मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसंवाद – फिरुनी नवी जन्मेन मी – भाग पहिला ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी

 ☆ आत्मसंवाद – फिरुनी नवी जन्मेन मी – भाग पहिला ☆ सुश्री सुमती जोशी ☆

सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, आकाशगंगा सारे आपापल्या मार्गाने वाटचाल करत असतात. तोच सूर्य आणि तोच चंद्र. तरीही सकाळ झाली की आपण म्हणतो सूर्योदय झाला. चंद्राच्या वाढत्या आणि कमी होणाऱ्या कला पाहून आपण रोज रात्री नव्यान चंद्र बघितल्याची  अनुभूती घेत असतो. मलाही स्वत:च्या बाबतीत तसंच काहीसं वाटलं. रोज उगवणारा दिवस वेगळा. त्या दिवसाची आव्हानं, कर्तव्य, कामगिऱ्या यात वेगळेपणा असतो. त्यानुसार आपण दिनचर्येत बारीक बारीक बदल करत असतो. एका तत्त्ववेत्त्याने म्हटलंय, आजचा मी कालच्या मीपेक्षा वेगळा आहे. वाटलं, बरोबर आहे. जीवनाच्या धकाधकीत येणाऱ्या नित्यनव्या अनुभवांमुळे आपली मतं बदलत राहतात. विशेषत: अडचणीच्या काळात आप्तेष्टांची खरी कसोटी होते. आपल्या भवतालाविषयी, मित्र, सखेसोयरे यांच्याविषयी आपले काही आडाखे असतात. अनुभवानुसार आपण त्यातही बदल करतच असतो. तेव्हा जीवनात ‘बदल’ हाच ‘नित्य’ असतो. कालची मी आज नाही. रोज माझा नव्यानं जन्म होत असतो, असा मला विश्वास वाटतो.

   संसारिक जबाबदाऱ्या काही प्रमाणात कमी झाल्या. मुलं आपापल्या शिक्षणात गुंतली होती. तेव्हा माझी मैत्रीण डॉक्टर मीना वैशंपायन हिने सुचवल्यामुळे मी मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीची आजीव सभासद झाले. टाऊन हॉलमधल्या त्या भव्य प्रांगणात शिरल्यावर अंगावर शहारे आले. मन भरून आलं. अगणित रॅक्स. ओळीने ठेवलेली लाखो पुस्तकं पाहिल्यावर लहान मुलाला खेळण्यांच्या भल्या मोठया दुकानात शिरल्यावर वाटेल, तशी माझ्या मनाची अवस्था झाली. तेव्हापासून पुस्तकांचं वेड लागलं. जगभरातली महत्त्वाची साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं आणि नामवंत लेखकांची पुस्तकं असा हा कितीही लुटला तरी न संपणारा खजिना. ज्ञात-अज्ञात लेखकांची पुस्तकं वाचली. नोबेल पारितोषिक मिळवलेल्या लेखकांची पुस्तकं वाचली, काही नजरली. सीमित जगातून मी या असीम जगात प्रवेश केला होता. इथे अनेक नामवंत लेखक, प्रकाशक, कवी, प्राध्यापक अशा ज्ञानी मंडळींची उठबस बघत होते. नवीन ओळखी होत होत्या. तिथेच भेटले निवृत्त चीफ म्युनिसिपल इंजिनिअर पी.जी. उर्फ नाना जोशी.

   नाना जोशी ‘नवी क्षितिजे’ नावाचं एक अनियतकालिक काढत असत. माझ्या मासिकासाठी लिहा, असा त्यांचा सततचा आग्रह. मी म्हणत असे, ‘आजवरच्या आयुष्यात मी एक ओळही लिहिली नाही. मला कसं लिहिता येईल?’ शेवटी विषय आणि त्याला लागणारं साहित्य देत ते मला म्हणाले, ‘हे वाचून भारतीय भोजनातल्या विलायती भाज्या असा दीर्घ लेख तयार करा’. मी बाचकतच कामाला लागले. माझा लेख त्यांच्या पसंतीस उतरला. हा लेखन प्रवास दीर्घकाळ चालू राहिला. चहा, कॉफी, कोको, साखर, मीठ..एक ना दोन. सगळ्यांचे इतिहास लिहून झाल्यावर नाना जोशी विविध शास्त्रीय लेख देऊन त्यावरून मराठीत लेख लिहायला सांगू लागले. डोरिस लेसिंग ही नावाजलेली ब्रिटीश लेखिका. तिच्या आत्मचरित्राचे दोन खंड आणि इतर अनेक कादंबऱ्या आमच्या वाचनालयात होत्या. नानांनी त्याचा परामर्श मला घ्यायला सांगितला. मायक्रोबायॉलॉजी आणि पॅथॉलॉजीचा डिप्लोमा, यानंतर संसारात बुडून गेलेली मी, साहित्याचा तसा वारा लागला नव्हता. तरीही माझ्या अल्प मतीला जमेल त्यानुसार मी तीही कामगिरी पार पाडली. नाना जोशी यांनी त्याचे पुस्तक प्रकाशित केले. त्यांच्या मनात अनंत विषयांची यादी तयार असे. पुढचा विषय होता डार्विनची उत्क्रांती

   दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे या समर्थांच्या उक्तीनुसार माझी कृती चालू होती. नवीन ज्ञानाची भर पडत होती. नवीन लेखक भेटत होते आणि मी रोज नव्यानं जन्म घेत होते.

क्रमश:….

© सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈