सौ. नीलम माणगावे
आत्मसाक्षात्कार – स्वतः स्वतःची घेतलेली मुलाखत – भाग – 3 सौ. नीलम माणगावे
माजघरातील हुंदक्या बद्दल ऐकण्याची मला उत्सुकता लागली आहे.. काय आहे हे
मुलाखतींवर आधारित हे पुस्तक आहे. असं म्हटलं जातं आज-काल, की पूर्वी ची एकत्र कुटुंब पद्धती किती छान होती, पण असं नाही आहे. दुरून डोंगर साजरे, म्हणतो ना, तसं आहे हे.. बघणाऱ्याला छान वाटतं पण वास्तव वेगळच असतं. माझं माहेर खेड्यातलं. सासर खेड्यातलं. सगळे पाहुणे खेड्यात राहणारे. त्यातून पुन्हा एकत्र कुटुंबात राहणारे. आजूबाजूलाही एकत्र कुटुंबं होतीच. माझे पाच मामा एकत्र राहायचे.. आम्ही सात जावा दीर सुद्धा एकत्र राहत होतो. ही सगळी एकत्र कुटुंब बघताना, समजून घेताना एक गोष्ट लक्षात आली, की प्रत्येक एकत्र कुटुंबामध्ये एका स्त्रीवर अन्याय होतो. अन्यायाची कारणं वेगवेगळी असतील.. एखादीला माहेर कडून हुंडा दाग-दागिने मिळाले नसतील, एखादी सुमार रूपाची असेल, हुशार नसेल, तिचा नवरा नव्हता नसेल किंवा तिच्या नवऱ्याला प्रतिष्ठान असेल.. कारण अनेक पण परिणाम एक की अशा स्त्री ला त्रास सहन करावा लागतो. तिचे शोषण होते. हे पाहून मी अशा अन्याय झालेल्या पन्नास एक स्त्रियां च्या मुलाखती घेतल्या. वेगवेगळ्या जाती-धर्माच्या, वेगवेगळ्या आर्थिक स्तर असलेल्या, वेगवेगळ्या वयोगटांच्या स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या. 90 वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंत इस्त्री या मुलाखतींमध्ये आहे. एकही स्त्री अशी नव्हती, कि जी बोलताना रडत नव्हती. अशा स्त्रियांच्या या मुलाखती आहेत. माजघरातल्या या स्त्रियामधली एक स्त्री म्हणाली.. माजघरातील स्त्रियांनी आता रडत न बसता रस्त्यावर बोंब मारायला हवी…
एकत्र कुटुंबातील खानदानीपणाचा बुरखा फाडून टाकतात त्या स्त्रिया.. पुरुष प्रधान संस्कृतीची चिरफाड करतात
या मलाही खुप रडवलं..
खरंच आहे, आज सुद्धा आपण टीव्हीवरच्या मालिकांमध्ये ही.. एखाद्या स्त्रीवर अन्याय होताना बघतोच.
हो ना गं, स्त्री शिकली. मिळवती झाली. चारचौघात वावरू लागली. तिचं बाह्य रूप बदललं. पण तिचे शोषण थांबलं नाही. शोषणाचे प्रकार बदलले. पण शोषण आहेच. शोषण फक्त आधी घरात उंबऱ्यात होत होतं ते आता कामाच्या ठिकाणी.. अगदी कार्पोरेट क्षेत्रातही होऊ लागलं आहे.. बलात्काराचा घटना बद्दल तर बोलायलाच नको.
खरं आहे. आता तुझ्या कवितांबद्दल सांग
माझ्या कविता सुद्धा स्त्री शोषणावर जास्त बोलतात. प्रेमाची हिरवळ, प्रेमातला वसंत, प्रेमातल्या गुदगुल्या माझ्या कवितांमध्ये नसतात
गमतीची गोष्ट म्हणजे माझा नवरा म्हणतो.. तुला प्रेमच करता येत नाही, मग प्रेमाच्या कविता कशा लिहिता यतील?.. मी म्हणते, प्रेमाची आणि माझी कधी गाठभेटच झाली नाही, मग प्रेमाच्या कविता मी कशाला येणार? खोट्या अनुभवावर लिहिता येत नाही. प्रेम अनुभवायचं वय दहशतीखाली गेलं.. आईनं सुद्धा कधी प्रेम नाही केलं. चोख कर्तव्य बजावलं. आपल्या मुलींना जपलं. मांजरी आपल्या पिल्लांना वाचवते तसं वाचवलं. आपल्या मुलींना कोणी नावे ठेवू नयेत, याची काळजी घेतली. कर्तव्य म्हणजेच प्रेम, असं मानण्याचा तो काळ होता.. आमची तर परिस्थितीच वेगळी होती. असो.
मग कवितेत हे नाही येणार तर काय येणार? अलीकडेच लिहिलेल्या चार ओळी सांगते
“त्यांनी तिच्या हाताची
बोटे तोडली
कारण त्यांना संशय होता
ती हस्तमैथुन करते”
मिळून साऱ्याजणी.. मासिकाच्या दिवाळी अंकात ही कविता प्रसिद्ध झाली.. कितीतरी लोकांचे फोन आले.. अगदी पुरुषांची सुद्धा.
बापरे! या चार ओळींवर कितीतरी देता येईल, बोलता येईल. स्त्री शोषणाची ही पुरुषप्रधान व्यवस्थेची प्रवृत्तीच म्हणायची.
स्त्रियांनी आपलं सुख आपण मिळवायचं नाही. तिचं सुख पुरुषांवर अवलंबून असेल तरच तिने ते घ्यावे नाही तर मिळेल ती शिक्षा भोगण्याची तयारी ठेवावी.
मला माहिती आहे, सगळेच पुरुष असे नसतात पण बहुतांशी असतात, हे विसरता येत नाही.
मध्ये मी नुकतीच वयात आलेल्या.. आमच्या कामवाल्या बाई मधल्या आईची वेदना, तिची काळजी एका कवितेत मांडली. ती कविता एका मासिकांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक लोकांचे विशेषतः काही पुरुषांचे फोन आले की.. मॅडम खरंच आहे हो, मुलगी वयात आल्यानंतर बाप घाबरतो…. मी मनात म्हणाले, पण हाच बाप आपल्या मुलीच्या वयाच्या मुलींकडे.. आपल्या मुलीसारखा बघतो का?
नाही ना बघत.. हीच तर अडचण आहे. तुझी कविता तळमळीने काय सांगते.. काय बोलते.. हे लक्षात आलं माझ्या. तरी, वेगळ्या काही कविता लिहिल्या असशीलच ना?
हो. लिहिल्या. माझी आई गेल्यानंतर.. “कंदील, काठी आणि तू”कवितासंग्रह तिच्या पहिल्या वर्ष श्राद्धदिवशी प्रकाशित केला. त्यामध्ये सगळ्या आईच्या आठवणी आहेत. शिवाय जागतिकीकरणाशी संबंधित कवितांचा”उद्ध्वस्तायन”नावाचा कवितासंग्रह सुद्धा प्रकाशित झाला. वेगवेगळ्या आशय विषयाच्या कविता लिहिल्या पण माझा कल स्त्री शोषणाच्या बाजूने भाष्य करणाऱ्या जास्त आहेत.. कारण समाजाचं ते वास्तव आहे आणि वास्तव सोडून पळ काढता येत नाही.. आज तर ते जास्त चाललंय, हेही नाकारता येत नाही.
आता तुझ्या कथांविषयी सांग..
क्रमशः …
© सुश्री नीलम माणगावे
जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर
मो 9421200421
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈