सुश्री सुमती जोशी
परिचय
- मायक्रोबायॉलॉजी या विषयात पदवी संपादन
- नवी क्षितिजे या नियतकालिकासाठी विविध विषयांवर लेखन
- २००४ साली ‘तीन पाश्चिमात्य लेखिका’ हे पुस्तक प्रकाशित झालं.
- २००९ साली ‘उत्क्रांती’ हे डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत सोप्या भाषेत समजावून सांगणारं पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित. राज्य पुरस्कारानं सन्मानित
- २०१० साली वयाच्या साठाव्या वर्षी बंगाली भाषा शिकले. त्यानंतर अनेक बंगाली कथा अनुवादित केल्या. ‘बंगगंध’ हे अशा कथांचं पुस्तक उन्मेष प्रकाशनातर्फे प्रकाशित. तिलोत्तमा मझुमदार यांनी लिहिलेली ‘वसुधारा’, सुचित्रा भट्टाचार्य यांनी लिहिलेली ‘तुटलेली तार’, स्मरणजित चक्रवर्ती यांनी लिहिलेली ‘आकाशप्रदीप’, चंचल कुमार यांनी लिहिलेली ‘काही जमणार नाही तुला’ या अनुवादित कादंबऱ्या उन्मेष प्रकाशनाच्या मेधा राजहंस यांनी प्रकाशित केल्या. मैत्र, संवाद सेतू, अक्षरधारा, हंस, अंतर्नाद अशा दिवाळी अंकात अनुवादित कथा प्रकाशित.
- वास्तव्य मुंबईचं पश्चिम उपनगर बोरीवली येथे.
☆ जीवनरंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 1) ☆ सुश्री सुमती जोशी ☆
पाठीवर मोठया बॅगेचा बोजा घेऊन अशोक कच्च्या रस्त्यावरून चालला होता. दोन्ही बाजूला हिरवी शेतं. कोवळी कोवळी रोपं वाऱ्यावर डुलत होती. थंडी पळाली होती. वसंताची चाहूल लागल्यामुळे हवेत उबदारपणा आला होता. अशोक घामानं निथळत होता. लहान चणीचा अशोक एका छोटया प्रकाशन संस्थेत पाठयपुस्तकांचा विक्रेता म्हणून काम करत होता. शाळा सुरू होण्याआधी तीन महिने विश्रांतीचं नावही घेता आलं नसतं. सारा दिवस वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन तिथल्या सरांना नवीन पुस्तकांच्या नमुनाप्रती द्यायच्या होत्या.
‘सर, आमची ही पुस्तकं बघता का? इतर पुस्तकांपेक्षा ती वेगळी आहेत.’
बहुतेक सर दोन-चार पानं उलटून गंभीर आवाजात म्हणत, ‘ठेवून जा. मग बघीन.’
‘पुन्हा कधी येऊ, सर?’
‘आणखी कितीतरी पुस्तकं आहेत. चाळायला वेळ लागेल.’
अगतिक होत अशोक पुन्हा प्रश्न विचारी, ‘तरीपण अंदाजे किती दिवसांनी येऊ?’
आता मात्र मान वर करून सर उलट प्रश्न विचारीत, ‘किती देणार?’
‘विक्रीच्या दहा टक्के.’
‘दुसरा एकजण पंधरा टक्के देणारेय.’
‘ठीक आहे, सर. मी पण तेवढेच देईन. शिवाय मी एखादी भेटवस्तूसुद्धा देईन.’
सरांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकतं, ‘बरंय, मग दोन आठवडयांनी ये. काय करता येईल, ते बघतो.’
अशी उत्तरे ऐकल्यावर अशोकला खूप वाईट वाटे. आईवडिलांखालोखाल प्रत्येक माणसावर ऋण असतं शिक्षकांचं. म्हणून तर…सुरुवातीला तोसुद्धा हे ऋण मानायचा, पण आता मात्र तसं होत नाही. त्याच्या प्रकाशनसंस्थेची पाठयपुस्तकं जिल्ह्यातल्या पाच शाळांमध्ये लावण्यात तो यशस्वी झाला होता. आणखी दोन-चार शाळांमध्ये तरी आपल्या पाठयपुस्तकांची वर्णी लावली पाहिजे, नाहीतर नोकरीवर केव्हा गदा येईल, ते सांगता येणार नाही, असं तो मनाला पुन:पुन्हा बजावत होता. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. आई आणि मुलगा, दोन तोंडाची व्यवस्था करावी लागे. गावच्या घरी जे काही थोडंफार असेल, त्यावर भागवता येत असे. पण सहा महिन्यांपूर्वी लग्न केलं आणि जबाबदारी एकदम कशी वाढली, ते अशोकच्या लक्षात आलं नाही.
पायाबरोबर मनातली विचारचक्रंही वेगानं फिरू लागली. गेले तीन दिवस पायपीट करत होता, पण एकाही शाळेत पुस्तकं खपवता आली नव्हती. सकाळीही तो एका शाळेत गेला होता, पण प्रवेशद्वारापासून शिपायानं ‘आमची पुस्तकांची व्यवस्था झालीय. आता आणखी पुस्तकं घेता येणार नाहीत.’ असं सांगून त्याला परतवून लावलं.
बस स्टँडपासून चालून चालून अशोक दमला होता. खेडेगावातल्या शाळांना भेटी देणं काही सोपं नव्हतं. बस मिळत नसे, रिक्षा नाही, सायकल मिळाली तर ठीक, नाहीतर टांगा टाकत चालत राहायचं! अशोकनं धप्प करून बॅग खाली टाकली आणि तो मटकन खाली बसला.
कशी कोणास ठाऊक, पण शिपायाला त्याची दया आली. म्हणाला, ‘तुला सोमेश्वर हायस्कूल बघता येईल.’
‘किती लांब आहे?’ अशोकनं विचारलं.
डांबरी रस्त्यानं गेलास तर खूप लांब आहे. पण नदीच्या काठानं गेलास तर लवकर पोचशील. मोठी शाळा आहे. खूप मुलं शिकायला येतात तिथे.’
दोन वर्षांपासून पाठयपुस्तकांच्या प्रचाराचं हे काम चालू होतं. सोमेश्वरनाथ शाळेचं नाव ऐकलं होतं, पण तिथे जायचं सुचलं नव्हतं. बॅगेचं ओझं पुन्हा एकदा खांद्यावर टाकून अशोक चालू लागला. थोडं पुढे गेल्यावर रस्त्यानं वळण घेतलं. माळरानातून जाणारी पायवाट. आजूबाजूला फारशी वस्ती नव्हती. एका बाजूला शेतं, कोवळ्या रोपांमुळे सगळीकडे हिरवगार दिसत होतं. दुसऱ्या बाजूला झाडापानांच्या पलीकडे दामोदर नदीचं पात्र दिसत होतं. नदीला फार पाणी नव्हतं. पाण्यापेक्षा वाळूच जास्त होती. उन्हात चमचम करत होती. पलीकडच्या तीरावर दूर अंतरावर झाडाझुडपात लपलेलं गाव दिसत होतं. नदीचं पाणी नागमोडी वळणं घेत वाहात होतं. कुठे कमी, कुठे जास्त. अनेक दिशांना पसरलं होतं. पात्रात मध्येमध्ये पाण्यात इंग्रजी व्ही अक्षरासारखे बांबूचे खुंट रोवून ठेवले होते. मासे जाळ्यावर आपटून व्हीच्या कोपऱ्यात गोळा होणार. एक कोळी जाळं टाकून मासे गळाला लागायची वाट बघत होता. जवळच्या काठीवर बसून पक्षी आशेनं जाळ्याकडे डोळे लावून बसला होता. एखादा तरी मासा मिळायची अधीर होऊन वाट बघत होता. अशोक थबकला. त्या दृष्याकडे काही काळ बघत राहिला आणि मनाशी काहीतरी पुटपुटत पुढे चालू लागला.
क्रमश: ….
श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.
अनुवाद – सुश्री सुमती जोशी
मोबाईल ९८३३२२२१०६. इ मेल आयडी [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈