श्रीमती माया सुरेश महाजन

☆ जीवनरंग ☆ सौभाग्य चिन्ह ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

रोजच्याप्रमाणे भाजीवाल्या सुमनबाईने आरोळी दिली ‘‘बाईऽऽ भाजीऽऽ!’’ मी भाजीसाठी टोपली घेऊन बाहेर आले. तिने आपल्या हातगाडीवर भाज्यांपासून दूर एक मिठाईचा खोका ठेवला होता. तो उघडून एक पेढा माझ्या हातावर ठेवत म्हणाली, ‘‘घ्या तोंड गोड करा!’’

‘‘कोणत्या आनंदात ही मिठाई वाटते आहेस?’’ उत्सुकतेने विचारले.

‘‘माझी मुलगी इंजिनिअर झाली; पहिल्या वर्गात!’’ तिच्या चेहर्‍यावर आनंद झळकत होता.

‘‘अरे वा! ही तर खरच खूप आनंदाची गोष्ट आहे.’’ तोंडात पेढा टाकत मी म्हटले, ‘‘पुढे काय करणार आहे?’’

‘‘एक दोन वर्ष नोकरी मग लग्न!’’ तिने पण हसत सांगितले.

‘‘तिच्या वडिलांना पण खूप आनंद झाला असेल ना!’ मी म्हणाले, तशी तिच्या चेहर्‍यावर थोडेसे दु:ख पसरले.’’

‘‘हिची आई आणि वडील दोन्ही मीच!’’

‘‘काय? ते नाहीयत आता?’’

‘‘माहीत नाही! मी खूप अगोदरच सोडलंय् त्याला, माझी मुलगी नऊ-दहा वर्षांची होती तेव्हा!’’

‘‘काय झालं होतं?’’ मी विचारताच तिने इकडे-तिकडे पाहिले, तिच्या माझ्या-शिवाय कोणीत नव्हतं हळूच म्हणाली, ताई, पुरुष जर बायकोच्याच जीवावर दारू पीत असेल, मार-झोड करत असेल तर ती एक वेळ सहनही करेल; पण तो जर पोटच्या पोरीवरच वाईट नजर ठेवत असेल तर कोण सहन करेल! बस् मी त्याला सोडून इथे आले आणि भाजी विकून माझे व पोरीचे पोट भरू लागले.

‘‘पण तुझा मळवट भरलेला भांग, कुंकू, मंगळसूत्र हे सर्व…’’

‘‘हे त्याच्यासाठी नाही हे तर समाजात माणसाच्या रूपात फिरणार्‍या लांडग्यांसाठी आहे; ज्यांची जीभ एकटी, विधवा, घटस्फोटीत बाई पाहून वळवळते, हे सर्व घातल्याने काही प्रमाणात सुरक्षितता मिळते…’’ बोलता-बोलता तिचा स्वर परत एकदा सहज झाला होता.

 

मूळ हिंदी कथा – सौभाग्य चिन्ह – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4.7 3 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments