☆ जीवन रंग ☆ कथा- निरागस भाग-२ ☆ सौ. सुनिता गद्रे ☆
पाच नंबरचा बंगला आला की म्हणायची, “आजी थांब इथं.” कंपाउंड मधून आत बघत आज किती रॅबिट दिसत आहेत. ते मोजायची 3…5..7.” बघून पुढं निघालं की एका बंगल्यात पक्षांचे पिंजरे-घर दिसायचं… तसच पुढं गेलं की एका ठिकाणी बोट दिसायची. पिसं, पानं-फुलं गोळा करत त्यांचं फिरणं चालू असायचं. एका ठिकाणी वेगळ्या जातीची गलेलठ्ठ मांजरी दिसायची. कधीतरी ती दिसली नाही तर फिस्-फिस्-फिस् करून बोलावलं जायचं.
‘आपण पण ती बरोबर असल्यामुळे बालपणात शिरलोय’ शरयुताई विचार करायच्या.
मुख्य स्वयंपाक संध्याकाळीच. त्याची जबाबदारी शरयू ताईंनी अंगावर घेतली होती. संध्याकाळी दोघं कामावरून दमून यायची आल्या-आल्या छान छान पदार्थ वेगळ्यावेगळा मेनू!सगळी मनापासून त्याचा आस्वाद घ्यायची.
हर्षदा ला सकाळी शाळेत सोडून त्या थोडं फिरायला जायच्या. ते पण रेल्वे स्टेशनच्या रस्त्याला. चार माणसं तरी जाता-येताना दिसायची. नाही तर रस्त्यावर नुसता शुकशुकाट! पण कोणी अनोळखी जरी समोर दिसलं तरी ‘विश’ केलं जायचं. गोरी, भुरी,काळी सगळीजणच असं करायची. त्यांनीही मोठी हिंमत करून ‘विश’ करायला सुरुवात केली. एक सरदारजी कुटुंब, एक गुजराती बा, एक बांगलादेशी औरत, एक फिजी इंडियन महिला. सगळ्यांशीच त्यांची ओळख झाली.गप्पा सुरू झाल्या.
आपण परदेशात राहतोय हे त्या विसरूनच गेल्या.
एकदा संध्याकाळी हर्षदा ला घेऊन त्या एका बागेत गेल्या होत्या. घसरगुंडी, झोपाळ्यावर तीचं खेळणं चालू होतं. तिथं ती फिजी इंडियन-संगीता-आपल्या मुलांना घेऊन आली होती. मुलं खेळत होती आणि त्या दोघी गप्पा मारत होत्या. फीजींची भाषा हिंदीच असते पण उच्चारात थोडा फरक, त्यामुळे शरयू ताईंना काही अवघड वाटले नव्हते. हर्षदा ते पहात होती. परत येताना रस्त्यात सरदारजी फॅमिली भेटली. “सत् श्रीअकाल” विश करुन थोड्याशा गप्पा सुरू झाल्या.
पुढे गेल्यावर हर्षदा त्यांना समजावण्याच्या सुरात सांगू लागली, “आजी फक्त मराठी लोकांशी बोलायचं. इतर कोणी इंग्लिश, फ्रेंच बोलत असलं ना तर त्यांच्याशी नाही बोलायचं. आईनंच मला सांगितलय. ती अंकल आणि ऑंटी मराठी होती का?”
“अगं बाई नाही. पण ती इंडियन होती ना. ती लोकं हिंदीत बोलत होती गं, आईला विचार ती पण सांगेल की हिंदी लोकांशी आपण बोलू शकतो म्हणून. “त्यांनी तिला समजावलं. घरी गेल्यावर त्यांनी खात्री करून घेतली.
“हो ग आई. “ज्योती म्हणाली. नंतर मोठे झाल्यावर बाहेरच्या जगाशी संपर्क आला की मुलांना इंग्लिश येईल पण मातृभाषा नाही ना येणार. म्हणून इकडे छोट्या शाळेत पण जोर देतात की घरात तुम्ही मुलांबरोबर मातृभाषेतच बोला. त्यामुळे हर्षुला बघ ना ,मराठी शिवाय इतर भाषा बोलता येत नाही. इंग्लिश थोडीशी समजते बस्स्. शिवाय इकडच्या मुलांचे संस्कार आणि आपले संस्कार यात फरक पडतो.समजा ती तीन-चार मुलं असली आणि आपलं एकटंच असलं तर ती फार आगाऊपणानं वागतात, दादागिरी करतात. म्हणून आम्ही आपलं सांगतो. फक्त आपल्या लोकांशी बोलायचं. इकडच्या लोकांना कसलाच रिस्पॉन्स द्यायचा नाही म्हणून…..बरं झालं बाई तुझी हिंदी भाषिकांची ओळख झाली ते. आता सहा महिने कसे जातील कळणार ही नाही” ती पुढे म्हणाली.
आजी नातीचं संध्याकाळी फिरायला जाणं मध्ये मध्ये गॅप पडत असली तरी चालूच होतं.
एक दिवशी शरयू ताई ज्योतीला सांगू लागल्या, “काय ग बाई आपलं हे पिल्लू !ते देशपांडे आजी-आजोबा भेटले होते. माझ्याशी बोलत होते. हिला किती प्रेमाने काही विचारत होते ,तर पठ्ठी चक्क पाठ करून उभी राहिली. त्यांच्याशी एक अक्षर पण बोलली नाही.
“हर्षु का ग बोलली नाहीस आजी आजोबांबरोबर” ज्योतीनं विचारलं.
“मला ना त्या दोघांची भीती वाटली” हर्षदाने सांगितले.
प्रकाश पण तिथेच होता. सासुबाईना दुजोरा देत तो म्हणाला “फार बेकार मुलगी आहे आई ही. मध्यंतरी एकदा आमच्या क्लबची क्रिकेट मॅच पाहायला तिला घेऊन गेलो होतो. तिथं माझा मित्र विथ-फॅमिली आला होता. हिनं साधा हाय-हॅलो पण केला नाही. ते हिचा फोटो काढायला लागले तर हाताने चेहरा झाकून टाकला हिने. आगावू कुठली!”
“आई अगं हीचं लाईक डिस् लाइकच फार जास्त आहे. कपडे, खेळणी, खाणं-पिणं आणि माणसं सगळ्यात तिची वेगळी त-हाचअसते.” ज्योती म्हणाली.
“असु दे. लहान आहे अजून. असतं एखादं मुल लहरी.” हर्षुला जवळ घेत त्या म्हणाल्या.
क्रमशः…..
© सौ. सुनिता गद्रे,
माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈