवढं मी मनापासून केलं. मी जेवढं करू शकले, त्याबद्दल मी तृप्त आहे. समाधानी आहे. वाचकांना माझ्या लेखनाबरोबरच अनुवादीत साहित्यही आवडलं. त्याबद्दल ते फोन करतात. मला म्हणतात, ‘पुस्तकात लिहिलं आहे, अनुवादित म्हणून आम्हाला तो अनुवाद आहे, हे कळलं. एरवी आम्हाला हे लेखन मूळ मराठीतीलच वाटतं. मी ऐकते आणि मला कृतार्थ वाटतं. एकूणच माझ्या लेखनाच्या बाबतीत मी तृप्त आहे. कृतार्थ आहे. जे मिळालं, त्यात मी समाधानी आहे.
समाप्त
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈