सौ. नीलम माणगावे
आत्मसाक्षात्कार – स्वतः स्वतःची घेतलेली मुलाखत – भाग – 6 सौ. नीलम माणगावे
बाल साहित्यामध्ये तू वेगवेगळे प्रयोग केलेस, त्याबद्दल सांग ना
अगं, प्रयोग वगैरे मी काही केले नाहीत.
मग वेगवेगळ्या विषयांवर लिहिलंस का..?
वेगवेगळ्या विषयांवर तर सगळेच लेखक लिहितात. आपल्या प्रत्येक पुस्तकांमध्ये वेगळाच विषय हाताळतात. त्यात काही नवीन नाही.
तरी,तुझ्या बाल साहित्या मधलं वेगळेपण सांग
वेगळं म्हणजे, ज्या गोष्टी मोठ्यांच्या आहेत पण मुलांनाही त्या माहित असणं गरजेचं आहे.. अशा गोष्टी मी बाल साहित्यातून आणण्याचा प्रयत्न केला आहे.. म्हणजे बघ, एकेकाळी नुकताच एड्स चालू झाला होता.. त्याचं प्रमाण पण मोठं होतं. तरुण मृत्युमुखी पडत होते. अशा काळात एड्स म्हणजे काय? तू कसा कशामुळे होतो, हे मुलांना माहीत असू दे म्हणून त्यांना समजण्यासारखं सोप्या भाषेत कथेतून मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्या संग्रहाचं नाव आहे..’या चुकीला क्षमा नाही’. एका बाल कथेमध्ये मी स्त्री जोकर आणला.
मुलांना उत्क्रांती कशी झाली हे समजण्यासाठी सोप्या भाषेमध्ये कवितेच्या फॉर्ममध्ये.. सलग 76 कडवी लिहिली. त्यासाठी स्पेशल सांगलीच्या डी. एम. आंबेकर सरांकडून भरपूर चित्रे काढून घेतली. एका पानावर आठ ओळी आणि पान भरून चित्र असं पुस्तकाचं स्वरूप ठेवल. नुसती चित्रं बघत पान उलटवली तरी उक्रांती समजावी, असं या पुस्तकाचं स्वरूप. आता तर प्र.रा. आड्रे आर्डे, सांगली यांच्या प्रेरणेने या 76 कडव्यांचा व्हिडिओ बनवून घेतला.. कवितेच्या ओळी, त्याचं वाचन आणि बॅकग्राऊंडला कवितेच्या ओळींना पूरक कलरफुल चित्र.. असा व्हिडिओ बनवून घेतला. कोरोना चा काळ संपल्यानंतर शाळाशाळांतून मोठ्या स्क्रीनवर हा व्हिडिओ दाखवून मुलांना उत्क्रांतीची सुलभ माहिती द्यावी,त्यांचा त्यांचा विचार आहे.
‘संविधान ग्रेट भेट’.. मुलांसाठी अतिशय सोप्या भाषेमध्ये हसत खेळत संविधान सांगण्याचा प्रयत्न.. सविधान म्हणजे काय हे लहान असल्यापासून समजायला हवं, हा उद्देश या लेखनामागे आहे.
शिवाय वयात येणाऱ्या मुलींसाठी ‘प्रिय मुली’ आणि मुलांसाठी ‘बेटा, हे तुझ्यासाठी’ अशा पुस्तिका लिहिल्या.. बाकी कथा, कविता, कादंबरी, नाट्यछटा वगैरे लिहिले आहेच..
तुझी कमाल आहे बाई… कधी करतेस हे सगळं? वेळ कसा मिळतो?
बाईसाहेब वेळ कधी मिळत नसतो. तो काढावा लागतो. बैठक मारून बसावं लागतं. तेवढ मी करते.. आणि मला त्यात आनंद आहे.
व्वा! ही ऊर्जा कुठून येते? आणि यामागे प्रेरणा कोणाच्या? तुझे मार्गदर्शक कोण आहेत?
पुन्हा तेच तुझं.. उर्जा मिळत नाही, मिळवावी लागते. ती आपण आपल्या मार्गदर्शकांकडून घ्यायची असते.. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, ताराबाई शिंदे, डॉक्टर तारा भवाळकर मॅडम, मिळून साऱ्याजणी च्या.. विद्याताई.. ही यादी बरीच वाढवता येईल. अवतीभवतीच्या घटना.. स्वस्थ बसू देत नाहीत. सतत पाठीमागे लिहिण्याचा लकडा लावतात. मग मी लिहित जाते…आता पुरे.. बस्स झालं.
बरं बाई, पुढे तर पुरे.. आता आभार मानू का तुझे?
तू म्हणजे ना.. ? स्वतःच स्वतःचे कधी आभार मानायचे असतात का? पण बरं वाटलं, तुझ्याशी बोलल्यावर..
क्रमशः…
© सुश्री नीलम माणगावे
जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर
मो 9421200421
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈