मराठी साहित्य – जीवन रंग ☆ सापळा…भाग 3 ☆ श्री आनंदहरी

 ? जीवनरंग ?

☆ सापळा…भाग 3 ☆ श्री आनंदहरी

एकीकडे त्याला मामाचं म्हणणं पटतही होतं.. बाबांना आताशा निभत नव्हतं हेही खरंच होते..दुसरीकडे किमान डी.एड. होणं हे त्याचं स्वप्न होते.. मार्क चांगले असल्यानं प्रवेशही सहज मिळत होता. तरीही तो फारसं काहीच न बोलता, थोडंसं नाराजीनंच मामाबरोबर गेला आणि त्याला मनातून आत्ता नोकरी करायला, लागायला नको असे वाटत असतानाही कापड गिरणीत नोकरी लागली.

ऑईल स्टेन रिमूव्हर म्हणून त्याला नोकरीवर हजर करून घेतलं होतं. तयार झालेल्या कापडावर पडलेले तेलाचे डाग काढायचं काम त्याला करायला लागायचं.. पगार होता साडेतीनशे रुपये.. तसा नाराजीनेच तो कामावर रुजू झाला होता पण पगाराचा आकडा ऐकून त्याची नाराजी थोडीशी कमी झाली होती. साडेतीनशे तेही एकरकमी. त्याच्यासाठी ती रक्कम तशी खूपच मोठी होती.

कापडवरचे तेलाचे डाग झटक्यात पुसून काढण्यासाठी जसे स्टेन रिमूव्हर असते  तसे परिस्थितीवरचे गरिबीचे, दारिद्र्याचे डाग पुसून काढण्यासाठी एखादं स्टेन रिमूव्हर असतं तर आपल्याला मनाजोगतं शिकता आलं असतं. असा विचार कधीतरी त्याच्या मनात तो एकटा असताना हमखास यायचा आणि तो विचार आला की तो उदास व्हायचा..

काळ हेच साऱ्यावरचं रामबाण औषध असते.. कालौघात कसलेही घाव, मनातली ठसठस कमी होत, भरले जातात.. काही दिवस गेले आणि तो आपल्या कामात रुळून गेला. कामातली सचोटी आणि प्राविण्य आणि कामाचा उरक पाहून काही महिन्यातच साहेबांनी त्याला बढती देऊन मोल्डर ची पोस्ट दिली.. कापड तपासणं, स्वीकारणं आणि दर्जा नसेल तर ते कापड नाकारणं..रिजेक्ट करणं हे काम त्याच्यावर सोपवलं. पगार ही वाढवला. तो खुश होता. नोकरीत रमला होता. मॅनेजर साहेब ही त्याच्या कामावर खुश होते पण असिस्टंट मॅनेजर वाडेकर मात्र त्याच्या कामावरून म्हणा किंवा उगाचच काही कारण नसताना त्याच्यावर खट्टू होते.. ते काही ना काही कारण काढून त्याला बोलायचेच.

काही दिवसांपूर्वी त्याच्या लक्षात आले होते की मिल मधून बाहेर पडताना गेटवरचे वॉचमन कामगारांना बाहेर सोडताना प्रत्येकाचे जेवणाचे डबे, पिशव्या तपासून पहायचे पण काही ठराविक कामगारांना नुसते तपासणी केल्याचं नाटक करुन बाहेर सोडत होते. त्याने काही दिवस जाणीवपूर्वक लक्ष ठेवले तेव्हा त्याला आपली शंका खरी असल्याचं जाणवलं आणि तो मनोमन अस्वस्थ झाला. काय करावं ? कुणाला सांगावं ? त्याला काहीच सुचेना आणि त्याला चैन ही पडेना. कुणाला बोललो आणि त्यात काही वावगं आढळलं नाही तर मोठी पंचाईत व्हायची आणि आपण नाहक अडचणीत सापडायचो हे ही त्याच्या ध्यानात आलं होतं.

एकेदिवशी काहीतरी निमत्तानं त्याला त्यातल्या एका कामगारांची डब्याची पिशवी पहायची संधी मिळाली. त्याने डबा उघडला आणि तो चक्क उडालाच. त्यात मिलच्या चांगल्या प्रतीच्या कापडाचे दोन दोन मीटरचे पाच सहा पीस लपवून ठेवले होते. त्याने ती गोष्ट वाडेकर साहेबांच्या कानावर घातली.

वाडेकर साहेबांनी त्या कामगार आणि वॉचमनवर काही कारवाई करायची सोडून त्यालाच समजावले होते. ‘ती लोकं खतरनाक आहेत उगाच त्यांच्या भानगडीत पडू नकोस नाहीतर ते तुलाच सापळ्यात अडकवतील ‘ असे समजवणीच्या सुरात सांगून अप्रत्यक्षरित्या त्याला धमकावले होते, घाबरवले होते. त्याला वाडेकर साहेबांच्या या बोलण्याचं, वागण्याचं आश्चर्य वाटले होते. वर ते त्याला म्हणाले होते.. ‘ तुला हवं तर तू घेऊन जा एखादा पीस तुझ्यासाठी.. पण मला बोललास तसे दुसऱ्या कुणाजवळ बोलू नकोस. काय माहीत, ज्या कुणाला बोलशील तो कदाचित त्यांना सामील असायचा आणि मग तूच अडचणीत यायचास.. गरीब आहेस, प्रामाणिक आहेस, आपण बरं की आपलं काम बरं..असाच रहा तरच इथं टिकशील.’

का कुणास ठाऊक पण वाडेकर साहेबांचं हे बोलणं त्याला खटकलं होतं. त्यांनी त्या लोकांना शिक्षा करायला हवी होती असे त्याला राहून राहून वाटत होते.. एक मात्र त्यानं केलं होतं तो ती गोष्ट दुसऱ्या कुणाजवळच बोलला नाही.

काही दिवसताच त्याला समजले होते की ती सगळी वाडेकर साहेबांचीच खास माणसं होती. त्यांना न तपासण्याबद्दल वॉचमनला पैसे मिळत होते तर तो माल बाहेर ठराविक ठिकाणी पोहोचवल्यावर त्या कामगारांनाही ठराविक पैसे मिळत होते. महिन्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा महिन्यात मिळणारी ती रक्कम जास्त होती. ते सारं समजताच त्याला तर धक्काच बसला होता.

वाडेकर साहेबांना बोलल्यापासून तो कुणालाही काही बोलला नसला तरी वाडेकर साहेबांचं मात्र त्याच्यावर लक्ष होतं. शेपटीवर पाय दिलेल्या सापासारखा त्यांनी त्याच्यावर डूख धरला होता. त्याला ते जाणवतही होतं पण तो बिचारा काय करणार?  अस्वस्थ मनानं पण आपण बरं आणि आपलं काम बरं असा तो वागत होता, तरीही त्याला सगळे माहीत झालंय असे वाटल्याने वाडेकर साहेबांना तो धोकादायक वाटू लागला होता आणि म्हणूनच तो कुठं चुकतोय काय, कुठं सापडतोय काय हे पहात त्याला पकडण्यासाठी वाडेकर साहेब सापळा लावून बसले होते. वाडेकर साहेबांच्या वागण्यातील बदल जाणवत असूनही तो मात्र या साऱ्यां बाबतीत अनभिज्ञ होता.

 क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈