image_print

सौ. नीलम माणगावे 

🥳 आत्मसाक्षात्कार – स्वतः स्वतःची घेतलेली मुलाखत – भाग – 4 🥳 सौ. नीलम माणगावे 🥳

कथे विषयी सांगण्याआधी मला सांग, साहित्याचे एवढे प्रकार तू कसे काय हाताळत गेलीस?

अगं, मुद्दाम ठरवून मी हे साहित्यप्रकार हाताळले आहेत. काय झालं, सुरुवातीला कविता लिहिली. खूप सार्‍या लेखकांची लेखन सुरुवात कवितेपासून होते तशी ती माझी पण झाली. खूप कविता लिहिल्या. नंतर वाटायला लागलं,आपल्याला खूप काही सांगायचं आहे.. पण ते कवितेमधून सांगता येत नाही. कदाचित ही माझी मर्यादा असेल, पण मला कवितेमधून सगळं सांगता येत नव्हतं. म्हटलं कथा लिहून बघावी. मग कथा लिहिली. जमली. मग कथा लिहिल्या. पुन्हा वाटायला लागलं, कथासुद्धा आपल्याला व्यक्त व्हायला अपुरी पडत आहे. खूप सारं सांगायचं आहे, जगण्याचा पट मांडायचा आहे.. आपल्या आजूबाजूला एवढं घडतय आणि आपण ते सगळं कथेमध्ये बांधू शकत नाही. चला, कादंबरी लिहून बघूया.. मग कादंबरी लिहिली. जमली. मग छान वाटायला लागलं. पूर्ण व्यक्त होता आलं. झाडाची एक फांदी  नव्हे, तर पूर्ण झाड…  फांद्या, पान, फुलं, लगडलेली फळ, फांद्यांवर ची घरटी, घरट्याटले पक्षी, झाडाचे मूळ.. वगैरे सगळं म्हणजे पूर्ण झाड. तसं कादंबरीचं. सगळ्या बाजूंचा लेखाजोखा मांडायचा असेल तर कादंबरी शिवाय पर्याय नाही.

कादंबरी मधून वेगवेगळे विषय हाताळले. बालगुन्हेगारी, कुष्ठरोगी   त्यांचे आयुष्य, वेश्या आणि तिचे जगणे, हिंदू-मुस्लिम दंगल अशा वेगवेगळ्या विषयांवर कादंबरी लिहिली. एका अपंग महिले वरची आणि महापुरावर ची कादंबरी लिहिली

कथासंग्रहवर म्हणशील तर, नऊ-दहा कथासंग्रह आले. पैकी ‘रथ वादळ’ या कथासंग्रह मधील कथा जैन समाजाच्या समाजाच्या म्हणजेच जैन कथा आहेत.’ सूर्य, देव आणि माणूस ‘ या संग्रहामधील कथा.. लघुत्तम कथा आहेत.’ निर्भया लढते आहे ‘ या संग्रहा मधील कथा बलात्कार झालेल्या स्त्रियांवरच्या कथा आहेत… त्यांच्या पुनर्वसनाच्या कथा आहेत. एखाद-दुसऱ्या कथेचा अपवाद सोडला तर बलात्कारित स्त्रीला आईने,नवऱ्याने स्वीकारले आहे. या कथांमधून मला हेच सांगायचे आहे, की बलात्कार ही फार मोठी घटना नसून तो एक अपघात आहे.. अपघातात एखाद्या अवयवाला इजा होते तशी बलात्कारा मध्ये योनीला इजा होते.. एवढेच समजून त्या स्त्रीला माणूस म्हणूनच स्वीकारवे. बलात्कार झाला म्हणून ती पापी ठरत नाही किंवा शील भ्रष्ट ठरत नाही किंवा अपवित्र वगैरे सुद्धा होत नाही, हे समाजाने समजून घ्यावे.असो

साहित्याचा प्रकार कुठलाही असो, एक स्त्री म्हणून आणि लेखक म्हणूनही मी शोषितांच्या बाजूला असते. शोषितांचा विचार करते. समाजातल्या प्रत्येक घटकाकडे माणूस म्हणून बघते. ही माझी भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी मी प्रामाणिक राहते. हे मी आत्मप्रौढीचा धोका पत्करूनही सांगते की, एकेकाळी मी शोषित होते म्हणून शोषितांचा विचार संवेदनशीलतेने करते.

माझा मागचा प्रवास मला सांगत असतो… तू त्यातलीच एक आहेस, हे कधीही विसरू नको. बस्स, लेखनात मी तेवढेच करते..

तू समीक्षणात्मक काही लिहिलं आहेस, त्याबद्दल सांग.

सांगते….

क्रमशः …

©  सुश्री नीलम माणगावे

जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर

मो  9421200421

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

0Shares
0
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments