सौ. सुनिता गद्रे

☆ जीवन रंग ☆ जिंदगी के साथ (भाग-4) ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

घरात बेला-सुदेश सोफ्यावर बसून होते. त्यांना जेवायचीच काय पण एकमेकांबरोबर बोलायचीही इच्छा होत नव्हती. अंथरुणावर पडले खरे, पण झोपच लागत नव्हती. तळमळत कुशीवर कुशी बदलणं चालू होतं. बेला उठूनच बसली. सुदेश ला विचारू लागली, “समिधा वाचेल ना रे. डॉक्टरांनी तर चोवीस तास धोक्याचे आहेत म्हणून सांगितलंय. “आठवल्यासारखं पुढं बोलू लागली,” तशी चांगली आहे रे ती… आता घर म्हणजे थोडं भांड्याला भांडं लागणार चकी…पण त्यामुळे एवढं मोठं पाऊल उचलायचं? बिचाऱ्या मीनूचा विचार पण डोक्यात आला नसेल?”  तिची बेचैनी बोलताना वाढतच चालली होती.

सुदेशनं तिला धीर देत थोपटलं.या सगळ्या गदारोळात कादंबरीचा शेवट होण्याऐवजी नवीन कादंबरीची सुरुवातच झालीय या विचारानं तो स्वतःशीच हसला. बेलाच्या हे गावीच नव्हतं. सुदेशला हसताना पाहून तिला आश्चर्य वाटलं,

“काय झालं?” तिनं विचारलं. काही नाही.. त्याने नकारार्थी मान हलवली.

“झोप आता. दमली आहेस खूप” तो म्हणाला.

**

बहुतेक पहाट झाली होती. किरण चा फोन आला.

“समिधाला शुद्ध आलीय. मी आणि प्रकाश हॉस्पिटलात चाललोय. तू येतेस ?”

“मी? हॉस्पिटलात? अजिबात नाहीss!” बेला एकदम ठामपणे म्हणाली. असा काय पराक्रम गाजवला ग तिनं की तिच्या दर्शनाला जायचं आपण?…. स्वतः आरामात ट्रीटमेंट घेत पडली असेल. डॉक्टर, चार चार नर्सेस तिच्या दिमतीला असतील…. आम्ही मात्र इथे रात्रभर तळमळत बसलोय. रागानं तिनं मोबाईल सोफ्यावर फेकून दिला. आपण एवढे का तिरसटतोय?… तिचं तिलाच कळेना. काल सकाळी मुरगळलेल्या पाय आता जोरात दुखू लागलाय म्हणून?… की बोजड झालेल्या समिधाला पूर्ण शक्तीनिशी ओढत नेल्यामुळे हात दुखताहेत म्हणून?… दिवसभराच्या विचित्र घटनाक्रमामुळं मन थकलंय म्हणून?… की रात्रभराच्या जागरणामुळं तारवटल्यागत झालंय म्हणून?… खरं कारण तिला जाणवलं नाही.तरी देहाला त्याची कल्पना होती.

तिच्या डोळ्यात एकदम अश्रू दाटून आले. सुदेशन तिला जवळ घेतलं. तिच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवत तो तिला धीर देत राहिला. थोड्यावेळाने अश्रू थांबले.

मन थोडं शांत झालं. सहज सोफ्यावरचा मोबाईल उचलून घेण्यासाठी तिनं हात पुढे केला. पण फोन बरोबर अर्धवट लिहून ठेवलेला एक कागद तिच्या हातात आला. ‘बरोबर! समिधानं वाजवलेली बेल ऐकून दरवाजा उघडायला आपण गेलो. तेव्हा हा कागद सोफ्यावर ठेवला होता.’ तिला आठवलं. कादंबरीचा संदर्भ आठवला.

थोडं नाराजीनं ती म्हणाली, “सुदेश मी पैज हरलेच की रे.”

“कसली पैज?” लक्षात आलेलं असूनही तो हसून म्हणाला.

“ती रे s…  कादंबरी पूर्ण  करायची.”

“वेडाबाई, जीवनातला एवढा थरार…. एक भयंकर नाट्य तू अनुभवलंस…  प्रसंगाला धैर्याने सामोरी गेलीस… कागदावरच्या साहित्यापेक्षा ते खूप मोठं काम होतं. हो ना बेला, अन् साहित्य काय, कला काय हे सगळं शेवटी मानवी जीवनासाठी, जीवन सुंदर बनवण्यासाठीच असतं ना?” सुदेश म्हणत होता.

तिचे डोळे चमकले. ती समाधानानं हसली मानेनच’ हो, म्हणाली.

“जिंदगीऔर मौत” यात काल एक भयंकर युद्ध चालू होतं. तू जिंदगीला साथ दिलीस. एका व्यक्तीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर ओढून काढण्यासाठी जीवाच्या शर्थीने प्रयत्न केलेस. अगं एकच काय पण असल्या दहा कादंबऱ्या जरी ओवाळून टाकल्या तरी त्या कमीच पडतील. तुझ्यातल्या माणुसकीनं सगळ्या पैजा तू जिंकल्या आहेस”….. सुदेशचा प्रत्येक शब्द तिच्या मनाला स्पर्शून जात होता. शांत झालेल्या तिच्या मनाला हे बोलणं कधीच संपू नये असं वाटत राहिलं.

समाप्त

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments