मराठी साहित्य – जीवन रंग ☆ खेळायची खोली भाग १ ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी

☆ जीवन रंग ☆ खेळायची खोली भाग १  ☆ सुश्री सुमती जोशी ☆

काल दिवसभर उन्हाच्या तापाने कोलकाता शहर जळत होतं. चंद्रोदय सकाळी बाजारात जाऊन आला तेव्हा सकाळचे नऊ–साडेनऊ वाजले होते. या कडक उन्हामुळे शरीराची कातडी जळून जाईल, असं त्याला वाटू लागलं. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी चंद्रोदय सबंध आठवडयाचा बाजारहाट करत असे. उरलेल्या शनिवारी अर्धा दिवस सुट्टी असल्यामुळे त्याची बायको शुकतारा बाजारात जात असे. दोघं नोकरी करत. त्यांना एकच मुलगी – ‘रिद्धी’. तिचं डाकनाम ‘पाखी’. वय वर्षे पाच. ती आहे के.जी.च्या दुसऱ्या वर्षात. कधीकधी चंद्रोदय पण बहुतेक वेळा शुकतारा तिला सकाळी शाळेत सोडून येत असे. त्यानंतर तिला शाळेतून आणणं, आंघोळ घालणं, दुपारी जेवू घालणं, झोपवणं, संध्याकाळी बागेत घेऊन जाणं अशी सगळी कामं शुकताराची आई नंदिता करत असे. वडील वारल्यावर शुकतारा रिद्धीच्या या लाडक्या आजीला आपल्या घरी घेऊन आली. पाखीला स्वत:च्या आईपाशी सोपवून शुकतारा निर्धास्तपणे साडेचौदा हजार मिळवून देणाऱ्या नोकरीवर जाऊ शकत असे. धुणंभांडयांची बाई सोडली तर बाकी दिवसभर कोणी नोकर ठेवायची तिला गरज वाटत नसे. नंदिता तिच्या मुलीपेक्षा बावीस वर्षांनी मोठी होती. निसर्गदत्त सौंदर्याचा नजराणा तिच्यापाशी होता. प्रकृती स्वास्थ्याचंही तिला वरदान होतं.

बाजारहाट करून झाल्यावर चंद्रोदय ए.सी.लावून बेडरूममध्ये आडवारला. आला तेव्हा तो घामाने निथळत होता. बाजारातल्या धुळीने पाय माखले होते. लेंग्याच्या काठाला चिकटलेला भोपळ्याचा मऊ भाग आता वाळला होता. पाच मिनिटांनी शुकतारा खोलीत डोकावली आणि खोलीतलं दृश्य पाहून जवळ जवळ ओरडली, “काय हो, किती वेळा बजावलं तरी हातपाय न धुता, घामट कपडे न बदलता कॉटवर झोपलात ना?”

चंदोदय डोळे न उघडता नाखुशीने म्हणाला, “मी आणखी काही करू शकत नाही. हुश्श! किती उकडतंय! एकदा बाहेर जाऊन बघ म्हणजे समजेल काय भयंकर अवस्था आहे ते!”

त्याचं बोलणं फारसं मनावर न घेता शुकतारा म्हणाली, “तुम्ही अतिशयोक्ती करताय. रोजच उकडत असतं. याच उकाडयात रोज आपण ऑफिसला जायला बाहेर पडतो.”

रिमोटच्या मदतीने साऱ्या घराचं तापमान वीस अंश सेंटीग्रेड करून चंद्रोदयनं विचारलं, “आज मुलींच्या नाचाची रंगीत तालीम आहे का?”

“आज नाही. उद्या आहे.” यजमानांकडे तिरकस कटाक्ष टाकत शुकतारानं विचारलं, “का बरं एवढी चौकशी करताय?”

एका सेकंदाचा अवधी जाऊ न देता आवाज चढवत चंद्रोदय उत्तरला, “उद्या जर असाच उकाडा असला तर मी पाखीला बाहेर पडू देणार नाही. पोरीला काय कळतंय?”

“सगळं तुमच्या आदेशानुसार होणार नाही मिस्टर भट्टाचार्य.” शिरा ताणत शुकातारानं बजावलं, “उद्या त्यांची रंगीत तालीम आहे. उद्या जायलाच हवं. शाश्वतीदींनी पुन:पुन्हा बजावलंय. सुरुवातीपासूनच…”

त्याचा एक मुद्दा बरोबर होता, स्टेजवरच्या इतक्या लहानशा कार्यक्रमासाठी पाखीने एवढी मेहनत घ्यावी असं चंद्रोदयला वाटत नव्हतं. दर शनिवारी आणि रविवारी भर दुपारी साडेतीन वाजता शुकतारा बळजबरी करत लेकीला घेऊन जाई, हे योग्य नाही असं चंद्रोदयचं मत होतं.

गेल्या वर्षी सुकिया रोडवरच्या एका नाचाच्या क्लासमध्ये पाखीचं नाव घातलं होतं.  शाश्वतीदी त्या क्लासच्या सर्वेसर्वा. शुकतारा लहानपणी नाच शिकली होती. त्या शिक्षणाचा जीवनात काहीही उपयोग झाला नाही, हे समजत असूनही तिनं लेकीला नाचाच्या क्लासमध्ये घातलं होतं. मुलांना नाच, गाणं, पोहणं, विविध खेळ या सगळ्यात प्राविण्य मिळवून ऑल राउंड करायचं असतं. अशा आया सगळीकडे प्रवेश घेत पळापळ करत असतात. शुकतारा अशांपैकीच एक, याविषयी चंद्रोदयच्या मनात संदेह नव्हता. सुरुवातीपासून चंद्रोदय तिला रोखायचा प्रयत्न करत होता. पाखी मुळातच अशक्त होती. अधूनमधून दुखणी चालूच असायची. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाखीला काय किंमत मोजावी लागणार होती कोणास ठाऊक! आपलं स्वप्न साकारण्यासाठी आईवडील मुलांचं बालपण लुटून नेतात. तो शुकताराला वाईट म्हणत नव्हता, पण तिला जागं करायचा प्रयत्न करत होता. अर्थात या कामात तो रेषभरही पुढे सरकला नव्हता. तरीही त्यानं प्रयत्न सोडले नाहीत.

श्री हर्ष दत्त यांनी लिहिलेल्या ‘पाखिदेर खेलाघर’ या बंगाली कथेचा भावानुवाद

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈