☆ जीवन रंग ☆ कथा- निरागस भाग-१ ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

हो, नाही करता-करता शेवटी शरयू ताईंचं ऑस्ट्रेलियात सिडनीकडं प्रस्थान झालं.  ज्योतीच्या लग्नाला सहा वर्षं होऊन गेली होती. ती आणि प्रकाश त्यांच्या कित्ती मागं लागायचे…. आमच्या संसार बघायला या म्हणून. पण दरवेळी काही ना काही कारणं निघायची आणि त्यांच्या पाय उंबरठ्यातच  अडखळायचा.

एकदा चार वर्षांची चिमुकली नात हर्षदा फोनवर बोलता- बोलता म्हणाली “बघ हं आजी, आता तुझी टर्न आहे तू आली नाहीस तर आम्हीपण येणार नाही इंडियात.”

त्या चिमुकलीचं रुसून गाल फुगवलेलं लोभस रुप त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. “नाही… नाही, आता कुठलंही कारण नाही. या डिसेंबरमध्ये मी तुमच्याकडे येणार म्हणजे येणारच” त्यांनी आश्वासन देऊन टाकलं.

शेवटी दुधापेक्षा दुधावरची साय जास्त प्रिय असते ,म्हणतात ना तसंच झालं. त्या मायेच्या ओढीनच त्या सिडनीला जाऊन पोहोचल्या. तिघेही एअरपोर्टवर रिसिव्ह करायला आले होते. हर्षुनं आजीला पाहताक्षणी तिचा ताबा घेतला.

“मी आजीजवळ बसणार बुस्टर सीटवर नाही” तिचा हट्ट चालू झाला. तिला समजवता-समजवता दोघांच्या नाकी नऊ आले.

“काय करणार? इथं लहान मुलांना एखादी चापटी मारणं तर दूरच सार्वजनिक ठिकाणी जोरात रागावूनही चालत नाही. न जाणो कुणी पाहून कंप्लेंट करायचं आणि आम्हाला फाईनचा भूरदंड पडायचा.” ज्योती म्हणाली.

शेवटी आजीचा हात घट्ट पकडून ठेवून बूस्टर सीटवर बसायला ती तयार झाली आणि मुलीच्या घरी माहेर पण अनुभवायला  शरयूताई तिच्या घरात दाखल झाल्या. दोन-तीन दिवस आराम झाला. नंतर ज्योतीने विकेंडला जोडून दोन दिवसांची रजाच टाकली.

“ए, तुझी गाडी बाहेर काढूच नकोस बाई आता. आपण बसनं नाही तर मेट्रोनंच हिंडू या. शहर, रस्ते कसे छान लक्षात राहतात” त्या ज्योतीला म्हणाल्या.

मग आजी, मुलगी, नात बस स्टॉप वर उभ्या राहिल्या. एक भली मोठी वोल्वो समोर येऊन थांबली. मोजून सात-आठ माणसं होती. सवयीप्रमाणे दार उघडल्या-उघडल्या शरयूतार्ई बसमध्ये चढायला पुढे सरकत होत्या.

“वेट् आजी !” हर्षदा त्यांचा हात घट्ट धरून म्हणाली.

“अगं बघ ना त्या दोन ओल्ड लेडीज खाली उतरताहेत. त्यांच्या हातात कित्ती सामान आहे . मी थोडी हेल्प करते त्यांना.” थोडी सारवासारव करत त्या ज्योतीकडे पाहून म्हणाल्या.

“आई अगं, उतरणारे सगळे लोक उतरल्याशिवाय पुढे जायचंच नाही आणि हेल्प-बिल्प म्हणत असशील ना, तर अशी चूक चुकूनही करायची नाही. तो त्यांना अपमान वाटतो”. ज्योतीनं समजावलं.

“सगळं वेगळंच बाई इथलं. मला जर कुणी सामान उतरवायला मदत केली असती ना तर धन्य धन्य वाटलं असतं मला. तोंडभर आशीर्वाद दिले असते मी त्या व्यक्तीला “शरयू ताई पुटपुटल्या.

“अगं इथं एकटी राहणारी माणसं … बायका, पुरुष आपण आपलं लाइफ मॅनेज करू शकतो असं वाटतं तोपर्यंत एकटे राहतात. कार चालवायचा कॉन्फिडन्स संपला तर बसनं  फिरतात आणि अगदीच होईनासं  झालं तर वृद्धाश्रमात राहायला जातात.”

शरयू ताईंच्या ज्ञानात हळूहळू भर पडत होती त्या टी शर्ट-शॉर्टस् घालणाऱ्या, बॉब केलेले केस हेअर फिक्सरनं व्यवस्थित सेट केलेल्या, आत्मविश्वासाने आपलं ओझं आपण उचलणाऱ्या स्त्रियाअन् आपल्या देशातील सीनियर सिटिझन्स बायका… आणि पुरुषही… या मधला नेमका फरक त्यांना जाणवला.

सकाळी हर्षुला प्री-स्कूल मध्ये सोडायला अन् दुपारी परत आणायला शरयू ताई जाऊ लागल्या .शाळा जवळ होती. सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच हे टाइमिंग. त्या मुदतीत केव्हाही सोडा आणि केव्हाही घेऊन जा. टाइमिंगच्या पाच मिनिटं आधी नाही की पाच मिनिटं नंतर नाही… त्या वेळेचा वेगळा चार्ज आकारला जायचा फी भरपूर आणि सगळं प्रोफेशनल.

शरयू ताईंना हिंडण्या- फिरण्यात गंमत वाटू लागली. आणि हर्षु ला आपल्या आजीला नाचवण्यात! संध्याकाळी आजी-नात फिरायला बाहेर पडायच्या. फिरणं म्हणजे रमणं-गमणंच असायच. हर्षु प्रत्येक बंगल्यासमोर लेटर बॉक्स वरील घर नंबर थांबून-थांबून वाचत चालायची.

क्रमशः…..

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments